Next
...आणि तो अभिनेताच झाला!
शब्दांकन : अमिता बडे
Friday, May 31 | 04:00 PM
15 0 0
Share this story


ज्येष्ठ नाटककार विद्याधर गोखले आजोबा, बाबा विजय गोखले… त्यामुळे घरात अभिनय होताच. घरातील सक्षम अशा या पार्श्वभूमीमुळे अभिनय म्हणजे काय हे समजण्याच्या आतच मी अभिनय करू लागलो होतो. माझा जन्म आणि संपूर्ण बालपण दादर-माहीम परिसरात गेलं. चौथीपर्यंत शिक्षण इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या आणि त्यानंतर दहावीपर्यंतच शिक्षण मॉर्डन इंग्लिश स्कूलमध्ये झालं. शाळेत असल्यापासून स्नेहसंमेलनाबरोबरच विविध विषयांवरील एकपात्री अभिनयस्पर्धांत सहभागी व्हायचो. त्यामुळे अभिनयाशी संबंधित कोणतीही स्पर्धेत माझा सहभाग असायचाच. सुरुवातीला शाळेत मिळणारं महत्त्व सुखावह होतं. कधी कधी वेगळं काही करण्याची इच्छा मनात यायची. त्यातूनच सातवीला असताना अभिनयापासून दुरावलो गेलो… त्याचं झालं असं…
राज्यस्तरीय ऐतिहासिक एकपात्री अभिनयस्पर्धेसाठी शाळेतून पाठवलं. (पाचवी,सहावीत असताना या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं होतं.) बाबांनी माझ्याकडून ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ नाटकातील शंभूराजांचा प्रसंग बसवून घेतला. स्पर्धेत सहभागी होण्याची इच्छा नसल्याचं आईला सांगितलं.  परंतु शाळेतून शिक्षकांनी सांगितल्यामुळे जायचंच हे सांगितल्यावर नाइलाज झाला. स्पर्धेला आई घेऊन गेली. माझा अजिबात मूड नसल्यानं स्टेजवर जाऊन अतिशय नीरसपणे सादरीकरण केलं. ते पाहून आई खूप रागावली. त्यानंतर तिनं सांगितलं, “आशुतोष, तुला जर असंच वागायचं असेल तर यापुढे कोणत्याही स्पर्धेत तू सहभागी होऊ नकोस. मीही आग्रह करणार नाही…” असं म्हणतं तिनं हा विषय संपवून टाकला. गंमत म्हणजे त्या स्पर्धेत तिसरं पारितोषिक मिळालं.
या घटनेनंतर दहावी होईपर्यंत स्नेहसंमेलन वगळात अभिनयाशी संबंधित कोणत्याही स्पर्धेत सहभागी झालो नाही. कारण तोपर्यंत माझ्या आयुष्यात अभिनयाची जागा क्रिकेटनं घेतली होती. त्यानंतर संपूर्ण लक्ष क्रिकेटवर केंद्रित केलं. आंतरशालेय क्रिकेट स्पर्धांमध्ये सहभागी होऊ लागलो. दहावी झाल्यानंतर रुपारेल कॉलेजमध्ये कॉमर्सला प्रवेश घेतला. त्यानंतरही आयुष्यात क्रिकेटचं स्थान अबाधित होतं. खरं तर रुपारेल कॉलेज अभिनयाची पंढरी मानली जाते. असं असूनही क्रिकेटवरचं लक्ष अजिबात कमी झालं नाही. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर ते अगदी एसवाय बीकॉम होईपर्यंत पहाटे उठून क्रिकेट ट्रेनिंगला जाणं, त्यानंतर क्रिकेटची प्रॅक्टिस, मग घरी येऊन आवरून कॉलेजला जाणं असं रुटीन सुरू होतं. क्रिकेटस्पर्धांमुळे महाविद्यालयात हजेरी फारशी लागत नव्हती. परंतु शिक्षकांनी सांभाळून घेतलं होतं. अनेकदा परीक्षाही चुकायची तेव्हा मात्र शिक्षकांना सांगावं लागायचं, ‘अरे, किमान प्रोजेक्ट तरी पूर्ण करून दे जेणेकरून काही मार्क देता येतील…’ त्याकाळात १९ वर्षांखालील क्रिकेटस्पर्धांमध्ये सहभागी होत होतो. पुढचं लक्ष्य होतं अंडर २५ क्रिकेटस्पर्धा. त्यासाठी मेहनत सुरू होती. परंतु माझं क्रिकेटिअर होण्याचं स्वप्न नियतीला मान्य नव्हतं… टीवायला असताना खांद्याला दुखापत झाली. डॉक्टरांनी सक्तीची विश्रांती घ्यायला सांगत खांद्यावर ताण येईल असं काही करायला मनाई केली. फास्ट बॉलर असल्यानं माझं क्रिकेट थांबलं. हे दु:ख मोठं होतं. कारण तोपर्यंत क्रिकेट हेच आयुष्य झालं होतं…

