Next
असेल का परग्रही कुणीकडे?
सुधीर थत्ते, नंदिनी थत्ते
Friday, September 06 | 04:00 AM
15 0 0
Share this story


“अलिकडेच पेन विद्यापीठातल्या वैज्ञानिकांनी ‘नासा’च्या केप्लर दुर्बिणीनं घेतलेल्या वेधांवरून केलेल्या गणितानुसार सूर्याएवढ्या असणाऱ्या दर चार तारकांपैकी एका तारकेभोवती साधारण पृथ्वीच्या आकाराचा, पृथ्वीसारखंच वातावरण असणारा एखादा ग्रह पृथ्वीएवढ्या अंतरावरून फिरत असू शकेल,” स्वप्निलदादा म्हणाला, “यावरून अशी शक्यता वर्तवली जात आहे, की आपल्या आकाशगंगेत सुमारे दहा अब्जांहून जास्त पृथ्वीसारखे ग्रह असू शकतील.”
“ग्रह पृथ्वीसारखा असण्याचं एवढं काय विशेष?” सोहमने विचारले.
“सध्याच्या ज्ञानानुसार एखाद्या ग्रहावर मानवासारखा सजीव निर्माण होण्याची शक्यता ही प्रामुख्यानं अशा ग्रहांवरच जास्त आहे.” तनुजाताई म्हणाली.
“का बरं?” आश्चर्याने प्रथमेशने विचारले.
“कारण आदिम जैवरेणू तयार होण्यापासून मानवाची उत्क्रांती होण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी पृथ्वीसारखं विशिष्ट वातावरण, तापमान, पाणी आणि जमीन यांची गरज असते,” राहुलदादा म्हणाला, “या सर्व गोष्टी असण्यासाठी लागणारी अनुकूल परिस्थिती अशा ग्रहांवर असू शकते.”
“परंतु वातावरण तर गुरूवरही आहेच की.” सोहमने आक्षेप घेतला.
“बरोबर,” तनुजाताई म्हणाली, “पण गुरूसारख्या मोठ्या ग्रहाचं गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या तुलनेत खूप जास्त असल्यामुळे तिथे वातावरणांत नायट्रोजन किंवा ऑक्सिजनपेक्षा हलके वायू मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे मानवासारखा प्राणी निर्माण व्हायला ते वातावरण अनुकूल ठरत नाही. याउलट, बुधासारख्या छोट्या ग्रहांवर गुरुत्वाकर्षण कमी असल्यामुळे तिथे वातावरणात नायट्रोजन आणि ऑक्सिजनचा अभावच असतो.”
“ग्रह पृथ्वीइतपतच अंतरातून का फिरायला हवा?” शाश्वतने विचारले.
“ग्रह तारकेच्या फार जवळ असेल तर त्याचं तापमान प्रचंड जास्त राहतं,” विद्याताई म्हणाली, “याउलट, ग्रह फार दूर असेल तर त्याचं तापमान फार कमी होतं. अशा ग्रहांवर पाणी नसतं. असे ग्रह मानवासारख्या सजीवाच्या उत्क्रांतीला अनुकूल ठरत नाही. त्यामुळे मानवासारखा सजीव निर्माण होण्यासाठी त्या ग्रहावर या सर्व गोष्टींची अनुकूलता आवश्यक ठरते.”
“या माहितीचा खगोलशास्त्रज्ञांना काय उपयोग?” अमनाला प्रश्न पडला.
“अनेक दशकांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या दुर्बिणींमधून आपण परग्रहींचा (एलियन) शोध घेतो आहोत,” राहुलदादा म्हणाला, “शिवाय, अशा परग्रहींनी विद्युतचुंबकीय लहरी वापरून काही संदेश प्रक्षेपित केले असतील, तर त्यांचाही आपण वेध घेत आहोत. हा शोध घेताना अशा ग्रहांवर लक्ष केंद्रित केलं, तर खगोलशास्त्रज्ञांना परग्रहींचा शोध घेणं
सोपं होईल.”
“आपल्या आकाशगंगेत पृथ्वीसारखे दहा अब्ज ग्रह असतील तर परग्रहींना घेऊन येणारं एखादं अंतराळयान किंवा निदान त्यांचा संदेश तरी एव्हाना आपल्यापर्यंत का नाही आला?” मुक्ताने विचारले.
