Next
शेत खाणारा हत्ती
आनंद शिंदे
Friday, July 05 | 03:00 PM
15 0 0
Share this story

साधारण चारच्या आसपास मी आकेरीच्या गेस्ट हाऊसला पोचलो होतो. गाडी चालवून अंग चांगलंच शिणलं होतं. नुकताच खुर्चीला टेकलो आणि वनखात्याचे अधिकारी मला न्यायला तिथे पोचले. हत्तीची नक्की चाहुल लागली नव्हती परंतु अंबेरीजवळच्या परिसरात तो फिरत होता. वनखात्याच्या अधिकाऱ्यांसोबत फिरताना गुगल मॅपवर परिसर छोटा वाटत असला तरी त्या संपूर्ण परिसराची रचना (Topography) पार कठीण होती. आम्ही फिरत असलेल्या परिसरामध्ये वाडोस, अंबेरी गोगेस, निवजे, घावनाळे आणि तुळसुली किंवा रांगणा तुळसुली हा परिसर येत होता. हत्तीची भीती ही दिवसा लोकांमध्ये जाणवत नसली तरी साधारण सात नंतरचा काळ सगळ्यांना कठीण वाटत होता, हे प्रत्येकाचा बोलण्यातून जाणवत होतं. वनखात्यानं इतर भागांतूनही खात्याची काही माणसं मागवली होती. सहा वाजताच जेवण संपवून वेगवेगळ्या गाड्यांमधून सगळे जण सहा गावांच्या दिशेनं निघून गेले. नुकसान होत असल्यानं लोक चिडलेले होते आणि तो राग प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. चूक कोणाचीच नव्हती- ना हत्तीची, ना माणसाची, ना वनखात्याची. वनखात्याचे लोक मात्र हत्ती आणि गावकऱ्यांमध्ये चांगलेच अडकले होते.
आमची गाडी आधी वाडोसवरून घावनाळेला गेली आणि तुफान पाऊस चालू झाला. अंधार एवढा मिट्ट होता की बोटं डोळ्यांत घातली तरी स्पर्श झाल्यावरच कळलं असतं, पण हत्तीचा काही पत्ता नव्हता. शेवटी एका शाळेच्या व्हरांड्यात सगळे बसले. सगळे चांगलेच भिजलेले होते. पावसाबरोबर येणारा वाराही बऱ्यापैकी टोचत होता. सगळ्यांची आता एकमेकांना फोनाफोनी चालू झाली. मात्र त्या दिवशी हत्तीनं कुठेही आपली चाहूल लागू दिली नाही. एव्हाना साडेअकरा होऊन गेले होते. आता बरोबरच्या लोकांच्या चेहऱ्यावरचा ताण निवळायला लागला होता. आता सगळे पाऊस थांबण्याची वाट पाहत होता. पहाटे पाऊस कमी झाला आणि गाडी अंबेरीला आली. साधारण सहा वाजता मला पवारांनी अकेरीत सोडलं आणि नऊ- साडेनऊला येतो, असे सांगून ते निघून गेले.
ज्या हत्तीचा गोंधळ निस्तरण्यासाठी मी आलो होतो त्यानं पहिल्या दिवशी साधी चाहूलही लागू दिली नाही, याचं नवल वाटत होतं. सगळं आवरून दोन तास झोपलो आणि पवार परत आले. अंबेरीच्या ऑफिसमधून शंकू लाड, सुखदेव बळवे, आणिक कांबळे असे आम्ही निघालो. तेवढ्यात तुळसुली भागात हत्तीचा आवाज ऐकू आला, असा फोन आला. आम्ही त्या दिशेनं निघालो. गावात पोचलो तसा गावकऱ्यांनी दिशा सांगितली आणि आम्ही चालायला लागलो. बरोबर असलेल्या वनखात्याच्या लोकांना जंगल माहीत होतं. चालताना मध्येच जंगल संपत होतं आणि शेत लागत होतं. तर शेतापलिकडे सलग असणाऱ्या जंगलसदृश्य भागात कोणाचं तरी घर लागत होतं. माझा चांगलाच गोंधळ होत होता की आपण कधी शेतात जातोय,  तर कधी जंगलात तर कधी अचानक समोर घर लागतंय. मी इतका गोंधळात होतो तर हत्तीही गोंधळत असेलच की! जंगल म्हणून जावं तर समोर घर, आणि शेत म्हणून जावं तर लगेच जंगल!
मागच्या लेखात मी वर्णन केलं होतं, तशी ती जागा ‘हत्तीचं घर’ म्हणून योग्य वाटत होती- दाट झाडी, छान गारवा, भरपूर अन्नासाठी बांबू. माणसानं लावलेलं भाताचं शेत आणि जवळ असलेलं तुळसुलीचं तळं, तेही भरलेलं. सकाळी साधारण ११ वाजता आम्ही चालायला सुरुवात केली. वाटेत शेत वाचवण्यासाठी विद्युतीकरण केलेलं कुंपण दिसलं आणि हत्ती का चिडला आहे, हे सहज लक्षात आलं. अन्न समोर दिसत आहे आणि पोचता येत नाही, ही  गोष्ट त्याला चीड आणणारी होती.
फिरून दमलो आणि एका घरासमोर बसलो. एक वयस्कर जोडपंं राहत होतं. त्यांच्या शेताला कुंपण नव्हतं. आजी-आजोबांना कारण विचारलं तर म्हणाले, “अरे, आपला बाप्पाच असतो ना तो. इल ह्यसर ता तेका सांगतंय म्या बाप्पा जेवढा काऊचा ता खा जो माका ठेवूचा वाटता तो ठीव.” त्या जोडप्याला नमस्कार करून पुढे निघालो. कोनाला तहानभूक सुचत नव्हती.
हत्तीच्या पाण्याच्या वाटेवर बसून बरीच वाट बघितली. चार वाजता पुन्हा दुसऱ्या फेरीला सुरुवात केली. ती फेरी पहिल्याच वाटेवरून जात होती. मात्र तळ्याजवळच्या मारुतीमंदिरापासून सगळ्यांना झटकाच बसला. कारण आम्ही सकाळी जाताना ज्या हत्तीचा मागमूसही नव्हता, त्याची पावलं आता आम्हाला त्याच मार्गावर दिसत होती. एवढा मोठा देह कसलाही आवाज न करता तिथूनच गेला होता. ज्याला आम्ही शोधत होतो तो न ओरडता आमच्यावर हल्ला न करता कदाचित आमच्या मागे फिरत होता. तळ्यातून बाहेर येणाऱ्या पावलातलं पाणीदेखील निवळलं नव्हतं,  इतका तो ठसा ताजा होता!
पावसाळ्यानंतर केलेल्या मोहीमेत तीन हत्ती पकडले असता मी तिथे गेलो. सोबत आशय सहस्त्रबुद्धे हा मित्र होता. अगदी सहज आपली सोंड माझ्याकडे करत त्या हत्तीनं जंगलातील ओळख दाखवली होती. माणसानं त्यावेळी त्याचं  नाव ‘भिमा’ ठेवलं होतं. नकळत पाणावलेल्या डोळ्यांनी माणूस म्हणून त्याची माफी मागितली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link