Next
बडे धोके है इस राह में...
अमृता दुर्वे
Friday, September 27 | 03:00 PM
15 0 0
Share this story

काम करत असताना काही दिवसांपूर्वी फोनवर मेसेज आला. ‘तुम्ही XXX बँकेचं कार्ड वापरल्यानं ४००० पॉइंट्स जमा झालेले आहेत. आजच वापरा नाहीतर ते फुकट जातील.’ काम झाल्यानंतर पाहू, असं म्हणत या मेसेजकडे दुर्लक्ष केलं.
दोनच मिनिटांत लक्षात आलं, की आपल्याकडे या बँकेचं डेबिट वा क्रेडिट कार्डच नाही. म्हणजे हा मेसेज फसवा होता.
म्हणून मग मुद्दामच या मेसेजवर क्लिक करून पाहिलं, तर त्यात बँक अकाऊंटचा तपशील, कार्ड नंबर, सीव्हीही नंबर अशा सगळ्या गोष्टी मागितल्या होत्या! सामान्य वाटणारा एखादा मेसेजही कधी कधी नजरचुकीमुळे भयंकर ठरू शकतो.

काय काळजी घ्याल?
अशा फसव्या मेसेज किंवा इमेल्सना म्हणतात फिशिंग स्कॅम.
बहुतेकदा असे मेसेज पाठवणाऱ्यांनी आपण दुसरेच कोणीतरी आहोत, असं भासवण्याचा प्रयत्न केलेला असतो. म्हणजे बँकेतर्फे आलेला मेसेज, रिवॉर्ड पॉईंट्स कंपनीकडून आलेला मेसेज इत्यादी.
या कंपनीनं आपल्या ग्राहकांशी साधलेला संवाद असं साधारण याचं स्वरूप असतं. पण प्रत्यक्षात कोणतीही बँक तुम्हाला कधीही तुमचे पासवर्ड, पिन नंबर वा सीव्हीव्ही विचारत नाही.
आणि ‘पेबॅक’ किंवा बँकांचे स्वतःचे रिवॉर्ड पॉइंट्सही रीडीम करण्याची एक स्वतंत्र वेबसाईट आणि पद्धत असते.
त्यामुळे तुमच्या मेसेजमध्ये नेमकं काय लिहिलंय हे तपासून पाहा.
इमेल आला असेल तर त्यामध्ये नेमक्या कोणत्या वेबसाइटचा उल्लेख आहे, वा तो कोणत्या वेबसाइटवरून आलाय ते पाहा. अनेकदा खऱ्या वेबसाइटच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये एखाद-दोन अक्षरांचा फेरफार करून वेगळी वेबसाइट तयार केली जाते. इथे जाऊन जर तुम्ही माहिती भरलीत, तर त्याचा गैरवापर होणार हे नक्की.
अनेकदा अशा इमेल्स वा मेसेजमध्ये तुम्हाला पैसे भरण्याबद्दल सूचना देण्यात आलेली असते आणि त्यासाठी तुमच्याकडे तुमची माहिती मागितली जाते.
अशा प्रकारच्या कोणत्याही इमेल वा मेसेजमधली लिंक क्लिक करून त्यात माहिती भरण्याआधी हा इमेल वा मेसेज तुम्हाला कुठून आला ते तपासा.
याआधी असा मेसेज आला होता का किंवा हा नेहमी येणाऱ्या योग्य वेबसाइटचा मेसेज आहे का, ते तपासून घ्या.
बँकेच्या व्यवहारांसाठी, इमेल लॉग इन अशा शक्य त्या सर्व ठिकाणी ‘टू फॅक्टर व्हेरिफिकेशन’ वापरा. म्हणजे तुम्ही दोन वेळा खात्री केल्याशिवाय व्यवहार पूर्णच होणार नाही.

या गोष्टी महत्त्वाच्या-
*    तुमच्या सर्व इमेल्स, बँक अकाऊंट्ससाठी स्ट्राँग पासवर्ड ठेवा.
* एकच पासवर्ड सगळीकडे वापरू नका.
* सगळे पासवर्ड ठरावीक कालावधीनं बदला.
* तुमचे अकाऊंट कुणी वापरलेय असा संशय आल्यास पासवर्ड लगेच बदला आणि संबंधित सेवा पुरवणाऱ्या वेबसाइटला वा कंपनीला याबद्दल कळवा.
* बँक व्यवहार केल्यानंतर आपल्याला एसएमएस आणि इमेल दोन्ही येतील हे पाहा. तुमचं बँक स्टेटमेंट वेळोवेळी तपासा.
* आपण आपला कोणता इमेल आयडी कोणत्या सेवेशी जोडलाय, हे लक्षात ठेवा.
* बँक कधीही तुम्हाला तुमचा अकाऊंट फोनवरून वा इमेलवरून व्हेरिफाय करायला सांगत नाही.
* तुमचा ऑफिसचा आयडी कधीही सोशल नेटवर्क वा इतर कोणत्याही खासगी गोष्टींसाठी वापरू नका.
* व्यक्तिशः वा ऑनलाइन कधीही कोणालाही तुमचं लॉग-इन, पासवर्ड, एटीएम पिन, सीव्हीव्ही नंबर देऊ नका.
* तुम्हाला देण्यात येणारी ऑफर वा पॉइंट रीडिम करून देण्यात येणारी वस्तू खरंच एरवीच्या परिस्थितीत मिळू शकते का, याचा अंदाज घ्या. साधारणपणे अशा फसव्या संदेशांमध्ये प्रलोभन दाखवण्यासाठी मोठमोठ्या गोष्टी देण्याचं सांगितलं जातं.
* सार्वजनिक ठिकाणी खासगी व्यवहार करू नका.
* सार्वजनिक वाय-फायचा वापर बँकेचे व्यवहार करण्यासाठी, इमेल वा सोशल मीडिया लॉग-इन करण्यासाठी वापरू नका.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link