Next
काय करता येईल?
मिथिला दळवी
Friday, June 07 | 03:00 PM
15 0 0
Share this story


अमनचा नुकताच दहावीचा रिझल्ट लागला होता. त्याला सातवी-आठवीपर्यंत खूप चांगले मार्क्स मिळत होते, पण नंतर त्याचा आलेख घसरत गेला. दहावीत शेवटी आईने महिनाभर सुट्टी घेऊन त्याचा कंबर कसून अभ्यास घेतला, त्यामुळे त्याला ठीक मार्क्स मिळाले. मात्र आईची त्यात प्रचंड कसरत झाली.

“अहो, किती वेळा टाइमटेबल बनवलं, कितीदा सांगितलं रात्री जागरण नको करू, त्यापेक्षा सकाळी लवकर उठत जा. नाहीच हो ऐकलं त्यानं.” आई अतिशय खिन्न झाली होती. आता बारावीत पुन्हा हा प्रकार घडू नये म्हणून काय करता येईल असं त्या विचारत होत्या.

मी म्हटलं, “अमनला विचारूया ना, काय करता येईल ते!”

“अहो, त्याला काय करता येईल हे माहीत असतं, तर आज ही वेळ आली असती का?” आईनं जरा चिडूनच विचारलं.

आज अनेक आई-बाबांशी बोलताना हा अनुभव येतो. मी सांगितलं ना त्याला, तू आता अमुक कर किंवा तमुक करू नकोस. आई-बाबा आपल्या परीनं योग्य वाटेल ते सांगत राहतात, आणि मुलं नेमकं ते बऱ्याचदा पाळत नाहीत.

“माझा मोबाइल देतानापण आम्ही आधीपासूनच ठरवलं होतं, अर्धा तास मिळेल दिवसातून, पण हिचं काही संपतच नाही. आधी गेम्स, मग मित्रमैत्रिणींबरोबर प्रोजेक्ट्स किंवा अभ्यासाची चर्चा. शाळेच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवरपण सूचना येत असतात, मग त्या पाहायला फोन हातात घेतला की तो ठेवला जातच नाही.” सृष्टी आणि तिच्या आईमध्ये त्यावर कायम तणतण होत राहते. अनेक घरांमध्ये हे नेहमीचं दुखणं आहे.

ओजस आणि त्याच्या आईबाबांचा तर खेळण्याच्या वेळाबद्दलचा वाद नेहमीचाच आहे. आईबाबांनी त्याला आठ वाजेपर्यंत खेळून घरी यायला सांगितलं आहे. ओजसला नेहमीच उशीर होतो. बाकीची मुलं खेळायला येईपर्यंत साडेसात-पावणेआठ होतात, मग कसा मी येणार खेळून आठ वाजता घरी!, ओजसचं म्हणणं रास्त आहे, हे आईबाबांनंही पटतं. मग जेवण, अभ्यास सगळंच लांबत जातं. आई त्याला खेळायला जाण्यापूर्वी सगळा अभ्यास आटपून घ्यायला सांगते, तेही ओजसकडून होत नाही. त्याच प्रकारचे वाद पुन्हा पुन्हा होत राहतात.

काय कॉमन दिसतं या सगळ्या प्रसंगांमध्ये? मुलांनी काय करावं याच्या अगदी छोट्यात छोट्या लेव्हलपर्यंतच्या सूचना पालक देत राहतात. मुलं लहान असताना, सूचना पाळतातही. परंतु मुलं टीन एजमध्ये येतात, तेव्हा चित्र झपाट्यानं बदलू लागतं.

आई-वडिलांच्या सूचना मुलं जितक्या पाळत नाहीत, तितका आई-वडिलांना त्यांच्याबद्दल कमी कमी विश्वास वाटू लागतो, आणि म्हणून ते शिस्तीच्या नाड्या आणखी घट्ट करू पाहतात. शिस्त जितकी जाचक वाटू लागते, तितकी मुलं त्यातून जास्त पळवाटा शोधतात, किंवा मग चक्क त्या नियमांना पूर्णपणे धाब्यावर बसवतात. गुंता सुटण्याऐवजी आणखी आणखी वाढत जातो.

काय करता येईल अशा परिस्थितीमध्ये?

हेच करायचं... काय करता येईल, हे मुलांनाच विचारायचं.

आपण काही उदाहरणं पाहूया.

“अमन, दहावीमध्ये आपण ज्याप्रकारे अभ्यास केला, त्याचा मला फार ताण आला. अगदी नकोसं झालं होतं मला ते सगळं. आता बारावीमध्ये तर मी काही तुझा अभ्यास नाही घेऊ शकणार. काय करता येईल आपल्याला अशा प्रकारचा ताण पुन्हा टाळण्यासाठी?”

“सृष्टी, मोबाइलसोबतचा वेळ, हे गणित काही जमताना दिसत नाही. मला हताश वाटतं मग. फार काहीतरी वेगळा विचार करायला हवं असं वाटतं. तुझ्या या सगळ्या अनपेक्षित येणाऱ्या गोष्टींचा ताळमेळ कसा घालायचा? तुला काही सुचतं आहे का?”

“ओजस, खेळ आणि अभ्यासाच्या वेळेचा ताळमेळ बसत नाही. काय करता येईल आपल्याला, ज्यातून तुझा खेळही नीट होईल, आणि अभ्यास, रात्रीचं जेवणंही वेळेत आटपेल?”

मुलांकडे याची उत्तरं लगेचच असतील असं नाही. त्यासाठी आपली थांबायची तयारी असणं अगदी महत्त्वाचं.

मुलांना असं विचारण्याबाबत अनेक आईबाबा साशंक असतात. अमनच्या आईसारखे काही ते बोलूनही दाखवतात. कदाचित मुलांना पटकन सांगताही येणार नाही, काय करता येईल हे. परंतु आपण हा प्रश्न विचारून मुलांना विचार करायला वाव आणि वेळ दोन्ही देतो. मुलांना अशा प्रकारचा विचार करायची सवय व्हावी लागते. आणि कायमच जर आपण त्यांना आयती तयार सोल्युशन्स देत राहिलो, तर ही सवय कधी लागणार? हे माझं आयुष्य आहे आणि त्यात जे काही बरं-वाईट होईल ती माझी जबाबदारी आहे, हा दृष्टिकोन मुलांमध्ये येण्यासाठीची ही सुरुवात असू शकते.

काय करता येईल, असं विचारून मुलांवर गोष्टी लादणं टाळता येतं. मुलांच्या आडनिड वयात त्यांचा विश्वास मिळवण्यासाठीही याची मोठी मदत होते. मुलांच्या आणि आपल्यामधले संवादाचे दरवाजे खुले राहण्यासाठी ही अतिशय आवश्यक बाब आहे.

हा मार्ग थोडा वेगळा, सुरुवातीला जरा अवघड वाटला, तरी त्यातून बरंच काही साध्यही होतं. त्याबद्दल आणखी थोडं पाहूया, पुढच्या लेखात.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link