Next
निवडसमितीचा त्रिफळा
सतीश स. कुलकर्णी
Friday, August 02 | 03:00 PM
15 0 0
Share this story

विश्वचषक क्रिकेटस्पर्धेच्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडकडून झालेला पराभव भारतीय क्रिकेट रसिकांना सहजी पचवता आलेला नाही. विश्वचषकस्पर्धा संपल्यानंतर गेल्या आठवड्यात ‘हे बघा आमच्या निवडसमितीचे अध्यक्ष’ असं म्हणत समाजमाध्यमात काहींनी व्हिडिओ टाकला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना एम. एस. के. प्रसाद याची कशी भंबेरी उडाली, हे तो व्हिडिओ दाखवत होता. सोबत प्रसादची कसोटी कारकीर्द कशी आहे, याचे आकडेही दिले होते - सहा कसोटी, १०६ धावा आणि सरासरी ११.७७. एवढी दिव्य कामगिरी असलेला माणूस भारताचा संघ काय निवडणार, असं त्यात विचारलं होतं.
विश्वचषकस्पर्धा सुरू असतानाच अम्बाती रायुडू यानं निवृत्ती जाहीर केली. वैतागून आणि वैफल्यातून! विश्वचषकासाठी राखीव खेळाडूंच्या यादीत असूनही संधी न मिळाल्यानं आलेलं वैफल्य. स्पर्धेसाठी संघ जाहीर झाल्यानंतरही त्यानं ते गाजलेलं ‘थ्री-डी’ ट्विट केलं होतं. त्याचा रोख तेव्हाही आणि आताही निवडसमितीवरच होता, हे उघड आहे. त्याच्या नाराजीची दखल निवडसमितीनं घेतल्याचं दिसलं नाही. प्रसाद, जतीन परांजपे, देवांग गांधी, शरणदीप सिंग, गगन खोडा यांच्यातील कोणीही त्याबद्दल काही मतप्रदर्शन केल्याचं ऐकिवात नाही. जखमी विजय शंकरऐवजी मयांक अग्रवाल याचा संघात समावेश करण्याचा निर्णय नेमका कोणाचा होता आणि राखीव खेळाडूंच्या यादीत असलेल्या रायुडूचा समावेश का झाला नाही, याचं नेमकं आणि स्पष्ट उत्तर त्यावेळी कुणी दिलं नाही. स्पर्धेचं रामायण संपल्यानंतर सांगण्यात आलं, की तिथल्या संघव्यवस्थापनाला (पक्षी - प्रशिक्षक रवी शास्त्री व कर्णधार विराट कोहली) डावखुरा फलंदाज हवा होता, म्हणून मयांकची निवड झाली.
भारताची मधली फळी अपेक्षेइतपत कामगिरी करत नसल्याचं विश्वचषकाच्या साखळी सामन्यांमध्ये दिसून आलं होतं. खोऱ्यानं धावा जमवणारे रोहित शर्मा, लोकेश राहुल व कोहली एकाच वेळी अपयशी ठरले, तर काय होईल, असं समीक्षक बोलून दाखवत होते. त्यांची ही शंका नेमकी उपांत्य सामन्यात खरी ठरली आणि प्रश्नाचं उत्तर शोधण्याएवढा वेळ तेव्हा उरला नव्हता.
वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठी भारतीय संघ आता रवाना झाला आहे. कसोटी, एक दिवसीय आणि टी-२० यासाठी संघाची निवड झाली आणि निवडसमितीच्या कामगिरीबद्दल पुन्हा एकदा प्रश्न विचारले जाऊ लागले. महेंद्रसिंह धोनीचं काय करायचं, याचं उत्तर शोधण्याची तडफ निवडसमितीला दाखवता आली नाही. मुदत संपण्याआधी शेवटची संघनिवड करताना वाईटपणा घेण्याचं टाळून, निवडसमितीनं आपण कोणाच्या ताटाखालचं मांजर आहोत, हेच पुन्हा एकदा दाखवून दिलं. स्पष्ट बोलण्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या माजी कर्णधार सौरभ गांगुली यानं निवडसमितीचा दृष्टिकोन व कार्यक्षमता याबद्दलच शंका घेतली. शुभमन गिल व अजिंक्य रहाणे यांना एक दिवसाच्या सामन्यांसाठीच्या संघात कसं निवडलं गेलं नाही, असा थेट प्रश्न गांगुलीनं विचारला आहे. वेस्ट इंडिजमध्येच असलेल्या आणि तिथे भारत ‘अ’ संघाकडून सर्वाधिक धावा करणारा गिलही स्वाभाविकपणे नाराज आहे, पण त्याला असं थेट बोलता येत नाही, हा भाग वेगळा.
