Next
बासरी
- मोहन कान्हेरे
Friday, May 10 | 03:00 PM
15 0 0
Share this story

‘नको वाजवू श्रीहरी मुरली रे
तुझ्या मुरलीने तहान भूक हरली रे’
किंवा
‘नाचते यमुना जळ धुंद
वाजवी पावा गोविंद’
अशी जुन्या जमान्यातील कितीतरी मधुर गाणी मुरलीधर कृष्णाला उद्देशून लिहिली गेली. पौराणिक ग्रंथांतून, कथा-कीर्तनातून कृष्णाच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या बासरीचा गौरव केला गेला. सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी कृष्णावतार झाला. याचाच अर्थ बासरी हे वाद्य पाच हजार वर्षांपूर्वी आपल्या भारतवर्षात अस्तित्वात होतं.
कसलीही गुंतागुंत नसलेलं, अत्यंत साधं, मात्र ऐकणाऱ्याला मंत्रमुग्ध करणारं हे वाद्य आहे. फ्ल्युट (Flute) आणि बासरी भिन्न आहेत. उभी ओठांत धरून (सनईप्रमाणे) फुंकर मारली जाते व छिद्रांवर बोटांच्या साहाय्यानं सूरनिर्मिती केली जाते, तिला फ्ल्युट असं नाव आहे. बासरी आडवी धरतात. ती आकारानं मोठी असते. सर्वात वरच्या बाजूला असलेल्या छिद्रातून हवा भरून खालच्या बाजूच्या छिद्रांवर बोटांच्या साहाय्यानं सूरनिर्मिती केली जाते, तिला बासरी म्हणतात.
आपल्या भारतीय शास्त्रीय संगीतात रागनिर्मिती, संथ आलापी, रागाची टप्प्याटप्प्यानं बढत करण्यासाठी बासरीच योग्य ठरते. उंच पट्टीत वाजवायला कधी कधी छोट्या आकाराची फ्ल्युट तात्पुरती घेतली जाते. लोकसंगीत, भक्तिसंगीत, गझल इत्यादी गानप्रकारांत बासरी व फ्ल्युटचा सर्रास वापर केलेला आपण पाहतो. अनेकदा सुगम संगीताच्या कार्यक्रमात विजू तांबे, संदीप कुलकर्णी, निनाद मुळावकर, वरद कवठापूरकर यांच्यासारखे कुशल बासरीवादक दोन कडव्यांच्या मध्ये अशी काही अफलातून सुरावट वाजवतात की श्रोत्यांच्या उत्स्फूर्त टाळ्या त्यांना मिळतात तेव्हा बासरीचं सामर्थ्य जाणवतं. बासरी म्हटली की प्रथम नाव येतं ते महान वादक पं. पन्नालाल घोष यांचं. त्यांच्यामुळे या मधुर, धीरगंभीर वाद्याला फार मोठी प्रतिष्ठा मिळाली. पं. देवेंद्र मुर्डेश्वर, रघुनाथ सेठ, रुपक कुलकर्णी, रोणू मुजुमदार आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पं. हरिश्चंद्र चौरसिया. आवर्जून त्यांचं वादन तुम्ही ऐका. तुम्ही मुलं या वाद्याचे चाहते व्हाल!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link