Next
चोकर्स की जोकर्स?
शरद कद्रेकर
Friday, June 07 | 03:45 PM
15 0 0
Share this story

पराभवाची हॅटट्रिक करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचे विश्वचषकस्पर्धेमधील आव्हान संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत. इंग्लंड, बांगलादेशपाठोपाठ भारताकडूनही मार खाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला पुढच्या सहाही सामन्यांत विजय मिळवणे गरजेचे आहे. सोमवारी विंडीजविरुद्ध त्यांचा मुकाबला असून, हा सामना गमावल्यास त्यांच्या या स्पर्धेतील आशा जवळपास संपुष्टात येतील. प्रमुख खेळाडूंना झालेल्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेची पुरती वाताहत झाली आहे.
गोलंदाजी व खास करून तेज गोलंदाजी हे दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे बलस्थान. विश्वचषकस्पर्धेला सुरुवात होण्याआधीच अॅनरिच नॉर्टजेला दुखापत झाल्यामुळे त्याची इंग्लंडवारी हुकली. प्रमुख गोलंदाज डेल स्टेनला  आयपीएल दरम्यानच खांद्याला दुखापतीने सतावले. आयपीएल अर्ध्यावर सोडून त्याने मायदेशी प्रयाण केले, उपचारही घेतले, परंतु दुखापत बळावतच गेल्यामुळे त्याला अखेर विश्वचषकस्पर्धेतून माघार घ्यावी लागली. यातच भर म्हणून लुंगी एनगिडीला दुखापतीमुळे १० दिवसांच्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आला. परिणामी कासिगो रबाडावर गोलंदाजीचा भार पडला आहे. धडाडणारी तोफच निकामी झाल्यामुळे दक्षिण आफ्रिका संघाची अवस्था मोठी बिकट झाली आहे.
ना धड फलंदाजी, ना धड गोलंदाजी, ना धड क्षेत्ररक्षण अशी दक्षिण आफ्रिकेची त्रेधातिरपीट उडाली असून कर्णधार ड्यू प्लेसिस, प्रशिक्षक ओटीस गिब्सन यांना पत्रकारांच्या फैरीला तोंड देणे अवघड जात आहे. खेळाडूंच्या दुखापतीपाठोपाठ मानसिक कणखरतेतही दक्षिण आफ्रिकेचा संघ कमी पडत आहे. विश्वचषकाच्या सलामीच्या लढतीत जोफ्रा आर्चरच्या चेंडूचा प्रसाद दाढीधारी हाशिम अमलाला मिळाला. धावांसाठी झगडणाऱ्या अमलाचा आत्मविश्वास उणावला. इंग्लडपाठोपाठ भारताविरुद्धही तो अपयशी ठरला. ९ चेंडूत ६ धावा ही कामगिरी अमलाला निश्चितच भूषणावह नाही. संघातील ज्येष्ठ, अनुभवी खेळाडू अपयशी ठरत असताना नवोदितांची परवड सुरूच आहे.
कर्णधार ड्यू प्लेसिसचे डावपेच अनाकलनीय ठरले. रोझ बौलच्या तेज खेळपट्टीवर नाणेफेकीचा कौल अनुकूल लागूनही त्याने प्रथम फलंदाजी स्वीकारली. बुमराहच्या तेजतर्रार गोलंदाजीने अमला, डीकॉक झटपट माघारी परतले. सुरुवातीलाच खिंडार पडल्यामुळे कुलचासमोर (कुलदीप यादव-चहल यांचे टोपण नाव) दक्षिण आफ्रिकेची मधली फळीही गडगडली. मॉरिस-रबाडा यांच्या फटकेबाजीमुळे दक्षिण आफ्रिकेने २२५ धावांचा टप्पा ओलांडला. पहिल्या दोन सामन्यांत (इंग्लड, बांगलादेश) नाणेफेक जिंकून धावांचा पाठलाग करण्याची चाल अपयशी ठरल्यामुळे तसेच रबाडाला तोलामोलाची साथ देणाऱ्या गोलंदाजाच्या अभावामुळे कर्णधार ड्यू प्लेसिसने कदाचित प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला असावा, पण तो त्याच्या अंगलट आला.
रबाडा जीव तोडून गोलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षकांची साथ त्याला लाभली नाही. शतकवीर रोहित शर्माला जीवदान लाभले कर्णधार प्लेसिसकडूनच! डेव्हिड मिलरनेही रोहितचा झेल सोडला तो रबाडाच्याच गोलंदाजीवर. अपुरी धावसंख्या, त्यातही ढिसाळ क्षेत्ररक्षणाची भर पडल्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा पराभव अटळच होता. वेस्ट इंडिज (१० जून), अफगाणिस्तान (१५ जून), न्यूझीलंड (१९ जून), पाकिस्तान (२३ जून), श्रीलंका (२८ जून), ऑस्ट्रेलिया  (६ जुलै) या सामन्यांत दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवल्यास त्यांच्या आशा कायम राहतील अन्यथा ‘गुडबाय इंग्लंड’ करत मायदेशी परतण्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्याकडे नाही. दक्षिण आफ्रिकेने १९९२ साली विश्वचषकस्पर्धेमध्ये पदार्पण केले. आतापर्यंत ७ पैकी ४ स्पर्धांत त्यांनी उपांत्य फेरी गाठली. एका स्पर्धेआड उपांत्य फेरी गाठण्याची किमया त्यांनी केली असून (१९९२, १९९९, २००७, २०१५) हा क्रम लक्षात घेता यंदा त्यांचे आव्हान साखळीतच संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत!
दक्षिण आफ्रिकेला ‘चोकर्स’ म्हटले जाते, कारण ते निर्णायक क्षणी ढेपाळतात. दक्षिण आफ्रिकेची यंदाची कामगिरी बघता त्यांना ‘जोकर्स’ म्हणणे उचित ठरावे.

ता.क.
भुवनेश्वरमधील एफआयएच सीरिज हॉकीस्पर्धेच्या सलामीच्या लढतीत अमेरिकेने दक्षिण आफ्रिकेवर २-० असा विजय संपादला. क्रिकेटपाठोपाठ हॉकीतही दक्षिण आफ्रिकेची पराभवाची मालिका खंडित होण्याची चिन्हे नाहीत असेच वाटते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link