Next
इतिहासात रमलेला
अमिता बडे
Friday, February 08 | 04:45 PM
15 0 0
Share this storyमुंबईतील केईएम हॉस्पिटल परिसरातील गोर्धनदास सुंदरदास (जी. एस.) मेडिकल कॉलेजमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनात काय सादर करायचे यावरून मोठा गदारोळ झाला होता. त्यावरून दोन गट पडले होते. एका गटाला अमराठी व्यक्तीचा गरब्याचा कार्यक्रम करायचा होता तर दुसऱ्या गटाला आपल्याच कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा कार्यक्रम सादर करायचा होता. कुणीच माघार घेत नसल्याने अखेर हा वाद डीनसरांपर्यंत पोहोचला. सर्वजण तिथे गेले… तिथे गेल्यानंतर एक तरुण गंभीर आवाजात आपली बाजू अतिशय संयत स्वरात मांडत होता. तो म्हणाला,“ सर, आपल्या कॉलेजचं स्नेहसंमेलन आहे. तर त्यात बाहेरच्या व्यक्तीनं येऊन कार्यक्रम का सादर करायचा आणि त्यासाठी आपण पैसे का द्यायचे? आपल्याच कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा कार्यक्रम आपण का सादर करायचा नाही? आतापर्यंत कधीच हे केलं नाही म्हणून हे करायचंच नाही का? आम्हाला हे यंदा करायचं आहे.” त्या तरुणाचे सर्व ऐकून डीनसरांनी त्याला विचारले हे तुला खरेच करायचे आहे का? आणि त्यासाठी तुझी तयारी आहे का? असे प्रश्न आल्यानंतर त्या तरुणाने क्षणार्धात ‘हो’ असे उत्तर दिले. अर्थात त्यानंतर त्याचा आत्मविश्वास,धडाडी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अभिनयाबद्दलचे त्याचे प्रेम पाहून कार्यक्रमाची परवानगी मिळाली… आणि त्यानंतर जीएस मेडिकल कॉलेजमध्ये ‘अपूर्वाई’ महोत्सवाची सुरुवात झाली. हा महोत्सव आजही तितक्याच उत्साहात आणि जल्लोषात होतो. आणि हा तरुण म्हणजे डॉ. अमोल कोल्हे!
पुणे जिल्ह्यातील नारायणगावातल्या सर्वसामान्य घरातून आलेल्या अमोल कोल्हे याने आज अभिनयाच्या क्षेत्रात स्वत:चे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. कोल्हे यांच्या घरात अभिनयाशी कुणीही संबंधित नव्हते तरीदेखील लहानग्या अमोलला अभिनयाची खूप आवड होती. नारायणगाव इथल्या बालक विद्यामंदिर आणि त्यानंतर गुरुवर्य रा. क. सबनीस शाळेतील प्रत्येक वर्षी स्नेहसंमेलनात तो आवर्जून सहभागी व्हायचा. त्याच्यातील अभिनयाचा गुण आईला माहीत असल्याने तिने कायमच प्रोत्साहन दिले. केवळ स्नेहसंमेलनातच नाही तर शाळांमध्ये होणाऱ्या विविध वक्तृत्वस्पर्धा, एकांकिकास्पर्धांतही अमोल आवर्जून सहभागी व्हायचा. त्यासाठीची तयारी तो स्वत: करायचा. त्याचे पाठांतर, त्याचे शब्दोचार योग्य होतात की नाही याकडे आईचे बारीक लक्ष असायचे. या सर्वांबरोबरच अभ्यासातही तो अव्वल असल्याने त्याच्या कलागुणांना घरून नेहमीच प्रोत्साहन मिळाले. अमोलला अधिक व्यापक अवकाश मिळावे यासाठी पालकांनी त्याला पुण्यातील आपटे प्रशालेत दाखल केले.  गावातून आलेल्या अमोलला शहरात रुळण्यासाठी थोडा वेळ गेला, पण जात्यातच हुशार असल्याने हा बदल त्याने चटकन आत्मसात केला. आपटे प्रशालेत प्रवेश केल्यानंतर त्याच्यातील वक्तृत्वकला अधिकच बहरली. दहावीत बोर्डात आल्यानंतर अमोलने विज्ञानशाखेत प्रवेश घेतला. त्यानंतर एकमार्गी अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्याने ते दोन वर्षे अभिनयापासून तो दुरावला होता. बारावीच्या परीक्षेला काही महिन्यांचा अवधी असतानाच अमोलच्या वडिलांना पक्षाघाताचा झटका आला. अचानक आलेल्या या संकटामुळे सारेच हादरून गेले होते. भेटायला येणारा प्रत्येक जण अमोलला बारावीत गॅप घेण्याचा सल्ला देत होता. परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये न डगमगता त्याला सामोरे जायचे हा कानमंत्र वडिलांनीच त्याला दिला होता. त्यानुसार अमोलने बारावीची परीक्षा दिली इतकेच नाही, तर तो बोर्डातही आला! (त्याच्या हाच जिद्दी आणि मेहनती स्वभावामुळे त्याला हव्या त्या गोष्टी साध्य करण्याची धमक तो दाखवतो आहे.) बारावी झाल्यानंतर पुण्यातील बी.जे. गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये त्याने प्रवेश घ्यावा असे त्याला अनेकांनी सुचवले. मात्र अमोलने थेट मुंबई गाठली. मुंबईतील जीएस वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएससाठी प्रवेश घेतला. मुंबईत आल्यानंतर त्याच्या आयुष्याला वेगळेच वळण मिळाले… निमित्त ठरले ते महाविद्यालयात केले जाणारे रॅगिंग आणि त्यानंतर त्याला भेटलेली सुबल सरकार आणि डॉ. रवी बापट ही दोन ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वे!

