Next
चंदेरी दुनिया
विशेष प्रतिनिधी
Friday, November 02 | 04:00 PM
15 0 0
Share this story
दिवाळीचा आनंद कुटुंबासोबतच


दिवाळी संपूर्ण कुटुंबासोबत, विशेष करून माझ्या दोन लेकी आणि पत्नीसोबत साजरी करायला खूप आवडतं. मनोरंजनविश्वात ३० वर्षांपासून कार्यरत आहे. सुरुवातीच्या काळात कामामुळे मला कुटुंबासोबत दिवाळी साजरी करता आली नाही. तेव्हा दिवाळीतही चित्रपटांचं चित्रीकरण असायचं त्यामुळे घरापासून दूर असायचो. दिवाळी माझ्यासाठी कायमच खास आहे, कारण दिवाळीच्या मुहूर्तावर पहिला चित्रपट  मिळाला होता. तो चित्रपट होता ‘रेशीमगाठी.’त्या वर्षीची दिवाळी आम्ही त्या चित्रपटाच्या सेटवरच साजरी केली होती. ‘झी मराठी’ सुरू झालं आणि मालिकांचं चित्रीकरण मुंबईतच होऊ लागलं. तेव्हापासून घरच्यांसोबत दिवाळी साजरी करण्याचा आनंद घेता येऊ लागला. यावर्षी आम्ही मालाडच्या काही शाळांत जाऊन फराळ वाटणार आहोत. त्या मुलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद आमच्यासाठी मोठा असेल.मला चकल्या आणि करंज्या विशेष प्रिय आहेत. आमच्या कुटुंबाची दिवाळी ही इकोफ्रेंडली असते. यंदा सर्वांनी प्रदूषणविरहित दिवाळी साजरी करावी, आवाज आणि धूर करणारे फटाके फोडू नका, असं आवाहन मी सर्व वाचकांना करीन.

़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़


कुटुंबासोबत आनंद साजरा करायचा सण

लहानपणी दिवाळी आल्यावर प्रचंड उत्साह असायचा. माझ्या बाबांची कामानिमित्त महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी बदली व्हायची. त्यानिमित्तानं मलाही विविध भागांत दिवाळी कशी साजरी करतात हे पाहता आलं. पुढे आम्ही कायमस्वरूपी नाशिकला स्थायिक झालो. लहानपणी मातीचा किल्ला बनवण्यात जी मजा होती तिला तोड नाही. मला अजून आठवतंय बाबा माझ्यासाठी आणि मोठ्या बहिणीसाठी फटाके आणायचे. आम्ही अक्षरशः त्याचे दोन वाटे करायचो. बॉम्ब, लवंगी माळ,आवाजाचे फटाके मी घ्यायचो तर फॅन्सी फटाके ती घ्यायची. मला अनारसे प्रचंड आवडतात. ते मामी अहमदनगरहून खास माझ्यासाठी घेऊन यायची आणि आई घरी फराळ बनवायचीच. असं अनेकदा व्हायचं, की मी आईला फराळ पुन्हा बनवायला सांगायचो. लहानपणी मी आईला चकली बनवायला मदत करायचो. हात दुखायचा तरीही उत्साह कमी व्हायचा नाही. आता बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत आणि काही गोष्टी वेळेअभावी शक्यही होत नाहीत. मुळात आता ध्वनी, वायूप्रदूषणाचं महत्त्व कळल्यामुळे फटाके आणायचंच बंद केलं आहे.  कितीही बिझी असलो तरी पाडवा आणि लक्ष्मीपूजनाला मी नाशिकला जातोच. यंदाच्या दिवाळीत माझ्यापेक्षा सुखदा जास्त बिझी असल्यानं बघुया नाशिकला जायला मिळतंय का? लक्ष्मीपूजनचा पूर्ण दिवस आणि पाडव्याचा अर्धा दिवस या दीड दिवसांत घरी धावती भेट तरी देऊन येईनच. यानिमित्तानं नातेवाईक, मित्रमंडळी भेटतात. मागील अनेक वर्षांपासून मी भाऊबीज केलीच नाही. त्याची कसर मी नंतर भरून काढतो. यंदा मी बाबांसाठी इलेट्रॉनिक गॅझेट घेतलं आहे तर सुखदासाठी तिच्या आवडीच्या रंगाची साडी घेतली आहे. दिवाळीत सर्वत्र रोशणाई असते त्यामुळे मी गोरेगावच्या घरी नसताना संध्याकाळी तिथे आकाशकंदील, पणत्या लागतील, याची सोय करून ठेवतो. दिवाळी म्हणजे माझ्यासाठी कुटुंबासमवेत आनंद साजरा करणारा एक सण आहे.

