Next
खायला काय आहे?
अमृता दुर्वे
Friday, January 11 | 04:00 PM
15 0 0
Share this storyखायला काय आहे? हा प्रश्न दोन्ही बाजूंना विचारात पाडणारा असतो. ते खाणं तयार करणाऱ्यालाही आणि ज्याला भूक लागलीय, त्या व्यक्तीलाही. ज्यांच्याकडे मुलं आहेत, त्यांना तर असा प्रश्न दिवसातून अनेकदा पडतो. विशेषतः डब्यात काय द्यायचं हा तर नेहमीचा प्रश्न. परंतु तुमच्या सोशल मीडियावर याचं उत्तर तुम्हाला मिळू शकेल.

फोटोज आणि कमी कालावधीचे व्हिडिओ ही इन्स्टाग्रामची खासियत. याच इन्स्टाग्रामवर काही फूड ब्लॉगर्स अगदी रंजक आणि साध्या-सोप्या पद्धतीने रोज काहीतरी नवी खवय्येगिरी पोस्ट करत असतात. यांना ‘फॉलो’ केलंत, तर इंटरेस्टिंग पदार्थांची उणीव कधीच भासणार नाही. यातल्या अनेकांचे ब्लॉग्स आहेत, फेसबुक पेजेस किंवा यूट्यूब चॅनल्स आहेत. मात्र इन्स्टाग्राम अकाउंट्सचा उल्लेख अशासाठी, कारण थोडक्यात माहिती मिळू शकते, किंवा कधी कधी नुसता फोटो किंवा लहानसा व्हिडिओदेखील पूर्ण कल्पना देऊन जातो.
 
Aditilunchbox / @Divya Iyer - डबा घेऊन घराबाहेर पडणाऱ्या कोणालाही डब्यात काय द्यायचं, याचा प्रश्न सोडवायचा असेल तर हे इन्स्टा हॅण्डल नक्की फॉलो करा. स्टीलच्या डब्याचा एक फोटो आणि त्यात तीन ते चार विविध पदार्थ. पण या अकाउंटच्या फीडवर एक नजर टाकलीत, की तुम्हाला त्यातलं वैविध्य लक्षात येईल. लहान मुलांना डब्यात देता येतील असे साधेसोपे शाकाहारी पदार्थ दिव्या अय्यर पोस्ट करते. पण लहान मुलंच काय मोठ्यांनाही असा दिसणारा डबा खायला नक्की आवडेल. मुख्य म्हणजे हे सगळे पदार्थ भारतीय आहेत. आपल्या नेहमीच्या आयुष्यातलेच आहेत. या अकाउंटला व्हिडिओ पोस्ट केले जात नाहीत. कारण रेसिपी देण्यापेक्षा, रोजच्या डब्यासाठीचे पदार्थ सुचवणं हा यामागचा हेतू आहे.

Funfoodandfrolic / Hina Bisht -
फोटो आणि व्हिडिओ दोन्ही असणारा हा इन्स्टा अकाउंट. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या अकाउंटवर तुम्हाला खूपसे संपूर्ण थाळीचे फोटो दिसतील. म्हणजे साग्रसंगीत बेत आखायचा असेल तर तुम्हाला भाजी-आमटी-पोळी-भात-लोणचं-पापड-गोड असा सगळा तयार मेन्यू या अकाउंटला मिळेल. शिवाय लहान लहान व्हिडिओंमधून एक अख्खी रेसिपीही या अकाउंटवर पाहायला मिळेल. यामध्ये भाज्या-भात वा पुलाव तर आहेतच, शिवाय विविध स्नॅक्सही आहेत.

Masterchefmom / Uma Raghuraman - तुम्हाला दाक्षिणात्य पदार्थ जास्त आवडत असतील तर हा ब्लॉग नक्की फॉलो करा. तोंडाला पाणी सुटेल असे छान फोटो आणि थोडक्यात दिलेली रेसिपी. दाक्षिणात्य पदार्थांसोबतच इतरही अनेक पदार्थ या अकाउंटवरून शेअर केले जातात.