अभिनयाशी नाळ जुळली
महाविद्यालयात प्रवेश केल्यानंतर सिनीयर विद्यार्थ्यांकडून नवीन विद्यार्थ्यांचे रॅगिंग केले जायचे. रॅगिंग म्हणजे नाटकांचे संवाद वाचणे, कविता वाचणे, नृत्य करून दाखवणे अशा प्रकारचे असायचे. अमोलचेही रॅगिंग झाले आणि त्याला नाटकाचे संवाद म्हणून दाखवावे लागले होते. अभिनयाची आवड असलेल्या अमोलचे संवाद ऐकून सर्वजण त्याच्या प्रेमात पडले. त्याची ही खासियत सिनीयर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली. कालांतराने तो कॉलेजमधील सांस्कृतिक वर्तुळात सहभागी झाला…आणि पुन्हा एकदा अभिनयाशी त्याची नाळ जुळली. अमोल आणि त्याच्यासारखीच अभिनयाची आवड असलेले समविचारी विद्यार्थी एकत्र आले आणि नाट्यविषयक उपक्रम राबवले जाऊ लागले. यातूनच मग कॉलेजच्या स्नेहसंमेलनात कार्यक्रम सादर करण्याचा प्रश्न उपस्थित झाला. तेव्हा अमोलने पुढाकार घेत विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. इतकेच नाही तर हा कार्यक्रम बसवण्यासाठी अमोलने थेट प्रख्यात नृत्यदिग्दर्शक सुबल सरकार यांनाच विनंती केली. अमोलने सुबलदांना प्रत्यक्ष भेटून सर्व संकल्पना समजावून सांगितली. ते ऐकून सुबलदा खूपच प्रभावित झाले आणि अमोलची कळकळ त्यांना जाणवल्याने त्यांनी होकार दिला. त्यानंतर जीएस महाविद्यालयात महाराष्ट्रातील लोकनृत्याचा जागर झाला. त्यानंतरही सुबलदा ‘अपूर्वाई’ महोत्सवाला अनेक वर्षे आवर्जून यायचे.

