Next
केमिस्ट्सच्या नेत्यांचेच ऑनलाइनविक्रीशी साटेलोटे?
समीर कर्वे
Friday, October 19 | 03:30 PM
15 0 0
Share this story


ऑनलाइन औषधविक्रीविरोधात राज्यातील किरकोळ औषधविक्रेते (केमिस्ट्स) एकवटले असतानाच, आंदोलनाची भाषा करणाऱ्या केमिस्ट्सच्या नेत्यांचेच ऑनलाइन औषधविक्री व्यवहारांशी साटेलोटे असल्याची माहिती हाती आली आहे. मुंबईतील तसेच राज्यातील औषधविक्रेत्यांच्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपले घाऊकविक्रीचे उद्योग ऑनलाइन औषधविक्रीच्या साखळीला बांधले आहेत. या ऑनलाइन खरेदीचा ग्राहकांना फायदा होत आहे, पण राज्यभरातील ५० हजार किरकोळ विक्रेते मात्र हवालदिल झाले आहेत.  औषधखरेदीवर २० ते ३५ टक्के इतकी घसघशीत सूट मिळत असल्याने ग्राहकांचा ओढा आता ऑनलाइन औषधखरेदीकडे वाढतो आहे. कायद्याच्या लेखी ऑनलाइन औषधविक्रीला अजून मान्यता नाही. यापूर्वी प्रिस्क्रिप्शनवरच मिळणारी औषधेही ऑनलाइन पोर्टलद्वारे उपलब्ध असल्यावरून वादळ उठले होते. त्याचबरोबर स्त्रीरोगतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीतच दिल्या जाणाऱ्या गर्भपाताच्या औषधांची किट्सही ऑनलाइन पोर्टलमार्फत विकली गेल्याचे उघड झाले होते. त्यावर महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने कारवाईही सुरू केली. आता तर ऑनलाइन औषधविक्रीचे प्रकरण न्यायालयातच आहे. ऑनलाइन औषधविक्रीला आळा घातला आहे, अशी ग्वाही महाराष्ट्र एफडीएतर्फे प्रत्येक सुनावणीत दिली जाते.

  मुंबईच्या पूर्व उपनगरातील एक घाऊक औषधविक्रेता अनेक वर्षे किरकोळ विक्रेत्यांच्या संघटनेचे प्रतिनिधित्व करतो. त्याने त्याच्या मुलाच्या नावाने एक उद्योग थाटून ऑनलाइन औषधविक्री करणाऱ्या पोर्टलवरच्या ऑर्डर पुरवण्याचे काम हाती घेतले आहे. एका गोदामाला एका बाजूने ऑनलाइनवाल्या कंपनीचे नाव आहे, तर दुसऱ्या बाजूने या घाऊक विक्रेत्याचे नाव आहे. परवाना दोघांच्याही नावावर आहे. ऑनलाइन विक्री करणारेही घाऊक व किरकोळी विक्रीचे परवाने घेऊन ठेवतात. मात्र त्याच्या बदल्यात औषधांचा साठा करत नाहीत. औषधांचा साठा नाही, मग औषधे विक्रीसाठी येतात कुठून, असा सवाल त्यांना औषध निरीक्षक विचारत नाहीत का, असा प्रश्न एका औषधविक्रेत्याने उपस्थित केला. ऑनलाइन औषधविक्रीला जोरदार विरोध दर्शवतानाच, त्यांच्यावर कारवाया केल्यास घाऊक विक्रेत्यांवर काही कारवाई करू नये, असे पत्रच एका संघटनेने पुण्यात एफडीएला दिले आहे.

बड्या ब्रॅन्डना विक्री?
आधी ऑनलाइन विक्रीचे जाळे तयार करायचे आणि नंतर परदेशातून भारतात येऊ घातलेल्या बड्या ब्रॅन्डना या ऑनलाइन औषधविक्रीचे पोर्टल विकून टाकायचे, असा प्रयत्न असल्याचे बोलले जाते.

दुकानातील ग्राहक कमी
ऑनलाइन व्यवहार तसेच पेमेन्ट अॅप वापरणाऱ्यांना सवलती अशा प्रलोभनांमुळे ऑनलाइन औषधखरेदी करणारे ग्राहक वाढले आहेत व त्याचा थेट परिणाम दुकानांमध्ये दिसत आहे, असे एका औषधविक्रेत्याने सांगितले. आमचे नेहमीचे ज्येष्ठ नागरिक ग्राहक आहेत, मात्र तरुण ग्राहक औषधे मागवताना ऑनलाइनलाच पसंती देतात, असे एका औषधविक्रेत्याने सांगितले. रुग्ण-ग्राहकाचे मार्गदर्शन फार्मासिस्ट व औषधविक्रेता करत असतो, ती गोष्ट ऑनलाइन औषधविक्रीत शक्य नाही, असे औषधविक्रेता संघटनेचे सागर कुलकर्णी यांनी सांगितले.

