Next
डॉल्फिनची दुनिया
अतुल साठे
Friday, April 05 | 04:00 PM
15 0 0
Share this story


काही देशांत प्राणिसंग्रहालयांतील तलावांत लक्षवेधी खेळ करून दाखवणारा माशासारखा प्राणी आपण माहितीपटात पाहतो. कधीकधी किनाऱ्यावर वाळूत किंवा खडकाळ भागांत अडकलेल्या अशाच प्राण्यांना मानवी मदतीने परत पाण्यात सोडल्याच्या बातम्या कानावर येतात. माशासारखे दिसत असले तरी सस्तन प्राणी असलेले हेच ते बुद्धिमान डॉल्फिन!
जगात डॉल्फिनच्या समुद्री व नदीतील मिळून ४०पेक्षा जास्त प्रजाती आहेत. भारतीय हद्दीतील समुद्रात डॉल्फिनच्या साधारण १६ प्रजाती सापडतात, ज्यामध्ये आखूड तोंडाचा, कुबड्या व निमुळत्या तोंडाच्या डॉल्फिनचा समावेश आहे. ‘दक्षिण आशियाई नदी डॉल्फिन’ ही गोड्या पाण्यातील प्रजातीही भारतात सापडते. त्याची ‘गंगा डॉल्फिन’ ही उपप्रजाती गंगा, ब्रह्मपुत्रा व त्यांच्या उपनद्यांत आढळते, तर ‘सिंधू डॉल्फिन’ ही उपप्रजाती पाकिस्तानात सिंधू व तिच्या उपनद्यांत आढळते. आखूड तोंडाच्या डॉल्फिनला तमिळमध्ये ‘पोमिग्रा’ म्हणतात. ‘गंगा डॉल्फिन’ला सुसू (हिंदी), सुसुक (बंगाली), सिसुमर (संस्कृत) व हिहो (आसामी) अशी विविध नावे आहेत.
एस. एच. प्रॅटरनुसार आखूड तोंडाच्या डॉल्फिनची लांबी साधारण ८ फूट असते आणि वरच्या बाजूला गडद राखाडी व खालच्या बाजूला पांढुरका रंग असतो. ‘गंगा डॉल्फिन’ची लांबी ७.५ ते ८.५ फूट आणि रंग काळपट तपकिरी असतो. वेगाने पोहण्यासाठी सुयोग्य अशा त्यांच्या निमुळत्या शरीराला दोन्ही बाजूंना वल्ह्यासारखे दिसणारे फ्लिपर असतात. समुद्री डॉल्फिन ताशी ५५ किमी वेगाने पोहू शकतात. काही प्रजाती पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन उड्या मारत जातात ज्यामुळे त्यांना अधिक वेगाने जात गाठता येते. पुढे जायला मदत करणारी दुभंगलेली शेपटी, पोहण्यात स्थैर्य आणण्यासाठी पाठीवरील कल्ला व गोलवा असलेले डोके ही डॉल्फिनची वैशिष्ट्ये असतात. ‘गंगा डॉल्फिन’चे तोंड जास्त निमुळते व पाठीवर एक कडा असते. ‘समुद्री डॉल्फिन’ मान फारशी वळवू शकत नाहीत, तर ‘नदी डॉल्फिन’ ९० अंशापर्यंत मान वळवू शकतात. डॉल्फिनची श्रवणशक्ती पाण्यात व पाण्याबाहेर, दोन्ही ठिकाणी चांगली असते. डोक्यावर असलेल्या छिद्रातून पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन डॉल्फिन श्वासोच्छवास करतात.
डॉल्फिनच्या अन्नात मासे व इतर समुद्री जीवांचा समावेश होतो. काही जातींचे समुद्री डॉल्फिन माशांच्या कळपाला किनाऱ्याजवळच्या उथळ पाण्यात जायला भाग पडतात, जिथे शिकार पकडणे सोपे जाते. डॉल्फिनच्या काही छोट्या प्रजातींना शार्कपासून धोका संभवतो. डॉल्फिनच्या त्वचेखालचा चरबीचा थर ठिकठिकाणच्या हवामानाप्रमाणे कमी-जास्त जाडीचा असतो. याचा उपयोग तरंगायला, भक्षकांच्या चाव्यापासून संरक्षणासाठी, खाद्य कमी उपलब्ध असताना व थंड पाण्यात उबेसाठी होतो. काही प्रजातीचे समुद्री डॉल्फिन खोल पाण्यातही जाऊ शकतात व प्राणवायूचे जतन करण्यासाठी त्यांना हृदयक्रिया मंद करता येते.
बाहेरील आवाज गळ्यातून अंतर्गत कानात जाऊन डॉल्फिनला ऐकायला येते. डोक्यावरील भागातून तो उच्च फ्रिक्वेन्सी ध्वनी सोडतो जो पुढील अडथळ्यांना आपटून परत येतो व डॉल्फिनला सुलभपणे मार्ग शोधता येतो. संवाद साधायला डॉल्फिन विविध आवाज काढतात. काही प्रजातींमध्ये प्रत्येक डॉल्फिनची एक विशिष्ट शीळ असते, ज्यामुळे तो इतरांपासून वेगळा ओळखला जातो. डोक्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या डोळ्यांनी डॉल्फिनला पाण्यात व पाण्याबाहेरसुद्धा दिसते. ‘समुद्री डॉल्फिन’ अर्धा मेंदू सुप्तावस्थेत ठेवून झोपतात, जेणेकरून श्वासोच्छवास करायला पृष्ठभागावर येणे शक्य होते. काही ‘नदी डॉल्फिन’ पोहतानाच काही क्षणांची डुलकी घेतात.