निवडसमितीचं सदस्यत्व म्हणजे कृतज्ञतेचे, आभाराचे दोन शब्दही ऐकायला न मिळणारं काम आहे, हे खरंच. तीन दशकांपूर्वी  निवडसमिती सदस्यांची ‘बंच ऑफ जोकर्स’ अशी खिल्ली उडवणाऱ्या मोहिंदर अमरनाथ यांच्यावर दहा वर्षांपूर्वी अशीच वेळ आली. नियामक मंडळानं त्यांना निवडसमितीतून डच्चू दिला होता. ‘मी कर्णधारपदासाठी उत्सुक आहे हे दाखवायचं म्हणजे काय उड्या मारायच्या का?’ असा प्रश्न विचारणाऱ्या दिलीप वेंगसरकर यांना साधारण तीस-बत्तीस वर्षांपूर्वी निवडसमितीच्या सदस्याला खेकड्याची उपमा द्यावीशी वाटली होती. आणि तेच दिलीप वेंगसरकर निवडसमितीचे अध्यक्ष असताना राहुल द्रविड याला फार चांगलं वागवत नसल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या!
उत्तम खेळणारा तेवढाच उत्कृष्ट कर्णधार होतो, असं नाही. त्याची अनेक उदाहरणं दिसली आहेत. माईक ब्रेअर्ली अजिबात भरात नसतानाही इंग्लंडचं नेतृत्व करत होता. साधारण नव्वदीच्या दशकाच्या सुरुवातीला अंशुमन गायकवाड यांनाही ‘भारताचे ब्रेअर्ली’ बनवण्याचा विचार चालू होता. त्याच धर्तीवर बोलायचं झालं, तर निवडसमितीच्या सदस्याच्या कामगिरीचं मूल्यमापन तो किती खेळला, किती चांगलं (वा वाईट) खेळला, यावर करता येत नाही. तसं ते करणं योग्यही नाही. त्यामुळेच निवडसमितीचे अध्यक्ष एम.एस.के. प्रसाद यांनी मंगळवारी मौन सोडून केलेलं वक्तव्य एका मर्यादेत ठीकच म्हणता येईल. ‘कमी खेळलो असलो, तरी ज्ञान आहेच,’ हे त्यांचं विधान योग्य असलं, तरी त्याचा पूर्वार्ध मात्र त्यांच्या पदाला व माजी खेळाडूला साजेसा नाही. जास्त खेळल्यानं जास्त ज्ञान मिळतं, हा गैरसमज आहे, हे त्यांचं वक्तव्य म्हणजे स्वतः आणि समितीतले सहकारी यांची बाजू सावरण्याचा निष्फळ प्रयत्न आहे.
मुळात प्रसाद यांना मौन सोडावं लागलं ते सुनील गावसकर यांनी विचारलेल्या काही प्रश्नांमुळे. विश्वचषकातल्या पराभवानंतर संघाच्या कामगिरीचा आढावा का घेण्यात आला नाही, कर्णधाराची निवड करण्यासाठी बैठक का घेण्यात आली नाही, कर्णधारपद म्हणजे कोहली आणि निवडसमिती यांना आपल्या मर्जीचा खेळ वाटतो का, असे नेमके प्रश्न गावसकर यांनी आपल्या सदरातून विचारले आहेत. त्यांची उत्तर ना निवडसमितीकडे आहेत ना, संघाच्या व्यवस्थापनाकडे. गावसकर यांच्याविषयी आदरपूर्वक असहमती दर्शवणाऱ्या संजय मांजरेकर यांनी संघाची विश्वचषकातील कामगिरी वाईट नसल्याचं  सांगितलं आहे. त्यांना ही वकिली करण्याची गरज का भासावी? गावसकर यांनी ‘लुळ्या-पांगळ्या’ निवडसमितीला विचारलेले प्रश्न नेमके आहेत. त्याची तर्कशुद्ध उत्तरंच देणं अपेक्षित आहे. विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यातच पराभूत झाल्यानंतर कपिलदेवला कर्णधारपद गमवावं लागलं होतं, हे विसरता येईल का?
प्रशिक्षकपदावरून अनिल कुंबळे यांना घालवण्याचा आपला हट्ट कोहलीनं पूर्ण करून घेतला, त्याला फार दिवस झाले नाहीत. त्यांच्या जागी शास्त्री यांची पुन:स्थापना करण्याचाही त्याचा हट्ट पूर्ण झाला. शास्त्री-कोहली यांच्यापुढे ठामपणे आपलं मत मांडण्याची, आपला अधिकार गाजवण्याची हिंमत निवडसमितीतील पाचपैकी कोणा सदस्याकडे असेल, असं वाटत नाही.
प्रसाद यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला हे खरेच, पण तो यष्ट्या वाचवण्याचा असफल प्रयत्न दिसतो. तूर्तास, गावसकरांच्या अफलातून गुगलीपुढे निवडसमितीचा त्रिफळा साफ उद्ध्वस्त झाला, एवढंच ढळढळीत सत्य समोर आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link