Next
मृत्यूकडे चाललेला मृतसमुद्र
दिवाकर देशपांडे
Friday, June 07 | 12:15 PM
15 0 0
Share this story


खरे तर जगातल्या सर्वच सागराच्या पोटात अनेक आश्चर्ये दडली आहेत… पण मृतसमुद्र हे एक वेगळेच आश्चर्य आहे. त्याला मृतसमुद्र का म्हणायचे… त्याची अनेक कारणे आहेत. एकतर हा अन्य सर्व समुद्रांसारखा प्रवाही समुद्र नाही… तर तो तळ्यात रूपांतरित झालेला समु्द्र आहे. म्हणजे याच्या चारी बाजूंनी जमीन आहे… मग त्याला तळंच का म्हणत नाहीत… कारण त्याचे सर्व गुणधर्म हे तळ्याचे नाहीत तर समुद्राचे आहेत… कारण खरेच तो समुद्रच आहे, पण तो जमिनीत बंदिस्त झालेला आहे.. त्यामुळे तो प्रवाही नाही… म्हणजे त्यात लाटा निर्माण होतात पण त्याला भरतीओहोटी नाही. पाणी सामान्य समु्द्राच्या पाण्याच्या दहापट इतके खारे आहे किवा त्यात ३४ टक्क्यांपेक्षाही जास्त क्षार आहेत. साहजिकच एवढ्या मोठ्या प्रमाणात खारट असलेल्या या समुद्रात सागरी जीवन असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे या पाण्याची घनता साध्या समुद्री पाण्यापेक्षा अधिक आहे. म्हणूनच या मृतसमुद्रात माणूस बुडत नाही, तो पाण्यावरच तरंगतो.

आणखी एक आश्चर्य म्हणजे हा मृतसमुद्र समुद्रसपाटीच्याही ४३० मीटर खाली आहे. त्यामुळे तेथे हवेचा अधिक दाब आहे आणि त्यामुळे हवेत ऑक्सिजनचे प्रमाण अधिक आहे. परिणामी हे एक नैसर्गिक आरोग्यकेंद्र बनले आहे. या समुद्राच्या भोवतालची माती ही क्षारयुक्त असल्यामुळे ती आरोग्यास विशेषत: त्वचेसाठी खूप चांगली समजली जाते. येथे येणारे पर्यटक या मातीच्या चिखलाने संपूर्ण शरीर माखून घेतात आणि मगच या समुद्रात स्नान करतात. अर्थात समुद्रातून स्नान करून बाहेर पडले की अंगावरचे पाणी सुकते आणि शरीरावर मिठाचे कण दिसू लागतात.

या समुद्रात मिठाचे प्रमाण खूपच असल्यामुळे समुद्राचे किनारे, खडक मिठाचेच बनलेले आहेत. हा समुद्र दिवसेंदिवस आक्रसत चाललेला आहे, त्यामुळे त्याचा आकार कमी कमी होत आहे. दरवर्षी तो जवळपास एक मीटर इतका आक्रसत आहे. १९३० साली या समुद्राचे क्षेत्रफळ १०५० चौरस किलोमीटर होते ते आता ६०५ चौरस किलोमीटर झाले आहे. यावर काही उपाययोजना केली नाही तर कदाचित १०० वर्षांनंतर हा समुद्र अस्तित्वात नसेल. या समुद्राला जॉर्डन नदी मिळते, तोच एक या समुद्राच्या पाण्याचा स्रोत आहे. शिवाय या समुद्राच्या काठाशी असलेल्या टेकड्यांवर भरपूर पाऊस पडला तर ते पाणी या समुद्राला मिळते, पण या भागात पावसाचे प्रमाण वार्षिक दोन ते चार इंच इतकेच आहे. या समुद्राच्या पाणलोटक्षेत्रात पाणी कुठून आणायचे हा प्रश्नच आहे. त्यामुळे या मृत म्हणवल्या जाणाऱ्या समुद्राची वाटचाल खरोखरच मृत्यूच्या दिशेने चालू आहे.

हा समुद्र एकेकाळी भूमध्य समुद्राचाच भाग होता. हा समुद्र जॉर्डनच्या किनाऱ्याला लागून होता. पण सध्याचा इस्रायलचा भूभाग हा भूगर्भीय हालचालींमुळे समुद्रातून वर उचलला गेला आणि या भूभागाच्या पूर्वेकडचा भूमध्य समुद्राचा भाग जॉर्डन आणि इस्रायलच्या भूभागात अडकून त्याचा मृतसमुद्र व गॅलीलीचा समुद्र बनला असे सांगण्यात येते. मृतसमुद्र इस्रायल आणि जॉर्डन यांच्या सीमेवर आहे. समुद्राच्या पूर्व किनाऱ्याला  जॉर्डनचा तर पश्चिम किनाऱ्याला इस्रायलचा भूभाग आहे. त्यामुळे या समुद्रावर जॉर्डन व इस्रायल या दोन्ही देशांतून जाता येते, पण मृत समु्द्राकडे जाण्यासाठी इस्रायलमधून सोपा मार्ग आहे व लोक तेथूनच या समुद्राकडे जातात.

