Next
अलौकिक दृष्टीची दिव्या!
शोभा नाखरे
Friday, July 05 | 03:00 PM
15 0 0
Share this story

नेत्ररोगतज्ञ असलेल्या पित्याच्या पोटी दृष्टिहीन कन्यारत्न देऊन नियतीने मोठे आव्हान उभे केले; नि रविंद्र आणि सुजला या डॉक्टर दाम्पत्याने ते मोठ्या हिमतीने पेलले, त्याची  ही कहाणी! अंध व्यक्तींच्या जगातला अद्भुत चमत्कार असलेली गोड गळ्याची, लांबलचक केसांची, भारतातली पहिली अंध फिजिओथेरपिस्ट महिला– डॉ.दिव्या बिजूर!
 डोळ्यांचे डॉक्टर रविंद्र आणि भूलतज्ञ डॉ. सुजला बिजूर (M.D.) यांना दोन डॉक्टर कन्या. अदिती आणि दिव्या! दिव्या एक-दोन महिन्याची असताना सारखी डोळ्यात बोटं घालायची. तिचे डोळे स्थिर रहात नव्हते. म्हणून शंका आली आणि कंडक्शन डिफेक्ट असल्याने, ‘कोणत्याही उपचाराने दिसणार नाही’, असा वैद्यकीय निष्कर्ष निघाला. डोळे अत्यंत सुंदर, मेंदूही व्यवस्थित कार्यशील! पण नसाच काम करीत नसल्याने, कोणतीही शस्त्रक्रिया फायदेशीर ठरणार नव्हती. घरात आजी-आजोबा म्हणजे या मुलींचे आईजी नि बाप्पाजी! त्यांनी मायेच्या छत्रासोबत, शिस्त आणि संस्कारांचे बाळकडू पाजले.
 जवळच्या नर्सरीत पहिले धडे गिरवून मग दिव्याच्या पालकांनी NAB चे मार्गदर्शन घेतले. तिथल्या चौधरीसरांच्या सल्ल्यानुसार दिव्याला प्रत्येक जीवनानुभव दिला. तिची स्पर्श-संवेदना तेज असल्यामुळे भाज्या, फळे, धान्ये इ. स्पर्शाने दाखवले गेले. देवळातल्या घंटेपासून, बाजारापर्यंत अनेक अनुभव दिले. आईबाबा वैद्यकीय व्यवसायातल्या पार्ट्यांनादेखील दिव्याला नेत, ओळख करून देत; त्यामुळे सार्वजनिक जीवनात सहजतेने वावरायची सवय दिव्याला झाली.
एकात्म शिक्षणासाठी वसईलाच शाळेत जाऊ लागली. जिथे खूप सहकार्याचा हात मिळाला. पहिली ते चौथीत तिची तोंडी परीक्षा घेतली गेली. नंतर शिक्षक वर्गातल्या मुलांना विचारायचे,“ दिव्यासाठी पेपर कोण लिहिणार?” जो पहिला हात वर करेल त्याला संधी मिळायची. शिक्षकांच्या खोलीत दिव्याला आधी पेपर वाचून दाखवला जाई, मग ती उत्तरे सांगे! आठवीनंतर मोठी उत्तरे असत. दिव्याची मैत्रीण श्रुतिका राणे स्वतःचे पेपर लिहून शिवाय हिचे पेपर परत लिहायची. विशेष म्हणजे दोघींचा पहिला वा दुसरा नंबर येई, पण श्रुतिकाला असूया वाटली नाही, इतकी छान मैत्री! शाळेत पाठांतर, वक्तृत्व, काव्य, गायनवादन अशा अनेक स्पर्धात तिने बक्षिसे पटकावली आहेत.
दहावीला नववीतला विद्यार्थी लेखनिक लागतो. यासाठी शाळेचे सहकार्य खूप मोलाचे ठरले. अर्थात दिव्याची उत्तम तयारी, अगदी निबंधही तोंडावर होते.  ८७.९ % मिळवून दहावीला ती दिव्यांग मुलांत पहिली आली. बारावीला तिला ७५ % मिळाले. शिवाय दोन्ही भगिनी शास्त्रीय संगीत शिकल्या. दिव्या तर हार्मोनियम वाजवून गाते. दिव्या ब्रेल शिकलीच आहे, शिवाय NAB च्या श्राव्य वाचनालयात अनेक पुस्तके तिने वाचली आहेत. Harry Potter ची पारायणे केली आहेत.
