Next
तरल भावना चितारणारा ‘समर ऑफ ४२’
मिलिंद कोकजे
Friday, September 20 | 04:00 PM
15 0 0
Share this storyपौगंडावस्था हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक अविभाज्य भाग असतो. तारुण्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या मुलांमध्ये बरेच बदल होत असतात. त्याचा पुरुष होण्याकडे प्रवास सुरू झालेला असल्याने स्त्रीविषयक आकर्षण वाढू लागते, क्वचित कधी त्याच्या वयाहून मोठ्या स्त्रीकडेही तो आकर्षित होतो. मुलांच्या आयुष्यातील अतिशय तरल असा हा काळ असतो. या संपूर्ण काळातील, या प्रक्रियेतील त्याची स्वतःची अशी काही गुपिते असतात जी तो जन्मभर स्वतःसोबत बाळगतो. क्वचितच त्याचा कुठे उल्लेख करतो.
हर्मन रॉचेर या लेखकाने आपली ही पौगंडावस्थेतील गुपिते उघड केली आणि त्यातून ‘समर ऑफ ४२’ हा एक अतिशय वेगळ्या विषयावरचा सर्वांगसुंदर चित्रपट निर्माण झाला. १९४२च्या उन्हाळ्याच्या सुट्टीत दुसरे महायुद्ध ऐन भरात असताना नानटकेट बेटावरील आपल्या आजीआजोबांकडे रॉचेर राहायला गेलेला असतानाच्या त्याच्या आठवणी या चित्रपटात आहेत. त्यावेळच्या काही जुन्या छायाचित्रांच्या पार्श्वभूमीवर आता मध्यमवयीन असलेल्या रॉचेरच्या निवेदनाने चित्रपटाला सुरुवात होते आणि फ्लॅशबॅकमध्ये तो उलगडत जातो… चित्रपटाचा १४-१५ वर्षे वयाचा नायक हर्मी आपल्या ओस्की आणि बेंजी या मित्रांबरोबर समुद्रकिनाऱ्यावर खेळत असताना नवीनच लग्न झालेला एक सैनिक पत्नी डोरोथीबरोबर किनाऱ्यावरच्या एका घरात राहायला येतो. डोरोथीच्या सौंदर्यामुळे ते तिघेही घायाळ होतात. हर्मी तर तिच्या प्रेमातच पडतो. डोरोथीचा नवरा युद्धावर निघून जातो. त्याच दिवशी संध्याकाळी डोरोथी दुकानातून रोजच्या वस्तू घेऊन घरी जात असताना हर्मी तिला पाहतो आणि तिच्या हातातील दोन-तीन जड पिशव्या पाहून तिला सामान घरी पोचवायला मदत करतो. तिथून त्यांची मैत्री सुरू होते. तिला माळा आवरण्याकरता मदत करायला तो जातो. ते काम संपल्यावर डोरोथी त्याच्या कपाळाचे चुंबन घेते.
त्यांची मैत्री वाढत असताना हर्मी, ओस्की आणि बेंजी यांचे त्यांच्या वयानुसार इतर उद्योग सुरूच असतात. बेंजी कुठूनतरी सेक्सवरचे एक पुस्तक आणतो. ते वाचल्यामुळे आता आपल्याला सेक्समधले सगळे काही कळते अशी त्या तिघांची समजूत होते. गावातील तीन मुलींना पटवून ते सिनेमाला नेतात, थिएटरच्या अंधारात त्यांच्याबरोबर जी काही मजा करता येण्यासारखी असते ती करतात. त्यातही बेंजी हा एकदम बिनधास्त, सेक्सबाबत उतावळा, हर्मी हा शांत, विचारी, सेक्सपेक्षाही प्रेमाकडे जास्त झुकलेला, तर ओस्की भयंकर घाबरट असतो. त्यांची ही स्वभाववैशिष्ट्ये त्या तीन मुलींबरोबरच्या त्यांच्या वागण्यातून बाहेर येतात. त्याच रात्री ते त्या तीन मुलींना समुद्रकिनाऱ्यावर सेक्स करण्याकरता घेऊन जातात. त्यात खूप गमतीजमती घडतात. ओस्की घाबरून
पळून जातो.
