Next
मुक्त संचाराचा असीम आनंद
कॅप्टन (निवृत्त) दिलीप दोंदे
Friday, June 07 | 12:15 PM
15 0 0
Share this story


हिंदी महासागर, प्रशांत महासागर, अटलांटिक महासागर अशी नावे आपण लहानपणापासून भूगोलाच्या पुस्तकात वाचलेली असतात. नकाशावर बोट ठेवून आपण विविध देश आणि महासागरांची नावे शोधत असतो. परंतु प्रत्यक्षात मात्र महासागरांना अशा वेगळ्या सीमा कधीच नसतात, हे सागरसफर करू लागल्यावर आपल्याला उमजते. सागरपरिक्रमेच्या दरम्यान तर मला जगभरातील महासागरांचा अनुभव घेता आला, तेव्हाही हीच गोष्ट ठळकपणे लक्षात राहिली. दृश्य स्वरूपातल्या सीमा इथे अजिबातच नसल्यामुळे ज्याला जिथे जायचे तिथे जाण्याचे स्वातंत्र्य असलेले मुक्त क्षेत्र असते आणि महासागर हे खरे सीमाविरहित आदर्श जग असते.

 नौदलात रुजू होण्यापूर्वीही मी भारतीय द्वीपकल्पासभोवतीच्या समुद्राचे दर्शन घेतले होते. त्यामुळे अगदीच समुद्राशी ओळख नव्हती, असे नाही. भारतीय नौदलात प्रवेश केल्यानंतर पहिली काही वर्षे माझे कार्यक्षेत्र हिंदी महासागरापुरते होते. १९९५ मध्ये नौदलाच्या युद्धनौकेवरून दक्षिण चीन समुद्र आणि प्रशांत महासगरातून मार्गक्रमणा करण्याची संधी मला मिळाली. अगदी प्रांजळपणे सांगतो की विविध महासागरांमध्ये तेव्हाही मला काही फरक जाणवला नाही. सागरी दिशादर्शनाच्या नकाशांवर (नॉटिकल चार्ट) आपण आपले स्थान निश्चित करत नाही, तोपर्यंत आपण नेमक्या कोणत्या महासागरात आहोत, ते सांगणेही एखाद्याला अवघड जाईल, असा अनुभव मला आला. संपूर्ण पृथ्वीवरचा सागर एकच आहे आणि केवळ मानवानेच भूगोल, हवामानशास्त्र यांचे मापदंड लावून या सागरांना विविध नावे दिली आहेत.

महासागरात जाण्यासाठी दर्यावर्दींना परवानगी लागते का किंवा परदेशातील समुद्रात प्रवेश करण्यासाठी व्हिसा लागतो का, असा प्रश्न मला लोक अनेकदा विचारतात. भूभागाविषयी आपण जो विचार करतो, त्याचेच प्रतिबिंब या प्रश्नामागच्या मानसिकतेत दिसून येते. भूभागावर आपण कुठेही गेलो, तर त्यावर कुणाची ना कुणाची मालकी असते किंवा ताबा असतो. ती जमीन कुठल्या ना कुठल्या देशाची असते. अगदी नगाधिराज हिमालय, सहाराचे वाळवंट किंवा अमेझॉनचे घनदाट जंगल हेही त्यातून सुटलेले नाही. तिथेही मालकी किंवा ताब्याविषयी मानवाने तयार केलेले कायदे लागू होतात. विशाल महासागरांविषयी कायदे करताना तरी मानवाला त्याच्या खुजेपणाची जाणीव झाली, एवढे तरी बरे, म्हणायचे. म्हणूनच आता महासागरावर स्वार होताना कुणाला कुणाची परवानगी घेण्याची गरज नसते, केवळ विदेशातील किनाऱ्यावर प्रवेश करतानाच माणसाला व्हिसा किंवा प्रवेशाचा परवाना आवश्यक ठरतो.

