Next
बलिप्रतिपदा
दा. कृ. सोमण
Friday, November 02 | 02:19 PM
15 0 0
Share this story

गुरुवार, ८ नोव्हेंबर, कार्तिक शुक्ल प्रतिपदा, दिवाळी पाडवा, बलिप्रतिपदा.  या दिवशी विक्रम संवत २०७५ या नूतन वर्षाचा प्रारंभ होणार आहे. विक्रम संवत हा उज्जयिनीस विक्रमादित्य राजाने सुरू केला. बलिप्रतिपदा हा साडेतीन मुहूर्तंंापैकी एक दिवस मानला जातो. व्यापारी लोक बलिप्रतिपदेपासून हिशेब लिहिण्यास प्रारंभ करतात.  या दिवशी पत्नी पतीला ओवाळते. पती तिला मौल्यवान वस्तू भेट देतो. कुटुंबातील नाती दृढ व्हावीत, प्रेम वाढावे यासाठी सणांमध्ये योजना केलेली आहे. म्हणूनच ही ओवाळण्याची पद्धत पडली. ज्याला ओवाळायचे त्याचे आयुष्य वाढते अशी समजूत आहे.

बलिप्रतिपदेच्या दिवशी बलीची पूजा केली जाते. बली हा असुर म्हणजे राक्षस असला तरी तो सत्त्वसंपन्न होता. अनेक चांगले गुण त्याच्या अंगी होते. बलीने स्वर्गावर स्वारी केली तेव्हा सगळे देव स्वर्गातून बाहेर पडले. आता कोणत्याही प्रकारे बलीला नष्ट करणे आवश्यक आहे हे इंद्राने विष्णूला पटवून दिले. विष्णूने अदितीच्या उदरी बटू वामनाच्या रूपाने जन्म घेतला. वामनाने बलीकडे तीन पावले जमीन मागितली. बलीने तीन पावले दान देण्याचे उदक सोडले. वामन एकाएकी मोठा होऊ लागला. त्याने दोनच पावलात त्रिभुवन व्यापले व तिसरे पाऊल कुठे ठेेवू असे विचारले. बलीने आपले मस्तक पुढे वाकविले. वामनाने तिसरे पाऊल बलीच्या मस्तकावर ठेवून सप्त पाताळांंपैकी सुतलात पाठवले. वामनरूपी विष्णू बलीला म्हणाले, “सुतलात मी तुझा द्वारपाल होईन व माझे चक्र तुझे संरक्षण करील. आजची तिथी कार्तिक शुक्ल प्रतिपदा आहे. ही तिथी बलिप्रतिपदा म्हणून ओळखली जाईल आणि आजपासून लोक या तिथीला तुझी पूजा करतील. वामनाची आज्ञा मानून बली सुतलात गेला. रामायणातही बलीच्या चांगल्या गुणांचे वर्णन आढळते.

बलिप्रतिपदेच्या दिवशी ‘गोवर्धनपूजा’ करावी असे सांगण्यात आले आहे. पर्वतामुळे पाऊस पडतो ही वैज्ञानिक गोष्ट त्या काळात  श्रीकृष्णाने लोकांना सांगितली होती. बलिप्रतिपदेच्या दिवशी काही मंदिरांमध्ये ‘अन्नकूट’ करण्याची प्रथा आहे. गावातील प्रत्येक जण आपापल्या घरून एक खाद्यपदार्थ मंदिरात आणतो. ते सर्व खाद्यपदार्थ एकत्र ठेवून त्यांचा नैवेद्य दाखवून नागरिक एकत्र बसून ते पदार्थ खातात. बलिप्रतिपदेपासून नूतन विक्रम संवत् वर्षाचा प्रारंभ होत आहे. आपणही मनाशी चांगल्या गोष्टींचा संकल्प करुया.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link