एक दिवस हर्मी डोरोथीकडे जातो तेव्हा ती नवऱ्याला पत्र लिहीत असते. तिला कंपनी देण्याकरता तो संध्याकाळी यायचे कबूल करतो आणि एखाद्या तरुण पुरुषाप्रमाणे प्रेयसीला भेटायला निघाल्यासारखा सूट वगैरे घालून तिला कंपनी द्यायला जातो. घराचा दरवाजा उघडाच असतो. आत एक दारूची रिकामी बाटली असते, अॅश ट्रेमध्ये भरपूर विझवलेल्या सिगारेट्स असतात आणि बाजूलाच एक तारेचा (टेलिग्राम) कागद पडलेला असतो. डोरोथीचा नवरा युद्धात मारला गेल्याची बातमी देणारी ती तार असते. काय झाले आहे ते लक्षात येऊन हर्मी आत जातो तर डोरोथी रडत बेडरूममधून बाहेर येते. हर्मी तिला सॉरी म्हणतो. ती आत एक रेकॉर्ड लावते आणि त्या मंद संगीताच्या तालावर ते दोघे हळुवारपणे डान्स करू लागतात (येथे डान्स हा शब्द मुद्दाम वापरला आहे. नाच किंवा नृत्य म्हटले, की एक वेगळीच आनंदाने/आनंदात केलेल्या नाचाची प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते. परंतु या प्रसंगातील डान्स मात्र दुखःद प्रसंगी केलेला हळुवार डान्स आहे). दोघांच्याही डोळ्यांतून अश्रू वाहत असतात. डोरोथी हर्मीला घेऊन बेडरूममध्ये येते आणि त्या दोघांमध्ये लैंगिक संबंध निर्माण होतात. डोरोथी बाहेर पोर्चमध्ये येऊन बसते, थोड्या वेळाने हर्मीही बाहेर येतो. डोरोथी फक्त त्याला गुड नाइट म्हणते.
हर्मी तेथून जातो. दुसऱ्या दिवशी तो परत येतो तेव्हा घर बंद असते. डोरोथी निघून गेलेली असते. फक्त दाराच्या कडीत तिने हर्मीकरता एक पत्र लिहून ठेवलेले असते. त्यात तिने लिहिलेले असते, की ती घरी परत जात आहे. ती कधीच हर्मीला विसरणार नाही आणि काल रात्री नेमके काय घडले ते आठवण्याचा, का घडले ते समजावून घेण्याचा मार्ग तो शोधून काढेल. त्या एका रात्रीने हर्मीचे मुलातून पुरुषात रूपांतर केलेले असते आणि त्याआधी काही काळ घडत असलेली प्रक्रिया पूर्ण झालेली असते. शेवटी हर्मी खूप लांबून त्या घराकडे बघत असताना रॉचरचे शेवटचे निवेदन ऐकू येते ‘डोरोथी नंतर कधीच मला भेटली नाही, तिचे आयुष्यात पुढे काय झाले हेही कळले नाही.’
एकाचवेळी अत्यंत तरल, गंभीर आणि काहीसा नर्मविनोदी अशा दोन पातळ्यांवर हा चित्रपट पुढे जात राहतो आणि दिग्दर्शक रॉबर्ट मुलीगनने या दोन पातळ्यांत उत्कृष्ट समतोल राखला आहे. सेक्ससारखा विषय असूनही खूप उघड, उत्तान असे काही दाखवलेले नाही. पण उगाचच टॅबू मानून सगळं लपूनछपून खूप सात्त्विक दाखवायचे असेही केलेले नाही. हाही त्याने राखलेला समतोल वाखाणण्यासारखा आहे. शेवटचे हर्मी व डोरोथीमधील सेक्सचे दृश्य अत्यंत सूचकपणे व संयमाने उभे केले आहे. त्याचवेळी हर्मी तिला माळा आवरायला मदत करायला जातो तेव्हा अत्यंत कमी व तोकड्या अंतर्वस्त्रांत तिचे अवयव व क्लिवेज दाखवताना त्याने संकोच केलेला नाही, कारण ते पाहून हर्मीची झालेली अवस्था, त्याची प्रतिक्रिया दाखवणे महत्त्वाचे असल्यान काय पाहून त्याची ही अवस्था झाली हे दाखवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. परंतु शेवटच्या दृश्यात मात्र त्यांच्यात नेमके काय घडले याचा खूप तपशील महत्त्वाचा नसल्याने फक्त काय घडले ते सांगणे आवश्यक असल्याने त्या दृश्यातील सूचकता पुरेशी आहे.
