Next
एकांकिकांचे युथफुल विश्व
गणेश आचवल
Friday, October 04 | 03:30 PM
15 0 0
Share this story
‘नाटक’ हा प्रत्येक मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि अनेक नाट्यवेड्या तरुणांसाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारी चळवळ म्हणजे दरवर्षी विविध संस्थांतर्फे आयोजित केली जाणाऱ्या विविध एकांकिकास्पर्धा. या एकांकिकास्पर्धांत नवीन काय द्यायचं यासाठी हा तरुणवर्ग खूप मेहनत करत असतो. कारण यातूनच अनेक युवक-युवतींना करिअरचं नवीन दालन खुलं होणार असतं.
सर्व मराठी एकांकिकास्पर्धांत ‘आयएनटी’ एकांकिकास्पर्धा ही अतिशय महत्त्वाची मानली जाते . दरवर्षी नवीन संहिता असली पाहिजे, हा या स्पर्धेचा एक महत्त्वाचा नियम. त्यामुळे या स्पर्धेचं वेगळेपण टिकून राहातं.  यंदाचं वर्ष हे आयएनटी स्पर्धेचं ४७ वं वर्ष आहे. याबद्दल बोलताना ‘आयएनटी’चं आयोजक रामचंद्र वरक म्हणाले “ कॉलेजतरुणांचा प्रचंड उत्साह सर्वांना आयएनटीमध्ये अनुभवता येतो. दरवर्षी नवीन संहितेच्या नियमामुळे खूप नवीन विषय दरवर्षी पुढे येतात. गेल्या काही वर्षांचा आढावा घेतला तर लक्षात येईल की सध्या चालू असलेल्या घडामोडींवरदेखील लेखक या एकांकिकांतून भाष्य करतात. तसंच गेली काही वर्षं आम्ही या स्पर्धेचं स्वरूप बदललं आहे. प्रथम परीक्षक आणि एकांकिकेचे लेखक, दिग्दर्शक यांची चर्चा होते, हा पहिला टप्पा.  लेखक, दिग्दर्शकांना मिळालेल्या सूचनांनुसार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.  पुढील फेरीसाठी तालीमस्वरूपात एकांकिका सादर होते आणि त्यानंतर अंतिम फेरीसाठी दहा एकांकिका निवडल्या जातात. त्यांचं सादरीकरण दोन दिवस असतं. त्यातून सर्वोत्कृष्ट एकांकिकांची निवड होते. तालीमस्वरूपातील एकांकिका आणि अंतिम फेरी यातही साधारण एक आठवडा अवधी असल्यानं विद्यार्थ्यांना आपलं सादरीकरण उत्तम पद्धतीनं करायला योग्य वेळ आणि वाव मिळतो.
सध्या ही स्पर्धा अधिक प्रगल्भ होत असल्याचं जाणवत आहे . महाराष्ट्रभर सादर होणाऱ्या एकांकिकांचा विचार केला तर मुंबईची जशी आयएनटी, तशी पुण्याची पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा. मुंबईत सादर होणाऱ्या उत्तुंग एकांकिकास्पर्धा ,उंबरठा एकांकिकास्पर्धा, मृणालताई करंडक स्पर्धा, अटल करंडक स्पर्धा, विघ्नहर्ता एकांकिकास्पर्धा अशा कित्येक एकांकिकास्पर्धांचा उल्लेख करावाच लागेल. ‘कल्पना एक आविष्कार अनेक ‘ हीसुद्धा

पान २३ वरून     आणखी एक एकांकिकास्पर्धा. ‘चतुरंग‘ प्रतिष्ठान आयोजित ‘सवाई एकांकिकास्पर्धा’ ही तर अत्यंत मानाची स्पर्धा. यातील काही एकांकिका स्पर्धा या खुल्या गटांसाठीही असतात. महाराष्ट्रात दरवर्षी ज्या एकांकिका विविध स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळवतात,त्याच एकांकिका या ‘सवाई’ एकांकिकेच्या प्राथमिक फेरीत सादर होतात. ‘चतुरंग’चे कार्यकर्ते विनायक काळे म्हणाले,‘सवाई एकांकिकास्पर्धेला ३२ वर्षं पूर्ण झाली आहेत. दरवर्षी २५ जानेवारीला रात्रभर रंगणारी ही स्पर्धा हे या स्पर्धेचं वेगळेपण म्हणता येईल. प्राथमिक फेरीतसुद्धा दरवर्षी २० पेक्षा जास्त एकांकिका सादर होतात आणि त्यातून सात एकांकिका अंतिम फेरीसाठी निवडल्या जातात. यावरून तुम्हाला