Next
क्रीडासत्ताकाच्या दिशेने
आशिष पेंडसे
Friday, January 25 | 03:30 PM
15 0 0
Share this story

क्री डाक्षेत्रात भारताच्या प्रगतीचा आलेख कायम चढता राहिला आहे. १९५२ साली भारतामध्ये एशियाड म्हणजेच आशियाई क्रीडास्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यापाठोपाठ भारतीय खेळ प्राधिकरण, राष्ट्रीय क्रीडा संस्था आदींच्या माध्यमातून क्रीडाक्षेत्रासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी यंत्रणा उभारण्यात आली. क्रीडा व युवककल्याण नावाचे स्वतंत्र मंत्रालय निर्माण करून या सर्व यंत्रणेला निधी आणि प्रशासकीय सुविधांचे पाठबळ पुरवण्यात आले. मिल्खासिंग, पी. टी. उषा, रामनाथन कृष्णन, रमेश कृष्णन, विजय अमृतराज, प्रकाश पदुकोण आणि अगदी कपिलदेवच्या वर्ल्डकप विजेत्या क्रिकेटसंघापर्यंत खेळाडूंनी कौतुकास्पद यश मिळवण्यास प्रारंभ केला. लिटिल मास्टर सुनील गावसकरसारखा संपूर्ण क्रीडाजगतामध्ये दबदबा निर्माण करणारा सुपरहिरो ऐंशीच्या दशकापर्यंत उदयास आला. भारतीय हॉकीसंघाने ऑलिंपिक सुवर्णपदकांची लयलूट करत अखिल हॉकी विश्वावर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले होते.
१९८२ साली भारताला पुन्हा एशियाडचे यजमानपद भूषवण्याची संधी मिळाली. एशियाडच्या निमित्ताने आधुनिक क्रीडाविश्वासाठी गरजेच्या सुविधा आणि त्यासाठी खेळाडूंची घडवण्याची मोहीम भारताने हाती घेतली. क्रीडाचळवळीतील ही दुसरी क्रांती ठरली. १९९० नंतर केबल टीव्ही प्रक्षेपणात प्रारंभ झाल्यानंतर भारतीय क्रीडाविश्वाचा चेहरामोहरा बदलला. एव्हाना अमेरिकेमध्ये क्रीडा आणि मनोरंजन यांची सांगड घालत नवीन क्षेत्राला जन्म देण्यात आला होता. त्याचप्रमाणे जगभरातील प्रसिद्ध क्रीडास्पर्धा म्हणजेच टेनिसच्या ग्रँड स्लॅम स्पर्धा, वर्ल्डकप, सुपर सीरिज, फॉर्म्युला वन कार रेसिंग एवढेच नव्हे तर ऑलिंपिक, एशियाड यांच्यासारख्या स्पर्धांचे थेट प्रक्षेपण भारतामध्ये घडू लागले. परिणामी आंतरराष्ट्रीय क्रीडाविश्वामध्ये कोणत्या कौशल्याच्या जोरावर सुवर्णपदक कसे मिळवता येते, हे तंत्र भारतीय अवगत करू लागले. शिवाय साहाजिकच एकविसाव्या शतकाकडे झेपावताना भारतीय क्रीडाविश्वाच्या आशा-आकांक्षा उंचावू लागल्या आणि या जागतिक दर्जाच्या कामगिरीची भारतीय क्रीडापटूंकडूनदेखील अपेक्षा करण्यात येऊ लागली. त्यापूर्वी स्पर्धांमध्ये खेळणे हेच भारतीय क्रीडापटूंचे ध्येय होते. पुढे पदकाला गवसणी, सुवर्णपदकावर हक्क प्रस्थापित करणे यावर भारतीय खेळाडू भर देऊ लागले. त्यासाठी पोषक अशी सर्व व्यवस्था विकसित करण्याचे आव्हान भारतीय प्रशासनयंत्रणेपुढे होते. लालफितीचा कारभार, भ्रष्टाचार अशा अनेक अडथळ्यांवर मात करत हे आव्हान आपण लीलया पेलले आणि एकविसाव्या शतकात पदार्पण करताना भारतामध्ये घडलेली ही तिसरी क्रीडाक्रांती. या क्रांतीच्या अग्रभागी ठरल्या महिला क्रीडापटू.