एकूणच जगभरात विविध ठिकाणच्या प्रवेशावर दिवसेंदिवस निर्बंध येत असताना असे मुक्तसंचारस्वातंत्र्य असणे, ही बहारच म्हणायला हवी, नाही का? कोणत्याही अडकाठीविना जगातील दुसऱ्या भागाशी जोडलेले राहण्याचे स्वातंत्र्य आपल्याला समुद्र देत असतो. अर्थात दुसऱ्या बाजूने असेही असते की समुद्राच्या एका भागात काही झाल्यास त्याचे उद्ध्वस्त करणारे परिणाम शेकडो मैल दूरवर दुसऱ्या भागातही भोगावे लागतात. प्लास्टिक किंवा प्रदूषणकारी पदार्थ पसरणे किंवा ग्लोबल वॉर्मिंगमुळे वाढलेले तापमान ही त्याचीच काही उदाहरणे.

जितके स्वातंत्र्य अधिक तितकी जबाबदारीही जास्त. महासागरांनी तर आपल्याला भरभरून दिले आहे. एखाद्या दर्यावर्दीकडे जर सुसज्ज शिडनौका असेल, तर तो अक्षरशः एक पैसाही खर्च न करता विश्वभ्रमंती करू शकतो. त्याच्या नौकेच्या शिडात भरण्यासाठी मुबलक वारे महासागरात विनामूल्यच उपलब्ध असतात, त्याला जीव जगवण्यासाठी अन्नही मिळू शकते आणि पावसाचे शुद्ध पिण्यायोग्य पाणीही भरपूर प्रमाणात. शिवाय आपले मन भरेपर्यंत भ्रमंती करण्याइतके अथांग सागरी क्षेत्रही त्याला उपलब्ध आहे.

 म्हादेई नौकेवरून पहिली भारतीय विश्वसागरपरिक्रमा करताना मी याचा पुरेपूर आनंददायी अनुभव घेतला. त्यात महासागरांविषयी मला काय वाटले, काय अनुभव आले, हेही यानिमित्ताने सांगायलाच हवे. महासागरांच्या आखीवरेखीव सीमा निश्चितच नाहीत. परंतु वेगवेगळ्या महासागरांचे वेगवेगळे मूड आहेत. ते वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे असतात. विषुववृत्तापासून आपण जेवढे दूर जातो, तेवढे तापमान कमी होत जाते. मग तो कोणताही महासागर का असेना. दक्षिण महासागरात नक्कीच हवामान प्रतिकूल होते. कारण जगभर घोंघावणाऱ्या वाऱ्यांना आणि लाटांना अटकाव करण्यासाठी तेथे भूभाग फारच कमी आहे.

समुद्रात कुठेही वादळ आले, तरी भल्याभल्या दर्यावर्दींच्याही नाकी नऊ येऊ शकतात. इथेही पुन्हा विषुववृत्ताच्या जवळ असल्यास ही वादळे थोडी सुसह्य असतात. कारण तिथे समुद्राचे पाणी थोडे कोमट असते. त्यामुळे तुमच्या अंगावर समुद्राच्या लाटांचा मारा झाल्यास विषुववृत्तापासून दूरच्या क्षेत्रात तुम्हाला जो गोठवणारा अनुभव येतो, तितका इथे येत नाही. इतकेच. पर्यावरण, जलजीवन या दृष्टीने मात्र विविध महासागरांमध्ये फरक असू शकतो व या महासागरांमधील फरक ओळखण्याचा हा एक मापदंड असू शकतो.