बुद्धिमान व समूहप्रिय

डॉल्फिन हा प्राणी अत्यंत हुशार समजला जातो. काही प्रजातींच्या डॉल्फिनचा मेंदू माणूस व चिंपांझीच्या मेंदूंपक्षा मोठा असतो. त्यांच्या मेंदू व शरीराच्या वजनाचे गुणोत्तरसुद्धा माणसापेक्षा जास्त असतो. कामात आयुधांचा वापर करण्याचा प्रयत्नही काही प्रजाती करतात. काही समुद्री प्रजाती अन्न शोधताना इजा होऊ नये म्हणून स्पॉन्ज हा मुलायम प्राणी तोंडावर ठेवतात. डॉल्फिन कळपाने राहतात. एका कळपाची संख्या काही प्रजातींमध्ये १२ पर्यंत असू शकते. जिथे अन्नाची विपुलता असते तिथे अनेक कळप एकत्र येतात. त्यांचे  परस्परसंबंध स्नेहपूर्ण असतात. आजारी किंवा जखमी डॉल्फिनला त्याचे भाईबंद पृष्ठभागावर श्वास घ्यायला येण्यासाठीसुद्धा मदत करतात. इतर सस्तन प्राण्यांप्रमाणे डॉल्फिन मादी पिल्लाला जन्म देते. कधीकधी एकमेकांशी खेळतानाही डॉल्फिन पाण्याच्या पृष्ठभागावर उड्या मारतात. वन्य अवस्थेतसुद्धा डॉल्फिनची माणसांशी असलेली वागणूक मैत्रिपूर्ण असते. काहीवेळेला डॉल्फिनच्या कळपाने पोहणाऱ्या माणसांचे शार्कपासून संरक्षण केल्याच्या नोंदी आहेत. ब्राझीलमधील काही मच्छीमार समुद्रातील मासे जाळ्याजवळ आणायला डॉल्फिनची मदत घेतात. जाळ्यात न सापडलेले मासे डॉल्फिनचे!  काम केल्याबद्दलचे बक्षीस म्हणून!

संवर्धन
शिकार, प्रदूषण व मोठ्या प्रमाणातील व्यावसायिक मासेमारी (ज्यामध्ये माशांसोबत डॉल्फिनही पकडले जातात) हे डॉल्फिनला भेडसावणारे प्रमुख धोके आहेत. काही देशांच्या आरमाराकडून स्फोटके शोधण्यासाठी किंवा पाण्यात सापडलेल्या माणसांना सोडवण्यासाठी डॉल्फिनचा उपयोग केला जातो. युद्धजन्य परिस्थितीत डॉल्फिनच्या जिवाला धोका संभवतो. प्रचंड प्रदूषणामुळे ‘नदी डॉल्फिन’ची हानी होते, परंतु आता काही आशेचे किरण दिसू लागले आहेत. गेल्या १-२ वर्षांत गंगा नदी बऱ्याच प्रमाणात स्वच्छ करण्यात आल्याने त्यातील डॉल्फिन अधिक संख्येने दिसू लागल्याचे वृत्त आहे. भारतीय वेदिक संस्कृतीत गंगामातेशी संलग्न असलेला व ग्रीक संस्कृतीतही उल्लेख असलेला हा हुशार व निरुपद्रवी प्राणी गंगा नदीत किंवा कोकणकिनाऱ्यावर दृष्टीस पडू शकतो.n

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link