Next
हम होंगे कामयाब!
शरद कद्रेकर
Saturday, May 25 | 09:00 AM
15 0 0
Share this story

क्रिकेटची बारावी विश्वचषकस्पर्धा अगदी तोंडावर येऊन ठेपली असताना क्रिकेटशौकिनांना उत्सुकता आहे ती विश्वचषक कोण जिंकणार याची. जेतेपदाच्या शर्यतीत यजमान इंग्लंडप्रमाणेच भारत, ऑस्ट्रेलिया या माजी-आजी विजेत्यांची नावे चर्चिली जात आहेत. वास्तविक पाहता उपांत्य फेरीतील चौथ्या संघाबाबत चुरस असून दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, न्यूझीलंड, वेस्टइंडिज यापैकी कोणता संघ बाद फेरीत प्रवेश करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
३० मेपासून क्रिकेटच्या या रणधुमाळीची रंगत इंग्लंड-वेल्समधील ११ विविध स्टेडियममध्ये तब्बल ४६ दिवस रंगेल. विश्वचषकाचे वैशिष्ट्य म्हणजे यंदा स्पर्धेचा ढाचा बदलण्यात आला आहे. १० संघांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत गटवार साखळी लढतींना फाटा देण्यात आला असून प्रत्येक संघ एकमेकांशी झुंजतील. ४५ सामन्यांनंतर अव्वल ४ संघांत उपांत्य झुंजी रंगतील. रविवार, १४ जुलै रोजी क्रिकेटच्या पंढरीत, लॉर्ड्सवर अंतिम सामना खेळला जाईल.
यंदाच्या विश्वचषकस्पर्धेतील १० पैकी ५ संघ आशियाई आहेत. त्यातही आयसीसी रॅकिंगमध्ये इंग्लंडपाठोपाठ भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. चार वर्षांपूर्वी (२०१५) ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमधील विश्वचषकस्पर्धेत इंग्लंडच्या संघावर साखळीतच गारद होण्याची आपत्ती ओढवली होती. (बांगलादेशानेही त्यांना हरवले होते.) केवळ अॅशेस मालिकेवर भर देऊन चालणार नाही याची जाणीव इंग्लिश क्रिकेटधुरीणांना झाली. नव्याने संघ बांधताना अनेक बदल करण्यात आले. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. आयसीसी रॅंकिंगमध्ये इंग्लंडने अव्वल स्थानावर झेप घेताना गेल्या ४ वर्षांत त्रिशतकी मजल मारण्याचा सपाटा लावला आहे. इंग्लंडने पाकिस्तानाचा ४-० असा धुव्वा उडवल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास निश्चितच दुणावला आहे. इंग्लंडने आपल्या चमूत जोफ्रा आर्चंरचा समावेश केला आहे. विलीऐवजी आर्चर तसेच हेल्सऐवजी जेम्स विन्सचा इंग्लंडच्या चमूत समावेश करण्यात आला आहे.
विराट कोहलीच्या भारतीय संघाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. यंदाच्या मोसमात भारताने पूर्वतयारीत कसूर केलेली नाही. विश्वचषकाआधी दोन सरावसामने भारतीय संघ खेळणार आहे. यंदाच्या मोसमात सर्वाधिक ४९ झटपट क्रिकेट सामने भारतीय संघ खेळला असून त्यातून तो तावूनसुलाखून निघाला असेल, अशी अपेक्षा आहे. रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली त्याचप्रमाणे जसप्रीत बुमराह, महंमद शमी, भुवनेश्वरकुमार हे फलंदाजी-गोलंदाजीतील त्रिकूट ही भारताची मोठी जमेची बाजू. ‘चायनामन’ कुलदीप यादव, लेगस्पीनर युजुवेंद्र चहल तसेच अचूक गोलंदाजी करणारा डावखुरा रवींद्र जाडेजा ही फिरकी त्रिमूर्ती. आक्रमणातील समतोल ही भारताची खासियत ठरावी. धोनीसारखा अनुभवी चतुरस्र खेळाडू कर्णधार विराटच्या दिमतीला आहे ही दिलासादायक बाब.
रोहित-शिखर या बिनीच्या जोडीने गेल्या ४ वर्षांत २६०९ धावा रचल्या असून त्यात ८ शतकी भागीदाऱ्यांचा समावेश आहे. रोहित-विराट या जोडीने ९ शतकी भागीदारी केल्या असून भारतीय संघाची मदार या त्रिकूटावर आहे. इंग्लंडमधील खेळपट्ट्यांचे स्वरूप बदलल्याची चर्चा सुरू असून पाटा खेळपट्ट्या बनवण्याचा आदेश दिला असावा असेच वाटते. चौकार, षटकारांची आतषबाजी बघायला प्रेक्षकांना आवडते. इंग्लंडमधील लहरी हवामान लक्षात घेता सर्व सामन्यांत त्रिशतकी मजल मारणे शक्य नसले तरी २६०-२७० धावांचा पाठलाग करणेही तितकेसे सोपे जाणार नाही. ढगाळ वातावरणात चेंडू स्विंग होत असल्यामुळे फलंदाजांची कसोटीच लागेल. लंडनचा (लॉर्ड्स, ओव्हल) अपवाद वगळता ओल्ड ट्रॅफर्ड, डरहॅम, एजबॅस्टन, हेडिंग्ली या ठिकाणी चेंडू चांगला स्विंग होतो.
