Next
खिळवून ठेवणारा ‘फेडोरा’
मिलिंद कोकजे
Friday, September 06 | 04:00 PM
15 0 0
Share this story


चित्रपटात चित्रपटाचाच किंवा चित्रपट तारेतारकांचा विषय क्वचितच असतो. फेडोरा अशा चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटतारकांचे आयुष्य फार कठीण असते. आपली प्रतिमा जपण्याकरता त्यांना काय काय करावे लागते. विशेषतः जेव्हा त्यांचे वय चेहऱ्यावर दिसू लागते, त्यांच्या करिअरचा सूर्य मावळू लागतो, आजूबाजूची फॅन्सची गर्दी ओसरू लागते, नवी पिढी नव्या तारकांच्या मागे धावू लागते तेव्हा नव्या एकाकी आयुष्याशी जुळवून घेणे कठीण होत जाते.
यातील काहीही न घडूनही फेडोरा ही अचानक निवृत्ती घेऊन, कोर्फ्यूजवळच्या एका छोट्या खासगी बेटावर जगापासून दूर एकांतात आयुष्य घालवणारी हॉलिवूडची अतिशय सुंदर अभिनेत्री रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या करते. ती अतिशय सुंदर असते आणि वाढत्या वयाचा तिच्या चेहऱ्यावर काहीही परिणाम झालेला नसतो. तिच्या पहिल्या चित्रपटात ती जितकी सुंदर व तरुण दिसते तितकीच सुंदर व तरुण ती तिच्या शेवटच्या चित्रपटातही दिसते. निवृत्ती घेतल्यावर ती कधीच लोकांसोर येत नाही. करिअरमध्ये टॉपला असताना ती निवृत्ती का घेते व चित्रपटाच्या झगमगत्या जगापासून पूर्णपणे दूर का जाते याचे अनेकांना कुतूहल असते. चित्रपटात हे रहस्य उघड होत जाते. चित्रपट फ्लॅशबॅक पद्धतीने उलगडत जातो.
तिला श्रद्धांजली वाहण्याकरता बॅरी डच डेटवेलर हा एक जुना चित्रपटनिर्माता येतो. तो फेडोराचा एकेकाळचा प्रियकर असतो. त्याला काही वेगळीच शंका असते. आठच दिवसांपूर्वी तो फेडोराने निवृत्ती सोडावी व अॅना कॅरनिन या त्याच्या नव्या चित्रपटात काम करावे म्हणून तिला विनंती करायला आलेला असतो. त्यावेळी त्याला तिला भेटूही दिले जात नाही. अखेर रात्री फेडोरा चोरून त्याला भेटायला येते. ती त्याला सांगते की पोलिस काऊंटेस सोब्रॅन्स्की, तिची एकनिष्ठ नोकर बोलफोर, ड्रायव्हर क्रिटोस व त्यांचा डॉक्टर वेंडो या सगळ्यांनी मिळून तिला बंदिवासात ठेवलेले आहे व ते तिला कुठेही जाऊ देत नाहीत, कोणालाही भेटू देत नाहीत. तो तिला पळून जायला मदत करतो पण तोपर्यंत क्रिटोस त्यांच्यापर्यंत पोचतो व बॅरीवर हल्ला करून त्याला बेशुद्ध करतो. आठवड्यानंतर बॅरी शुद्धीवर येतो तेव्हा त्याला फेडोराच्या आत्महत्येविषयी कळते. त्याच्या मनात काही संशय असतात. काऊंटेसने तिचा खून केला असावा असे त्याला वाटत असते. दुसरी एक गोष्ट त्याला नीट कळत नाही. तो जेव्हा फेडोराशी त्यांच्या जुन्या प्रेमप्रकरणाविषयी बोलतो तेव्हा तिला त्यातले काहीच आठवत नसते. तिला श्रद्धांजली वाहायला आल्यावर तो काऊंटेसशी बोलू लागतो. तिच्या बोलण्यातून सर्व रहस्य हळूहळू  उलगडू लागते.
आपल्या वाढत्या वयाची व त्याचा चेहऱ्यावर होणाऱ्या परिणामाची चिंता वाटत असल्याने फेडोरा आपण तरुणच दिसत राहावे म्हणून डॉ. वेंडोकडून आपल्या चेहऱ्यावर कॉस्मेटिक सर्जरी करवून घेते. परंतु ती शस्त्रक्रिया फसते व तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या येतात व तिचे सौंदर्य लोप पावते. त्यामुळे फेडोरा निवृत्ती स्वीकारून अज्ञातवासात जाते व त्या बेटावर राहू लागते. कोणीही तिला बघणार नाही याची काळजी ती घेते. परंतु शेवटी एक अडचण येते. तिला लाईफटाइम अचीव्हमेंट ऑस्कर पुरस्कार देण्याचे जाहीर केले जाते. तो स्वीकारायलाही ती ऑस्कर समारंभाला जात नाही. तेव्हा ऑस्कर कमिटी हेन्री फोंडा या प्रसिद्ध अभिनेत्याला ते ऑस्कर तिला देण्याकरता पाठवणार असल्याचे जाहीर करते. आता तिची पंचाईत होते. फोर्डला सामोरे कसे जायचे या चिंतेत ती असताना तिला समोर उभी असलेली आपला मुलगी अँटोनियो दिसते. ती अगदी फेडोरासारखी दिसत असते. फेडोरा तिलाच फेडोरा म्हणून उभी करायचे ठरवते व स्वतःला पोलिश काऊंटेस सोब्रॅन्स्की असे नाव घेते. फोंडा तिला ऑस्कर देतो व नंतर वृत्तपत्रांना प्रतिक्रिया देतो, ती जितकी सुंदर होती तितकीच सुंदर ती आजही आहे. या सगळ्यातून फेडोराला कल्पना सुचते की परत एकदा तिच्या मुलीच्या रूपाने ती स्टार होऊ शकते. ती अँटोनियाला फेडोरा म्हणून चित्रपटात काम करायला पाठवते व परत एकदा फेडोरा स्टार होते.
फेडोराच्या रूपातील अँटोनिया मायकेल यॉर्क या तरुण अभिनेत्याच्या प्रेमात पडते आणि मग सगळे बिघडायला सुरुवात होते. अँटोनियाला मायकेलला सगळे सांगायचे असते पण फेडोरा तिला विरोध करते. ती आपल्या हातात राहणार नाही हे लक्षात आल्यावर फेडोरा तिला बंदिवासात ठेवते व परत एकदा फेडोरा चित्रपटसंन्यास घेऊन लोकांपासून दूर एकांतवासात गेल्याची बातमी पसरवते. आपण फेडोराच्या प्रतिमेत अडकवले गेलो आहोत व आपली आई तिची जुनी प्रतिमा कायम राखण्याकरता त्यातून आपल्याल सुटू देणार नाही हे लक्षात आल्यावर अँटोनिया ड्रग्ज घेऊ लागते. त्यामुळे तिचे सौंदर्य संपते आणि ती वेडसर होते. बॅरीच्या मदतीने पळून जायचा प्रयत्न फसल्यावर ती कंटाळून आत्महत्या करते. खरी फेडोरा काऊंटेसच्या रूपात आपल्या समोर आहे व आत्महत्या केली ती जबरदस्तीने फेडोरा बनवण्यात आलेल्या तिच्या मुलीने, अँटोनायाने हे कळल्यावर बॅरीला धक्का बसतो आणि हे सर्व वर्तमानपत्रांना सांगावे असे त्याला वाटू लागते. मात्र अजूनही त्याला फेडोराबद्दल प्रेम वाटत असते आणि मुलीच्या मृत्यूने व स्वतःचे करिअर संपल्याने तिला आधीच शिक्षा मिळालेली आहे असे समजून तो काहीच करत नाही. वयस्क फेडोराचा निराप घेऊन तो निघतो आणि सहा महिन्यांनी काऊंटेस सोब्रॅन्स्कीच्या मृत्यूची बातमी त्याला वाचायला मिळते.