Archanaskitchen - ब्रेकफास्ट, लंच, डिनर आणि मधल्यावेळचं खाणं यासाठीचे विविध पदार्थ सुचवणारा हा इन्स्टाग्राम अकाउंट. शिवाय या अकाउंटवर तुम्हाला विविध पदार्थांच्या रेसिपींचे व्हिडिओदेखील पाहायला मिळतील. खाद्यपदार्थांचं वैविध्य ही या अकाउंटची खासियत म्हणावी लागेल. कारण इथे तुम्हाला खाकऱ्यापासून ते पुदिना लस्सी ते ख्रिसमस केक ते विविध मांसाहारी पदार्थ सापडतील.

Thegutlessfoodie / Natasha Diddee - या अकाऊंटमागची व्यक्ती या इन्स्टाग्राम हँडलइतकीच इंटरेस्टिंग आहे. ट्युमरमुळे नताशाचं मोठं आतडं काढून टाकावं लागलं. असं होऊनही तिच्यातली खवय्येगिरी तिने कोमेजू दिली नाही. गटलेस फूडी म्हणजे पोटच नसणारा खवय्या अशा नावानं तिनं ब्लॉगिंग करायला सुरुवात केली. या इन्स्टा हँडलवरचे फोटो पाहून भूक लागते. वेगवेगळ्या पदार्थांनी सजलेलं पूर्ण ताट आणि खाली त्या सगळ्या पदार्थांची माहिती, अशा स्वरूपाच्या बहुतेक पोस्ट इथे असतात. त्याशिवाय मध्येमध्ये विविध पाकशैलींमधले (Cuisine) पदार्थ आणि त्यांची रेसिपीही नताशा पोस्ट करत असते. पराठ्यांपासून वडापाव, बर्गरपासून रोस्टेड चिकनपर्यंत सगळंच इथे आहे.

Hebbar’s Kitchen - सगळ्यात सोशल मीडिया फ्रेंडली अकाउंट असं हेब्बर्स किचनबाबत म्हणता येईल. कारण दोन मिनिटांच्या लहानशा व्हिडिओमध्ये तुम्हाला इथे अगदी एखाद्या रेसिपी दाखवणाऱ्या कार्यक्रमासारखीच सगळी पद्धत पाहायला मिळेल. विविध प्रकारचे भारतीय शाकाहारी पदार्थ इथे आहेत. यात नाश्त्याचे पदार्थ आहेत, डेझर्ट्स आहेत आणि जेवणातले मुख्य पदार्थही आहेत.

Lifewithspices - जेवणासाठीचे विविध मेन्यू, डब्यासाठीचे पदार्थ, स्नॅक्स, ब्रेकफास्टचे पदार्थ असं सगळं एकाच अकाउंटवर तुम्हाला इथे सापडेल. शिवाय भारतीय पदार्थांसोबतच इतरही शैलींचे पदार्थ इथे पोस्ट केले जातात. हेल्दी शाकाहारी जेवण ही या अकाउंटची खासियत आहे. जेवणासाठीच्या विविध मेन्यूचे फोटो इथे आहेत. तर लहान व्हिडिओंमधून रेसिपी दाखवल्या जातात.

ही सगळी हौशी लोकांची इन्स्टाग्राम अकाउंट आहेत. बहुतेकांनी नवीन पदार्थ करून बघायची हौस म्हणून हे सोशल मीडिया अकाउंट सुरू केले.  अशी अनेक इन्स्टा हँडल्स तुम्ही फॉलो करू शकता. किंवा जर काही ठरावीक हॅशटॅग फॉलो केलेत, तरीदेखील तुम्हाला वेगवेगळ्या युजर्सनी टाकलेल्या पोस्ट पाहता येतील. बहुतेक फूड ब्लॉगर्ससाठी इन्स्टाग्राम हे थोडक्यात कन्टेन्ट सांगायचं माध्यम आहे. त्यामुळे त्यांच्याच फेसबुक किंवा यू-ट्यूब किंवा ब्लॉगपेजवर तुम्हाला सगळ्या गोष्टी तपशिलात वाचता येऊ शकतात. शिवाय अनेक प्रसिद्ध शेफ आपल्या अकाउंटवर अतिशय रंजक माहिती पोस्ट करू शकता. ते इन्स्टाग्राम अकाउंटही फॉलो करता येतील.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link