Next
अंतिम सत्याचा शोध
मानसी वैशंपायन
Friday, November 23 | 05:00 PM
15 0 0
Share this storyआता अष्टांगयोगाभ्यासाच्या आठव्या व शेवटच्या टप्प्याचा आपण अभ्यास करणार आहोत. ‘समाधी’ शब्दाची फोड आहे सम्+आ+धि म्हणजे समावेशकतेने पूर्णपणे ठेवणे, चित्तस्थैर्याची अवस्था टिकवून धरणे म्हणजे समाधी. धारणेतून चित्त ध्यानात सरकते व ध्यानातून ते समाधीत सरकते. धारणेच्या या अतिप्रगत अवस्थेलाच समाधी म्हणतात. समाधीअवस्थेत चित्तामध्ये केवळ तो ध्यानविषयच उजळल्यामुळे चित्ताचे स्वत:चे रूप नाहीसे झाल्यासारखे वाटते. केवळ ध्यानविषयच जाणिवेमध्ये शिल्लक राहतो. ध्येय, ध्याता व ध्यान या तिन्हींचा वेगवेगळेपणा संपुष्टात येऊन केवळ ध्यानविषयच शिल्लक राहतो. ध्याता व ध्यान हे ध्येयविषयात एकरूप होतात. कबीर या अवस्थेचे वर्णन करताना म्हणतात, थेंब सागरात मिसळून गेला नाही तर सागरच थेंबात एकरूप झाला.

धारणेचा विषय सुरुवातीला शब्दरूपात्मक असतो. इतर सारे विषय दूर सारून जाणीव केवळ एकाच विषयावर केंद्रित झाली की ‘धारणा’ साधते. अशा धारणेतून ध्यान साधते. धारणा ही पायवाटेसारखी आहे. ही पायवाट ध्यानाच्या राजमार्गाला मिळते. हा राजमार्ग साधकाला समाधीमंदिरापर्यंत घेऊन जातो. ओशोंकडे एकदा एक शिष्या आली व म्हणाली, “स्वामीजी बाळंतीण झाल्यापासून माझे ध्यान लागत नाही. लक्ष सारखे बाळाकडेच जाते.” ओशो हसले व म्हणाले, “मग हे माते, तू दुसऱ्या कशावर ध्यान करण्यापेक्षा तुझ्या बालकावरच ध्यान केंद्रित कर.” आपल्या आवडीच्या विषयावर ध्यान केंद्रित करावे, असे महर्षी पतंजली सांगतात.
डॉ. करंबेळकरांच्या मते धारणा-ध्यान-समाधीचा एकच विषय असल्यास अंतरंगसाधना सुलभ होते. यासाठीच इष्टदेवता वा इष्टगुरू यांची प्रतिमा धारणेचा विषय म्हणून निवडावा किंवा त्या देवतेमागचे तत्त्व हा सूक्ष्म विषय ध्यानासाठी निवडावा. त्यातून समाधी साधली जाऊन देवतेशी वा गुरुतत्त्वाशी एकरूपता साधता येईल. धारणेच्या विशिष्ट भावावस्थेचे सातत्य टिकवणे म्हणजे ध्यान आणि ध्यानाच्या अवस्थेचे सातत्य टिकवणे म्हणजे समाधी.

बाह्य जगातील एखाद्या प्रक्रियेकडे एखादा वैज्ञानिक ज्याप्रमाणे एकाग्रतेने, पण तटस्थपणे पाहतो, त्याचप्रमाणे योगी आपल्या आंतरिक प्रक्रियांकडे एकाग्रतेने, पण तटस्थपणे पाहतो. स्वत:च्या आंतरिक स्थितीकडे तटस्थपणे पाहणे म्हणजे ध्यान. विमलाजी ठकार म्हणतात की, ‘मी ध्यानाचा अनुभव घेत आहे’ असे जाणवणारा ‘मी’ जेव्हा गळून पडतो तेव्हा त्या अवस्थेला ‘समाधी’ म्हणतात.

