Next
अ‍ॅनिमियावर उपयुक्त योगक्रिया
वृंदा प्रभुतेंडुलकर
Friday, October 04 | 04:00 PM
15 0 0
Share this story

मागील लेखातून आपण अ‍ॅनिमियाची लक्षणे, कारणे सविस्तर पाहिली. शरीराला ऑक्सिजनची गरज असते ती अन्नातील साखर व स्निग्धांचे ज्वलन करून ऊर्जा निर्माण करण्यासाठी. अ‍ॅनिमिया झाल्यावर रक्तातील लाल पेशी घटतात आणि पुरेसा ऑक्सिजन पेशींपर्यंत पोचवला जात नाही. याचा परिणाम म्हणून अंतर्गत अवयव दुर्बल होत जातात. अधिकाधिक ऑक्सिजनच्या मागणीमुळे हृदय व फुप्फुसांवर जास्तीचा भार येतो, म्हणून त्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी योगाच्या श्वसनक्रिया खूप उपयोगी ठरतात.
रक्तामध्ये ऑक्सिजन मिसळण्याची प्रक्रिया फुप्फुसांतील सूक्ष्म वायुकोषांद्वारे होत असते. हे वायुकोष कार्यक्षम करून पेशींना प्राणवायूचा भरपूर पुरवठा करवणारी कपालभातीची क्रिया या लेखमालेत पूर्वी दिली होती. नवीन वाचकांसाठी पुन्हा फक्त कृती सांगत आहोत-
पद्मासनात बसावे. पाठीचा कणा सरळ ठेवावा. मूलबंध लावावा (गुदद्वार वरच्या बाजूस आतमध्ये ओढ़ून घ्यावे). प्रथम रेचक करून (श्वास सोडून) हवा बाहेर काढून टाकावी. त्यानंतर अर्धाच पूरक भरून (अर्धाच श्वास घेऊन) रेचक-पूरक, रेचक-पूरक मध्यमगतीने, दोन्हींचा आवाज सारखा येईल अशाप्रकारे किंचित बळ लावून करावे. सुरुवातीला क्षमतेनुसार २५-३० श्वास-प्रश्वास करावेत. हळूहळू सवय वाढवत न्यावी व एका टप्प्यात १०८ पर्यंत श्वास-प्रश्वास करावेत. त्याहून अधिक करण्याची क्षमता असली तरी करू नये. क्रिया थांबवताना रेचक करून थांबावे. लगेच श्वास भरू नये. ८ ते १० सेकंद श्वास न घेता, म्हणजेच बाह्य कुंभकात राहावे. यानंतर सावकाश एक दीर्घ श्वास घ्यावा व ३ ते ४ सेकंद थांबून दीर्घ रेचक करावा. हा रेचक करताना घाई होऊ नये याची काळजी घ्यावी.
  कपालभातीचे श्वास-प्रश्वास लोहाराच्या भात्याप्रमाणे गतिमान करावेत, परंतु ही गती सेकंदाला दोन श्वास-प्रश्वास एवढी असावी. याहून जलद केल्यास फायदा होणार नाही तसेच याहून दीर्घ केल्यास डोके जड होऊन चक्कर आल्यासारखे वाटू शकते. श्वास-प्रश्वास जोरकसपणे न करता सहजपणे करावेत. रेचकाच्या वेळी पोट स्वाभाविकपणे आत जाते व पूरकाच्या वेळी बाहेर येते.
कपालभाती मोजताना एक श्वास व एक प्रश्वास मिळून एक संख्या होते. म्हणून फक्त पूरक किंवा फक्त रेचक मोजावेत.
 
अशाप्रकारे एक आठवडा सराव झाल्यानंतर कपालभाती पुढीलप्रमाणे करावी :
१  पूर्ण रेचक करून हवा बाहेर काढून टाकावी.
२  अर्धा पूरक भरावा.
३  डावी नाकपुडी डाव्या अंगठ्याने पूर्णपणे बंद करावी.
४  उजव्या नाकपुडीने कपालभाती करावी.  एका टप्प्यात ५४ पर्यंत श्वास-प्रश्वास करावेत. त्याहून अधिक करण्याची क्षमता असली तरी करू नये.
५  थांबताना रेचक करून थांबावे. हात खाली घ्यावा व ८ ते १० सेकंद बाह्य कुंभकात राहावे
६  दोन्ही नाकपुड्यांनी दीर्घ श्वास घ्यावा व ३-४ सेकंद थांबून दीर्घ रेचक करावा.
७. ७ ते ८ साधारण श्वास-प्रश्वास करावेत व नंतर वरील पायऱ्यांनुसारच, परंतु आता उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने कपालभाती करावी.
८    अशाप्रकारे प्रथम उजव्या व मग डाव्या नाकपुडीद्वारा प्रत्येकी ५४ संख्येत कपालभाती करून झाल्यावर दोन्ही नाकपुड्यांद्वारा १०८ ची कपालभाती करावी. या तिन्हीच्या दरम्यान प्रत्येकी ७ ते ८ साधारण श्वास-प्रश्वास करणे आवश्यक आहे.
अ‍ॅनिमियामुळे शरीराला अशक्तपणा येतो. चक्कर आल्याची भावना होते आणि तोल सांभाळणे कठीण वाटू लागते. यासाठी शरीराला शीतलता आणि स्थैर्य देणाऱ्या, अशक्तपणा दूर करून दृढपणा प्राप्त करून देणाऱ्या शीतकारी आणि शीतली या क्रिया नियमितपणे केल्यास रक्तशुद्धीसाठीसुद्धा साहाय्य करतात.

शीतकारी
प्रथम रेचक करावा. वरचे व खालचे दात जुळवून घ्यावेत. जीभ दातांच्या मागे लावून ठेवावी. आता ओठ उघडून दंतपंक्तींमधून सावकाश पूरक भरावा. पूरकाचा सी... सी... असा आवाज व त्याबरोबरच श्वास थंड झाल्याचे जाणवेल. पूरक भरून झाल्यावर तोंड बंद करावे व थोडे थांबून सावकाश नाकाने रेचक करावा. अशाप्रकारे ७ ते ८ आवर्तने करावीत.शीतली
शीतकारीप्रमाणेच या क्रियेतही तोंडाने पूरक करायचा आहे. हा पूरक जिभेच्या गोलाकार पन्हाळीमधून भरला जातो. जिभेच्या ओलसरपणामुळे हा श्वास थंड होऊन आत येतो व शीतलता अनुभवास येते. जिभेची पुंगळी करणे जमत नसेल, तर जिभेचे टोक आतल्या बाजूला वळवून टाळूला लावावे. पूरक भरून झाल्यावर तोंड बंद करावे, थोडे थांबून सावकाश नाकाने रेचक करावा. अशाप्रकारे ७ ते ८ आवर्तने करावीत.

शीतकारी व शीतली विशिष्ट आसनात बसून करण्याचे बंधन नाही. आपण कुठेही दिवसातून ५-६ वेळा करू शकतो. मात्र आहार घेतल्यानंतर लगेचच करू नये तसेच प्रदूषित हवेत करू नयेत.
सूचना - दमा, टॉन्सिल्स किंवा कफविकार असेल तर शीतकारी, शीतली योगशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली कराव्या.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link