प्रशांत आणि अटलांटिक या दोन्ही महासागरांमध्ये मार्गक्रमणा करताना मी मोठ्या तांत्रिक मर्यादांचा सामनाही केला. दर्यावर्दी जर एकटा असेल, तर तो शिडनौकेवर किती ठिकाणची व्यवधाने एकटा सांभाळणार? त्यासाठीच सुकाणू धरण्याकरता माझ्या म्हादेई नौकेवर दोन इलेक्ट्रॉनिक ऑटोपायलट देण्यात आले होते. अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतरात दोन्ही ऑटोपायलट बंद पडले. सुदैवाने त्याला पर्याय म्हणून नौकेवर विंड वेन सेल्फ स्टिअरिंग नावाचे आणखी एक यंत्र बसवण्यात आले होते. इलेक्ट्रॉनिक ऑटोपायलट हाताळण्यास सोपे-सुटसुटीत असल्याने हे यंत्र मी तोवर वापरले नव्हते. मात्र इलेक्ट्रॉनिक ऑटोपायलट नादुरुस्त झाल्यावर मला या यंत्राची साथ मिळाली. थोडे श्रम घेतल्यावर हे यंत्र वाऱ्यानुसार नौकेची दिशा ठेवते. पर्यायच नसल्याने हे यंत्र वापरण्यास मी शिकलो आणि दोन मोडक्या ऑटोपायलटच्या जिवावरही प्रशांत आणि अटलांटिक महासागर पार करून जाणे मला जमले. बहुधा महासागर तुम्हाला प्रतिकूलतांवर मात करायलाही शिकवत असावा.

  विश्वसागरपरिक्रमेतला आणखी एक अनुभव सांगायचा म्हणजे महासागरांच्या दृश्य परिणामांविषयीचा. भूभागानुसार प्रत्येक महासागराचे सौंदर्यही बदलत जाते. उदाहारणार्थ, निरभ्र आभाळ असताना, तुम्ही पश्चिमेकडून किंवा वायव्येकडून केप टाऊनच्या दिशेने प्रवेश केलात, तर टेबल माऊन्टनचे ग्रॅन्ड विस्ता हे सर्वात मनोहारी दृश्य असते. त्याचप्रमाणे गेल्यावर्षी मी आर्क्टिक महासागरात शिडनौकेवरून गेलो, तेव्हाही ग्रीनलँडमधील स्कॉर्स्बी सन्डमध्ये प्रवेश करतानाचे दृश्य मोठे विलोभनीय होते. बर्फाचे आच्छादन लाभलेल्या ग्रीनलँडच्या शिखरांवरून महासागरात बर्फ भुरभुरत होते, हे दृश्य काही वेगळेच भासत होते. अर्थात त्यामुळे एक महासागर दुसऱ्यापेक्षा सुंदर असतो, असे होत नाही. प्रत्येक महासागराला त्याच्या त्याच्या वाट्याचा मनोरम भूभाग लाभलेला असतो आणि तोच त्याचे सौंदर्य खुलवतो.

महासागर असे विविध रूपांनी आपल्याला भरभरून देत आले आहेत. त्यामुळेच आपणही त्यांचे देणे लागतो. महासागर स्वच्छ ठेवणे आणि त्यांना मर्यादेपलिकडे न लुटणे हे आपले कर्तव्य ठरते. समुद्रसंवर्धनाच्या कामात सहभागी होण्याइतका प्रत्येकाकडे वेळ किंवा रुची नसेलही, प्रत्येकाने त्यात पडणे गरजेचेही नाही. आपण समुद्रात घाण टाकली नाही किंवा समुद्र आणि किनारे प्रदूषित केले नाहीत, तरी भरपूर होईल. एवढा एक साधा नियम जरी आपण सर्वांनी पाळला, तरी आपल्या महासागरांचे स्वास्थ्य टिकून राहील आणि त्यातील साधनस्रोत आपल्याला कित्येक पिढ्यांसाठी वापरता येतील. प्रत्येकाला काही महासागरांवर स्वार होऊन परिक्रमा करणे जमणार नाही. परंतु किनारा जर स्वच्छ असेल, तर समुद्रकाठी साधी फेरी मारणे, ताजी हवा अंगावर घेणे हा अनुभवही ताजातवाना करणारा ठरेल. तेव्हा आपले समुद्र, किनारे आणि नद्या यांच्यात घाण, केरकचरा न टाकण्याची सवय लावून घेऊन जागतिक महासागरदिन साजरा करूया.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link