एकांकिका ही चळवळ किती मोठी आहे, याचा अंदाज येईल. ‘आयएनटी’नं आतापर्यंत अनेक कलावंत रंगभूमी आणि मालिका, चित्रपट यांना दिले आहेत. तुम्हाला ‘आयएनटी’मध्ये सादर झालेली ‘मंजुळा ‘ ही एकांकिका आठवत असेल. त्यात मध्यवर्ती भूमिकेत असणारी अदिती सारंगधर ही सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराची विजेती होती. अदिती सारंगधर म्हणाली, “माझ्या जीवनात ‘आयएनटी’चं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण या स्पर्धेमुळे आपण अभिनय करू शकतो, हे मला समजलं. आपल्यातील कलागुणांचा शोध या स्पर्धेमुळे घेता येतो.  याआधी मी या क्षेत्राचा करिअर म्हणून कधीच विचार केला नव्हता. ‘आयएनटी’मध्ये बक्षीस मिळाल्यावर  ‘मंजुळा’ साठी मला अनेक ठिकाणी अनेक पुरस्कार मिळाले आणि मला आठवतंय की ‘सवाई’मध्ये जेव्हा ही एकांकिका सादर झाली, तेव्हा ती पाहायला निर्माते शशांक सोळंकी आले होते आणि त्यांनी मला ‘वादळवाट’ची ऑडिशन द्यायला सांगितली. त्यानंतर मला ‘झी मराठी’ची ‘वादळवाट’ ही मालिका मिळाली.” ‘आयएनटी’सारख्या स्पर्धांतून अभिनेता आणि अभिनेत्री यांच्याप्रमाणे अनेक लेखक, दिग्दर्शक, प्रकाशयोजनाकार, नेपथ्यकार हेदेखील पुढे येतात. अनेक एकांकिकांची दोन अंकी नाटकं व्यावसायिक रंगभूमीवर येतात . ‘गमभन’, ‘अनन्या ‘ या एकांकिकांची दोन अंकी नाटकं रंगभूमीवर आली. सिडनेहॅम महाविद्यालयानं ‘शामची आई’ आणि ‘निर्वासित’ या दोन एकांकिका सलग दोन वर्षं ‘आयएनटी’मध्ये सादर केल्या. या दोन्ही वर्षी सर्वोत्कृष्ट लेखक ठरला होता स्वप्निल जाधव. या अनुभवाबद्दल स्वप्निल सांगतो, “युथ फेस्टिवल, आयएनटी, उत्तुंग, सवाई अशा सर्व एकांकिकास्पर्धा आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. माझ्या घरातील कोणीच या क्षेत्रात नाही. त्यामुळे माझ्यातील लेखनकौशल्य लोकांसमोर यावं यासाठी मी खूप मेहनत घेत होतो. ‘आयएनटी’मध्ये बक्षीस मिळवणं हे माझे स्वप्न होतं. ते स्वप्न पूर्ण झालं आणि मग ‘शामची आई’ ही  माझी एकांकिका दोन अंकी नाट्यस्वरूपात व्यावसायिक रंगभूमीवर आली. माझ्यासारखे अनेक विद्यार्थी असतील की त्यांच्या घरातील कोणीच अभिनयाच्या किंवा प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रात नसेल. आम्हाला आमचे गुण सिद्ध करण्याची संधी या स्पर्धा देत असतात. त्यामुळे हे ऋण कधीच न फिटणारं आहे.”
थोडक्यात, या स्पर्धांची प्रत्येक जण पंढरीच्या वारीप्रमाणे वाट पाहत असतो, म्हणून तर नाट्यरसिकांची पंढरी असेसुद्धा या स्पर्धांना म्हटलं जातं आणि या पंढरीचा वारकरी असतो, नाटकांवर जिवापाड प्रेम करणारा प्रेक्षक, हे नक्की.
नवीन पायंडा
‘आयएनटी’ अंतिम फेरी (३ व ४ ऑक्टोबर) मोठ्या उत्साहात पार पडली. गेली काही वर्षे  ‘आयएनटी’च्या परीक्षकांमध्येही एक बदल झाला आहे. तो म्हणजे जे कलाकार रंगभूमीवर या स्पर्धांतून आले आहेत,ज्यांना या एकांकिकास्पर्धांतून यश मिळालं आहे,त्यातील काहीजण परीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळतात. त्यामुळे युवकांची नेमकी मानसिकता त्यांना माहीत असते. सध्या नेमकं काय सुरू आहे या दृष्टिकोनातूनही त्यांना एकांकिकांचं परीक्षण करता येतं.


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link