Next
मोटारसायकलवरून विश्वप्रदक्षिणा
मिलिंद वि. आमडेकर
Friday, November 30 | 05:00 PM
15 0 0
Share this story

चाकाचा शोध ही मानवी उत्क्रांतीला गती देणारी घटना होती. त्यात पुढे सायकल आणि नंतर मोटारसायकल भटक्यांना खुणावू लागली, त्यांना दुचाकीवरून जगभ्रमंतीचं स्वप्न पडू लागलं. महिलाही त्यात मागे नव्हत्या. अॅनी लंडनडेरी हिनं १२५ वर्षांपूर्वी सायकलनं एकटीनं जगप्रदक्षिणा पूर्ण केली, तर  मोटारसायकलनं एकटीनं प्रदक्षिणा करण्याचा प्रयत्न एल्सपेथ बियर्ड या लंडनच्या महिलेनं केला.
एल्सपेथ बियर्डनं ३ ऑक्टोबर १९८२ रोजी आपली BMW R60/6 ही दणकट मोटारसायकल लंडनहून न्यू यॉर्ककडे जाणाऱ्या बोटीत चढवली आणि न्यू यॉर्कहून आपल्या जगप्रदक्षिणेला सुरुवात केली. एल्सपेथ १७व्या वर्षी मोटारसायकल चालवायला शिकली. नंतर तिनं स्कॉटलंडची परिक्रमा, इंग्लंडची परिक्रमा आणि पुढे युरोपमध्येही तिनं एकटीनं प्रवास केले होते. त्या प्रवासांचा अनुभव तिच्या गाठीशी होता. असं असलं तरी जगप्रदक्षिणेची गोष्टच वेगळी होती. आधीच्या प्रवासामध्ये जगप्रवास करू शकू, असा विश्वास तिला वाटू लागला होता. त्याच सुमारास तिचा प्रेमभंग झाला. ते दु:ख विसरण्यासाठी तिला लंडनपासून दूर जायचं होतं. तेव्हा तिनं अर्धवेळ नोकरी करून साठवलेले अडीच हजार डॉलर सोबत घेतले. अनेकांनी तिला प्रायोजकत्व नाकारलं. ती जगप्रदक्षिणेचं आव्हान पेलू शकेल, असा विश्वास कोणाला वाटत नव्हता. त्यामुळे तर एल्सपेथ जिद्दीला पेटली.
सुट्टीच्या दिवसांत ती मोटारसायकल पूर्णपणे दुरुस्त करायला शिकली. ती जगप्रवासाला जाण्यासाठी तिनं  आर्किटेक्चरचं तिसरं वर्ष सोडून दिलं. न्यू यॉर्कहून ती उत्तरेकडे कॅनडात गेली. तिथून नायगारा पाहून ती डेट्रॉईटला आली. ३५ वर्षांपूर्वी त्या काळात मोटारसायकलवरून येणाऱ्या तरुणाला बघून सगळे धास्तावायचे, ते मॅडमॅक्स टाइपच्या टोळीवाल्यांचे दिवस होते. ते अनेक वेळा गडबड गोंधळ करत असत. एल्सपेथ लेदरजॅकेट, हेल्मेट वापरत असे. त्यामुळे ती दुरून पुरुषच वाटे. हेल्मेट काढल्यावर तिचे लांब केस पाहून सगळे आश्चर्यचकित होत असत. मग प्रश्न सुरू होत. त्यांची उत्तरं देताना तिला अवघडल्यासारखं होई.
