Next
‘इन्स्टास्टोरी’ची लाट!
दिपाली सहानी
Friday, February 08 | 04:00 PM
15 0 0
Share this story

फेसबुक, ट्विटर ही माध्यमे भलेही गप्पा-चर्चांसाठी वापरली जात असतील पण समाजमाध्यमांत तुम्हाला तुमची ऐट दाखवायची असेल तर इन्स्टाग्रामवर खाते हवेच! इथे प्रत्येकाला सेलिब्रिटी होण्याची संधी असते. इतरांच्या आयुष्यात डोकावायची उत्सुकता प्रत्येकालाच असते. त्यामुळे आपल्या दिनक्रमाची, एखाद्या विशेष क्षणाची माहिती सर्वांना व्हावी म्हणून त्या क्षणी किंवा ठिकाणी काढलेला सेल्फी, छायाचित्र अथवा चित्रफीत दिनक्रमाचा अविभाज्य भाग असल्याप्रमाणे ‘इन्स्टास्टोरी’मार्फत प्रसिद्ध केली जाते. ‘स्नॅपचॅट’ या वापरायला काहीशा अवघड समाजमाध्यमाने हे फीचर आणले होते. ‘इन्स्टाग्राम’ने या फीचरची नक्कल केली, असे म्हटले जाते. सध्या ‘फेसबुक’ची मालकी असलेल्या ‘इन्स्टाग्राम’ने तरुणाईला मोहित केले आहे.

‘इन्स्टास्टोरी’ म्हणून काहीही ठेवले जाते. जांभई देणारा ‘मॉर्निंग सेल्फी’, भरलेले डबे, कॉलेजकट्ट्यावरची धमाल, अभ्यासाचा ताण दर्शवणारा सेल्फी असे कोणतेही फोटो ठेवले जातात.

‘इन्स्टास्टोरी’मधून गोष्ट सांगयची तर त्यात वैविध्य हवेच, हे ‘इन्स्टाग्राम’ने बरोबर हेरले. त्यामुळे विविध ‘फिल्टर्स’, ‘स्टिकर्स’, ‘बूमरॅंग’, ‘लाइव्ह व्हिडिओ’, ‘हॅशटॅग’ आदी फीचर्स ‘इन्स्टाग्राम’ने उपलब्ध करून दिली आहेत. आपली स्टोरी अधिकाधिक हिट व्हावी, तिला जास्तीत जास्त हिट्स मिळाव्या, यासाठी कल्पकतेचा कस लावला जातो.

‘फिल्टर्स’ फीचरमध्ये कुत्रा, ससा इत्यादी प्राण्यांचे कान, प्रेम व्यक्त करणारी लाल बदामाची चिन्हे असे अनेक फिल्टर्स इन्स्टाप्रेमींसाठी उपलब्ध आहेत. ‘बूमरँग’ म्हणजे एकच क्रिया पुन्हा पुन्हा करताना दाखवणे. म्हणजे एखादी बसलेली व्यक्ती उठून उभी राहिल्याच्या व्हिडिओला ‘बूमरँग’ फीचर जोडले तर ती व्यक्ती सतत उठबश्या काढतेय, असे दिसते! हे प्रसंग मजेशीर दिसतात. ‘हॅशटॅग’ फीचरमध्ये चिन्हासोबत शब्द जोडून कथेतील चित्राची माहिती दिली जाते.
‘इन्स्टास्टोरी’ची मुदत असते केवळ २४ तासांची. त्या अपलोड करण्यासाठी तुम्ही ‘इन्स्टाग्राम’ने उपलब्ध केलेला कॅमेरा वापरून ‘फिल्टर’ अथवा इतर ‘फीचर्स’द्वारे तुमची कथा प्रदर्शित करू शकता. ‘इन्स्टास्टोरी’ जरी केवळ २४ तास तुमच्या ‘फॉलोअर्स’ना उपलब्ध असली तरीही नंतर ‘हायलाईट्स’ या ‘फीचर’द्वारे तुम्ही ती तुमच्या ‘प्रोफाईल’वर कायमस्वरूपी उपलब्ध करू शकता.

‘इन्स्टाग्राम’वर ‘पर्सनल ब्लॉगिंग’ करून त्याद्वारे व्यवसाय करणाऱ्यांनाही यातून लाभ होतो. इथे तुम्ही तुमच्या छंदांचे प्रदर्शन करू शकता. एखादे नवीन उत्पादन बाजारात आणण्यापूर्वी ग्राहकांमध्ये त्याची उत्सुकता निर्माण करायची असेल तरी ‘इन्स्टाग्राम’ची मदत घेतली जाते. ‘इन्स्टास्टोरी’मध्ये ‘हॅशटॅग’ची सोय असल्याने ठराविक लोकांना आकर्षित करण्यास मदत होते, असेही काही ‘ब्लॉगर्स’चे म्हणणे आहे. शिवाय चित्रफीत अथवा संकेतस्थळाचे दुवे देता येत असल्याने इतर समाजमाध्यमखात्यांना जोडण्याची सोय होते.

सेलिब्रिटी जगतातील अनेक बातम्यांची पहिली कुणकुण ‘इन्स्टास्टोरी’मुळे लागते. दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या बातमीनंतर अनेक चाहत्यांचे डोळे सध्या त्यांच्या ‘इन्स्टास्टोरी’वर खिळलेले होते. अलिकडे नाटक, चित्रपट अथवा कार्यक्रमाच्या प्रमोशनसाठी ‘इन्स्टास्टोरी’चा उपयोग करून घेतला जातो.
 ‘भाडिपा’ हा तरुणाईचा लाडका हास्यमंच! या पेजला फॉलोअर्सची तुडुंब गर्दी आहे. यांत ‘इन्टास्टोरीज’ महत्त्वाची भूमिका बजावतात, असे अभिनेता अमेय वाघ सांगतो. त्याच्या स्वत:च्या ‘इन्स्टापेज’ला हजारो फॉलोअर्स आहेत. ‘आज मी कोणता टीशर्ट घालू’ यासाठीही इन्स्टास्टोरीद्वारे चाहत्यांच्या मतांचा कल घेतल्याचा मजेशीर किस्सा अमेय वाघ सांगतो. निपुणने वजन कमी केल्याचे ठरवल्यावर काय खाऊ नये, हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांची मते मागितल्याचेही अमेयने सांगितले. ‘इन्स्टाग्राम’ने तरुणाईला चांगलेच आकर्षित केले आहे.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link