रोहित, शिखर, विराट हे त्रिकूट एकसाथ अपयशी ठरल्यास भारतीय संघाची अवस्था बिकट होऊ शकते. चौथ्या क्रमांकासाठी विजय शंकरची (थ्री डायमेन्शल) निवड करण्यात आली असली तरी कर्नाटकी लोकेश राहुल या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकेल का, याबाबतचा निर्णय कर्णधार विराट कोहली, प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर अवलंबून असेल. अष्टपैलू हार्दिक पंड्याकडून भारताला मोठ्या अपेक्षा आहेत.एरॉन फिंचच्या ऑस्ट्रेलियाची बाजू वॉर्नर, स्टीव स्मिथच्या समावेशामुळे मजबूत वाटते. या बुर्जुगांमुळे ऑस्ट्रेलियन फलंदाजीला स्थैर्य लाभेल अशी धारणा आहे. सहाव्या विश्वचषक जेतेपदासाठी ऑस्ट्रेलियन संघ उत्सुक असून कमिन्स, स्टार्क, रिचर्डसन, बेहरनडॉर्फ, नॅथन कोल्टर-नाईल या तेज पंचकासह नॅथन लायन, अॅडम झम्पा या फिरकी जोडगोळीवर कांगारूंच्या आक्रमणाची धुरा असेल.
वेस्ट इंडिजने (१९७५, १९७९) सलग दोनदा विश्वचषक पटकावला. त्यानंतर त्यांना जेतेपदापर्यंत जाता आले नाही. अंतिम फेरीदेखील गाठता आलेली नाही. जेसन होल्डरच्या विंडीज संघात क्रिस गेल, आंद्रे, रसेलसारखे स्फोटक फलंदाज आहेत. हेटमायर, शाई होप, निकलस पुरनसारख्या युवा प्रतिभावान फलंदाजांचा समावेश आहे.
सर्फराज अहमदचा पाकिस्तानी संघ प्रतिस्पर्धांसाठी धोकादायक ठरू शकतो. इंग्लंडकडून त्यांना ४-० अशा पराभवाला सामोरे जावे लागले. परंतु इंग्लंडला चिवट झुंज देताना त्यांनीदेखील त्रिशतकी मजल मारली. पाटा खेळपट्ट्यांवर पाकची फलंदाजी बहरत असताना गोलंदाजी मात्र निष्प्रभ ठरली. १६ जून रोजी ओल्ड ट्रॅफर्ड मॅंचेस्टर येथे होणाऱ्या भारत-पाक सामन्यावर साऱ्यांच्या नजरा असतील. विश्वचषकस्पर्धेत भारताने पाकिस्तानावर ६ विजय मिळवले आहेत. यंदा कोहलीचा संघ पाकविरुद्ध विजयाची परंपरा कायम राखतो, का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. परंतु भारतीय संघ पाकिस्तानशी सामना खेळेल का, याबाबतचा निर्णय केंद्र सरकार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ घेईल.
केन विल्यम्सनचा न्यूझीलंड संघ उपांत्य फेरी गाठण्याची अपेक्षा आहे. गेल्या विश्वचषकस्पर्धेत न्यूझीलंडचा संघ उपविजेता ठरला होता. विश्वचषकस्पर्धेत सहा वेळा उपांत्य फेरी गाठण्याची किमया किवीजनी केली असली तरी जेतेपदाने त्यांना कायम हुलकावणी दिली आहे.
दक्षिण आफ्रिकन संघाला ‘चोकर्स’ म्हटले जाते. ड्यु प्लेसिसच्या दक्षिण आफ्रिकन संघात डेल स्टेन, कागिसो रबाडा ही तेज जोडगोळी तसेच इम्रान ताहीरसारखा अनुभवी फिरकी गोलंदाज असून तेच दक्षिण आफ्रिकेचे बलस्थान आहे. माजी विजेता श्रीलंकन संघ कमकुवत वाटतो. लसिथ मलिंग, अँजेलो मॅथ्युजसारख्या अनुभवी खेळाडूंची ही अखेरचीच विश्वचषकस्पर्धा ठरावी. नईबच्या अफगाणी संघाकडून फारशा अपेक्षा नसल्या, तरी रशीद खान, नबी या फिरकी दुकलीवर साऱ्यांच्या नजरा असतील.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link