Next
ब्रिटिश नौदलाचे ‘शाही’ रूप
समीर कर्वे
Friday, September 06 | 04:00 AM
15 0 0
Share this storyआरमारशक्तीच्या जोरावर ब्रिटनने जगभर कित्येक मैल दूरदूरपर्यंत वसाहती निर्माण केल्या, परराष्ट्रांवर राज्य केले. व्यापारही केला. दोन्ही महायुद्धांमध्ये इंग्लंडचे शाही नौदल ही मोठी आरमारशक्ती होती. साहजिकच शतकानुशतके इंग्लंडमध्ये अनेक प्रकारच्या युद्धनौका बांधण्यात आल्या. आज जगभर विमानवाहू युद्धनौका ही राष्ट्राची आरमारी शक्ती ओळखण्याचे महत्त्वाचे प्रतीक ठरते, त्या आजच्या स्वरूपातील विमानवाहू युद्धनौकांची सुरुवातही ब्रिटिश शाही नौदलापासूनच झाली. आज ब्रिटिश शाही नौदलातील आघाडीची आणि आजवरची सर्वात मोठी विमानवाहू युद्धनौका आहे, एचएमएस म्हणजेच हर मॅजेस्टीज शिप क्वीन एलिझाबेथ. ब्रिटिश रॉयल नेव्ही म्हणजेच ब्रिटिश शाही नौदल असे आजही या नौदलास म्हटले जाते आणि सर्व युद्धनौका या राणीच्या सेवेत हर मॅजेस्टीज शिप म्हणून कार्यरत असतात.
क्वीन एलिझाबेथ ही युद्धनौका तशी अगदी नवीकोरीच आणि तिचे कमिशनिंग ७ डिसेंबर २०१७ रोजी झाले असले, तरी समुद्री चाचण्यांसह ती पूर्णपणे कार्यान्वित होण्यास पुढचे वर्ष उजाडेल. त्यामुळेच तिची अद्याप भारतास भेट झालेली नाही. क्वीन एलिझाबेथ विमानवाहू युद्धनौकेची माहिती घेण्यापूर्वी ब्रिटिश शाही नौदलातील विमानवाहू युद्धनौकांच्या परंपरेविषयी थोडेसे.
युद्धनौकेचा पूर्ण डेक विमानउड्डाणासाठी किंवा फ्लाइटडेक म्हणून वापरण्याची परंपरा ब्रिटिश नौदलातील एचएमएस आर्गस या पहिल्या महायुद्धाच्या काळात बांधल्या गेलेल्या विमानवाहू युद्धनौकेपासून सुरू झाली. आज विमानवाहू युद्धनौका म्हटल्यावर तेच आरेखन सर्वत्र वापरले जात आहे. या प्रकारातील पहिली विमानवाहू युद्धनौका साडेचौदा हजार टनांची होती व तिची लांबी ५६५ फूट, तर सर्वाधिक रुंदी ६८ फूट होती. १९१८ ते १९४४ या काळात तिने शाही नौदलासाठी सेवा दिली, म्हणजेच दोन्ही महायुद्धे तिने पाहिली. या नौकेच्या फ्लाइटडेक हा सलग पृष्ठभागाचा होता व नौकेचे सारथ्य करण्याचे चक्रधरदालन (ब्रिज) हा त्याखाली होते. नौकेवरून १८ विमाने नेण्याची सोय होती. त्यानंतरच्या काळात विमानवाहू युद्धनौकांचे तंत्रज्ञान प्रगत होत गेले, तसतसे या क्षमतेत वाढ होत गेली. भारतीय नौदलाची विमानवाहू युद्धनौकांची परंपराही ब्रिटिश शाही नौदलाकडील नौकांपासूनच सुरू झाली. बांगलादेश मुक्तिसंग्रामात कामगिरी बजावलेली आयएनएस विक्रांत ही भारतीय नौदलातील पहिली विमानवाहू युद्धनौका म्हणजे पूर्वाश्रमीची एचएमएस हर्क्युलिस. १९४३ साली तिची बांधणी सुरू झाली, परंतु ती ब्रिटिश शाही नौदलात रीतसर कमिशन झाली नाही. त्यापूर्वीच १९५७ मध्ये ती भारतास विकण्यात आली व १९६१ मध्ये भारतीय नौदलात आयएनएस विक्रांत म्हणून रुजू झाली. भारतीय नौदलातून अलीकडेच निवृत्त झालेली आयएनएस विराट ही पूर्वाश्रमीची एचएमएस हर्मिस. २७ वर्षे ब्रिटिश शाही नौदलात व ३० वर्षे भारतीय नौदलात सेवा बजावलेली आयएनएस विराट ही जगभरात सर्वाधिक काळ कार्यरत विमानवाहू युद्धनौका ठरली. ब्रिटिश नौदलात आजवर १६ विविध श्रेणींच्या विमानवाहू नौका होऊन गेल्या. प्रत्येक श्रेणीतील संख्या वेगवेगळी होती.