करनाम मल्लेश्वरी हिच्या माध्यमातून २००० मध्ये झालेल्या ऑलिंपिकमध्ये वेटलिफ्टिंग प्रकारात तिने पदक पटकावले. ऑलिंपिक पदक पटकावणारी ती पहिली भारतीय क्रीडापटू महिला ठरली. त्यानंतर सुरू झाला सानिया मिर्झा ते साईना आणि पी. व्ही. सिंधू असा रोमहर्षक प्रवास. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि आता महेंद्रसिंग धोनी, विराट कोहलीच्या क्रिकेटसंघांनी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. भारतीय बॅडमिंटनपटूंनी चीनची भिंत जिंकून बॅडमिंटन विश्वावरदेखील अव्वल स्थानी झेप घेतली. लिअँडर पेस याच्या हरहुन्नरी नेतृत्वाखाली भारतीय टेनिसपटूंनी अंतरराष्ट्रीय विजयांना गवसणी घातली. इतकेच नव्हे तर कुस्ती, बॉक्सिंग आदी क्रीडाप्रकारांमध्ये ज्युनियर वर्ल्डकपपासून भारतीय खेळाडू पदकांचे मानकरी ठरत आहेत. भारतीय नेमबाजांनी तर विश्वविक्रमी कामगिरीचा धडाकाच लावला आहे.

प्रोफेशनल लीगची क्रांती
सर्व आघाड्यांवर आश्वासक कामगिरीची प्रगती होत असतानाच क्रीडाक्षेत्रामध्ये चौथी क्रांती घडली ती म्हणजे व्यावसायिक साखळीस्पर्धांची. इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या माध्यमातून सुमारे अकरा वर्षांपूर्वी या साखळीस्पर्धांचा पाया भारतामध्ये रचला गेला. क्रिकेटला व्यावसायिकतेचा साज चढवण्यात आल्याने भारतीय क्रीडापटूंच्या कौशल्याच्या विकासाबरोबरच विजयाचे चौकार आणि षटकार लगावण्यात आले. देशी क्रिकेटपटूंना या स्पर्धेने परदेशी खेळाडूंनाही आकर्षित केले आणि काही वर्षांतच ही स्पर्धा मानाची आणि घवघवीत उत्पन्न मिळवून देणारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटस्पर्धा म्हणून गणली जाऊ लागली.
भारतासारख्या पारंपरिक आणि सांस्कृतिक देशांमध्ये अशा प्रकारचा व्यावसायिक क्रीडाप्रयोग यशस्वी होऊ शकतो याची खात्री क्रीडाविश्वाला पटली. त्यापाठोपाठ इतर खेळांमध्येदेखील व्यावसायिक साखळीस्पर्धा सुरू करण्यात आल्या. फूटबॉल, बॅडमिंटन, कुस्ती, घराघरात पोहोचलेली कबड्डीची साखळीस्पर्धा, प्रो-कबड्डी लीग... यांच्या माध्यमातून क्रीडाक्षेत्राचे व्यावसायिकीकरण झाले. उद्योगविश्वातून मोठ्या प्रमाणावर निधी क्रीडाक्षेत्राला पुरवण्यात आला. खेळाडूंच्या मानधनात न भुतो न भविष्य असे मानधन मिळू लागले. याशिवाय आंतरराष्ट्रीय दर्जाची कामगिरी करण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत क्रीडासुविधादेखील निर्माण केल्या जाऊ लागल्या. जगभरातील खेळाडू भारतामध्ये होत असलेल्या या स्पर्धांमध्ये खेळत असल्याने त्याचा जबरदस्त फायदा भारतीय क्रीडापटूंना झाला. त्यामुळे दिग्गज खेळाडूंशी दोन हात करताना वाटत असलेली भीती, दडपण व्यावसायिक साखळीस्पर्धांमुळे नाहीसे झाले. परिणामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळताना या दिग्गज खेळाडूंवर विजय मिळवण्याचा आत्मविश्वास भारतीय खेळाडूंनी अवगत केला.