़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़


फटाक्यांपासून लांबच!
लग्न झाल्यानंतर दिवाळी सण मी खऱ्या अर्थानं साजरा करू लागले. दिवाळी असली की चकली, लाडू असे फराळाचे सर्व पदार्थ मला करायला फार आवडतात. दिवाळीच्या निमित्तानं नवीन कपडे घेणं, कंदील लावणं असो वा घर सजवणं असो, हे सर्व करायला मला खूपच आवडतं. दिवाळीच्या निमित्तानं सर्व मंडळी एकत्र येत असल्यानं घरात उत्साहाचं वातावरणं असतं. सणासुदीच्या काळात बऱ्याचदा चित्रीकरण नसतं. जरी असलं तरी मी घरी लवकर येण्याचा प्रयत्न करते...
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला लहानपणापासूनच फटाके उडवायला अजिबात आवडत नाही. कारण लहान असताना फटाके लावताना माझ्या हाताला दुखापत झाली होती. तेव्हापासून फटाक्यांबद्दल मनात भीतीच असल्यानं फटाक्यांपासून मी चार हात लांबच असते. फटाक्यांमुळे प्रदूषण होत असल्याचं लक्षात आल्यानंतर तर मी फटाके फोडणं टाळतेच. प्रदूषण टाळण्यासाठी फटाके फोडणं टाळा आणि इकोफ्रेंडली दिवाळी आनंदानं साजरी करा, असं  आवाहन मी चाहत्यांना या निमित्तानं करीन.

़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़

लहानपणीची दिवाळी न्यारी!
यंदाची दिवाळी कुठल्यातरी आदिवासी पाड्यामध्ये किंवा ज्यांना घर नाही अशा अनाथ मुलांसोबत साजरी करण्याचा माझा विचार आहे. त्यानिमित्तानं त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून दिवाळी खरोखरच साजरी केल्याचा आनंद अनुभवता येणार आहे. मला फराळातील चकल्या खूप आवडतात. जेव्हा चकल्या तयार केल्या जातात तेव्हा गरमागरम चकल्यांवर मी यथेच्छ ताव मारतो.  दिवाळीत सगळ्या कुटुंबानं, मित्रमंडळींनी एकत्र जमून दिव्यांच्या या उत्सवाचा आनंद द्विगुणित करायला हवा, असं मला वाटतं.  बऱ्याचदा असं होतं  की कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वत:च्या घरी फक्त दिवा लावून बाहेर पडतो, आणि ऐन दिवाळी दुसऱ्याच्या घरी साजरी करतो. तेव्हा मनाला खूप हुरहुर वाटते. अशावेळी लहानपणाच्या बऱ्याच आठवणी मनात दाटून येतात… पहाटे उठायचं, अंघोळ करायची, नवीन कपडे घालायचे. आता तो आनंद उपभोगता येत नाही. ती मज्जा कुठेतरी हरपली आहे… काळ बदलतोय, वेळही बदलते आहे… त्यातच आपणही आनंद शोधायला हवा… दिवाळीमध्ये फटाके फोडून ध्वनी आणि वायूप्रदूषण करण्याऐवजी एकमेकांच्या सान्निध्यात राहून हास्याचे, आनंदाचे फटाके जरूर फोडा असं आवाहन मी सर्वांना या दिवाळीच्या निमित्तानं करत आहे.

़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़


नातीमुळे दिवाळी खास
अगदी लहान असल्यापासून दिवाळी हा सण माझ्यासाठी कायमच खास आहे. यंदाची दिवाळी तर माझ्यासाठी फारच खास आहे, कारण या वर्षी आमच्या घरात माझ्या नातीचं, जिजाचं आगमन झालं आहे. यंदाची तिच्यासोबतची आमची पहिली दिवाळी आहे. त्यामुळे आम्ही सर्वच दिवाळीची खूप आतुरतेनं वाट पाहत आहोत.
दिवाळी माझ्यासाठी व माझ्या परिवारासाठी फार महत्त्वाची असते. आम्ही सर्व एकत्र येऊन  दिवाळी साजरी करतो. दिवाळीत मी, आदिनाथ, ऊर्मिला  शक्यतोवर घरीच राहतो. त्यानुसार आम्ही आमचं शेड्युल ठरवतो. प्रत्येकानं आपल्या कुटुंबासह दिवाळी साजरी करावी असं मला वाटतं. आम्ही दिवाळी अतिशय पारंपरिक पद्धतीनं साजरी करतो. दिवाळीमध्ये आमच्या घरी विशेष फराळ असतो. त्यात एक विशेष पदार्थ असतो तो म्हणजे  शिंगण्या. हा पदार्थ चवीला अतिशय उत्कृष्ट लागतो. शिंगण्या करण्यात माझी बायको अतिशय तरबेज आहे.