नौका पुन्हा त्याच नावाने जन्म घेते, ही संकल्पना ब्रिटिश नौदलातही आहे. क्वीन एलिझाबेथ नावाची यापूर्वीची नौका पहिल्या एलिझाबेथ राणीच्या नावाने बांधण्यात आली होती व ती कोळशाऐवजी तेलरूपातील इंधनावर चालवल्या गेलेल्या पहिल्या युद्धनौकांपैकी होती. आता त्याच नावाने पहिल्या एलिझाबेथ राणीच्या नावेच ब्रिटिश नौदलातील आजवरची सर्वात मोठी विमानवाहू युद्धनौका बांधण्याचे काम २००९ मध्ये सुरू झाले व २०१४ साली तिचे जलावतरण झाले. २०१७ साली तिचे कमिशनिंग झाले. एकूणच हा सर्व कालावधी विदेशी युद्धनौकाबांधणीचा वेग पाहता कमालीचा मंदगती आहे. याच श्रेणीमध्ये एचएमएस क्वीन एलिझाबेथ आणि एचएमएस प्रिन्स ऑफ वेल्स अशा दोन विमानवाहू युद्धनौकांची बांधणी पोर्ट्समाऊथ बंदरात सुरू झाली. या प्रकल्पासाठी ६ अब्ज पौंड इतका अवाढव्य खर्च आला असल्याने ब्रिटनच्या सध्याच्या नाजूक आर्थिक स्थितीत विमानवाहू युद्धनौकाबांधणी हा तसा चिंतेचाच विषय ठरला आहे.
एचएमएस क्वीन एलिझाबेथ श्रेणीतील विमानवाहू युद्धनौका ६५ हजार टनांच्या आहेत. तिची लांबी ९२० फूट तर सर्वाधिक रुंदी २४० फूट आहे. एकदा इंधन भरल्यानंतर ती १० हजार सागरी मैल अंतर जाऊ शकते. तिच्यावर एकावेळी ४५ दिवसांच्या अन्नपाण्याची रसद साठवलेली असते. या युद्धनौकेवरील ७०० नौसैनिकांना ९० मिनिटांत तयार जेवण मिळण्याची सुविधा तेथे आहे. सैन्य पोटावर चालते, त्यामुळे ही रसद गरजेचीच असते. ताशी २५ सागरी मैल वेगाने ही अंतर कापू शकते. नौकेवर पाच व्यायामशाळा, एक चर्च, वैद्यकीय उपचारकेंद्र आहे. अर्थात या सर्वांबरोबरच नौकेची सर्वात मोठी शक्ती सामावली आहे ती तिच्यावरील लढाऊ विमानांमध्ये.
क्वीन एलिझाबेथवर एफ ३५ –लाइटनिंग २  ही अमेरिकन लॉकहिड मार्टिन कंपनीची लढाऊ विमाने आहेत. नावातील लाइटनिंगप्रमाणेच विजेच्या वेगाने ती आकाशात घोंघावतात. त्यांचा वेग ताशी १२०० मैल इतका आहे. त्याचबरोबर मेर्लिन क्रोजनेस्ट, अपॅचे, चिनूक हेलिकॉप्टरही नौकेवर तैनात असतात. एकूण ७० विमाने-हेलिकॉप्टर ती घेऊन जाऊ शकते. ती डिझेल-गॅसटर्बाइनवर चालते. विमानांचे उड्डाण व लँडिंग करण्यासाठी तिच्यावर पारंपरिक योजनाच आहे. शॉर्ट टेकऑफ अँड व्हर्टिकल लँडिंग असे त्यांचे स्वरूप आहे. फ्लाइटडेकवर उजव्या बाजूस दोन स्वतंत्र मनोरे आहेत. पुढच्या मनोऱ्याचे चक्रधरदालन (नौकेच्या सारथ्याचा ब्रिज) आहे, तर दुसरा मनोरा उड्डाण परिचालन, दिशादर्शनासाठी आहे. अमेरिकन सुपरपॉवरच्या बरोबरीने वाटचाल करण्यासाठी अजून तरी ब्रिटिश शाही नौदलाला विमानवाहू युद्धनौका या तितक्याच महत्त्वाच्या वाटतात.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link