…आणि संधी मिळाली!
सांस्कृतिक कार्यक्रमांमधील सक्रिय सहभागाबरोबरच एमबीबीएसचा अभ्यासही सुरूच होता. दुसऱ्या वर्षाला असताना एकांकिकास्पर्धांत सहभागी होण्याचा विचार अमोल आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या मनात आला. परंतु वैद्यकीय,अभियांत्रिकी महाविद्यालयांतील परीक्षांच्या तारखा आणि आयएनटी, उन्मेष, मृगजळ या एकांकिकास्पर्धांचा काळ एकच असायचा. त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी ‘अद्वैत’ एकांकिकास्पर्धा सुरू झाल्या. प्रारंभी याला प्रचंड विरोध झाला. मात्र डॉ. रवी बापट त्यांच्या मागे ठामपणे उभे राहिल्याने या स्पर्धा दरवर्षी नित्यनेमाने उत्साहात होऊ लागल्या.

 दुसऱ्या वर्षापासून अमोलने ‘कमवा आणि शिका’ हे तत्त्व अंगिकारले होते. वडिलांचे आजारपण होतेच, त्यात आपल्या शिक्षणाचा भार कुटुंबावर पडू नये यासाठी त्याने हा निर्णय धाडसी निर्णय घेतला. अर्थार्जनासाठी तो विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करू लागला. (कॉलेजमध्ये सूत्रसंचालन करताना अश्विनी त्याची साथीदार होती होती. तीच पुढे त्याच्या आयुष्याची साथीदार झाली.) सूत्रसंचालनाच्या माध्यमातून पैसे मिळत होते, त्यात सातत्य असे नव्हते. सुबलदांकडे विषय निघाल्यावर त्यांनी ‘दूरदर्शन’चा मार्ग अमोलला दाखवला. तिथे स्वत: ते घेऊन गेले. ‘सांगा उत्तर सांगा’ हा कार्यक्रम सादर करण्याची संधी त्याला मिळाली. या कार्यक्रमाचे शेवटचे चार भाग शिल्लक होते. मात्र अमोलची कार्यक्रम सादर करण्याची पद्धत आवडल्याने हा कार्यक्रम वाढवण्यात आला. गंमत म्हणजे याआधी कधीही अमोल कॅमेऱ्याला सामोरा गेला नव्हता. तरीदेखील त्याची तांत्रिक अंगे शिकून घेऊन आत्मविश्वासाने त्याने हा कार्यक्रम सादर केला. ‘सांगा उत्तर सांगा’ कार्यक्रमानंतर त्याला ‘आमची शाखा कुठेही नाही’ हा कार्यक्रम त्याला मिळाला. या कार्यक्रमाचे स्क्रिप्टही तो लिहायचा. त्यामुळे वाचनाची आवड अधिक वाढली. हे सर्व करत असताना चांगल्या गुणांनी तो दरवर्षी उत्तीर्ण होत होता. त्यामुळे त्याच्या या निर्णयाला घरच्यांचा कायमच पाठिंबा होता. दरम्यानच्या काळात एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण झाले. आता पुढे काय असा प्रश्न होता. एकीकडे डॉक्टर म्हणून असलेले उज्ज्वल भवितव्य तर दुसरीकडे आवडीचे असे अभिनयक्षेत्र…काय करायचे अशा द्विधा मन:स्थितीत अमोल अडकला होता. त्याचवेळी तुझ्यातील अभिनेत्याला अजमावून पाहा. यश मिळाले तर उत्तमच नाही मिळाले तर निराश न होता डॉक्टरकी सुरू कर असा सल्ला डॉ. रवी बापट यांनी दिला. तो काळ खासगी वाहिन्यांच्या उदयाचा होता. त्यामुळे विविध वाहिन्यांवर सुरू असलेल्या दैनंदिन मालिकांत अमोलला काम मिळाले. (चार दिवस सासूचे, या गोजिरवाण्या घरात, अधुरी एक कहाणी, काट रुते कुणाला). एकाचवेळी अमोलच्या पाच मालिका सुरू होत्या. सारे काही सुरळीत सुरू होते. दरम्यानच्या काळात करिअर आणि संसाराची घडीही बसली होती.