दरवर्षी आम्ही दिवाळी पर्यावरणपूरक पद्धतीनं साजरी करतो. तशीच यंदाही करणार आहे. तुम्हीसुद्धा यंदाच्या दिवाळीपासून फटाके न फोडण्याचा संकल्प करा, असं माझं आवाहन आहे.

़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़

आईला गिफ्ट देणार!

दिवाळी म्हणजे एकदम धमाल. पहिल्या अंघोळीला लवकर उठायचं, अभ्यंगस्नान करायचं आणि देवळात जायचं. त्यानंतर शाळा-कॉलेजमधील मित्रांना भेटायचं, त्यांच्यासोबत नाश्ता करायचा किंवा मग जेवायला जायचं, असा प्लॅन ठरलेलाच असे. मागच्या तीन-चार वर्षांपासून मी पाडव्याच्या दिवशी निघणाऱ्या शोभायात्रेत मित्रमंडळींसोबत सहभागी होत आहे. वेगळीच मजा असते ती. लहानपणी फटाक्यांचे आकर्षण होतं. परंतु आता मी फटके फोडण्याच्या विरोधात आहे. माहीत नाही माझी यंदाची दिवाळी कुठे असेल, सेटवर की घरी? सुट्टी मिळाली तर या वेळी माझं प्रथम प्राधान्य माझ्या कुटुंबाला असणार आहे. मग मित्रमंडळींना. दिवाळीची खरेदी माझी आधीच झाली आहे. त्यातूनही वेळ मिळाला तर नक्कीच पुन्हा खरेदी करेन.  या दिवाळीला मला आईसाठी एखादी चांदीची किंवा सोन्याची वस्तू घ्यायची आहे. असा विचार तरी आहे, बघू कितपत शक्य होतंय ते. दिवाळीत फारसं नातेवाईकांकडे येणं-जाणं होत नाही, मात्र भाऊबीजेच्या दिवशी आम्ही एखाद्या नातेवाईकाकडे सगळेजण आवर्जून एकत्र येतो. मला भरपूर चुलत, मावस, मामेबहिणी आहेत. त्यामुळे त्यांची खरेदी आईच बघते. दिवाळीत सर्वात जास्त आवडतो तो फराळ. मला चिवडा, चकली खूप आवडते. त्यातही आजीच्या हातचे रवा-बेसनचे लाडू म्हणजे अप्रतिम चव. लहानपणी मी येताजाता हे लाडू खायचो.
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़

अभ्युदयनगरच्या आठवणी!
दिवाळीच्या आदल्या दिवशी बाबा आमच्यासाठी फटाके घेऊन यायचे आणि त्याचं  तिन्ही भावंडात वाटप व्हायचं. हे फटाके आम्ही शाळेच्या ॲल्युमिनियमच्या बॅगेत ठेवून द्यायचो आणि ते इतर कुणी घेऊ नये, म्हणून त्याला कुलूपही लावायचो. पहाटे पहिला ॲटम बॉम्ब कुणाचा फुटणार, याचीही स्पर्धा लागायची. दिवाळीत कपडे शिवण्यातही चुरस असायची. कारण आदल्या दिवसापर्यंत शर्ट तयारच नसे. रात्री दोन वाजेपर्यंत शिंप्याच्या डोक्यावर बसून ते शिवून घ्यायचे. लहानपणी अभ्युदयनगरमध्ये अनुभवलेली दिवाळी काही औरच होती. चाळीतील सर्वजण एकत्र येऊन दिवाळी साजरी करायचे, फराळाची देवाण-घेवाण व्हायची, एकमेकांना फराळ बनवायला मदत करायचे. आम्ही आईला फराळ करायला मदत करायचो. चाळीतील सर्वांचे कंदील एकाच रंगाचे असायचे. दिवाळीच्या दिवशी लवकर उठून, नवीन कपडे घालून जवळच असलेल्या राममंदिरात जायचं आणि मग मित्रांसोबत मजा करायची.
आता दरवर्षी दिवाळीच्या पहिल्या दिवशी बोरीवलीला भावाच्या घरी जातो. तिथे बाबांनी बनवलेल्या मिसळीची हमखास मेजवानी असते. त्यानंतर ओवाळणी वगैरे. सुचित्राला पाडव्याला काय द्यायचं हे ठरलेलं नाही, परंतु देणार हे नक्की. दिवाळीत कुटुंबासोबत वेळ घालवायचा, असं ठरवलं तरी आहे. आवाजाचे फटाके वाजवणं कटाक्षानं टाळतो. घरात पाळीव प्राणी असल्यानं त्यांच्यावर काय दुष्परिणाम होतात, हे सोहमलाही माहीत असल्यानं  तोही फटाके फोडत नाही.

