Next
पण बोलणार नाही...
डॉ. राजेंद्र बर्वे
Friday, May 10 | 04:00 PM
15 0 0
Share this story


‘काही बोलायचे आहे; पण बोलणार नाही,
देवळाच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही.’
सर, हे गाणं तुम्ही ऐकलंच असेल. तसं लोकप्रिय आहे, पण माझं अतिशय प्रिय असं गाणं आहे. गाणं म्हणजे कविता आहे ती. किती सुंदर म्हटलंय ना, काहीतरी सांगायचं आहे, काही तरी तुझ्यापर्यंत पोचवायचं आहे, पण मी ते सांगणार नाही. मी ते बोलणार नाही. जे वाटतंय ते माझ्या माझ्यात राहू देणार आहे.
सर, खरं म्हणजे पुढच्या कडव्यांमध्ये कल्पकुसुम, नक्षत्रांचे गूज, जांभळ्या मेघाचे रहस्य, बंदराले गलबत याचा अर्थ मला कळत नाही. पहिल्या ओळीतून माझं व्यक्तिमत्त्व पूर्णपणे व्यक्त झालं आहे. ‘...पण बोलणार नाही’ यातून माझ्या जगण्याची भूमिका स्पष्ट होत आहे. तो भावुकपणे बोलत होता. बोलणार नाही, असं म्हणून बरंच बोलत होता म्हणून अधिक बोलतं करण्यासाठी मी त्याला प्रश्न विचारू लागलो.
“लक्षात आली तुझ्या मनोभूमिकेतली मुख्य गोष्ट! म्हणजे कविता, भावगीत म्हणून ठीक आहे. म्हणायला काहीतरी आहे गाणंबिणं. मला सांग, तुला बोलायचं का नाही? म्हणजे असल्या भावना व्यक्त का करायच्या नाहीत? मनात भावभावनांचा बराच कल्लोळ असावा, त्यामुळे तू भावविभोर झालेला दिसतो आहेस. मग मनातले ते भाव मनातच का बरं तसेच ठेवून देतो आहेस?”
तो जरा विचारात पडला. कारण तल्लीन होऊन गाणं ऐकताना त्याच्या लक्षात आलं नव्हतं की ‘काही बोलणार नाही’ हे विधान नसून धोरण आहे. विशिष्ट हेतुप्रीत्यर्थ गप्प राहणं तो निवडतो आहे. त्याला उत्तर सुचेना म्हणून अधिक नेमके प्रश्न विचारावे लागले. “तू बोलणार नाहीस, कारण तुझं कोणी ऐकून घेणार नाही, असं तर वाटत नाहीये. मग बोलायची टाळाटाळ करण्यामागे भीती वाटत असावी का? कसली भीती बाळगून गप्प राहतो आहेस? आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावणार तर नाही ना, अशी धास्ती तर वाटत नाही ना? की तुला कोणीतरी नाकारेल, अशी शंका किंवा खात्री तर वाटत नाही ना? बोलायचं आहे पण मी कसा गुपचूप सारं सारं (अन्याय, खोटे आरोप इत्यादी) सहन करतो, असं विधान न बोलता कराचयं आहे? आपला एकूणच सहनशील आहोत, लोकांनी केलेले जुलूम, मानवाच्या प्रेमाखातर हूं की चूं न म्हणता, कसे गप्पपणे पोटात, म्हणजे मनात ठेवत आहोत. आपण कसे एकूण उदात्त आहोत, असं तर वाटत नाही ना?” माझ्या प्रश्नांमुळे तो थोडा भांबावला. मग एकेक करून ते प्रश्न मी पुन्हा विचारले. मग विचार करून म्हणाला, “खरं तर मी इतका विचारच केलेला नव्हता. पण तुम्ही म्हणता त्यामध्ये सत्य आहे. पण बोलणार नाही, असं म्हणण्यामागे माझा घाबरटपणा आहे. कविताबिविता बाजूला ठेवू. मला हे लक्षात येतंय की मी बोलत नाही कारण बोलण्याची भीती वाटते. लोक आपल्याला नाकारतील, या भावनेमुळे मी गप्प राहून माझे कोणतेच प्रश्न सुटत नाहीत. माझ्या जिवाची तगमग होते. मनातले विचार आणि भावना बोलून न दाखवल्यामुळे घुसमट होते. मनाचा कोंडमारा होतो. मी या सत्यापासून पळत होतो. मला बोललं पाहिजे, व्यक्त झालं पाहिजे, असं तुम्हाला वाटतं का?” त्यानं रोखठोकपणे विचारलं. “तू बोलायला सुरुवात केलेलीच आहेस. मनाचा कोंडमारा करू नकोस. अद्वातद्वा बडबडू नकोस, पण बोलत राहा. गाण्याचं काय? मनावर घेऊ नकोस.” “अगदी बरोबर,” तो मोकळेपणानं म्हणाला.


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link