धाडसी निर्णय

सारे काही आलबेल सुरू असले तरी अमोल मनातून अस्वस्थ होता. लहानपणी वाचलेली अनेक ऐतिहासिक पात्रे मनात रुतून बसली होती. खास करून संभाजी महाराज. एका मुलाखतीमध्ये संभाजी महाराज हा ड्रीम रोल असल्याचे त्याने सांगितले होते. कर्मधर्म संयोगाने मोहन तोंडवळकर यांच्या ‘कलावैभव’ संस्थेच्या ‘शंभूराजे’ या नाटकात अमोलला संभाजीराजे साकारण्याची संधी मिळाली. अर्थात नाटकातील या भूमिकेला पूर्ण न्याय देता यावा यासाठी  त्याने मालिका सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला! मध्यमवर्गीय घरातील एक मुलगा डॉक्टरकी सोडून अभिनयात येतो आणि त्यानंतर उत्तम अर्थाजन देणाऱ्या मालिकांवर पाणी सोडून केवळ संभाजी महाराजांवरील आत्यंतिक प्रेमापोटी  नाटक स्वीकारतो हा निर्णय कोणत्याही घरात स्वीकारला जाणे केवळ अशक्य. मात्र अमोलच्या घरच्यांनी हा ही निर्णय सहज स्वीकारला. कारण त्यांचा त्याच्यावर असलेला विश्वास आणि प्रत्येकाला असलेले निर्णयस्वातंत्र्य. अमोलचा हा निर्णय सार्थ ठरला. या नाटकाला, अमोलने साकारलेल्या संभाजी महाराजांच्या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. अमोलचे नाटक सुरू असताना त्याला नितीन चंद्रकांत देसाई यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील मालिकेत शिवाजीराजांची भूमिका मिळाली. या भूमिकेचे शिवधनुष्य अमोलने पेलले. प्रचंड मेहनत घेत ही भूमिका त्याने साकारली. (ही मालिका स्वीकारल्यामुळे ‘शंभूराजे’ हे नाटक त्याला सोडावे लागले होते.) ही मालिका करत असताना छत्रपतींप्रमाणे संभाजीराजांचे कर्तृत्व घराघरांत पोहोचावे, अशी आस त्याच्या मनात निर्माण झाली होती.

‘छत्रपती…’ मालिका संपल्यानंतर पुन्हा ‘शंभूराजे’ नाटकाचे प्रयोगाला सुरुवात केली. हे नाटक, संभाजीराजांची भूमिका अमोल अक्षरश: जगू लागला. दरम्यानच्या काळात ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्यातही तो रमला. त्यातूनच संभाजीराजांवर भवदिव्य आणि त्यांच्या कर्तृत्वाचा आढावा घेणारी एखादी कलाकृती साकारण्याची इच्छाशक्ती अधिक प्रबळ झाली. विलास सावंत, डॉ. विलास राव, आणि अमोल यांनी एकत्र येऊन ‘जगदंब क्रिएशन’ची स्थापना केली. आणि या निर्मिती संस्थेतर्फे आणि ‘झी मराठी’च्या मदतीने ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेचे स्वप्न २५ सप्टेंबर २०१७ रोजी प्रत्यक्षात आले. ‘ऐतिहासिक मालिका कोण पाहतो’ अशी टीका अमोल आणि त्याच्या सहकाऱ्यांवर झाली होती. परंतु या मालिकेला मिळत असलेल्या लोकप्रियतेने सडेतोड उत्तर दिले आहे. या मालिकेत अर्थातच संभाजी महाराजांची भूमिका अमोलने साकारली आहे. संभाजीराजे साकारताना त्यांच्यातील बारकावे समजून घेत, त्यांच्या स्वभावाचा सखोल अभ्यास केला. अमोलने घेतलेल्या या मेहनतीमुळे संभाजी महाराज ही भूमिका सर्व वयोगटांतील प्रेक्षकांमध्ये कमालीची लोकप्रिय झाली आहे.


