Next
धोका वेळीच ओळखा
शिरीषा साठे
Friday, January 11 | 04:00 PM
15 0 0
Share this storyआयुष्यातला पहिला शब्द ‘दीदीओ’ (म्हणजे व्हिडिओ) असा उच्चारणारं सव्वा वर्षाचं मुल माझ्या अगदी जवळून बघण्यात आहे. हे मूल रिमोटनं टी.व्ही. लावल्याशिवाय जेवत नाही. कोणाचाही मोबाइल मिळाला तर त्यावर यू-टयूब शोधतं. त्यावर हवं ते गाणं/कार्टून चालू झालं नाही तर सुमारे तिसऱ्या मिनिटाला मोबाइल फेकतं.. याविषयी घरातल्यांच्या मनात कौतुकमिश्रित तक्रार आहे. या वयात, या पद्धतीनं स्वतःला हवं ते इतक्या ठामपणे समजणारं, ते मिळवणारं आणि राग इतक्या स्पष्टपणे व्यक्त करणारं मूल - एका बाजूनं विचार केला तर ‘भारी’च आहे, पण दुसऱ्या बाजूनं ज्या ‘स्क्रीन’बाबत हे वर्तन आहे ती अतिशय चिंतेची बाब आहे.

मागच्या लेखात आपण बघितलं तसं चक्रव्यूहात शिरलेलं -’अभिमन्यू’ झालेलं हे एक प्रातिनिधिक कुटुंब. पालकत्वात अनेक वेळा होणारी एक गल्लत म्हणजे- Wrong things done with right intent, अतिशय चांगल्या हेतूनं पण नकळतपणे चुकीचं केलेलं वर्तन.

मुलानं नीट जेवावं, खावं, त्याला नावीन्यपूर्ण काहीतरी मिळावं, ते आनंदी असावं, पालकत्व सुलभ असावं या हेतूमध्ये काहीच वावगं नाही. परंतु ‘इन सबका अक्सीर इलाज’ म्हणून काय वापरलं जातं आहे तर “स्क्रीन” आणि विविध गॅजेट्स.. खरा धोका आहे तो इथे. या कुरुक्षेत्रात धारातीर्थी काय पडतं? तर यादी फारच मोठी आहे....

प्रत्येक मुलामध्ये आपल्या भवतालाला समजून घेण्याची एक उपजत प्रेरणा असते. जसं की- वस्तू हाताळणं, तोंडात घालून बघणं, वास घेणं, पाचही ज्ञानेंद्रियांद्वारे विविध उद्दिपकांचा अनुभव घेणं, त्यांची व्यक्ती- जागा या सगळ्यांशी सांगड घालणं, आपापल्या परीनं अर्थ लावणं आणि यातून अजून ‘कुतूहल’ निर्माण होणं इत्यादी.. स्क्रीनमुळे पहिला घाला पडतो तो असं कुतूहल निर्माण होण्यावर. कारण हे काही वाटण्यापूर्वीच समोर फक्त डोळ्यांना आणि कानांना मिळणारं खाद्य असतं आणि शिवाय त्यासाठी स्वतःला काहीच धडपड करावी लागत नसते. अगदी फिरायचीदेखील गरज नसते. वाढीसाठी गरजेच्या असणाऱ्या म्हणजे मेंदूमध्ये जोडण्या तयार होण्याच्या विविध अनुभवांच्या आणि त्याच्या शक्यतांचा इथेच गळा घोटला जाऊ लागतो. यामुळे वरकरणी सुबत्तेत जगणारं मुल खरं तर अनुभवांच्या आणि त्यातील वैविध्याच्या अभावात वाढू लागतं.

मात्र या ठिकाणी हे लक्षात घेतलं जात नाही, की काही गोष्टी या आपसूक मिळतात, पण काही गोष्टी कल्पनेतूनच उभ्या कराव्या लागतात- त्या कधी कल्पनेतच राहातात तर कधी प्रत्यक्षात उतरतात. महत्त्वाचं म्हणजे उपलब्धींचा (resources) अभाव किंवा मर्यादा आणि एकसुरीपणाचा कंटाळा या गोष्टी खरं तर कल्पनाशक्तीला, प्रयोगशीलतेला चालना देण्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात.