“हा प्रश्न एन्रिको फर्मी यांनाही १९५०मध्ये पडला होता,” स्वप्निलदादा सांगू लागला, “त्यावर वेगवेगळ्या प्रकारे विचार करून अनेक उत्तरं शास्त्रज्ञांनी दिली आहेत. काहींच्या मते परग्रही त्यांच्या प्रगत यानांमधून आपल्या पृथ्वीवर फार पूर्वीच येऊन गेले आहेत. अर्थात, यातल्या इतिहासपूर्वकाळात येऊन गेलेल्या परग्रहींचे अवशेष सापडण्याची शक्यता फारशी नाही. त्यामुळे ते आल्याचं ना आपल्याला ठाऊक आहे, ना सिद्ध करता येणार आहे.”
“मात्र यानंतरच्या काळाचं काय?” प्रथमेशने विचारले.
“काहींचा दावा असा आहे की जगातल्या पौराणिक ग्रंथांमध्ये वर्णन केलेल्या दिव्य शक्ती असणाऱ्या अनेक देवता हे त्या काळातल्या आलेल्या परग्रहींचंच वर्णन आहे,” तनुजाताई म्हणाली, “तसंच, मानवांना हलवणं अशक्य असलेल्या महाप्रचंड शिळांपासून बनवलेला सॅकसैहुआमॅन हा दक्षिण अमेरिकेतल्या अँडिस पर्वतातला किल्ला, केवळ हेलिकॉप्टरमधूनच उलगडू शकणाऱ्या महाप्रचंड भौमितिक आणि प्राण्यांच्या लिमाजवळच्या आकृत्या, मेक्सिकोजवळचा टियोतिहुआकनचा भव्य पिरॅमिड अशा अनेक गोष्टी मानवानं प्राचीन काळी कोणतंही प्रगत तंत्रज्ञान हाताशी नसताना कशा बनवल्या असतील, या प्रश्नाचं उत्तर अनेकांच्या मते पृथ्वीवर आलेल्या परग्रहींच्या करामतीतच आहे. अंतराळातून पृथ्वीजवळ आल्यावर अवकाशातून दिसणाऱ्या या खाणाखुणा पृथ्वीवर यान उतरवण्यासाठी उपयुक्त ठरत असतील म्हणून त्यांनी बनवल्या, असा त्यांचा दावा आहे.”
“आज मानवाचं तंत्रज्ञान अवकाशाचा दूरवर वेध घेण्याइतकं समर्थ झालेलं असताना आपल्याला कुठेही परग्रही का सापडले नाहीत?” सानियाने विचारले.
“काही जणांच्या मते परग्रहींचा किंवा त्यांच्या उडत्या तबकड्यांचा सुगावा लागला असतानाही तो विविध देशांच्या राज्यकर्त्यांनी दडवून ठेवला आहे,” विद्याताई सांगू लागली, “अशा सगळ्या कपोलकल्पित कथांना ‘कारस्थान सिद्धांत’ (कॉन्स्पिरसी थिअरी) म्हणतात. परग्रहींची यानं का आली नसतील याचं मुख्य वैज्ञानिक कारण तारकांमधली प्रचंड अंतरं हे असू शकेल. सगळ्यात जवळची तारकासुद्धा आपल्यापासून सुमारे ४.२२ प्रकाशवर्षं अंतरावर आहे. आपल्या यानांचा सध्याचा कमाल वेग हा सेकंदाला सुमारे ८ किलोमीटरच्या आसपास आहे. अशा यानाला सर्वात जवळच्या तारकेवर पोचायला सुमारे दोनेक लाख वर्षं लागतील. हा काळ एवढा मोठा आहे की अशा यानातून वेध घेणारी उपकरणं किंवा अंतराळवीर दुसऱ्या तारकेकडे पाठवण्यात काही अर्थच राहत नाही.”
“यानं सावकाश जात असली तरी विद्युतचुंबकीय तरंग तर प्रकाशाच्याच वेगानं जातात. त्यामुळे माहितीच्या देवाणघेवाणीसाठी त्यांचा नक्कीच वापर होईल,” शाश्वत म्हणाला.
“ते प्रयत्न चालूच आहेत,” विद्याताई म्हणाली, “आपण परग्रहींच्या तरंगांचाही वेध घेत आहोत आणि असे तरंग वापरून त्यांच्याकडे आपले संदेशही पाठवतो आहोत. परंतु आजवर तरी आपल्याला परग्रहींचा थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे कदाचित एवढ्या अब्जावधी ग्रहांच्या गर्दीत मानवासारखा प्रगत सजीव असणारी पृथ्वी ही एकुलती एकच आहे की काय, अशी शंकाही काही शास्त्रज्ञ व्यक्त करू लागले आहेत.”
“तसं असेल तर,” मुक्ता म्हणाली, “विश्वातल्या या एकमेव बुद्धिमान प्राण्याचं वसतिस्थान असणाऱ्या पृथ्वीचं जतन करण्याची आपली जबाबदारी आणखीच वाढते!”

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link