Next
धारावीच्या मेरीची हुकमी ‘किक’
अमित मधुकर डोंगरे
Friday, May 17 | 03:00 PM
15 0 0
Share this story

किंग्ज सर्कलच्या पुलाखाली, अक्षरशः फूटबॉलचा ‘गोलपोस्ट’सुद्धा मोठा असेल इतक्या लहान जागेत मेरी व तिचे कुटुंब दिवस काढत होते. अतिक्रमणविरोधी पथकाची कारवाई झाली की डोक्यावरचे छप्पर काही काळापुरते जायचे. मग त्याच हातांनी पुन्हा एकदा सगळ्या वस्तू शोधून घर पुन्हा उभारायचे. आई बबिता आणि वडील प्रकाश यांच्याकडून परिस्थितीला कसे तोंड द्यायचे याचा धडाच मेरीला लहान वयात मिळाला आणि तिच्यातील जिद्दी वृत्ती बळावली.
धारावीतील छत्रपती श्री शिवाजी विद्यालयात मेरीचे शिक्षण एका एनजीओच्या मदतीने सुरू होते. वडील मुंबई महापालिकेच्या सफाई विभागात कंत्राटी पद्धतीवर सेवेत आहेत. दिवसाला मिळणाऱ्या ३०० रुपयांतून त्यांचा चरितार्थ चालायचा. तिच्या शाळेने तिला विनामूल्य युनिफॉर्म दिले, दहावीपर्यंत तिचा खर्च शाळेच्या मुख्याधापिका वीणा दोनवलकर करत होत्या. याच सुमारास एनजीओतर्फे धारावीत गरीब मुलांकरता फूटबॉल प्रशिक्षणशिबिर आयोजित केले होते. मेरी लहानपणापासून तिच्या घराजवळ लहान मुलांना हा खेळ खेळताना बघायची. यातूनच तिला या खेळाची आवड निर्माण झाली व तिने या शिबिरात सहभाग घेतला. तिचा खेळ पाहून प्रशिक्षकही प्रभावित झाले.
‘मिशन ११’ अंतर्गत घेतलेल्या सर्व राज्यांतील फूटबॉलशिबिरांतून अकरा खेळाडूंची निवड होणार होती, त्यात मेरीने बाजी मारली. निवडचाचणीत तिचा खेळ अफलातून झाला आणि तिला इतर दहा खेळांडूसह नवी दिल्लीला जाण्याची व पंतप्रधान नरेद्र मोदी यांना भेटण्याची संधी मिळाली. मोदींच्या हस्ते मेरीचाही सत्कार झाला. मुंबई जिल्हा फूटबॉल संघटनेने तिला सदस्यत्व बहाल करत वरच्या स्तरावर खेळण्याची संधी दिली. स्थानिक नेते कचरू यादव व माटुंग्यातील आणखी एक एनजीओने तिला प्रत्येकी २५ हजार रुपये दिले व तिच्या फूटबॉलप्रशिक्षणाचा, स्पर्धाप्रवासाचा खर्चही उचलला. दहावीनंतर मेरीने वाशी येथील फादर अॅग्नेल महाविद्यालयात प्रवेश घेतला. एनजीओमार्फत शिक्षण आणि खेळ सुरूच होता. महाविद्यालयाने तिला त्यांच्या हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी स्वतंत्र खोली दिली.
मुंबई जिल्हा फूटबॉल संघटनेच्या महिलांच्या विविध स्पर्धांत मेरी चमकदार कामगिरी करत आहे. सध्या ती महाविद्यालयातील सरावाबरोबरच संघटनेकडून अंधेरीतील क्रीडासंकुलातही सराव करत आहे. इथेच तिचे खऱ्या अर्थाने व्यावसायिक फूटबॉलप्रशिक्षण सुरू झाले.
मोठ्या पातळीवरील फूटबॉल खेळायचे आहे, पुढे जाऊन देशासाठी खेळायचे आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुटुंबाला हलाखीच्या स्थितीतून बाहेर काढायचे आहे, ही आणि अशी कित्येक स्वप्ने घेऊन मेरी मैदानात उतरते ती जिंकण्यासाठीच. पंतप्रधानांच्या हस्ते सत्कार झाल्यानंतर मेरीच्या शाळेने आणि महाविद्यालयानेही रोख रक्कम देऊन तिचा सत्कार केला, ही आठवण सांगतानाच या सर्वांच्या अपेक्षा मी नक्की पूर्ण करेन, असा विश्वास मेरी व्यक्त करते.
सुरुवात जरी ‘गोलपोस्ट’इतक्या आकाराच्या घरातून झाली असली तरी तिला सरकारतर्फे येत्या काळात खेळाडूकोट्यातून घर मिळणार आहे. ज्या ठिकाणी ती वाढली व फूटबॉलकडे आकर्षित झाली ते ती विसरलेली नाही. वेळ मिळेल तेव्हा ती तिच्या किंग्ज सर्कल-धारावीत जाते व तिथल्या मुला-मुलींना फूटबॉल शिकवते.
मुंबई जिल्हा फूटबॉल संघटनेच्या महिलांच्या सर्व स्पर्धांमध्ये ती सहभागी होते, शिवाय महाविद्यालयीन स्पर्धाही खेळते. अॅनस्ट्रेगंग या एनजीओतर्फे मेरीला प्रशिक्षणासह इतरही मदत मिळत आहे. या संस्थेचे सदस्य व प्रसिद्ध फूटबॉलप्रशिक्षक परवेज शेख यांच्यासह अमोल सावंत आणि श्रृंगार राहुल यांनीही मेरीला सर्वतोपरी मदत केली आहे.
माटुंगा येथील गुरुनानक खालसा महाविद्यालयात सध्या तिचे शिक्षण आणि फूटबॉलचा सराव दोन्ही सुरू आहे. मी खेळेन तो प्रत्येक सामना माझा संघच जिंकेल, असा निर्धार तिचा असतो. सध्या मेरी मुंबईतील विविध क्लबकडून जास्तीत जास्त सरावसामने खेळते, स्पर्धा खेळते. आता यंदाच्या मोसमात ती राष्ट्रीय स्पर्धादेखील खेळेल.
आपली मुलगी मेहनती आहे आणि खेळातील यशाच्या जोरावर आपल्या संपूर्ण कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढेल, अशी खात्री तिच्या आईवडिलांना आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून इथवर पोचलेल्या मेरीचा पुढील प्रवासही थक्क करणाराच असेल आणि त्यातूनच देशाला एक नैपुण्यवान फूटबॉलपटू मिळेल.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link