Next
स्वातंत्र्यानंतरची ‘नोट’क्रांती
संजय जोशी
Friday, January 11 | 03:00 PM
15 0 0
Share this story

१५ ऑगस्ट १९४७ हा भारताच्या इतिहासातील अतिशय महत्त्वपूर्ण दिवस.  कारण याच दिवशी भारताला आणि भारतीय चलनालाही १०० वर्षांपेक्षा जास्त काळ जखडलेल्या ब्रिटिशशाही नियमातून स्वातंत्र्य मिळाले. तर २६ जानेवारी १९५० रोजी भारत गणराज्य म्हणून घोषित करण्यात आले. त्याचवेळी ब्रिटिश राज्यकर्त्यांचे चित्र त्यावेळच्या नोटा तसेच नाण्यांवरून कायमचे काढून टाकण्यात आले.  भारताच्या स्वातंत्र्यानंतर इंग्लंडच्या राजाऐवजी भारतीय राजमुद्रेला नोटेवर स्थान मिळाले. ही राजमुद्रा म्हणजे सम्राट अशोकाने त्याच्या राजधानीत बांधलेला ‘सारनाथ स्तंभ’. हा स्तंभ भारताचे राष्ट्रीय चिन्ह म्हणूनसुद्धा ओळखला जातो. हे प्रतीक भारताच्या पहिल्या प्रजासत्ताकदिनी स्वीकारले गेले. सारनाथ येथील मूळ स्तंभामध्ये स्तंभाच्या अगदी वरच्या भागावर ४ उभे आशियाई सिंह कोरले आहेत. या सिंहाखालच्या पट्टीवर पूर्वेकडे हत्ती, पश्चिमेकडे घोडा, दक्षिणेकडे बैल व उत्तरेकडे एक सिंह आहे. प्रत्येक जोडीमध्ये अशोकचक्र कोरले आहे.
अशोकचक्राखाली देवनागरी लिपीत ‘सत्यमेव जयते’ लिहिले आहे. मूळ स्तंभातील कमळ राजकीय प्रतीकांमधून वगळण्यात आले आहे.   

 “एक रुपया भी बहुत बडी चीज होती है बाबू” :        
एक रुपयाचे मूल्य आज जरी खूप नसले तरी एक रुपयाच्या नोटेचे महत्त्व कायम आहे.  भारतीय चलनात एक रुपयाची नोट सर्वात लहान, तरीही सर्वात मोठी म्हणायला हवी. कारण केवळ एक रुपयाची नोटच थेट भारत सरकार चलनात आणते. बाकीच्या नोटा रिझर्व्ह बँकेमार्फत जारी केल्या जातात. त्यामुळे एक रुपयाच्या नोटेवर ‘भारत सरकार’ असा उल्लेख असतो. गेल्या १०० वर्षांत १ रुपयाच्या १२५ वेगवेगळ्या नोटा चलनात आल्या.  एकूण २८ वेळा या नोटांचे डिझाइन बदलले गेले. स्वातंत्र्यानंतर जारी करण्यात आलेली एक रुपयाची नोट ऑलिव्ह हिरव्या रंगात छापण्यात आली . १२ ऑगस्ट १९४९ रोजी छापण्यात आलेल्या या नोटेवर के.आर.के. मेनन यांची सही होती.
        एक रुपयाच्या सगळ्या नोटांवर वित्तसचिव किंवा विशेष सचिवांची सही होती. या परिमाणांच्या सर्वच नोटांवर अशोकस्तंभाचे चित्र असून १९७९ साली जारी करण्यात आलेल्या नोटांवर महात्मा गांधींचे चित्र आहे.  आर.बी.आय.च्या नोटांवर जसे ‘मी धारकाला एक रुपया ही रक्कम देण्याचे वचन देतो आहे’ असे लिहिलेले असते, तसे लिहिलेले नाही. चलनात आलेल्या पहिल्या तीन नोटांचा रंग हिरवा तर पुढच्या नोटांचा रंग निळा होता.  मार्च १९९४ मध्ये या नोटा चलनातून बंद करण्यात आल्या.  २०१५ साली या एक रुपयाच्या नोटा पुन्हा चलनात आल्या.              
 
आर.बी.आय.ने चलनात आणलेल्या नोटा :

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आरबीआयने पहिली नोट डिंसेबर १९४९ साली दहा रुपयांची काढली.  नोटेच्या उलट बाजूस छापण्यात आलेले नौकायन नौकेचे चित्र जवळजवळ ३४ वर्षे (१९४१-१९७५) कदाचित सर्वाधिक काळासाठी छापण्यात आलेले एकमेव चित्र होते.  
 
आर.बी.आय.ने चलनात आणलेल्या नोटांबद्दल काही रंजक गोष्टी :  
१.    १९५४ साली आर.बी.आयने रुपये १०००, ५०००, १०००० या नोटा चलनात आणल्या.  या नोटांचे विमुद्रीकरण १६ जानेवारी १९७८ रोजी झाले.  
२.    त्यानंतर १००० रुपयाची नोट ऑक्टोबर २००० मध्ये पुनर्मुद्रित करण्यात आली.
३.    श्री. एस. जगन्नाथन यांनी सही केलेली २० रुपयांची नोट १९७२ मध्ये पहिल्यांदा चलनात आली.
४.    १९७५ मध्ये जेव्हा पहिल्यांदा ५० रुपयांची नोट आली, तेव्हा त्यावर आपला झेंडा नव्हता. १९७७-७८ मध्ये नोटेचे डिझाइन व रंग बदलला तेव्हा ही चूक सुधारली गेली.
५.    १९५९ ते १९७० मध्ये आर.बी.आय.ने अनेक आखाती देशांसाठी नोटा जारी केल्या.
६.    १९५९ साली सौदी अरेबियातील ‘हज’ तीर्थयात्रेसाठी मक्का व मदिना येथे गेलेल्यांसाठी रुपये १० आणि १०० रुपयांच्या वेगळ्या नोटा चलनात आणल्या गेल्या. या सर्व नोटांवरील अनुक्रमांच्या आधी “HA” असा उपसर्ग वापरण्यात आला होता.

 हे माहीत आहे का ? :  
१.    १९९६ सालपासून अशोकस्तंभाऐवजी महात्मा गांधीचे चित्र नोटांवर छापण्यास सुरुवात झाली.
२.  २००५ पासून नोटाछपाईचे वर्ष छापणे सुरू झाले.
३.    ९ एप्रिल २००६ पासून ज्या नोटा बदली नोटा आहेत म्हणजे चुकीच्या छापलेल्या नोटा किंवा त्रुटी असलेल्या नोटांवर चांदणी किंवा तारा (asterik (*) छापला जातो.
४.    श्री. उदयकुमार यांनी योजलेले रुपयाचे चिन्ह २०१० मध्ये सगळीकडे अधिकृतपणे स्वीकारले गेले.
५.  ९ नोव्हेंबर २०१६ मध्ये २ हजार रु.ची नोट आली.
६.    २५ ऑगस्ट २०१७ रोजी २०० रु.ची नोट आली.
७.    १९७८ व २०१६ या दोन्ही वर्षांत झालेल्या नोटाबंदीच्या वेळी अनुक्रमे आयजी पटेल व ऊर्जित पटेल हे नामसाधर्म्य असलेले गव्हर्नर रिझर्व्ह बँकेवर होते.
(शब्दांकन : गौरी भिडे)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link