Next
बालपणीचा काळ सुखाचा!
पुष्कर श्रोत्री
Friday, May 10 | 03:00 PM
15 0 0
Share this story

नमस्कार, आज मी तुम्हाला माझ्या बालपणीच्या आठवणी सांगणार आहे. आमचा बालपणीचा काळ ‘रम्य ते बालपण’ या शब्दांत वर्णावा असाच होता. परंतु त्यातही पार्ल्यासारख्या ठिकाणी बालपण गेल्यामुळे ते अधिकच रम्य होतं. माझा जन्म पार्ल्यातलाच, शाळाही पार्ल्यातलीच.
माझ्या आईनं माझं नाव पुष्कर ठेवलं असलं तरी माझ्या आजीनं माझं नाव ‘नंदन’ ठेवलं होतं. त्यामुळे त्या गल्लीतले, परिसरातले सगळे मला नंदन म्हणून आणि माझ्या आजीला नंदनची आजी म्हणूनच हाक मारायचे. हे नाव माझ्या डोक्यात इतकं पक्क बसलं होतं की मीसुद्धा आजीला ‘नंदनची आजी’ अशीच हाक मारायचो. लहानपणी आमचा एकच उद्योग होता तो म्हणजे भरपूर खेळायचं... अगदी काळोख पडेपर्यंत मनसोक्त खेळायचं. तेव्हाचं पार्ले खूपच वेगळं होतं. छोटे छोटे रस्ते, मध्येच छोटंसं जंगल, त्यापलिकडे हायवे आणि मग विमानतळ.
मला आठवतंय, बाबा संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर त्यांना आम्ही सांगायचो, ‘बाबा, आज ना आपल्या रस्त्यावर एक रिक्षा आली होती.’ बाबा सायकलवरून स्टेशनला जायचे. ते दूरवर जाईपर्यंत आम्हाला दिसायचे आणि त्या रस्त्यावरून वळताना मागे न बघता आम्हाला टाटा करायचे. मध्ये सगळं   मोकळं होतं. दुसरं आकर्षण होतं ते विमानांचं.  रन-वे एकच असल्यामुळे सगळी विमानं जवळून दिसायची. कधी कधी रात्रीच्या वेळी त्या कॉकपिटमधला माणूसही दिसायचा इतकी जवळून जायची. विमानाचा आवाज आला, की आम्ही बाल्कनीत जाऊन बघायचो कुठलं विमान आलं ते! या विमानांच्या आवाजाचा आम्हाला कधीही त्रास झाला नाही, परंतु आमच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना मात्र त्रास व्हायचा. ‘या आवाजात तुम्हाला झोप कशी लागते,’ असा त्यांचा प्रश्न असायचा. तेच पाहुणे संध्याकाळी ‘चला, विमानतळ बघून येऊ’ म्हणायचे तेव्हा मला खूप गंमत वाटायची.
नंतर शालेय जीवन सुरू झालं तेसुद्धा पार्ल्यातच- पार्ले टिळक विद्यालयात! सहस्रबुद्धे सर मुख्याध्यापक होते आणि वाटवे मॅडम उपमुख्याध्यापिका होत्या. शाळेच्या आवारात लोकमान्य टिळकांचा पुतळा होता. त्या पुतळ्याला नमस्कार करूनच पुढे जायचं अशी अलिखित प्रथा होती. शाळेत जाताना, शाळेतून निघताना सगळी मुलं न चुकता हे करायची.  मला चांगलं आठवतंय, शाळा सुरू व्हायच्या एक तास आधी आम्ही मुलं शाळेत पोहोचायचो. तुम्ही विचाराल, का? तर क्रिकेट खेळण्यासाठी. एक तास आधी शाळेच्या मैदानावर जमायचं. दप्तरांवर दप्तरं रचून त्यांचे स्टंप करायचे आणि क्रिकेट खेळायचं. हाच खेळ संध्याकाळी शाळा सुटल्यावर पुन्हा रंगायचा. त्यामुळे सकाळी जसे आम्ही एक तास लवकर यायचो तसे संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर एका तासानं घरी परतायचो. शाळेत माझं गणित आणि भाषा विषय चांगले होते, पण माझा जीव घ्यायचा तो ‘जीवशास्त्र’ हा विषय. तीच गत रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयांची होती. माझ्या आईचं गणित अफलातून होतं. ती राज्य सरकारच्या सांख्यिकी विभागात नोकरीला होती. त्यामुळे माझं गणित चांगलं होतं. इंग्रजी विषय शाळेतल्या उबाळेबाई आणि भागवतबाई यांनी इतका घोटून घेतला होता, की त्याचा फायदा मला आयुष्यभर जाणवतो. मी जेव्हा पहिलं इंग्रजी नाटक करायला परदेशात गेलो तेव्हा तिथे इंग्रजाशी इंग्रजीत बोलताना मला जो आत्मविश्वास जाणवला त्याची मुळं ही शाळेत रुजली होती. हीच गोष्ट मराठी भाषेची. सहस्रबुद्धेसरांचा कल, मराठी हा विषय म्हणून शिकवण्यापेक्षा भाषा म्हणून शिकवावी याकडे असायचा. मराठी भाषेची गोडी लागावी म्हणून विद्यार्थ्यांना काय शिकवायला पाहिजे याच्या नोट्स त्यांनी काढलेल्या असायच्या. आज जेव्हा लोक मला म्हणतात की ‘तुमची मराठी भाषा चांगली आहे. तुमची मराठी भाषा ऐकत राहावीशी वाटते’ तर याची मुळंही तिथे रुजलेली आहेत.
