Next
बॅडमिंटनमध्ये ‘डबल्स’धमाका!
नितीन मुजुमदार
Friday, August 23 | 03:30 PM
15 0 0
Share this story

भारतीय बॅडमिंटन आणि भारतीय टेनिस यांच्यातील एक गमतीदार विरोधाभास, अलीकडेच भारतीय बॅडमिंटनपटूंनी जिंकलेल्या मानाच्या ‘डबल्स’  जेतेपदाच्या  पार्श्वभूमीवर जाणवला. आपल्या टेनिसपटूंनी जागतिक पातळीवर ‘डबल्स’मध्ये जेवढी उत्तम कामगिरी केली त्या तुलनेत ‘सिंगल्स’मध्ये केली नाही. सानिया मिर्झा, लिअॅन्डर पेस, महेश भूपती या तिघांनी मिळून तब्बल ३३ डबल्स व मिक्स्ड् डबल्स ग्रँड स्लॅम अजिंक्यपदे मिळवली आहेत. त्या तुलनेत एकाही भारतीय टेनिसपटूकडे एकही ग्रँड स्लॅम ओपन सिंगल्सचे
टायटल नाही.
बॅडमिंटनमध्ये मात्र अगदी उलट परिस्थिती आहे. सध्या सायना, सिंधू, श्रीकांत, तर त्याआधी गोपीचंद, प्रकाश पदुकोण, नंदू नाटेकर यांनी सिंगल्समध्ये जागतिक पातळीवर दबदबा प्रस्थापित केला होता. मात्र डबल्समध्ये ज्वाला गुट्टा, अश्विनी पोनप्पा यांना मर्यादित यश मिळवता आले होते. चिराग शेट्टी व सात्त्विकसाइराज रानिकेरेड्डी या जोडीने जागतिक अजिंक्यपद मिळवलेल्या जोडीस पराभूत करून प्रथमच सुपर ५०० दर्जाची स्पर्धा जिंकली व भारतीय बॅडमिंटनमध्ये इतिहास घडवला.
मुंबईकर चिरागशी या निमित्ताने खास ‘झी मराठी दिशा’साठी संवाद साधला. आपल्या जागतिक पातळीवरील यशाने प्रोत्साहित झालेला चिराग-सात्त्विकसाइराज यांना दुखापतींमुळे स्वित्झर्लंडमध्ये सोमवारपासून सुरू झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून माघार घ्यावी लागली आहे. “ऑलिम्पिकच्या तयारीच्या दृष्टीने आम्ही बघत आहोत, ती स्पर्धा आमच्यासाठी सर्वाधिक महत्त्वाची आहे,” असे चिरागने स्पष्ट केले. “मी व माझा साथीदार सात्त्विकसाइराज दोघांचाही खेळ मूलतः आक्रमक तसेच एकमेकांसाठी पूरकही आहे. त्यामुळे आमच्यात उत्तम समन्वय होतो.” ऑलिम्पिक पदक हे कुठल्याही खेळाडूसारखेच त्याचेही स्वप्न आहे. आपल्या बचावावर तो अधिक मेहनत घेऊ इच्छितो. २२ वर्षीय चिरागने गोरेगाव स्पोर्ट्स क्लब येथे त्याच्या खेळाचे प्राथमिक धडे गिरवले. मनीष हडकर हे त्याचे पाहिले कोच. त्यानंतर माजी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू उदय पवार यांनी त्याचा खेळ घडवला. पाच वर्षांपूर्वी आपला खेळ डबल्ससाठी अधिक योग्य असल्याचे बघून त्याने त्यावर लक्ष केंद्रित केले. गेली ३ वर्षे तो सात्त्विकसाइराज बरोबर खेळत आहे.
मोहम्मद अहसान व हेंद्रा सॅतीयावन या सध्या जागतिक चौथ्या रँकिंगवर असलेल्या जोडीचा खेळ त्याला भावतो. सॅतीयावनने तर ऑलिम्पिक गोल्डसह दोन वेळा मानाची ऑल इंग्लंड स्पर्धा डबल्स गटात जिंकली आहे. सॅतीयावन हा डबल्समधील आघाडीचा खेळाडू मानला जातो. बँकॉक येथे थायलंड ओपन सुपर ५०० स्पर्धा जिंकून चिराग व सात्त्विकसाइराज जोडीने जागतिक नवव्या स्थानावर झेप घेतली आहे. जागतिक टॉप टेनमध्ये येणारी ही भारतीय बॅडमिंटन इतिहासातील पहिलीच जोडी. हुई व चेन या सध्याच्या जगजेत्या चिनी जोडीला हरवून त्यांनी केवळ इतिहासच रचला आहे असे नाही तर जागतिक स्तरावर बॅडमिंटन डबल्सप्रकारात आता अधिकाधिक भारतीय सहभागाला प्रोत्साहन मिळेल अशी कामगिरी केली आहे. बॅडमिंटन डबल्स या प्रकाराला आता भारतात जास्त वाव मिळण्याची शक्यता आहे. एरवी हा प्रकार निदान भारतीय बॅडमिंटनमध्ये तरी दुर्लक्षित होता!
थायलंडमधील अजिंक्यपदापूर्वी चिराग-सात्त्विकसाइराज जोडी हुई व चेन जोडीशी जून २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळली होती व तेव्हा भारतीय जोडीस १९/२१, १८/२१ असा निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. थायलंड ओपन सुपर ५०० स्पर्धेत उपांत्य फेरीतही भारतीय जोडीने अपसेट केला होता. त्यांनी उपांत्य फेरीत को सुंग ह्युन व शिन बेक चेओल या माजी जगजेत्या जोडीला हरवले होते. “पूर्वी आम्ही टॉप टेनमधील जोडीला कडवी लढत दिली तरी खुश होत असू, आता तशी परिस्थिती राहिलेली नाही, आता आमचा आत्मविश्वास नक्कीच वाढलाय,” चिराग सांगतो. आपल्या खेळातील परिवर्तनाचे श्रेय तो भारतीय संघाचे डबल्स प्रकारचे कोच तान किम हेर यांना देतो.
चिराग सध्या इंडियन ऑइलमध्ये  कार्यरत असून, सराव नॅशनल सेंटर (गोपीचंद अॅकॅडमी), हैदराबाद येथे करतो. जपानी खाद्यपदार्थ आवडणाऱ्या चिरागचा लीन डॅन हा आवडता खेळाडू आहे.डबल्स प्रकाराला मिळणाऱ्या सापत्न वागणुकीबद्दल कायम आवाज उठवणाऱ्या ज्वाला गुट्टाने एकदा उद्वेगाने म्हटले होते, “भारतात खरे तर बॅडमिंटन डबल्सची संस्कृतीच नाही.” आता बघूया बॅडमिंटन डबल्स भारतात किती झेप घेण्यास सुरुवात करते ते!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link