पुन्हा अभिनयाकडे
एक दिवस कॉलेजच्या लॉबीतून जाताना बोर्डावर एकांकिकांसाठी ऑडिशनचा बोर्ड दिसला. कॉलेजला प्रवेश घेतल्यानंतर अभिनयाशी कधीच संबंध आला नव्हता. भाऊ अद्वैत दादरकर कॉलेजच्या एकांकिका दिग्दर्शित करायचा. तो जेव्हा जेव्हा घरी यायचा तेव्हा त्याबद्दल बोलायचा. ते तितकंच होतं. बोर्ड वाचल्यानंतर काही क्षण तिथं रेंगाळलो आणि आईला फोन केला आणि सांगितलं, “ कॉलेजचं शेवटचं वर्ष आहे. मला ऑडिशन द्यायची इच्छा आहे.” हे ऐकून ती आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली तुला जे योग्य वाटतं ते कर. त्यानंतर ऑडिशनच्या ठिकाणी गेलो. तिथं लहानपणी सादर केलेल्या नाटकातील प्रसंग सादर केला. माझी निवड झाली आणि पुन्हा अभिनयाच्या प्रांतात प्रवेश झाला. अद्वैतला जेव्हा मी अभिनय करणार असल्याचं समजलं तेव्हा तो गमतीनं म्हणाला,“ लेका, तुला क्रिकेट जमलं नाही म्हणून इथं आलास होय… तुमच्यासारख्या लोकांमुळे अभिनय खूप सोप्पा आहे, असा समज पसरतो…” माझ्या जडणघडणीत त्याचा मोलाचा सहभाग आहे हे तितकंच सत्य आहे. कॉलेजतर्फे आयएनटी एकांकिकास्पर्धेत द.मा. मिरासदार यांची ‘संगीत कोणे एकेकाळी’ ही एकांकिका सादर केली. या एकांकिकेवर कालांतरानं दोन अंकी प्रायोगिक नाटक बसवलं. त्याचं दिग्दर्शन अद्वैतनंच केलं होतं. त्याच्याच दिग्दर्शनाखाली पुन्हा रंगमंचावर पाऊलं ठेवलं. बीकॉमची परीक्षा देण्याआधी आनंद म्हस्वेकर यांच्या ‘दुधावरची साय’ या नाटकात काम केलं. ते माझं पहिलं व्यावसायिक नाटक. दरम्यान, कॉलेज संपल्यानंतर पुढे काय असा प्रश्न होताच. क्रिकेटचा पर्याय बंद झाला होता. बीकॉम झाल्यानंतर पुढे सीए वगैरे करायची इच्छा नव्हती. नोकरी करण्याचा माझा पिंड नव्हता. आपल्याला अभिनय बरा जमतो हे माहीत असल्यानं इथंच करिअर करण्याचा निर्णय घेतला. मग काम शोधायला सुरुवात झाली. याच काळात अद्वैतनं ‘मोरूची मावशी’ हे नाटक दिग्दर्शित केलं. त्यात मोरूचं काम मिळालं. या नाटकात भरत जाधव, अद्वैतही होते. याचे १५० प्रयोग झाले. त्याबरोबरीनं काम मिळवण्याचा संघर्ष सुरू होता.

संघर्ष मानसिक पातळीवरचा
जे काही काम मिळावं ते स्वत:च्या जोरावर, स्वत:च्या हिमतीवर हे मनात होतं. त्यामुळेच वडिलांमुळे आपली ओळख निर्माण होऊ नये, म्हणून त्यांच्या नाटकात काम करायला नकार दिला होता. विजय गोखले यांचा मुलगा, ज्येष्ठ नाटककार विद्याधर गोखले यांचा नातू, अद्वैत दादरकरचा भाऊ अशीही ओळख असल्यानं एकप्रकारचं दडपण होतं. काम आवडलं तर कौतुक करतीलही, पण नाही आवडलं तर विजयचा मुलगा फार काही बरा काम करत नाही असंही म्हणायलाही मागेपुढे पाहणार नाहीत, या विचारानं ताण अधिकच येत असल्यानं मानसिक पातळीवर संघर्ष अधिक होता. काम मिळवण्यापेक्षा हा संघर्ष जास्त होता. अर्थात कामासाठी अनेकदा ऑडिशन देऊनही नकार मिळतच होता. तरी न थकता कामाचा शोध सुरू होता. ‘मोरूची मावशी’मुळे माझं काम प्रेक्षकांना आवडलं होतं. त्यातूनच कामं मिळत गेली. मग कधी मालिका, तर कधी नाटक मिळालं. त्यात ‘शेवग्याच्या शेंगा’ हे नाटक, ‘ओ वुमनिया’, ‘डोंट वरी बी हॅपी’ हे नाटक आणि आता आलेलं ‘सोयरे सकळ’ हे नाटक. तर मालिकांमध्ये ‘अस्मिता’, ‘तुझ्या वाचून करमेना’, ‘तुझं माझं ब्रेकअप’ मिळाल्या. अर्थात यात फार महत्त्वाची भूमिका नसली तरी माझी दखल घेतली जात होती, हे महत्त्वाचं होतं.