खून झाला आहे आणि कातिल कौन या प्रकारचा हा रहस्यपट नाही. अतिशय वेगळ्या प्रकारचा रहस्यपट म्हणून फेडोराचा उल्लेख करता येईल. तो रहस्यपट असला तरी त्यातील रहस्य काय असू शकेल हेही प्रेक्षकांना लगेचच लक्षात येऊ शकते. गंमत ही आहे की तरीही चित्रपट शेवटपर्यंत पकडून ठेवतो हे दिग्दर्शक बिली वायल्डरचे कौशल्य आहे. रहस्य व त्यातही फ्लॅश बॅकचे तंत्र म्हटल्यावर  अतिशय खुबीने पटकथा तयार करावी लागते. पटकथेचा प्रवाह कसा ठेवायचा, कुठे फ्लॅशबॅकमध्ये जायचे, कुठे आजच्या काळात परत यायचे याची रचना नीट केली तरच कथेतील रस टिकून राहू शकतो. अशा पटकथेचे योगदानही या चित्रपटाच्या यशात मोठे आहे.
मार्था केलरने फेडोरा आणि अँटोनिया अशा दोन भूमिका केल्या आहेत. अर्थात या दोन व्यक्तिरेखांमध्ये फारसा काही फरक नाही. परंतु अँटोनिया प्रेमात पडल्यावर बदलते आणि तिला तिच्या मूळ रूपात परत जावेसे वाटू लागते तो बदल मार्थाने चांगला दाखवला आहे. चेहऱ्यावर सुरकुत्या आल्याचे लक्षात आल्यावर बसलेला धक्काही तिने चांगल्या प्रकारे उभा केला आहे. हाईलगार्ड क्नेफने काऊंटेस सोब्रान्स्कीचा कणखरपणा तिघांच्या मदतीने अँटोनियावर बसवलेला वचक चांगला उभा केला आहे. विल्यम होल्डीनने बॅरी उभा केला आहे. एक वेगळ्या प्रकारचा चित्रपट, प्रसंगी जुन्या हॉलिवूडची आठवण करून देणारा म्हणून तो जरूर बघावा. n

फेडोरा     -    १९७८
निर्माता, दिग्दर्शक    -    बिली वायल्डर
पटकथा     -    बिली वायल्डर, आय ए एल डायमंड
कथा    -    टॉम ट्रायनच्या कादंबरीवर आधारीत
कलाकार    -    विल्यम होल्डीन, मार्था केलर, हाईलगार्ड क्नेफ

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link