हर्मीचे केमिस्टच्या दुकानात कंडोम आणायला जाणे, पण कंडोम मागतानाचा संकोच, त्यामुळे दोन वेळा दुसरेच काहीतरी घेऊन दुकानाबाहेर पडणे हा प्रसंग असो किंवा त्या तिघांनी आपल्या मैत्रिणींना घेऊन सिनेमाला जाणे व नंतर रात्री समुद्रावर सेक्स करण्याकरता घेऊन जाणे असो, वाळूच्या टेकडीआड सेक्स करत असताना मध्येच बेजींने हर्मीकडे कंडोम मागायला येणे आणि बेंजीला सेक्स करताना बघून ओस्कीने घाबरून पळून जाणे, हे असे बरेच गमतीशीर प्रसंग चित्रपटात आहेत. या सर्व प्रसंगातील नवखेपणामुळे होणारी त्या तिघांची होणारी त्रेधातिरपिट तर त्याचवेळी आपण मोठे पुरुष झाले असल्याची जाणीव व त्यामुळे असे काहीतरी करत आहोत व ते योग्यच आहे हा कॉन्फिडन्स यांचे सुरेख मिश्रण या प्रसंगांत दिसते. या सर्व प्रसंगांसाठी दिग्दर्शकाला जसे गुण द्यायला हवेत त्याहून जास्त गुण त्या तीन तरुण कलाकारांना द्यायला हवेत इतका सुंदर अभिनय त्यांनी केला आहे.
हर्मी जेव्हा पहिल्यांदा डोरोथीला तिचे वाणसामान घरी नेण्याकरता मदत करायला जातो व जेव्हा ती त्याची मदत घेते त्यावेळी एक बाई आपली मदत घेते म्हणजे आपण कसे मोठे झालो या कल्पनेने हर्मीचा उजळलेला चेहरा बघण्यासारखा आहे. अशा प्रकारे अनेक ठिकाणी केवळ दृश्यातून वा प्रतिक्रियेतून संवादाचा वापर न करता दिग्दर्शकाने दृश्ये फुलवली आहेत. चित्रपट शेवटची १५ ते २० मिनिटे जवळजवळ पूर्णपणे मूक आहे. पार्श्वसंगीत सोडले तर क्वचितच एखादा संवाद आहे. त्याकरता अर्थात जशी दिग्दर्शकाची कल्पनाशक्ती हवी तसेच कलाकारांचीही भक्कम साथ हवी. गॅरी ग्राइम्स (हर्मी), जेरी औसर (ओस्की) आणि ऑलिव्हर कॉनांट (बेंजी) या तिघांचाही हा पहिला चित्रपट, त्यामुळे तेव्हा ते काही कसलेले कलाकार नव्हते आणि तिघेही खरेच १५-१६ वर्षांच्या गटात होते. असे असूनही त्यांनी खरोखरच अप्रतिम काम केले आहे. आपापल्या व्यक्तिरेखांची स्वभाववैशिष्ट्ये त्यांनी बरोबर दाखवली आहेत. धाडस, संकोच, भीती, बिनधास्तपणा, प्रेम अशा अनेक भावनांचे संमिश्र मिश्रण त्यांनी उत्तम प्रकारे उभे केले आहे. जेनिफर ओनील ही कसलेली अभिनेत्री. तिच्या कामाची लांबी कमी असली तरी त्या व्यक्तिरेखेची खोली खूप आहे, ती व्यक्तिरेखा महत्त्वाची आहे. एक वयात येत असलेला मुलगा आपल्या प्रेमात आहे, याची जाणीव नसणे ते ती जाणीव होणे आणि शेवटी मनाच्या एका विशिष्ट अवस्थेत त्याच्याशी संबंध येऊ देणे हा तिच्या व्यक्तिरेखेचा प्रवास तिने प्रभावीपणे उभा केला आहे. या सगळ्यांच्या टीमवर्कमुळेच ‘समर ऑफ ४२’ एक नितांतसुंदर अनुभव देतो.


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link