Next
चित्रपट माझ्या गायकीला पोषकच!
राहुल देशपांडे
Friday, December 28 | 04:00 PM
15 0 0
Share this story


 ज्या कलाकारांवर रसिक प्रचंड प्रेम करतात त्या कलाकाराची जडणघडण कशी होते, त्याचं त्या क्षेत्रातील शिक्षण, संघर्ष, साधना आणि यश कसं त्याच्या पदरात पडत जातं त्याचा प्रवास उलगडणारं हे नवीन सदर. या सदरातून दर महिन्याला एक कलाकार तुमच्या भेटीला येणार आहे आणि सांगणार आहे त्याच्या कलाप्रवासाविषयी.


नमस्कार, मागील तीन भागांतून मी माझ्या गाण्याविषयी, संगीत नाटकांविषयी, त्यातील भूमिकांविषयी बोललो होतो. हे सगळं करत असताना आयुष्यात एक वेगळं सुखद वळण आलं, त्याविषयी मी तुम्हाला आज सांगणार आहे. ‘अमलताश’ हा माझा पहिला चित्रपट लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. नायक म्हणून हा माझा पहिला चित्रपट. मी कधी चित्रपटात अभिनय करेन, त्यातही नायकाची भूमिका करेन असं अजिबातच वाटलं नव्हतं, पण ‘अमलताश’च्या निमित्तानं संधी मिळाली आणि तीही थेट नायक साकारण्याची. नाटक असो अथवा चित्रपट, माझ्यातील गवयाला ही सगळीच माध्यमं अधिक परिपक्व बनवत आहेत हे मात्र खरं!
मी नाटक करत असताना माझा मित्र सुहास देसले अनेक दिवस माझ्या मागे लागला होता, की आपण ऑडिओ ब्लॉग टाकुया. म्हणजे काय तर ब्लॉगवर आपण जसं लिहितो तसं गाण्याविषयी बोलायचं आणि गायचं, तो ऑडिओ ब्लॉग. सुहास एक दिवस घरी आला आणि म्हणाला, ‘तुला काय हवं ते गा.’ मी गायलो, त्याचा ऑडिओ ब्लॉग तयार झाला आणि मग ती सुरुवातच झाली. एक नवीन माध्यम मी पहिल्यांदाच हाताळत होतो. विशेष म्हणजे प्रेक्षकांकडूनही त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला. मी गायचो, गाण्याविषयी बोलायचो आणि प्रेक्षक मला प्रश्न विचारायचे त्याची उत्तरं द्यायचो. ते ऐकणारा एक श्रोतृवर्ग तयार झाला. वेगवेगळ्या देशांतून प्रेक्षक आम्हाला ‘फॉलो’ करू लागला. इथपर्यंत ठीक होतं, परंतु ही पुढे येणाऱ्या माझ्या चित्रपटाची नांदी ठरेल याची कल्पनाही नव्हती.
दरम्यान, सुहासच्या डोक्यात वेबसीरिजचा विषय घोळत होता. एक महिन्यांनी सुहास मला भेटायला आला तो थेट स्क्रिप्ट घेऊनच. “मी चित्रपटाची स्क्रिप्ट घेऊन आलोय.” त्याचं हे वाक्य ऐकून मी उडालोच. तो म्हणाला, “माझ्याकडे कॅमेरा आहेच. काम करणारी मंडळी सगळी आपलीच असतील. थोडंफार काही भाड्याने घ्यावं लागेल तेवढंच. पाच-दहा लाखांत फिल्म होईल आणि नायक तू असशील.” मी अवाक झालो. त्यानं मला स्क्रिप्ट आणि माझी भूमिका समजावून सांगितली. हो-नाही करता करता, ‘करून तर बघू’ असा विचार करून मी तयार झालो. आम्ही काम सुरू केलं आणि बजेट वाढत वाढत दहा लाखांवरून दीड-दोन कोटींवर गेलं. परंतु चित्रपट खरंच खूप सुंदर झाला आहे. त्याचा यूएसपी हा आहे, की त्यात सगळं लाइव्ह म्युझिक होतं. रेकॉर्डेड काहीच नव्हतं. काहीतरी वेगळं करून पाहिल्याचं समाधान मिळालं. चित्रपट यावर्षी ‘मामि’ फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवला गेला, तेव्हाही खूप कौतुक झालं. एक हळुवार उलगडत जाणारी ती एक सांगीतिक प्रेमकहाणी आहे.
नाटकातील अभिनय वेगळा, चित्रपटातील अभिनय वेगळा. मी अभिनय करण्यापेक्षा त्यातील भावना ओळखून त्यानुसार व्यक्त होण्यावर भर दिला आहे. सुहासचं सांगणं होतं, की “तू अभिनय करतो आहेस असं मला कुठेही वाटलं नाही पाहिजे.” माझ्या भूमिकेवर मी खूप मेहनत घेतली आहे. त्या दरम्यान मी दुसरं काही केलं नाही. याआधीही मी चित्रपटांतून छोट्या छोट्या भूमिका केल्या आहेत, पण चित्रपटाचा नायक साकारण्याचा हा पहिलाच अनुभव आहे. मी जे करतोय ते सगळं मला मनापासून आवडतंय. संगीत नाटकांचे शेकडो प्रयोग केले.
चित्रपटामुळे अभिनयाच्या शाळेत नवीन शिकायला मिळालं. एखादी व्यक्तिरेखा साकारायची असेल तर त्यासाठी लागणारा अभ्यास, परिश्रम या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. या गोष्टींचा मला गाण्यासाठी खूप फायदा होतो, विशेषतः गाण्यातून व्यक्त होताना! नाटक, चित्रपटातून वेगवेगळ्या भूमिका साकारायला मिळाल्यामुळे गाण्यातून त्या भावना व्यक्त करताना मला सोपं जातं. मी ठुमरी गातो, नाट्यपद गातो तेव्हा त्या भूमिकेत शिरून गायला लागलो. गाण्यातून नायक काय म्हणत असेल, ते मला कसं अभिव्यक्त करता येईल याचा विचार करू लागलो. माझं माध्यम सुरांचं आहे. मी जेव्हा निर्गुणी भजन गायचो तेव्हा मला सुरांची भाषा कळायची, पण शब्दांची भाषा येत नव्हती. आता जेव्हा मी प्रत्यक्ष भूमिका साकारतो तेव्हा दोन्ही भाषा मला कळायला लागल्या. शब्द सुरातून कसे व्यक्त होतील यावर लक्ष केंद्रीत होऊ लागलं. माझ्या गायकीत खूप चांगले बदल होत आहेत. वेगळ्या पद्धतीनं गाण्याचा, त्यातील शब्दांचा विचार करू लागलो आहे आणि म्हणून या सगळ्या भूमिका माझ्यातील गायकासाठी, माझ्या गायकीला अधिक प्रगल्भ करण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. या लेखमालेचा समारोप करताना प्रेक्षकांना मी सांगेन, की पुढचं वर्षं हे त्यांच्या लाडक्या वसंतरावांचं जन्मशताब्दी वर्षं आहे. त्यानिमित्तानं त्यांच्यावर चित्रपट येणार आहे. मी त्यावरही सध्या काम करतोय. वेगवेगळी माध्यमं हाताळून पाहतोय. या प्रवासात रसिकांची साथ कायम मिळत राहो, ही सदिच्छा आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!  (समाप्त)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link