Next
अपूर्व जिद्द
शोभा नाखरे
Friday, December 07 | 04:00 PM
15 0 0
Share this story

त्या दिवशी, गुगलवरून शोधलेल्या नवऱ्या मुलाच्या आईबरोबर भेट ठरली होती. घराजवळच्या एका बागेत अपूर्वा आणि तिची आई अशा दोघी आल्या होत्या. अपूर्वाला अतितीव्र श्रवणऱ्हास आहे, पण ती छान बोलते याची कल्पना दिलेली होती. ठरल्याप्रमाणे मुलाची आई आली होती. मुलाचा मात्र पत्ता नव्हता. कर्णबधिरत्व आणि त्याअनुषंगानं येणाऱ्या गोष्टी याची त्यांना कल्पना होती. भेटल्यावर जुजबी बोलणं झाल्यावर, ती माऊली अपूर्वाला म्हणाली, “अगं अपूर्वा, बागेच्या त्या कोपऱ्यात जा व तिथून मला फोन कर आणि बोल. माझ्या प्रश्नांची उत्तरं दे.”

“अहो, अपूर्वा फोनवरचं बोलणं ऐकू शकत नाही. त्यामुळे तुम्ही फोनवर प्रश्न विचारलात तर उत्तर कसं देणार?” तिची आई स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न करू लागली. मात्र अशी आपली परीक्षा घेतलेली पाहून अपूर्वा उठलीच, ‘चल आपण घरी जाऊ.’ मायलेकी घरी आल्या.

नितीन व अतुला कुळकर्णी या सी.ए. दाम्पत्याची अपूर्वा ही एकुलती एक मुलगी. दोन्ही कुटुंबांत कर्णबधिरत्व नाही. याबाबतची माहितीदेखील नाही. लहान असतानाच ती आवाजाला प्रतिसाद देत नाही, हाक मारल्यावर बघत नाही या गोष्टी लक्षात आल्या. तिला विशेष शाळेत घातलं. श्रवणयंत्र लावून ऐकायची सवय केली गेली. आईने व्यवसायातून वेळ काढून शाळेत कसं शिकवतात याचं प्रशिक्षण घेतलं. घरी त्याचा अवलंब करून सतत अपूर्वाशी सगळे बोलू लागले. बघता –बघता ती बोलायला लागली. गुबगुबीत गाल नि गुबगुबीत देह... शाळेतल्या ताई  तिला भोपळा म्हणत. स्थूलपणामुळे तिच्या बोलण्यावर परिणाम होऊ लागला. घेतलेला श्वास बोलताना पुरेनासा झाला. कोणी चिडवलं की अपूर्वाला भारी राग यायचा. डोळे मोठे –मोठे करून ती रागावायची. आईनं तिला नाचाच्या क्लासला घातलं. या मुलांना नेहमीच्या  शाळेत प्रवेश नाकारला  जातो.  एक-दोन ठिकाणी अशीच अडचण आली.  

अखेर, पुरेशी भाषावाढ असल्यानं चौथीत तिला घराजवळच्या ‘लोकमान्य  विद्यामंदिर’ शाळेत प्रवेश मिळाला. मोठी शाळा, खूप मुलं हे सारं तिनं सहज पेललं. तिचा बंडखोर स्वभाव खूपदा उपयोगी पडे. एकदा आईनं डब्यात कचोरी दिली होती. वर्गातल्या एका मुलानं पटकन पळवली. अपूर्वा झटकन मागे धावली नि आपली कचोरी मिळवली. शाळेतही फारशी काही अडचण न येता ७४% गुण मिळवून दहावी झाली.

सहसा भाषेच्या समस्येमुळे अशी मुलं काहीही वाचायची टाळाटाळ करतात. हिनं मात्र दरम्यान भरपूर वाचन केलं. याबरोबरच पाच वर्षांचा भरतनाट्यमचा कोर्स पूर्ण केला. क्लासच्या कार्यक्रमांत भाग घेतला. वडील रुपारेल महाविद्यालयात व्याख्याता. गुणांमुळे प्रवेशाला अडचण आली नाही. आई –वडील मार्गदर्शनाला होतेच. त्या पाच वर्षात  अभ्यास सांभाळून अपूर्वानं आईबाबांना खूप मदत केली. कॉलेज लाइफदेखील एन्जॉय केलं. द्वितीय श्रेणीत ती बीकॉम झाली.
पुढे वडिलांनी अपूर्वाकडे अनेक कामं सोपवली. इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये जाऊन रिटर्न फाईल करणे, बँकेची सर्व कामं इत्यादी जबाबदाऱ्या अपूर्वा पेलू लागली. पण ही सर्व वाटचाल इतकी सोपी होती का, या प्रश्नावर आई म्हणाली, “अजिबात नाही. मधल्या काळात अपूर्वा आळशी झाली होती. शाळेतून आल्यावर आजीसोबत टी.व्ही. पाहत राही. मग पैसे कमवायला किती कष्ट करावे लागतात, हे दाखवायला, ऑडिट  करायला सगळीकडे माझ्यासोबत चालत नेलं. मग मात्र तिला जबाबदारी कळू लागली. ”

“शाळेत असताना ती एकटी चावी उघडून घरी  यायची, जेवायची. एकदा घरातली कामवाली बाई, एका पुरुषाला सोबत घेऊन आली. लगेच तिनं ही गोष्ट मला सांगितली. पुढे नेटवरून हिनंच नवऱ्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. तिला तेलगू  भाषिक विशाल राव जोडीदार म्हणून मिळाला. विशालही कर्णबधिर आहे, पण तोही बोलतो. २००८ साली विशाखापट्टणमला लग्न झालं. राव कुटुंब सुशिक्षित, समजूतदार! त्यांचं कलकत्त्याला अमूलचं आउटलेट आहे. अपूर्वा सर्व जबाबदाऱ्या सांभाळून दुकानही सांभाळते. आता ती तिथे चांगली रुळली आहे. अपूर्वाला वैष्णवी नावाची पाच वर्षांची मुलगी आहे. अपूर्वा आता छान कार चालवते. दुकानाचे सारे हिशोब, बँकव्यवहार बघते. पोहणं, भरतकाम, पेंटिंग, विणकाम हेही तिला येत.

अपूर्वा आता विमानातून मुलीला घेऊन एकटी प्रवास करते. सध्या ती नवीन जबाबदारीच्या शोधात आहे. अतितीव्र श्रवणऱ्हास असूनही तिचा चढता आलेख नक्कीच मनात भरतो. तिच्या जिद्दीला व आईवडिलांच्या मेहनतीला सलाम!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link