अमेरिकेत न्यू मेक्सिको राज्यातून जात असताना पाच मोटारसायकली तिच्यामागून येताना तिला दिसल्या. ती गँग झपाट्यानं तिच्याजवळ येत होती. हेल्मेटमधून तिचे केस बाहेर दिसत होते. त्यामुळे ते अधिकच चेकाळले होते. एक जण डाव्या तर एकजण उजव्या बाजूला, तर एक जण तिच्या पाठीमागून तिच्या गाडीला खेटून, असे गाडी चालवत होते. त्यांचा इरादा एल्सपेथला लुटण्याचा, तिच्यावर बलात्कार करण्याचा होता. एल्सपेथनं गाडीचा वेग वाढवला. ८०, ८५, ९० किलोमीटरच्या वेगानं ती गाडी पळवत होती. त्यांचा वेग हळूहळू कमी पडायला लागला. एका वळणावर तर तिनं त्यांना मागेच टाकलं. तिनं वेग कमी केला नाही. ती तशीच सुसाट पुढे निघून गेली आणि त्यांच्या तावडीतून बचावली. तिनं लॉस एन्जेलिस गाठलं. तिथून ती ऑस्ट्रेलियातील सिडनी बंदरात आली. त्यापूर्वी तिनं संपूर्ण न्यूझीलंड देशही पाहून घेतला होता. ऑस्ट्रेलियात तिनं काही काळ नोकरी केली. पैसे जमवले आणि मग ती ऑस्ट्रेलियाच्या प्रवासाला निघाली.
तिथं तिची ओळख टॉम व इवान या दोन तरुणांशी झाली. ती दोघंही मोटरसायकलनं ऑस्ट्रेलिया फिरायला निघाली होती. ती पुढे आणि ते मागे असे ते जात. टाउन्सव्हिलेहून माउंट इसाकडे जात असताना रस्त्यावरच्या एका खड्ड्यामुळे ती जोरदार आपटली. तिच्या बाईकनं तीन-चार कोलांट्या खाल्ल्या. ती फेकली गेली आणि रस्त्याकडेच्या खड्ड्यात पडली. मागून येणाऱ्या टॉम आणि इवाननं लगेच तिला खड्ड्यांतून बाहेर काढलं. सुदैवानं मागून एक ट्रक आला. त्यातून तिची गाडी त्या दोघांनी एका फार्महाउसवर नेऊन ठेवली. तिला न्यायला अॅम्ब्युलन्स आली. तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं. डॉक्टरांनी सांगितलं, हेल्मेटमुळे तुझे प्राण वाचले. जोरदार आपटल्यामुळे हेल्मेटचा एक तुकडा पडला होता. तिचं अंग खरचटलं होतं. काही दिवस उपचार घेऊन तिनं गाडीही दुरुस्त केली. पुढच्या वाटेत कांगारू तिच्या बाजूनं उड्या मारत पळत असत. मध्येच ते रस्त्यावर येत. कशीबशी ती त्यांना धडकण्यापासून स्वतःला सावरे. वाहनांच्या धडकेमुळे मेलेल्या कांगारूंचे मृतदेह रस्त्याच्या कडेला पडलेले असत. त्यावर अनेक प्रकारच्या माश्या घोंगावत. त्यांच्याजवळून पुढे जाताना त्या एकदम झुंडीनं त्या अंगावर येत. त्याची किळस वाटे. त्रास होई, पण उपाय नसे.
ऑस्ट्रेलियातला मोठा प्रवास संपवून तिनं पर्थहून इंडोनेशियाच्या बाली बेटामार्गे जावा, सुमात्रा, मलेशिया या देशांतून थायलंडमध्ये प्रवेश केला. तिथं रस्त्यात अचानक एक कुत्रा आल्यानं ती जोरात पडली. तिची बाईक झाडावर आदळली. रस्त्याकडेच्या खड्ड्यात ती फेकली गेली. तिला बरंच लागलं. हा अपघात एका गावापाशी झाल्यानं तिच्या मदतीला लोक धावून आले. तिला एका घरात नेलं. भाषेची अडचण असूनही खाणाखुणांनी सगळं होत होतं. गाडीचे निखळलेले भाग गोळा करून ती दुरुस्त करावी लागली. त्या कुटुंबानं तिला तीन दिवस ठेवून घेतलं. निघताना ती घराच्या मालकिणीला भेटायला गेली. तेव्हा तिला दिसलं, की आपल्या गाडीखाली मेलेल्या कुत्र्याचं मांसच तीन दिवस आपण खात होतो. तिला एकदम मळमळूनच आलं, पण आता विचार करण्यात अर्थ नव्हता. पेनांग बंदरातून बोटीनं पाच दिवस प्रवास करून ती मद्रासला (आताचं चेन्नई) उतरली. अत्यंत गलिच्छ अशा त्या बोटीच्या प्रवासात झुरळं, उंदीर सुखेनैव फिरत होते. अस्वच्छ संडास, कळकट वस्तू, अशातून तो प्रवास झाला. कारण पैसे वाचवायचे होते. २८ एप्रिल १९८४ रोजी ती मद्रासला उतरली. रेल्वेत तिची बाईक टाकून ती कलकत्याला निघाली.  कारण पुढे नेपाळमध्ये काठमांडूला तिला तिचे आईवडील भेटायला येणार होते. दोन वर्षांत ते भेटले नव्हते.