मात्र “आम्हाला जे मिळालं नाही ते आम्ही आमच्या मुलांना देतो” या जाणिवेतून आपण पालक मुलांवर अशा सर्व सोयीसुविधांची खैरात करतो आणि खरं म्हणजे ‘अभावामुळे’ आपल्या स्वतःच्या वाट्याला आलेल्या अशा अनेक संधींपासून मुलांना वंचित ठेवतो.

थोडक्यात, दुसरा बळी जातो तो कल्पनाशक्ती आणि प्रयोगशीलतेचा.

आता एक तिसरा मुद्दा बघुया - कल्पना करा की आपण सुट्टीमध्ये ट्रिपला जायचं ठरवतो आणि रजा काढण्यापासून बुकिंग करेपर्यंत अनेक कामांची यादी त्यातून तयार होते. कधी सुविधा नीट मिळतात, कधी वाहनाची अडचण होते, कधी जेवणा-खाण्याचे हाल होतात. तरी त्यावर मात करून आपण मजा करण्याचा प्रयत्न करतो आणि बहुतांश वेळा त्या ‘मजे’चाच अनुभव मनात साठवत पुन्हा पुढची ट्रिप कुठे काढायची याचा विचार करतो. थोडक्यात, ‘आनंद’ मिळण्यासाठी दीर्घकाळ चालणारी ही प्रक्रिया आणि अनिश्चितता हा सगळा मिळून एक संमिश्र ‘अनुभव’ आपल्याकडे जमा होतो.

तसचं, मुलांच्या बाबतीत मित्रमंडळींबरोबर खेळायला गेलं की मजा येते खरी, पण त्यात कधी खेळायला जागा अपुरी असते, साधनं पुरेशी नसतात. बरं हे सगळं असलं तरी प्रत्येकाला काहीतरी वेगळं करायचं असतं. हे करताना वेगवेगळे स्वभाव असल्यानं त्यात भांडणं होतात, कधी कधी हाणामारी होते, कधी नमतं घ्यावं लागतं, कधी राग येतो, कधी रडू येतं, हे सगळं केल्यानंतरच कुठे खेळण्याची ‘मजा’ येते.

आता कल्पना करा ही मजा जर फक्त बोटांच्या स्पर्शानं (रिमोट, कीपॅड, टचस्क्रीन) मिळाली तर, हवी तेव्हा, हवी तशी, हवी तितकी, खात्रीशीर आणि कुठलीही तडजोड न करता मिळाली तर..... मूल म्हणून, माणूस म्हणून हा ताबडतोबीचा, सोपा खात्रीशीर मार्गच मग जास्त हवासा वाटू लागतो आणि मेंदूमधील आनंद केंद्र त्याच्या उद्दीपनासाठी आवश्यक रसायनं आणि पेशींमधल्या जोडण्या ज्यातून I Should be Happy Today & Tomorrow also ही मानसिकता तयार होणं, नकारात्मक अनुभवांचं भयंकरीकरण न करणं, आनंदी राहण्यासाठी निरोगी धडपड करणं हे घडेनासं होतं.

“कभी ख़ुशी तो कभी गम और बोअरम” खात आयुष्याची मजा आहे या धारणेची पायाभरणी न होता- मला हवं ते, हवं तेव्हा, हवं तसं, हवं तितकं मिळालंच पाहिजे, तसं ते नाही मिळालं तर ते ‘भयंकर’ आहे, मला ते सहन होणं शक्य नाही. आणि असा अनुभव वाट्याला आल्यामुळे तुम्ही पालक म्हणून किंवा मी मूल म्हणून किंवा हे जग जगण्यासाठी म्हणून लायक नाही अशी धारणा रुजण्याची शक्यता बळावत जाते.

या ठिकाणी हे लक्षात ठेवायला हवं की, जे उगवावं असं वाटतं ते आधी पेरावं लागतं, त्याची मशागत करावी लागते, खतपाणी घालावं लागतं आणि तरीसुद्धा आपल्या आवाक्याबाहेरच्या काही गोष्टींनी पेरलेलं सगळं उगवत नाही किंवा हाताशी आलेलं पीक जळून जातं.
म्हणूनच, आपल्या मुलाच्या बाबतीत पेरतानाच काही गल्लत होत नाहीये ना हे बघणं, त्याविषयी सजग राहणं पालक म्हणून आता अधिक जबाबदारीचं झालं आहे.
हे वाचताना, चाकोरीच्या पहिल्या लेखातला शेतकरी आठवला ना! हम्म... विचार करुया... चला, भेटुया परत.
n
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link