Next
शब्देविण संवादू
आनंद शिंदे
Friday, June 07 | 04:00 PM
15 0 0
Share this story


एकदा एक छोटा कळप चरत होता. चरताना कोणी कोणाकडे बघत नव्हतं. प्रत्येक हत्ती आपल्या खाण्यात मग्न होता. कळपाची प्रमुख मादी दोन पावलंच चालली आणि काही कळायच्या आत सगळ्या हत्तींनी तिची दिशा पकडली. कोणी तोंडातून आवाज काढला नाही. तरीही हे कसं घडलं असावं, असा विचार चालू होता. खरं उत्तर होतं शेपटीत. हा सगळा संवाद घडला, तो शेपटीच्या हालचालींतून. प्रमुख मादी विशिष्ट पद्धतीनं शेपटीची हालचाल करते. या हालचालींवर सगळ्या कळपाचं लक्ष असतं. त्यातूनच जायची दिशा निश्चित कळते आणि अख्खा कळप त्या दिशेनं चालू लागतो.
 हत्तीच्या कळपाला जंगलात चरायला नेत असू तेव्हा या गोष्टी प्रकर्षानं जाणवायच्या. मीन्ना हत्तिणीनं माहुताची टिंगल करताना त्याच्या डोक्यावर शेपटीच्या टोकानं थोपटणं, सुंदरीनं चालताना माझ्या पोटावर ठरावीक पद्धतीनं मारणं, सुंदरी पिल्लूला आपल्याबरोबर पुढे येण्यासाठी अम्मू हत्तिणीनं चालताना स्पर्श करणं आणि त्यानंतर सुंदरीनं पटापटा अम्मूच्या मागे चालणं अशा गोष्टींनी ज्ञानात भर पडत गेली.
अर्थात या संवादाशिवायही आवाजाच्या माध्यमातून हत्ती नक्कीच बोलत असतो. यानिमित्तानं या विषयात प्रचंड अभ्यास केलेल्या जॉईस पुली वाचनात आल्या. आपल्याला सहसा माहीत असतो तो हत्तीचा चित्कार. मात्र अॅम्बोसेली अभयारण्यात कित्येक वर्षं काम करणाऱ्या जॉईस पुली व त्यांच्या सहकाऱ्यांनी दहा विविध हाकाऱ्यांची (Call) नोंद केली. त्यातील सात हाकारे हे स्वरयंत्रात असलेल्या पोकळीतून येतात, तर इतर तीन ते सोंडेमार्फत काढतात, असं आढळलं.
आपल्याकडे असलेल्या पियानोला सात सप्तकं असतात. त्यात हत्तीच्या आवाजाची श्रेणी पियानोच्याही तीन सप्तकं पुढे असते. म्हणजे ती दश सप्तक इतकी मानली जाते. हत्ती जे आवाज स्वरयंत्रात असलेल्या पोकळीतून (Larynx) अथवा घशातून काढतो, त्यांचा शब्दश: अर्थ घेतल्यास भुंकणं (Bark), रडणं (Cry), गोंधळाचा आवाज (Grunt), विचित्र रडण्यासारखा आवाज (Husky cry), धांगडधिंगा केल्यासारखा आवाज (Rev), गर्जना करणं (Roar), पोटातून येणारा घुमारायुक्त आवाज (Rumble) असे विविध प्रकार त्यात असतात. तर जे तीन आवाज आपण सहज ऐकू शकतो, ते सोंडेद्वारे काढले जातात. बिगुल वाजवल्यासारखा आवाज (Trumpet), नाकावाटे काढला गेलेला आवाज (NasalTrumpet) आणि रणशिंग फुंकल्यासारखा आवाज (Snort). या ठिकाणी मुद्दाम इंग्रजी नावं देण्याचं कारण म्हणजे यांचा शब्दश: मराठी अर्थ वेगळाच वाटू शकतो. अगदीच ढोबळ अर्थ घ्यायचे तर फुरफुरतो, गुरगुरतो किंवा चित्कारतो असे साधे शब्द घेऊ शकतो.
दोन अगदी जाड भिंतींच्या खोलीत हत्ती ठेवले तरी ते एकमेकांशी संवाद साधू शकतात. यावर हत्तींचे अभ्यासक इयान डग्लस हॅमिल्टन तसंच, पुली यांनी शिक्कमोर्तब केलं आहे. एक हत्ती दुसऱ्या हत्तीशी सात किलोमीटरपर्यंत संवाद साधू शकतो आणि तोही अगदी सहज. या दूरस्थ संवादाला संशोधकांनी एका प्रयोगाचा आधारही दिला. इटोशा (नामिबिया देशातील राष्ट्रीय उद्यान) या कोरड्या प्रदेशात एक उंच टॉवर उभारून त्यावर चार दिशांना चार मायक्रोफोन लावण्यात आले. त्यावरून वेगवेगळे हाकारे ध्वनिमुद्रित करून त्यांचा अभ्यास केला गेला. हत्तींचे कळप पाण्याचा शोध घेत होते, तेव्हा एका कळपाला पाण्याचा शोध लागल्यावर लांब असलेल्या हत्तींना हाकाऱ्याच्या माध्यमातून तो संदेश पोचवला गेला, असं त्यात लक्षात आलं. हा संदेश मिळाल्यावर इतर कळपही त्या ठिकाणी जाऊ लागले.
आवाज काढून बोलण्यात हत्तींपेक्षा हत्तिणी जास्त पुढे असतात. हत्ती क्वचित प्रसंगी हाकाऱ्यांचा वापर करतो. अन्यथा तो आपला पाय जमिनीवर विशिष्ट जोरानं आपटून ती कंपनं बरीच लांब असलेल्या दुसऱ्या हत्तींपर्यंत पोचवतो. अगदी गरज पडली, तरच तो हाकाऱ्यांचा उपयोग करतो. म्हणून नेहमी मी विनोदानं म्हणतो, हत्ती असो वा माणूस, बायकाच जास्त बोलतात. यापुढे जाऊन स्पर्शाचा संवाद हत्तिणींमध्ये चालतो तोही फार गोड असतो. मीन्ना आणि अम्मू या दोन हत्तिणींनी आठवडाभरापेक्षा जास्त काळ एकमेकींना बघितलं नव्हतं. त्या अगदी जिवलग मैत्रिणी होत्या. त्या पाण्यापाशी जवळ आल्या तेव्हा मीन्नानं ज्या प्रेमानं अम्मूचे गाल गोंजारले, त्यावरून दोघींचं प्रेम सहज लक्षात आलं. अतिशय मूक पण प्रचंड बोलका असा तो गोड संवाद होता.
माणसानं प्रचंड प्रगती केली, विपुल संशोधन केलं आणि संवाद साधण्यासाठी भरपूर साधनं निर्माण केली. तरीही दोन देशांमध्ये, दोन राज्यांमध्ये, अगदी शेजाऱ्यांमध्ये किंवा एका कुटुंबामध्ये तरी सुसंवाद असतो का, हा प्रश्न आपणच आपल्याला विचाण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच आपल्याला ठरवून दिलेलं काम प्रामाणिकपणे करत, निसर्गात राहून अगदी स्वत:च्या आणि इतरांच्याही कळपाशी गोड सुसंवाद साधणारे माझे हत्ती मात्र मला गोडच वाटतात.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link