मद्रास ते कलकत्ता प्रवासाचा तिला खूप मनस्ताप झाला. कलकत्त्याला सनातन नावाच्या तरुणानं तिला खूप मदत केली. कलकत्याहून ती पाटण्याला आली. तिथं तर एका लॉजवाल्यानं तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. कसंबसं त्याला बाहेर ढकलून तिनं कडी लावून घेतली, पण त्या खोलीच्या छताला असलेल्या भोकातून तो तिला पाहतच होता. तिनं दिवे मालवले. सकाळी कोणीही उठायच्या आत ती तिथून निसटली. वाटेत कुठे थांबलं, की लगेच माणसं गोळा होत. तिला स्पर्श करायला बघत. हपापलेल्या नजरांनी सतत बक्षीस मागत. पाटण्याहून ती काठमांडूला पोहोचली. दोन दिवसांनी तिचे आईवडील आले. त्यांना एल्सपेथचा वेडेपणा मान्यच नव्हता. त्यामुळे ती व्यथित झाली. तरी दोन आठवडे ती त्यांच्याबरोबर राहिली. नंतर तिनं अन्नपूर्णा शिखरांची प्रदक्षिणा पायी पूर्ण केली. नंतर काठमांडूहून गोरखपूर, वाराणसी, खजुराहो, ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर, जोधपूर, जैसलमेर, बिकानेर, दिल्ली, सिमला, श्रीनगर, लेह, अमृतसर अशी ती भारतात फिरली. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर उसळलेल्या दंगलीचा तिला त्रास झाला. खोट्या कागदपत्रांनी ती पाकिस्तान शिरली. त्यावेळी तिला पाकिस्तान भारतापेक्षा बरं वाटलं. भारतातल्या नोकरशाहीनं तिला खूप त्रास दिला.

५ सप्टेंबर १९८४ रोजी ती लाहोरला पोहोचली. या प्रवासात रॉबर्ट हा सहप्रवासी तिच्याबरोबर होता. पाकिस्तानातून अफगाणिस्तान करत ते इराणपर्यंत आले. इराणमध्ये १९७९ साली इस्लामिक क्रांती झाल्यानं तिथले कायदे महिलांच्या बाबतीत कडक होते. त्यात इराण-इराकयुद्धाचं वातावरण. त्यामुळे लोक सतत संशयानं पाहत. कधी पाऊस, धुळीची वादळं, बेदरकार ट्रक ड्रायव्हर या सगळ्यांना तोंड देत ती तुर्कस्तान आणि पुढे युरोपमार्गे २२ नोव्हेंबर १९८४ रोजी लंडनला पोहोचली. २१ देश, ७९९ दिवस, आणि ३५,००० मैल इतका तिचा प्रवास झाला. या दरम्यान तिला दोन वेळा हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. जीवघेण्या आजारातून ती वाचली. दोन जीवघेणे अपघात तिला झाले. तिच्या प्रवासाची टिपणं तशीच पडून होती. ३४ वर्षांनंतर, २०१७ साली तिच्या प्रवासाचा वृत्तांत ‘लोन रायडर’ या नावानं पुस्तकरूपानं प्रसिद्ध झाला. मोटारसायकलनं जगप्रदक्षिणा करणारी ती पहिली महिला ठरली.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link