घरच्यांची भूमिका महत्त्वाची
संभाजीराजांवरील मालिकेच्या निर्मितीची जबाबदारी अमोलने स्वीकारली तेव्हा स्थिरतेकडून अस्थिरतेकडचा हा प्रवास होता. याबाबत अमोलने सांगितले की, ‘आई-बाबा आणि मुख्य म्हणजे पत्नी अश्विनी हिने दिलेल्या पाठिंब्यामुळे हे शिवधनुष्य पेलता आले. या मालिकेसाठी द्यावा लागणारा वेळ, आर्थिक तोशीस, करावा लागणार त्याग सर्व त्यांनी आनंदाने केले. त्यामुळे ही मालिका उभी करण्यात त्यांचे मोठे श्रेय आहेच.’

भविष्यातील भूमिका
कलाकार हा नेहमीच वैविध्यपूर्ण भूमिकांच्या शोधात असतो. अमोललाही भविष्यात कर्ण, सदाशिवरावभाऊ, महात्मा फुले, शाहीर अण्णाभाऊ साठे यांचा ‘फकिरा’ या भूमिका साकारायच्या आहेत. ही त्याची इच्छा लवकरच पूर्ण होवो, या शुभेच्छा! n

ही अपेक्षाही पूर्ण व्हावी!
अमोल हा उत्तम कलाकार आहे यात कुणाचेही दुमत नाही. त्याने आतापर्यंत शिवाजी महाराज, संभाजी महाराज या भूमिका साकारून वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याशिवाय मुलगा (२००९), आघात (२०१०), ऑन ड्युटी २४ तास (२०१०), राजमाता जिजाऊ (२०११), साहेब (२०१२), रंगकर्मी (२०१३), अरे आवाज कुणाचा (२०१४), रमा माधव (२०१४),  बोला अलखनिरंजन (२०१८) हे चित्रपट आणि अर्धसत्य, बंधमुक्त, सत्ताधीश अशा विविध विषयांवर आधारित नाटकांतही भूमिका केल्या आहेत. मात्र कलाकार म्हणून विचार करता आणखी वैविध्यपूर्ण भूमिका त्याने साकाराव्या अशी त्याच्या चाहत्यांची अपेक्षा आहे. त्याच्या चाहत्यांची ही इच्छा भविष्यात पूर्ण होईल,अशी अपेक्षा… 

राजकारणी आणि समाजकारणीही
अमोल २०१५ पासून शिवसेनेशी संबंधित आहे. तेव्हापासून तो राजकारणातही सक्रिय असला तरी अभिनयाशीही त्याची  बांधिलकी आहे. सक्रिय राजकारणाबरोबरच शिवाजी महाराजांच्या काळातील सर्वात महत्त्वाचे साक्षीदार असलेल्या गड-किल्ल्यांच्या संवर्धनाच्या कामातही तो आघाडीवर आहे. महाराष्ट्र दुर्गसंवर्धन महासंघाच्या माध्यमातून तो यासाठी कामही करत आहे. दुर्गसंवर्धन, पर्यटन आणि स्थानिकांना रोजगार या त्रिसूत्रीवर तो काम करत आहे.

लेखक अमोल!

छत्रपती शिवाजी महाराज ही मालिका करताना आलेल्या हृदयस्पर्शी अनुभवांवर आधारित पुस्तक अमोलने लिहिले आहे. हे पुस्तक येत्या वर्षभरात प्रकाशित होणार आहे. त्यामुळे दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता डॉ. अमोल कोल्हे लेखक या एका नव्या भूमिकेत दिसेल. त्याचप्रमाणे संभाजी महाराजांवरील मालिकेतील कलाकारांच्या अनुभवांवर आधारित पुस्तकाची योजना असून त्यावरही काम सुरू आहे.

‘ती’ भूमिका नाकारली होती!
नितीन देसाई यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज’ मालिकेत शिवरायांची भूमिका अमोलने करावी असे जेव्हा त्याला सांगितले तेव्हा त्याने या भूमिकेसाठी नकार दिला होता. याचे कारण विचारले असता, संभाजी महाराज साकारणे हे स्वप्न आहे त्यामुळे ही भूमिका नको असेही सांगितले होते. मात्र नितीन देसाई यांनी खूप आग्रह केल्यामुळे शिवरायांची भूमिका अमोलने साकारली. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link