दिव्याला भटकंतीचाही छंद आहे. वैष्णोदेवी, हिमालय, केरळ, नेपाळ, सिंगापूर, लंडन... एवढेच काय, रोहतांग पासला जाऊन तिने स्कीइंगचे (skiing) थ्रीलही अनुभवले आहे. मॅरेथाॅनदेखील धावली आहे. दिव्या स्वयंपाकही रुचकर बनवते. सुजलाताई म्हणतात– ‘दिव्याच्या दहा बोटांना काम करताना जणू दहा डोळे फुटतात.” तिने संगणकाचा डिप्लोमा, USA मधील Hadley School for Blind मध्ये जाऊन शिक्षण घेतले आहे. बारावी नंतर NABच्या करीयर मार्गदर्शनसत्रातून तिला फिजिओथिअरपीचा मार्ग सुचवला गेला, पण CET साठी दृष्टी आवश्यक होती. पण पर्याय मिळाला! सिक्कीम मणिपाल विद्यापीठात डिस्टन्स एज्युकेशनद्वारे फिजिओथिअरपीचा डिग्री कोर्स उपलब्ध होता, शिवाय त्याची वसईत शाखा होती. सोन्याहून पिवळे! शिक्षण सुरू झाले, पण वाटचाल सोपी नव्हती. मोठ्या निष्ठेने अभ्यास करून फिजिओथेरपीला ८८ टक्के गुण मिळवून दिव्या कॉलेजमध्ये पहिली आली.
एक दृष्टीविकलांग मुलगी डोळस मुलांना मागे टाकून पहिली येते; हे पचवायला सर्वांना अवघड गेले. पुढे इंटर्नशिपच्या वेळी तर दिव्याला अचानक मैत्रिणींचा असहकार अनुभवावा लागला. प्रोजेक्टसाठी ठराविक जणांचा ग्रुप करायचा होता.  शेवटच्या क्षणाला दिव्याला एकटे पाडले गेले. दिव्या खूपच रडकुंडीला आली त्यावेळी.  अशावेळी ‘बेस्ट फ्रेंड’ आई मदतीला धावली, “देवाने तुझ्यासाठी नवीन काही योजले असेल, चांगले घडेल,” आईने धीर दिला. दिव्याने तेही आव्हान पेलले. आज त्याही मैत्रिणींशी दिव्याचे चांगले संबंध आहेत. स्वभावातील परिपक्वता हा दिव्याचा विशेष! ती सारे काही सकारात्मकतेने घेते. लंडनला, ऑस्ट्रेलियाला जाऊनही फिजिओथेरपितील अद्ययावत ज्ञान तिने घेतले आहे.
दिव्या नऊ-दहा वर्षाची असेल, आईने सिद्धिविनायकाच्या मंदिरात नेल होते. ‘हा देव सामर्थ्यशाली आहे, हवे ते माग!’ त्यावर तिचे उत्तर – ‘देवाने मला सर्व दिले आहे, आता आणखी काय हवे आहे? आणखी काहीच नको!’ उत्तराने आई अवाक् झाली.
आज दिव्या दोन-दोन क्लिनिक चालवते. १५ ऑगस्टपूर्वी आठवडाभर ती गरिबांना मोफत ट्रीटमेंट देते. माणसांचा महापूर लोटतो. १२ ते १४ कोर्सेस करून ती स्वयंसिद्धा झालीय! यात स्वसंरक्षण, घरातली सुरक्षा असेही कोर्सेस आहेत. ‘धडकन’ हा तिचा गाण्याचा अल्बम प्रकाशित झाला आहे. स्वयंसिद्धा सन्मान, प्रेरणा पुरस्कार, नीलम कांगा अवार्ड अशा अनेक पुरस्कारांनी दिव्याचा गौरव झाला  आहे.  
तिच्या दुर्दम्य चिकाटीकडे  पाहून मिलिंदकुमार पाटील यांचे शब्द आठवतात -
“चैतन्याची फुलवा झाडे , द्या जगण्याला अर्थ  नवा
अडले, पडले; उचला त्यांना; ज्यांना आधाराचा  हात हवा!
                   
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link