Next
भ्रमदानमुक्त मतदान!
अरविंद वैद्य
Friday, April 12 | 04:00 PM
15 0 0
Share this story


महिला राजसत्ता आंदोलन महिलांना निवडणुकांमध्ये उमेदवार म्हणून किंवा प्रचारक म्हणून सहभागी होण्यासाठी कायम प्रोत्साहन देत असते. महिलांचा निवडणुकांमधील हा सहभाग केवळ, ‘सहभागासाठी सहभाग’ असा न राहता काही तत्त्वांवर आधारलेला असला पाहिजे असा आंदोलनाचा आग्रह असतो. गेल्या वीस वर्षांत त्यांनी त्यांच्या अनुभवातून ही तत्त्वे विकसित केली आहेत आणि अभ्यासवर्ग, प्रचारसाहित्य, चर्चासत्रे, वार्षिक अधिवेशने यांमधून ती तत्त्वे महिला कार्यकर्त्यांमध्ये बिंबवण्याचा प्रयत्न करत आहे.
सत्तेतून पैसा मिळवणे आणि तोच पैसा वापरून पुन्हा सत्ता काबीज करणे हा निवडणुकीतील पैशांचा खेळ दिवसेंदिवस वाढतो आहे. निवडणुका जिंकण्यासाठी पैसा लागतो. मतदारांना मटण–बिर्याणी, दारू इत्यादी वाटप करण्याची प्रथा वाढत आहे, असे चित्र आहे. निवडणूकप्रचारात पैशांचा खेळ वाढत गेला की अर्थातच निवडणुकीला उभे राहणे ही गोष्ट सर्वसामान्यांच्या आवाक्यातील राहत नाही. निवडणुकीच्या रिंगणात येणारे बहुतांश उमेदवार हे पैसा खर्च करण्याची क्षमता असलेलेच असतात. सर्वच उमेदवार हे एका उच्च आर्थिक थरातले असल्याने कोणीही निवडून आला तरी त्याच्याकडून घेतले जाणारे निर्णय हे सर्वसामान्यांच्या हिताचे न राहता ते एका वरच्या थरातील लोकांच्या हिताचे होतात. लोकशाहीचा हा मोठा पराभव म्हणावा लागेल.
पैशांचा खेळ करू शकणाऱ्या महिलांचे प्रमाण कमी, म्हणून त्या तर उपेक्षितांतील उपेक्षित! महिलाआरक्षणामुळे ह्या उपेक्षित स्त्रीला राज्यकारभारात येण्याची संधी आली. ही संधी घेऊन गावातील महिला जेव्हा प्रथम निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या, तेव्हा त्यांना पैशांचा खेळ अनुभवास येऊ लागला. तो थांबवला नाही तर धनदांडगे नेते आपल्याच घरातील महिला पैशांच्या जोरावर निवडून आणतील आणि त्यांच्यामार्फत ‘नथीतून तीर मारून’ पूर्वीचेच उद्योग चालू ठेवतील, हे स्पष्ट होते. हे प्रकार थांबवावेत म्हणून महिला राजसत्ता आंदोलनाने आपल्या सभासदांची तयारी करून घ्यायला सुरुवात केली.
राजकीय नेत्यांचा सार्वजनिक व्यवहार हा काही निश्चित मूल्यांवर आधारलेला असावा, हा महिला राजसत्ता आंदोलनाच्या अजेंड्यावरील एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. आजवर ज्या ज्या महिलेने निवडणुकीत भाग घेतला ती प्रत्येक महिला भ्रष्टाचारापासून दूर राहिली, असा दावा कोणीच करणार नाही; पण आंदोलन निदान तसा प्रयत्न करत आहे. आतापर्यंत किती महिला निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या, किती विजयी झाल्या, त्यांचा व्यवहार किती टक्के निकोप राहिला, याचा हिशोब ठेवणे अवघड असले तरी या प्रक्रियेत जाणाऱ्या महिलांची संख्या, त्यांची जाण आणि त्यांच्या वर्तनातील शुद्धता ही वाढते आहे, हे नक्की! महिला राजसत्ता आंदोलनाशी संबंधित बऱ्याच महिला सलग दोन–तीन वेळा ग्रामपंचायतीवर निवडून आल्या आहेत. पुष्कळ महिलांनी पंचायत समिती (तालुका पातळी) जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत भाग घेतला आहे. अशा महिलांची संख्या वाढते आहे. काही महिला जिल्हा पातळीवरील विविध विषय समित्यांच्या सभापतीपदापर्यंत पोहोचल्या आहेत.
हे सारे काम या महिला ‘भ्रष्टाचारमुक्त स्वच्छ निवडणूक’ हे ब्रीद समोर ठेवून करतात. मतदारांना त्यांच्या राजकीय हक्कांची आणि कर्तव्यांची जाणीव करून देऊन, निवडणुकीत योग्य उमेदवाराला निवडून देण्यासाठी त्यांना प्रेरित करणे हा ह्या महिलांच्या अभियानाचा हेतू आहे. या अभियानाचे नाव आहे ‘भ्रमदानमुक्त मतदान’! भ्रमदान म्हणजे ‘भ्रष्टाचार, मटन, दारू, नवस’मुक्त मतदान!
भ्रष्टाचार हा फक्त पैशांचाच नसतो. मूल्य सोडून, तत्त्व सोडून केलेला कोणताही व्यवहार म्हणजे भ्रष्टाचार! निवडणूक जिंकण्यासाठी मी माझ्या तत्त्वांशी तडजोड करणार नाही ही वृत्ती काही महिलांनी दाखवली आहे. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे लातूर जिल्ह्यातील वडवळ गावाच्या आंदोलनातील कार्यकर्त्या माया सोरटे!
राज्य सरकारच्या नियमाप्रमाणे दोनपेक्षा अधिक अपत्ये असलेली कोणीही व्यक्ती निवडणूक लढवू शकत नाही. मायाताई दुसऱ्यांदा निवडणुकीला उभ्या होत्या. या खेपेला त्यांचा मतदारसंघ खुला झालेला होता. एका पुरुष उमेदवाराविरुद्ध त्या रिंगणात होत्या. त्या उमेदवाराने अर्ज भरताना आपल्याला दोनपेक्षा अधिक अपत्ये आहेत, ही माहिती लपवली होती. गावात तर हे सर्वांनाच माहीत होते. मायाताई दोन ओळींची तक्रार देत्या तरी त्या पुरुष उमेदवाराची उमेदवारी रद्द होती; पण मायाताईंनी तक्रार दिली नाही. त्याला एक तात्त्विक कारण होते. रूढीपरंपराग्रस्त समाजात स्त्रियाच नव्हे तर पुरुषही मुले होण्याच्या संदर्भात निर्णय घ्यायला स्वतंत्र नसतात. ही परीस्थिती बदलत नाही तोवर हा नियम लावून एखाद्या व्यक्तीचा निवडणुकीला उभे राहण्याचा हक्क नाकारू नये, असे राजसत्ता आंदोलनाचे मत आहे. मायाताई ह्या मताशी प्रामाणिक राहिल्या. त्या तक्रार का करत नाहीत, हे बरोबरच्या लोकांना कळेना. आपल्या ह्या निर्णयाने मायाताईंनी गावाला एक वेगळा दृष्टिकोन दिला. महिला राजसत्ता आंदोलन आपल्या परीने लोकशाही निकोप करण्याचा प्रयत्न करीत आहे.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link