महर्षी पतंजली यांनी समाधीअवस्थेच्या निरनिराळ्या पायऱ्या, विश्वरचनेची कारणमीमांसा, अंतिम अवस्थेत घडणारे ज्ञान हे सारे शास्त्रीय परिभाषेत सांगण्याचा एक विलक्षण प्रयत्न केला आहे. पतंजलीचा काळ दोन हजार वर्षांपूर्वीचा असल्यामुळे त्यावेळचे वर्तन आज समजणे अवघड आहे. मात्र पातंजलयोगसूत्रांवर अनेकांनी टीका ग्रंथ लिहिले असल्यामुळे या ग्रंथाच्या आधारे आपल्याला योगशास्त्रातील बारकावे कळणे सुलभ झाले आहे. त्या सर्वांचा एकच अर्थ आहे, की अंतिम सत्य ज्याचे त्यानेच शोधायचे असते.

समाधीचे दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात विषयाशी तद्रूपता आहे, पण सूक्ष्म स्वरूपात किंवा बीजरूपात त्या अवस्थेत साधकाचे ‘मी’पण शिल्लक आहे, अशा समाधीला सबीज समाधी म्हणतात. जेव्हा हे ‘मी’पणाचे बीजही नष्ट होते आणि आत्मा स्वत:च्या स्वरूपात स्थित होतो त्याला ‘निर्बीज समाधी’ किंवा कैवल्यावस्था म्हणतात. सबीज समाधीत गेलेला साधक समाधीची अवस्था संपली, की परत समाधीपूर्व स्थितीत येतो. त्याची ती निर्मन तद्रूपावस्था मर्यादित काळासाठी असते. श्रीगजानन महाराजांच्या पोथीतही ते अशा सबीज समाधी अवस्थेत दोन तीन तास राहत असत, याचा उल्लेख आला आहे.

एकदा देवर्षी नारद अरण्यातून चालले असताना त्यांना एक मनुष्य ध्यानस्थ अवस्थेत बसलेला दिसला. बराच काळ तो तेथे ध्यानस्थ असावा. कारण त्याच्या शरीराभोवती मुंग्यांनी एक भलेमोठे वारूळ उभारले होते. नारदांना वंदन करून तो मनुष्य म्हणाला, ‘आपण भगवंताला माझ्यावतीने विचारा, की मला कधी मुक्ती लाभेल?’ नारद, ‘बरे’ म्हणून पुढे निघाले. तेथे रस्त्यात त्यांना आणखी एक माणूस दिसला. तो नाचत होता, गात होता. नारदांना बघून त्याने विचारले, “हे देवर्षी, तुम्ही वैकुंठाला जात असाल तर देवाला विचारा, की मला कधी मुक्ती लाभेल?” नारदांनी “बरे” म्हटले व ते पुढे गेले.

काही दिवसांनी नारद पुन्हा त्या अरण्यातून चालले असता देहाभोवती वारूळ झालेला तो मनुष्य नारदांना दिसला. त्याने विचारले, “हे मुनिवर, माझ्या प्रश्नाचे उत्तर विचारले का देवाला?” नारद म्हणाले, “होय, मी विचारले. भगवान म्हणाले, की आणखी चार जन्मांनी तुला मुक्ती लाभेल.” ते ऐकून तो मनुष्य विलाप करू लागला आणि म्हणू लागला. “भोवती वारूळ तयार होईपर्यंत मी ध्यान केले तरी अजून माझे चार जन्म बाकी आहेतच?” नारद पुढे गेले. आनंदात मग्न असलेला तो माणूस त्यांना विचारू लागला. “हे मुनिवर, भगवंताने माझ्या प्रश्नाचे काय उत्तर दिले? नारद उत्तरले, “या समोरच्या चिंचेच्या झाडाला जितकी पाने आहेत, तितक्या वेळा तुला मुक्तीसाठी आणखी जन्म घ्यावे लागतील. त्यानंतर तू मुक्त होशील.” ते ऐकून तो माणूस हर्षभरित झाला व म्हणाला “काय! एवढ्याशा थोड्या वेळात मला मुक्ती मिळणार आहे? अहो, केवढे माझे भाग्य!” तत्काळ आकाशवाणी झाली, “बेटा, तुला आताच, याच क्षणी मुक्ती लाभेल.”

दुसरा माणूस अनेक जन्म साधना करावयास तयार होता, पण पहिल्या मनुष्याला आणखी चार जन्म फार जास्त वाटले. थोडक्यात काय, तर या दुसऱ्या माणसासारखी चिकाटी, निष्ठा असेल तरच योगाभ्यासात धारणा, ध्यान, समाधी आणि कैवल्य या टप्यापर्यंत पोहोचता येते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link