Next
सैन्यात अधिकारी व्हायचंय?
लेफ्टनंट कर्नल डॉ. सतीश ढगेे
Friday, May 10 | 04:00 PM
15 0 0
Share this story


वाचकमित्रहो, या लेखमालेतील मागील लेखात आपण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे सैन्यदलातील अधिकारी बनण्याचे कमी प्रमाण व त्याची कारणे यांचा परामर्श घेतला आहे. आजच्या या लेखात आपण शिक्षणाच्या विविध टप्प्यांवर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असणाऱ्या ‘सैन्यदलातील विविध अधिकारीपदाच्या संधी’ बघुया.
विज्ञानशाखेतील प्रत्येक विद्यार्थ्याला सैन्यदलात अधिकारी बनण्याची पहिली संधी मिळू शकते, ती त्याच्या बारावीच्या परीक्षेनंतर! आपण १६.५ ते १९.५ वर्षे वयोगटात असाल आणि बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असेल तर NDA (राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी) परीक्षेसाठी किंवा TES (Technical Entry Scheme) परीक्षेसाठी पात्र ठरू शकता. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमधून नौदल अथवा हवाई दलात प्रवेश हवा असल्यास, तुम्ही बारावीपर्यंत भौतिकशास्त्र आणि गणित हे दोन विषय अभ्यासलेले असणे आवश्यक आहे. TES परीक्षा उत्तीर्ण झाल्यास सैन्यदलातून अभियांत्रिकी शाखेची पदवी प्राप्त करून सैन्यदलात अधिकारी म्हणून कार्यरत होता येते.
सैन्यदलात अधिकारी म्हणून प्रवेश करण्याचा दुसरा टप्पा म्हणजे- युनिव्हर्सिटी एण्ट्री स्कीम (UES) किंवा TGC परीक्षा! अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षातील १८ ते २४ वर्षे वयोगटातील विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. अशा विद्यार्थ्यांची त्याच्या अभियांत्रिकीच्या गुणांची सरासरी ६० टक्क्यांहून अधिक असणे आवश्यक आहे. अभियांत्रिकी शाखेतील पदवी प्राप्त करताच सैन्यदलात तांत्रिक क्षेत्रात अधिकारी बनण्याची संधी या माध्यमातून प्राप्त होते. सिग्नल रेजिमेंट, इएमइ यांसारख्या तांत्रिक शाखांमध्ये आपण या माध्यमातून अभियांत्रिकी अधिकारी बनू शकाल. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना यासाठी केवळ SSB (Service Selection Board) व्यक्तिमत्त्वचाचणीला सामोरे जावे लागते.
सैन्यदलातील अधिकारीपदासाठी प्रवेश करण्याची तिसरी आणि सर्व पदवीधारकांना (कला, वाणिज्य अथवा विज्ञान शाखांचे पदवीधारक) उपलब्ध असणारी संधी म्हणजे CDS (Combined Defence Services) परीक्षा! दोन टप्प्यांमध्ये असणाऱ्या या परीक्षा तिन्ही दलांच्या अधिकारीनिवडीसाठी आयोजित केल्या जातात. या परीक्षेच्या पहिल्या भागात इंग्रजी, सामान्य अध्ययन व चालू घडामोडी आणि बुद्धिमत्ताचाचणी या तीन विषयांशी संबंधित बहुपर्यायी प्रश्नांचा समावेश असतो. महिलांना Short Service Commission (SSC)च्या माध्यमातून सैन्यदलात अधिकारी बनता येते आणि यासाठी या परीक्षेमध्ये केवळ इंग्रजी आणि सामान्य अध्ययन या दोनच विषयांचा समावेश असतो. हवाईदलात अधिकारी बनण्यासाठी परीक्षापद्धतीच्या याच धर्तीवर AFCAT या परीक्षेचे आयोजन केले जाते. या परीक्षांचा दुसरा आणि सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे SSB परीक्षा. हा टप्पा म्हणजे प्रत्येक उमेदवाराची सर्वांगाने केली जाणारी परिपूर्ण व्यक्तिमत्त्व चाचणी! पाच दिवसांहून अधिक काळासाठी चालणाऱ्या या परीक्षेमधून परीक्षार्थीचे सैन्यदलातील अधिकारी बनण्यासाठी लागणारे व्यक्तिमत्व विशेष बारकाईने तपासले जाते. यामध्ये शारीरिक, मानसिक तसेच देहबोलीशी संबंधित १५ विविध प्रकारच्या गुणांची विविध मानसिक चाचण्यांच्या माध्यमातून तपासणी केली जाते. नेतृत्वगुण, साहस, समूहात काम करण्याची हातोटी, आत्मविश्वास, संवादकौशल्य, इत्यादी.
सीडीएस व एसएसबी या टप्प्यांमधून यशस्वी झालेल्या उमेदवारांची शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर त्यांना अधिकारीपदाच्या प्रशिक्षणासाठी देहरादून वा चेन्नई येथील संस्थांमध्ये पाठविले जाते. पदव्युत्तर पात्रताधारक उमेदवारांसाठीदेखील वेळोवेळी आर्मी एज्युकेशन कोअरमध्ये अधिकारीपदाच्या जागा उपलब्ध असतात.
सैन्यदलातील या विविध स्पर्धात्मक परीक्षा प्रत्येकवर्षी साधारणतः दोनदा आयोजित केल्या जातात. सैन्यदलात काही विशेषज्ञांचादेखील अधिकारी म्हणून समावेश केला जातो. MBBS डॉक्टरांसाठी AMC, BDS डॉक्टरांसाठी ADC, परिचारिकांसाठी MNS, वकिलांसाठी JAG शाखा, पशुवैद्यकीय डॉक्टरांसाठी RVC यांसारख्या कित्येक शाखांमध्ये लेफ्टनंट पदापासून करिअरची सुरुवात करता येऊ शकेल.
सर्व पदांसाठी वयोमर्यादा ही तरुणांपुरतीच सीमित आहे. सैन्यदलाचा या परीक्षांमधून ध्येयप्रेरित आणि हरहुन्नरी तरुणांची अधिकारी म्हणून निवड करण्याकडे कल असतो.
 सैन्यदलातील अधिकारीपदाच्या असंख्य संधींचा विचार करता विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वविकासासाठी विशेष मेहनत घ्यावी लागते. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळविण्यासाठी नियमितपणे चांगले इंग्रजी वर्तमानपत्र वाचणे आणि इंग्रजी बातम्या नियमितपणे पाहणे आवश्यक आहे. ‘ग्रुप डिस्कशन’मध्ये यशस्वी होण्यासाठीदेखील वर्तमानपत्रांच्या वाचनाचा फायदा होऊ शकेल. नियमितपणे इंग्रजीमध्ये बोलण्याचा जाणीवपूर्वक सराव, विविध वक्तृत्व वा वादविवाद स्पर्धांमध्ये सहभाग या गोष्टी मदतकारक ठरू शकतात.
 सैन्यदलात अधिकारी बनण्याचे पक्के ध्येय, सकारात्मक दृष्टिकोन आणि योग्य मार्गदर्शनाखाली शिस्तबद्ध पद्धतीने ध्येयप्राप्तीसाठी मार्गक्रमण ही आपल्या यशाची त्रिसूत्री ठरू शकेल.
सैन्यदलाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी शालेय अथवा महाविद्यालयीन जीवनापासूनच कसा पक्का पाया बांधता येईल, याबद्दल वाचा पुढच्या लेखामध्ये! एक लक्षात ठेवा- ‘Arise! Awake! And stop not until the goal is achieved!’
    
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link