़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़

आजोबांची परंपरा जपली आहे
दिवाळीत आजोबांपासून चालत आलेली परंपरा आम्ही आजतागायत जपली आहे. दिवाळीच्या पहिल्या अंघोळीला पहाटे लवकर उठायचं, आई उटणं लावणार, ओवाळणी करणार आणि फराळ झाल्यावर देवळात, मठात जायचं, असा वर्षानुवर्षं सुरू असलेला आमचा दिवाळीचा कार्यक्रम. आम्ही दोन भाऊ असल्यानं माझा भाऊ बाहेरचं सर्व बघायचा आणि मी आईला फराळ बनवायला मदत करायचो. लहानपणी फटाके भरपूर फोडायचो. आता लक्ष्मीपूजनाला पूजा झाल्यावर एखादी लवंगी माळ लावतो. दिवाळीत जमेल तेव्हा सोनं घेतो. शूटिंगमुळे खरेदीसाठी वेळ मिळत नसल्याने आईच माझ्यासाठी खरेदी करते. दिवाळीत मी कुर्ता घालतो. दिवाळी निमित्तानं  घरातील सर्व सदस्य, नातेवाईक,मित्रपरिवार एकत्र येतो. आमची भाऊबीजही जोरदार असते. घरी भाऊबीज साजरी करतो आणि रात्री जेवायला बाहेर जातो.

़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़

उत्सुकता दिवाळीची!
आमच्या घरी डोंबिवलीला दिवाळी एकदम दणक्यात साजरी होते. यंदाची दिवाळी माझ्यासाठी विशेष आहे. कारण खुशबूची लग्नानंतरची ही पहिली दिवाळी आहे आणि ती संग्रामसोबत घरी येणार आहे. त्यामुळे या दिवाळीची उत्सुकता आहे.
दिवाळीला घराची सजावट, पणत्या लावणं, रांगोळी काढणं या सर्व गोष्टी मी आवडीनं करते. पूर्वी आम्ही सोसायटीमध्ये सर्वजणी एकत्र रांगोळी काढायला बसायचो. दोन-अडीच तास गप्पांची मैफल रंगायची... पण आता वेळेअभावी ही मजा अनुभवता येत नाही. घरी असताना फराळ बनवायला आईला मदत करायचे. विशेषतः करंज्या बनवायला. करंजीवर कातणी फिरवताना खूप मजा यायची. चकली मात्र कधीच जमली नाही. आता डाएटच्या बाबतीत जागरूक झाल्यानं मी जास्त फराळ खात नाही आणि आई-बाबांनाही खाऊ देत नाही. डोंबिवलीतील दिवाळीपहाट उत्साहवर्धक असते. दिवाळीच्या पहिल्या दिवशी फडके रोडवर तरुणाईचा जल्लोष उसळतो. मी अस्सल डोंबिवलीकर असल्यानं तिथं दरवर्षी जाते. त्यानिमित्तानं शाळेतील मित्रमैत्रिणींशीही भेट होते. यंदाच्या वर्षीही जाण्याचा विचार आहे, पाहू या कसं जमतं ते…

लहानपणापासूनच मला फटाक्यांची फारशी आवड नव्हती. लहान असताना खुशबू केसांना गंगावण लावून फटाके फोडायला गेली होती आणि तिचं गंगावण जळून गेलं. तेव्हापासून माझ्या मनात फटाक्यांबद्दल भीतीच आहे.

संकलन : कपिल देशपांडे, योगिता राऊत


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link