Next
प्रतिसाद
प्रतिनिधी
Friday, September 06 | 02:30 PM
15 0 0
Share this story

छान लेख
‘उत्सव  भारताचा’ या लेखात सुप्रिया देवस्थळी यांनी लाल किल्ल्यावर झालेल्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याचे अतिशय सुंदर वर्णन केले आहे. स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून तेथे पतंग उडवतात, सरकारी अधिकाऱ्यांना कार्यक्रमाची निमंत्रणपत्रिका, वाटेत पोलीसतपासणी, बैठकव्यवस्था, विविध देशांतील प्रतिनिधींची उपस्थिती, त्यांच्यासाठी हिंदीसोबत इंग्रजीतूनही सूत्रसंचालन, बिस्मिल्ला खान यांची शहनाई, सेनादलाचे संचलन, शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, तोफांची सलामी, पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण, त्यांचे भाषण व राष्ट्रगीत सुरू असताना उचंबळून येणारा देशाभिमान हे सारे वर्णन वाचून या सोहळ्यास आपण प्रत्यक्ष लाल किल्ल्यावर उपस्थित असल्यासारखे वाटले. तसेच, ‘प्रेरणा’ सदरातील मंगला गोखले यांचा ‘तेजस्वी राजबंदिनी’ हा लेखही अत्यंत माहितीपूर्ण आहे. अगदी शेजारच्या देशातील ‘आँग सान स्यूची’ने लोकशाही व शांततेसाठी २२ वर्षे लढा दिला. नोबेल व अन्य जागतिक-प्रतिष्ठित पुरस्कारांनी तिला सन्मानित करण्यात आले. ही तिची शौर्यगाथा सर्वांसमोर आली.
- सुप्रिया सावंत, डोंबिवली (पू.)
------------------------------------------------

मानवतावादी दृष्टिकोन जपावा
‘पुरातला स्वातंत्र्यदिन’ हा संपादकीय लेख चौफेर विचार करायला लावणारा आहे. हवामानखात्याचा अंदाज हा विश्वसनीय नसतो असाच समज झालेला असल्याने या महापुराच्या एक आठवडा अगोदर मुसळधार पावसाचा दिलेला इशारा दुर्लक्षित झाला. आपत्तीव्यवस्थापनाच्या सज्जतेत शिथिलता आली. लोकउद्बोधन होऊ शकले नाही व सन २००५ च्या पुराचा अहवाल न अभ्यासता तसाच टेबलावर पडून राहिला. परिणामी मानवी व भौतिक हानीला तोंड द्यावे लागले. पाऊस तर न भूतो न भविष्यती असाच बरसला. अवैध बांधकामांनी प्रवाहमार्ग अरुंदला व अडला. प्रवाहांनी दिशा बदलली व हल्लकल्लोळ माजला. लोकांची घर सोडून स्थलांतराची मानसिक तयारी न झाल्याने मृत्यूस सामोरे जावे लागले. अर्ध्या मोसमात धरणे ‘ओव्हर फ्लो’ झाली. पाण्याचा विसर्ग होताना मुसळधार पावसामुळे पुराची तीव्रता कमी झाली नाहीच, उलट नदीपात्रातही पाऊस झाल्याने ती अधिकच वाढली. यात काय व्हायला पाहिजे होते हे लक्षात येतेच. परंतु पूर ओसरल्यानंतर मदतीचा ओघ वाहू लागला. त्याचाही विचार आपत्तीव्यवस्थापनात होणे आवश्यक होते. मदत भरपूर, पण वाटपाचे व्यवस्थापन आवश्यक होते. मदत देतानाही राजकीय वर्चस्वप्रदर्शन व चर्चेस ऊत आला. याने दिली, त्याने दिली नाही हे दोषारोपही सुरू झाले. तेव्हा स्वार्थ, दोष बाजूस ठेवून मानवाने मानवासाठी निरपेक्षवृत्तीने आपत्तीत धावून जाण्याचा मानवतावादी दृष्टिकोन जपला पाहिजे. मिळालेली मदत ही आपलीच आहे, अशी भावना पीडितांच्या मनी निर्माण झाली तरच खऱ्या स्वातंत्र्याची ज्योत मनात तेवत राहील हेच नक्की!
- विलास मधुकर यादव, मु. म्हसळा, रायगड
------------------------------------------------

अन्याय कुणावरही नको!
आरक्षण हा खूपच गुंतागुंतीचा प्रश्न झाला आहे. त्यावरचा तोडगा मी आपल्या सर्वांच्या विचारासाठी ठेवत आहे. सरकारने प्रत्येक विद्याशाखेची काही महाविद्यालये लवकरात लवकर ठिकठिकाणी सुरू करावी व त्यामध्ये फक्त आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा. फक्त आरक्षित वर्गातील प्राध्यापक/शिक्षकांनाच तेथे काम मिळावे अशी मागणीही ते करू शकतात. यामुळे निश्चितच शिक्षणाची संधी वाढेल आणि नोकरीच्या माध्यमातून बऱ्याच आरक्षित वर्गातील कुटुंबांचे रोजगार आणि शैक्षणिक उत्थान वाढेल. सध्याच्या प्रणालीमध्ये त्यांचे केवळ ५०% विद्यार्थी स्पर्धा करू शकतात. ५०% आरक्षण असूनही अनेकांना महाविद्यालयात प्रवेश मिळणे शक्य नसल्यामुळे अनेकांना पुढे अभ्यास करता येत नाही. वर सांगितलेल्या व्यवस्थेमुळे आरक्षित वर्गातील खूप जणांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष  फायदा होईल. अशा महाविद्यालयातील शिक्षणाचा दर्जा चांगला राहावा म्हणून तज्ज्ञांची समिती नेमावी. फक्त वंचित मुलांना स्वतंत्र शिक्षण देऊन त्यातील ९०% विद्यार्थ्यांना आय.आय.टी.त प्रवेश मिळवून दिल्याचे उदाहरण सर्वश्रुत आहेच. यानंतर मात्र इतर सर्व संस्थांमध्ये प्रवेश कोणत्याही आरक्षणाविना असावा. ते प्रवेश केवळ गुणवत्तेवरच असावेत. (आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थीसुद्धा गुणवत्तेच्या आधारे तेथेपण प्रवेश घेऊ शकतात.) अगदी पैसे घेऊन देण्यात येणारे व्यवस्थापकीय आरक्षणदेखील नसावे. खाजगी व्यवस्थापनांना ही अट पाळण्यास सांगितले पाहिजे, नाहीतर ते कॉलेज बंद करण्यास सांगितले पाहिजे. तरच ते व्यवस्थापन, पैसे घेऊन, कमी गुण असलेल्यांना प्रवेश देऊन, गुणी मुलांवर होणारा अन्याय थांबवतील.
- डॉ. कांचन श्रीरंग गडकरी, मुंबई
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link