गेल्या नोव्हेंबरमध्ये मी इस्रायलला गेलो होतो तेव्हा आवर्जून मृतसमुद्र पाहण्यासाठी व त्यात स्नान करण्यासाठी, त्याचा चिखल अंगावर माखून घेण्यासाठी गेलो होतो. इस्रायलची अधिकृत राजधानी जेरुसलेमपासून मृतसमुद्र फक्त ३३ किलोमीटरवर आहे म्हणजे जेमतेम तासाभराचा हा प्रवास आहे. तर इस्रायलची आर्थिक राजधानी असलेल्या तेलअविवपासून तो जवळपास ८८ किलोमीटवर आहे. तेलअविवहून मृतसमुद्र व त्याच्या काठाशी असलेल्या मसाबा या ऐतिहासिक स्थळासाठी बसेस सुटतात, या बसेस जेरुसलेम मार्गेच जातात. दिवसभरात मृतसमुद्र व मसाबा पाहून रात्री जेरुसलेम किंवा तेलअविवला परतता येते. जेरुसलेम हे उंच टेकडीवर वसलेले ऐतिहासिक शहर आहे. समुद्रसपाटीपासून त्याची उंची ७५४ मीटर आहे. तर मृतसमुद्र हा समुद्रसपाटीच्या ४३० मीटर खाली आहे. त्यामुळे जेरुसलेमहून निघालेली बस अर्ध्या तासात जवळपास १२०० मीटर खाली उतरते आणि मृतसमुद्राच्या किनाऱ्याशी लागते. मृतसमुद्राच्या काठाशी हॉटेल व मॉल आहे. तेथे भाड्याने लॉकर मिळतो. त्यात आपले सामान ठेवून फक्त पोहण्याच्या पोशाखात समुद्राकडे जावे लागते. त्याआधी मृतसमुद्राच्या मातीचा चिखल तयार करून ठेवलेला असतो, तो अंगाला फासून घेतला जातो. हा चिखल डोक्यालाही लावतात, त्यामुळे केस काळे राहतात व गळत नाहीत असे म्हणतात. हा चिखल तेथेच धुऊन समुद्रावर जाता येते किंवा तसेच गेले तरी चालते. हॉटेलपासून समुद्रकिनाऱ्यावर जाण्यासाठी दर १५ मिनिटांनी छोटी रेलगाडी आहे. दहा मिनिटांत ही गाडी किनाऱ्यावर नेऊन सोडते. समुद्रकिनाऱ्यावर जगातल्या अनेक देशांतून आलेल्या शेकडो पर्यटकांचा समुदाय असतो व तो मृतसमुद्राच्या पाण्यात मनसोक्त डुंबत असतो किंवा किनाऱ्यावर ऊन खात असतो. समुद्रात शिरताना सावधगिरी बाळगावी लागते, कारण किनारा पूर्णपणे मिठाच्या स्फटिकांचा आहे, त्यावरून अनवाणी चालणे म्हणजे पायाला जखमा करून घेऊन त्यावर मीठ चोळण्यासारखे आहे. त्यामुळे पादत्राणे घालून जावे लागते. पण पाण्यात उतरताना ती काढून ठेवली तरी पाण्याखालीही मिठाचे स्फटिक असतात, त्यामुळे सावधपणे पाण्यात चालावे लागते. पाण्यात आडवे झाल्यानंतर एक विचित्र अनुभव येतो, तो म्हणजे हे पाणी आपल्याला वर ढकलते त्यामुळे आपण पाण्यावर तंरगत राहतो. अगदी पाण्यावर आडवे होऊन पुस्तकही वाचता येते, कारण शरीराचा बराच भाग पाण्यावरच असतो. पोहताना हे पाणी डोळ्यांत जाणार नाही याची मात्र काळजी घ्यावी लागते कारण ते डोळ्यांत गेल्यास डोळ्यांची प्रचंड आग होते व तात्पुरते अंधत्वही येऊ शकते. तसे झाल्यास लागेच साध्या थंड पाण्याने डोळे धुवावेत, त्यासाठी साध्या पाण्याच्या बाटल्या बरोबर घेऊन जाणे योग्य ठरते.

मृतसमुद्र मृत्यूच्या दिशेने वाटचाल करीत असला तरी ते जगातले एक अपूर्व आश्चर्य असल्यामुळे तो वाचवण्याचे प्रयत्न होत आहेत. गेल्या एप्रिल महिन्यात मृतसमुद्र भागात मोठा पाऊस झाल्याने ती इस्रायली वर्तमानपत्रातली मोठी बातमी ठरली होती. या भागातून खनिजे काढण्याचे काम इस्रायल व जॉर्डन हे दोन्ही देश करीत असतात, त्यावर निर्बंध घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच, तांबड्या समुद्रातून पामृतसमुपने मृतसमुद्रात पाणी सोडण्याचा विचार चालू आहे. परंतु पाण्याअभावी मृतसमुद्रात पाण्याने भरलेल्या घळी (sinkholes) निर्माण होत असून समुद्र धोकादायक बनत चाललेला आहे.

मृतसमुद्र हा सुमारे २० लाख वर्षांपूर्वी भूगर्भीय हालचालीतून निर्माण झाला असावा असा कयास आहे. निसर्गाची ती एक अद्भूत देणगी आहे. ती आपण गमावली तर आपल्यासारखे करंटे आपणच असू, त्यामुळे मृतसमुद्र वाचवण्यासाठी कसोशीचे प्रयत्न त्या भागातील देशांनी करणे आवश्यक आहे.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link