‘तुला पाहते रे’ टर्निंग पॉईंट
शेखर ढवळीकर यांच्या ‘ओ वुमनिया’आणि  ‘तुझं माझं ब्रेकअप’मध्ये काम केलं होतं. माझं काम माहीत होतं. तेच ‘तुला पाहते रे’ मालिकेचे लेखकही होते. त्यांनीच मालिकेच्या दिग्दर्शकांना माझं नाव सुचवलं. ऑडिशन होऊन निवड झाली. भूमिका नेमकी माहीत नव्हती. हळूहळू व्यक्तिरेखा आकाराला आली आणि ती होती जयदीप सरंजामे. तऱ्हेवाईक, संतापी,त्याचवेळी लहान मुलासारखा भाबडा. जेव्हा या व्यक्तिरेखेबद्दल सांगितलं तेव्हा टेन्शन आलं. ही भूमिका साकारताना खोटी वाटू नये हे आव्हान होतं. परंतु लेखक, दिग्दर्शकांशी चर्चा करून ही भूमिका साकारणं तुलनेनं सोपं गेलं.  प्रारंभी प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया थोड्या विचित्र होत्या. एका लहान मुलीचे पालक माझ्यासोबत फोटो काढायला आले पण ती यायला तयार नव्हती. कारण तिच्या मते मी ‘वेडा दादा’ होतो. तो ओरडतो, तो मला आवडत नाही,अशी प्रतिक्रिया आल्यावर आपलं काम योग्य ट्रॅकवर असल्याचं जाणवलं. या मालिकेमुळे मला अभिनेता म्हणून खऱ्या अर्थानं ओळख मिळाली. सुबोध भावेसारखा अनुभवी अभिनेता असल्यानं त्याच्याकडून खूप  गोष्टी शिकता येतात.

दिग्दर्शनाची आस
अभिनयाच्या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला तेव्हा अद्वैतसह जवळच्या अनेक मित्रांनी तू दिग्दर्शनावर जास्त लक्ष दे असं सांगितलं होतं. दिग्दर्शन आवडत असल्यामुळेच ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर २०१२ मध्ये  ‘एफटीआयआय’ची फिल्म मेकिंगसाठी परीक्षा दिली होती. लेखी परीक्षा पास झालो नंतर पुढे जाता आलं नाही. मात्र तेव्हापासून फिल्ममेकिंग, दिग्दर्शनाचा विचार डोक्यात आहेच. गेल्या तीन-चार वर्षांपासून एकांकिका यूथ फेस्टिव्हल, आंतरमहाविद्यालयीन पातळीवर, आयएनटीला एकांकिकांचं दिग्दर्शन करत आहे. पुढच्या वर्षभरात एखादं  व्यावसायिक नाटक करणार आहे. त्यासाठी कामही सुरू झालं आहे. नाटकांबरोबरच चित्रपटाच्या दिग्दर्शनाचा अभ्यास करून तेही करायचं आहे. त्यासोबत ही मालिका संपल्यानंतर चित्रपटांत काम करण्यासाठी गंभीरपणे प्रयत्न करणार आहे.सध्या ‘हवा येऊ द्या’च्या ‘शेलिब्रिटी पॅटर्न’मधून विनोदाचा जॉनर अनुभवत आहे.  दरम्यान, वेब सीरिजच्या विश्वातही प्रवेश केला आहे. येत्या जून महिन्यात माझी वेब सीरिज प्रसारित होत आहे. त्याला कसा प्रतिसाद मिळतो याची उत्सुकता आहे.

आवडतं पुस्तक  -  द आऊटसायडर
आवडता लेखक  -  अल्बर्ट काम्यू
आवडता चित्रपट  -  हे सतत बदलतं असतं. पण सध्या ‘अंदाधून’
आवडता अभिनेता  -  नासिरुद्दीन शहा, आमिर खान, जितेंद्र जोशी
आवडती अभिनेत्री  -  प्रियांका चोप्रा, केट विंसलेट

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link