माझं अक्षर चांगलं होतं. त्यामुळे शाळेतील फळ्यांवर लिहिणं, चित्र काढणं, रांगोळ्या काढणं,ं आणि क्रिकेट याव्यतिरिक्त मला कशातच गोडी नव्हती. नाटक, अभिनय या विषयांच्या मी जवळपासही कधी फिरकलो नव्हतो. आम्ही वर्षातून एक किंवा दोन सिनेमे बघायला जायचो, बस्स. त्यावेळी उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही सगळी भावंडं एकत्र यायचो आणि धमाल करायचो. चार दिवस मावशीकडे, मग चार दिवस मामाकडे, मग दुसऱ्या मावशीकडे – मग सगळे आमच्याकडे यायचे. असं करत करत आमची उन्हाळ्याची सुट्टी जायची.
दुसरी एक पद्धत होती ती म्हणजे उरणला जायचं. उरण आमचं गाव. तिथे आमची वाडी होती. मग सगळी गँग घेऊन काही दिवस उरणला जायचो. तिथे गेल्यावर समुद्रावर जायचं, शेतात हिंडायचं, झाडांवर चढायचं, पोटभर आंबे खायचे, सायकल चालवायची, गावात भटकायचं, टांग्यातून फिरायचं आणि दिवसभर फक्त आणि फक्त मजा, मस्ती करायची! यात उन्हाळ्याची सुट्टी कधी संपायची कळायचं नाही. गंमत म्हणजे सगळी भावंडं सुट्टीत कायम एकत्र असायचो. पार्ल्यातसुद्धा आम्ही इतके खेळायचो की काय सांगू? आज जरी जुने मित्र भेटले तरी त्यावेळचे आमचे खेळ आणि ती मजा हाच गप्पांचा विषय असतो. डबा ऐसपैस खेळताना आम्ही लपायचो तेव्हा एकमेकांचे शर्ट बदलायचो आणि हात बाहेर काढून दाखवायचो. मग ज्याच्यावर राज्य असेल त्यानं ज्याचा शर्ट बघितला असेल त्याचं तो नाव घ्यायचा, पण तो शर्ट घालून दुसराच मुलगा बाहेर यायचा. ही जी गंमत होती, मजा मस्ती होती त्याच्या आठवणी आजही मनात रुंजी घालतात. या मजा-मस्तीमध्ये नाटक किंवा रंगभूमी कुठेही नव्हती.
माझं पार्ल्यातलं बालपण हे चारचौघांसारखं मजेचं आणि सुरम्य होतं. शाळेत एकांकिका व्हायच्या पण मी फक्त त्या बघण्यापुरता जायचो. त्यात भाग वगैरे कधी मी घेतला नाही. दहावीत असताना आमच्या ग्रुपनं पुलंचं ‘दारू म्हणजे काय रे भाऊ’ यावर एक प्रहसन सादर केलं होतं तेव्हा दोन मिनिटांसाठी मी त्यात काम केलं होतं तेवढंच! बाकी नाटकाशी माझा काहीही संबंध नव्हता. मग ही सगळी ‘नाटकं’ बालपणी चालू असताना खऱ्या अर्थानं मी नाटकाकडे कधी वळलो, असा तुमचा प्रश्न असेल. ती गंमत वाचा पुढच्या भागात.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link