रुग्णालयात मात्र लूट
ऑनलाइनच्या घसघशीत सवलतींमुळे किरकोळ दुकानदार आता १० ते १२ टक्के सवलती देऊ लागले आहेत. मात्र रुग्णालयांतील फार्मसींच्या दरांना सवलतींची काहीही पडलेली नाही. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना तेथील फार्मसीमधून औषध घेण्यावाचून पर्याय नसतो. तेथे सर्जिकलच्या किमतींवर भरमसाट नफा कमावला जातो. त्याचप्रमाणे औषधविक्रीतही ब्रॅन्ड्सचा पर्याय नसतो. अनेक रुग्णालयांमध्ये तर न वापरलेल्या सामानाचे पैसे लावणे, सर्जिकल्समध्ये अति पैसे लावणे असे प्रकार घडतात. रुग्णाच्या नातलगांना डिस्चार्जच्या वेळी ही भलीमोठी यादी तपासणे शक्य नसते.
ऑनलाइन फार्मसीबाबत केंद्र सरकारने अलिकडेच नियमांचा मसुदा वेबसाइटवर टाकून सूचना व आक्षेप मागवले होते. ऑनलाइन फार्मसीला वेगळी नोंदणी घ्यावी लागणार होती. मात्र या सर्वाला मंजुरी मिळण्यापूर्वीच ऑनलाइन विक्री बिनबोभाटपणे सुरू आहे. रुग्ण ग्राहकांना जर २० ते ३५ टक्के लाभ मिळणार असेल, तर कुणीही हाच पर्याय निवडेल, असे लोक उघडपणे सांगतात.
 
डेटाखरेदी सुरू
कोणत्या भागातले रुग्ण कोणती औषधे खरेदी करतात, ती किती संपतात, या विषयीचा डेटा विकत घेण्यास ऑनलाइन कंपन्यांनी सुरुवात केली आहे. ऑल इंडियन-ओरिजन केमिस्ट्स आणि ड्रगिस्ट या संघटनेच्या अवॅक्स या संस्थेने अलिकडेच एका ऑनलाइन पोर्टलबरोबर संयुक्त सहकार्याचा करार केला. या घटनेवरून राज्यातील औषधविक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली. जी कंपनी ऑनलाइन औषधविक्रीत उतरते आहे, तिलाच आपल्या संघटनेच्या संस्थेतर्फे डेटा पुरवला जाणार, म्हणजे फुकटचे निमंत्रण अशी भावना औषधविक्रेत्यांमध्ये पसरली. केमिस्ट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी असा कोणताही समझोता नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र त्यावरून विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

ऑनलाइनची सद्यस्थिती काय
सध्या प्रचलित औषधे व सौंदर्यप्रसाधने कायद्यानुसार ऑनलाइन औषधविक्रीला मान्यता नाही. मात्र ऑनलाइन औषधविक्रीला काही नियमावलीच्या अधीन राहून मान्यता देण्याचा मसुदा केंद्र सरकारने तयार केला आहे. 10 ऑगस्ट रोजी सरकारने तो वेबसाइटवर हरकती व सूचना मागवण्यासाठी टाकला व त्याची मुदत ऑक्टोबरमध्ये नुकतीच संपली. या नियमावलीनुसार एनडीपीएस म्हणजेच अमलीपदार्थ कायद्यात येणारी औषधे तसेच परिशिष्ट एक्समधील प्रिस्क्रिप्शनवरच मिळणारी औषधे ऑनलाइन विकण्यास बंदी आहे. इ-फार्मसीवरील औषधांची इंटरनेट, रेडिओ-टीव्ही किंवा छापील माध्यमातून जाहिरात करण्यास बंदी आहे. ऑनलाइन खरेदी केलेल्या औषधांसंदर्भात कोणतीही शंका ग्राहकाला असल्यास तिचे निवारण करण्यासाठी फोनलाइनद्वारे फार्मासिस्ट तत्पर ठेवण्याची तरतूद त्यात आहे. मात्र यापैकी कोणत्याही व्यवस्था निर्माण केल्याशिवायच ऑनलाइन विक्री सुरू असल्याकडे फार्मासिस्ट कैलास तांदळे यांनी लक्ष वेधले.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link