Next
ध्यान चांगले होण्यासाठी...
स्वामी मकरंदनाथ
Friday, September 21 | 03:30 PM
15 0 0
Share this story

आजच्या धकाधकीच्या जीवनात मन स्थिर, शांत राहण्यासाठी ध्यानाची अत्यंत आवश्यकता आहे. ध्यान ही अवघड गोष्ट नाही तशी सोपीही गोष्ट नाही. कधी कधी ध्यान चांगले लागते, तर कधी विचारांमध्ये मन गुंतून गेले, तर ध्यान अजिबात लागत नाही, पण अभ्यासाने ध्यान जमू लागते हेही खरे आहे. ध्यान चांगले लागणे म्हणजे काय, ध्यान चांगले लागत नाही म्हणजे तरी काय, हे प्रथम पाहिले पाहिजे. ध्यान चांगले लागणे म्हणजे विचार कमी येणे किंवा आले तरी त्यांच्याकडे साक्षित्वाने किंवा अलिप्ततेने पाहिल्यामुळे त्या विचारांबरोबर वाहवत न जाणे. एखद्या दिवशी असे ध्यान सहज जमते. ध्यानाला बसल्यानंतर विचार कमी होतात, निस्तरंगता प्राप्त होते. कधी कधी मात्र काही केल्या विचार थांबत नाहीत. एकापाठोपाठ एक विचारांची मालिकाच मनामध्ये चालू राहते आणि आपण म्हणजेच ध्याता, विचारांच्या बरोबर फिरतच राहतो. ध्यानाच्या शेवटी लक्षात येते, की आपण ध्यान करायला बसलो आहोत, पण विचार थांबलेच नाहीत. ध्यान उत्तम साधण्यासाठी आपल्या चित्तात प्रथम ध्यानाला अनुकूल भाव निर्माण व्हावा. त्यासाठी मनोमन परमेश्वराला, सद्गुरूंना प्रेमादराने नमस्कार करावा. प्रार्थना करावी. आपले चित्त त्या प्रार्थनेमध्ये एकाग्र करावे. परमेश्वराची अथवा सद्गुरूंची मूर्ती डोळ्यांसमोर आणावी, त्यायोगाने आपले मन प्रसन्न होते.
स्वामी स्वरूपानंद म्हणतात,

साधुसंतांचे होता स्मरण।
घेता तयांचे मनोमय दर्शन।
लाभता तयांचे सन्निधान।
सहजे मन प्रसन्न होय।।

ध्यानाला बसण्याआधी मनापासून सद्गुरूंचे, पूर्वसुरींचे स्मरण, प्रार्थना करावी. रोज ध्यानाला बसत असल्याने कधीकधी या गोष्टी यंत्रवत होण्याची शक्यता असते. प्रार्थनेचे श्लोक म्हणून कधी संपले, सोऽहंचे श्वास कधी घेतले, हे कळतदेखील नाही. मन तर फिरतच राहते. असे होऊ नये, यासाठी सावध असावे. सद्गुरू माझ्याबरोबर ध्यानाला बसलेले आहेत, ते मला आशीर्वाद देत आहेत, त्यांच्या कृपेने माझे ध्यान चांगले होणार आहे असा भाव ठेवावा. मुख्यत: कोणत्याही विचारांचा पाठलाग न करणे हे अगदी सावधानतेने सांभाळावे, म्हणजे ध्यान उत्तम होण्यासाठी त्याची मदत होते. त्याचबरोबर आपण लक्षात घ्यावे, की मनाचेही एक तंत्र आहे, त्यामुळे कधी ध्यान चांगले होईल, कधी होणार नाही. जेव्हा चांगले ध्यान झाले नसेल तेव्हा निराश होऊ नये. आपण प्रयत्न करतोच आहोत. स्वामी माधवनाथ म्हणत, ‘एखादा दगड १००व्या घावाला फुटला तरी आधीचे ९९ घाव वाया गेले असे नसून ९९ घावांच्या प्रयत्नांमुळेच तो दगड १०० व्या घावाला फुटतो.’ रोजच्या रोज ध्यान चांगले होण्यासाठी आपण प्रयत्न अवश्य करावेत. असे लक्षात घ्यावे, की सातत्य आणि पुरेसा वेळ दिल्यास ध्यान उत्तम होते. ध्यान कसेही झाले तरी उठताना पुन्हा एकदा मन एकत्र करून, एक-दोन सोऽहंचे दीर्घ श्वास घेऊन ‘मी तोच आहे’ अशा प्रसन्न, शांत भावाने उठावे. प्रसन्न मनाने ध्यानाला बसावे आणि प्रसन्नतेनेच ध्यानातून उठावे. तसेच ध्यानाच्या वेळी पराभूत मनोवृत्ती नको. याचा अर्थ ध्यान अवघड आहे, मला ते जमणार नाही, असा भाव ठेवू नये. आपण परमात्मस्वरूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करत आहोत, ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. म्हणून ध्यानाला बसताना आणि ध्यानातून उठताना सद्गुरूंची आपल्यावर पूर्ण कृपा आहे, असा भाव ठेवावा. या भावासहित, निश्चयपूर्वक, नित्यनेमाने ध्यानाचा अभ्यास करावा; त्यामुळे थोड्या वेळातही, ध्यानात रंगून जाण्याचा अनुभव साधकाला आल्याखेरीज राहणार नाही.
(पावसच्या स्वामी स्वरूपानंदांचे 
शिष्य स्वामी माधवनाथ 
यांचा वारसा पुढे चालवणारे स्वामी मकरंदनाथ यांचे
खास तरुणांसाठी सदर)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link