गेला आठवडा बऱ्याच घडामोडींनी भरलेला होता. माहिती अधिकार दुरुस्तीविधेयकापाठोपाठ तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयक संसदेत संमत झाले आणि त्यानिमित्त वाद सुरू झाला. त्यापाठोपाठ महाराष्ट्रात पक्षांतराची... पक्षांतराची म्हणण्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात सामील होण्याची मोठी साथ आली. आणि आता कॅफे कॉफी डेचे संस्थापक, मालक व्ही. जी. सिद्धार्थ यांच्या आत्महत्येची धक्कादायक बातमी आली. एवढ्या मोठ्या उद्योजकाने ज्या परिस्थितीत आत्महत्या केली ती परिस्थिती अधिक चिंताजनक आहे. या सर्व घटनांचे पडसाद बराच काळ उमटत राहणार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद बहुमत मिळविल्यानंतर भाजपविरोधी पक्षांत खळबळ माजलेली आहे. भाजपचे नेते व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जबरदस्त प्रचार व आरोपप्रत्यारोप झाल्यानंतरही मतदारांनी त्यांच्या पक्षाला जे भरघोस मतदान केले त्यामुळे येत्या काळात होणाऱ्या राज्यांच्या निवडणुकांतही भाजपलाच लोक मतदान करतील असा होरा सर्वजण मांडत आहेत. त्यामुळे सतत सत्तेच्या वळचणीला राहून राजकारण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. कारण सत्तेच्या आसपास राहून त्याचे फायदे लाटण्याची सवय या मंडळींना झाली आहे. त्यातच गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचा पार धुव्वा उडाला आहे, त्यामुळे या पक्षात राहून सत्तेचा मलिदा लाटणारी मंडळी भयभीत झाली आहेत. त्याची दोन कारणे आहेत. एकतर सत्तेत राहून जी माया जमविली आहे तिची चौकशी सत्ताधारी पक्षात गेलो तर होणार नाही असे त्यांना वाटत आहे आणि दुसरे कारण म्हणजे, सत्तेजवळ राहिलो तर आपले उद्योग नीट चालू राहतील अशी त्यांची धारणा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात रांगा लावून सामील झालेल्यांची नावे पाहिली तर धक्का बसल्याशिवाय राहणार नाही, कारण हीच मंडळी भाजपला जातीयवादी, बहुजनविरोधी वगैरे ठरविणारी आहेत. यातल्या बहुतेकांनी राजकीय सत्तेच्या जोरावर आपल्या भागात शैक्षणिक संस्था, साखर कारखाने वगैरे स्थापून साम्राज्ये निर्माण केली आहेत. येती पाच वर्षे सत्तेच्या बाहेर राहिलो तर ही साम्राज्ये टिकवणे अवघड आहे, हे या मंडळींना चांगलेच माहीत आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वालाही या पक्षांतराच्या लाटेमागची कारणे माहीत आहेत, पण सध्या त्यांना निर्वेधपणे विधानसभा निवडणूक जिंकायची आहे. ही निवडणूक झाल्यानंतर हे आयाराम काय करतात व भाजपत त्यांचे स्थान काय राहते ते स्पष्ट होईल. सध्या भाजप आणि आयाराम या दोघांसाठी पक्षांतराची साथ सोयीची आहे. संसदेने माहिती अधिकार दुरुस्ती व तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयक मंजूर केले. माहिती अधिकार दुरुस्ती विधेयकामुळे जनतेला मिळालेला माहितीचा अधिकार बोथट झाला आहे, असा विरोधकांचा आक्षेप आहे, त्यात कितपत तथ्य आहे, याची चर्चा करणारा लेख ‘झी मराठी दिशा’च्या या अंकात प्रसिद्ध करण्यात आला आहे, तो वाचकांसाठी उद्बोधक ठरेल. तिहेरी तलाक विधेयकाची योग्यायोग्यता याचीही चर्चा याच अंकात केली आहे. तिहेरी तलाक विधेयकामुळे मुस्लीम स्त्रियांना मनमानी पद्धतीने घटस्फोट देण्याच्या पद्धतीला आळा बसणार आहे. असा तलाक दिला तर तुरुंगवासाची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे व त्याला काही लोकांचा आक्षेप आहे, परंतु अशी शिक्षा नसली तर या विधेयकाची अंमलबजावणीच होणे अवघड आहे. वाचकांनी याबाबत आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवाव्यात.