एशियाडस्पर्धा, राष्ट्रकुलस्पर्धा आदींच्या पदकतालिकांमध्ये भारतीय संघ टॉप टेन देशांमध्ये गणला जाऊ लागला आहे. या आंतरराष्ट्रीय स्पर्धा भारतामध्ये आयोजित करणे, त्यासाठी सुविधा उपलब्ध आता होऊ लागल्या आहेत. १७ वर्षांखालील फूटबॉलचा वर्ल्डकप हा त्याची अतिप्रभावी अनुभूती ठरला. युरोप-अमेरिकेतील कोणत्याही देशांमधील व्यावसायिक संयोजनाच्या तोडीस तोड नियोजन करत भारताने या स्पर्धेचे यजमानपद गाजवले. आता २०३२ या वर्षीच्या ऑलिंपिक स्पर्धांचे यजमानपद भूषवण्याची दावेदारी भारतीय क्रीडाविश्व करण्याच्या तयारीत आहे. खेळांच्या मैदानावर ही कामगिरी केली तर ऑलिंपिकसारख्या स्पर्धेचे यजमानपद भारताचा स्वाभाविक अधिकार ठरू शकेल. म्हणूनच आगामी दशकामध्ये मैदानात अग्रेसर राहण्यासाठी भारताने क्रीडानियोजन केले आहे. याचा फायदा आंतरराष्ट्रीय क्रीडाजगतात आपली पत उंचावण्यासाठी भारताला नक्कीच होणार आहे.

खेळावर आधारित लाइफस्टाइल
भारताचे व्यावसायिक क्रीडापटू घवघवीत यश मिळवत असताना आव्हान आहे ते खेळावर आधारित लाइफस्टाइल निर्माण करण्याचे. म्हणजेच भारतीय घराघरांमध्ये कोणता ना कोणतातरी खेळ खेळला जावा आणि पर्यायाने भारतीय समाज क्रीडाप्रेमी व्हावा अशी अपेक्षा आहे. इंग्लंड, अमेरिकेमध्ये कम्युनिटी स्पोर्ट्स चळवळ अतिशय प्रभावी ठरते आहे. त्यामध्ये खेळाडू नागरिकांमध्ये मिसळून आपापल्या राज्यांमध्ये खेळांचा प्रसार करतात. त्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांकडे आवर्जून लक्ष दिले जाते. खेळ हा केवळ स्पर्धेपुरता खेळायचा नसून सर्वसाधारण तंदुरुस्ती कमावण्यासाठी खेळाचे योगदान महत्त्वाचे आहे. तंदुरुस्ती राखण्याची जबाबदारी पेलावी लागेल. मराठी समाजात क्रीडाप्रेम आणि तंदुरुस्त राहण्याविषयीच्या जाणिवा विकसित करणे गरजेचे आहे. ऑलिंपिकमधील पदक हे एखाददुसऱ्या खेळाडूच्या मेहनतीमुळे मिळत नसते तर त्याला तळागाळातून मिळणारा पाठिंबा आणि रुजवण्यात आलेली क्रीडासंस्कृती यावर निर्णायक ठरते. आता त्याच दिशेने क्रीडाविश्वाची वाटचाल सुरू आहे आणि क्रीडासत्ताकाची निर्मिती करण्याचा गोल भारतीय क्रीडाप्रेमी नागरिक लवकरच या करतील याबाबत दुमत नाही.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link