Next
वरुणास्त्र
श्वेता प्रधान
Friday, June 07 | 04:00 PM
15 0 0
Share this story


वरुण धवन आणि रणवीर सिंग यांच्यात एक साम्य आहे - दोघांचीही ऊर्जा दुथडी भरून वाहत असते... रणवीर सिंगला ‘चालताबोलता ट्रेडमिल’ म्हटलं जातं असेल तर वरुण धवन म्हणजे ‘धावता विद्युतप्रवाह’ आहे. त्याच्या उत्साहाचं लोडशेडिंग होत नाही.
वरुण  हे एक असं रसायन आहे, ज्यात थोडासा शाहिद कपूर, थोडाफार रणवीर सिंग, बराचसा सलमान खान आणि खूप सारा गोविंदा दिसतो. या नायकावर तरुणी जितक्या फिदा आहेत, त्याहून अधिक संख्येनं लहान मुलांना त्यांचा ‘वरुणभय्या’ प्रिय आहे. वरुणचे फॅन्स स्वतःला ‘वरुणहोलिक्स’ म्हणवून घेतात. सोशल मीडियावर त्यांचा चांगलाच बोलबाला असतो. सलमान खाननं तर वरुणला ‘उद्याचा सुपरस्टार’ जाहीर करून टाकलंय.

नावात काय आहे!
प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याव्यतिरिक्त दुसरं काहीही करायचं नाही, हे त्यानं कधीचंच ठरवून टाकलं होतं. वडिलांचं नाव ‘दिग्दर्शक डेव्हिड धवन’ असल्यावर ते स्वाभाविकही होतं म्हणा! शिवाय, गोविंदाचा निस्सीम चाहता असल्यानं वडिलांच्या सिनेमात त्याला बघताना वरुणची मानसिकता, देहबोली, विचारसरणी तशीच घडत गेली. डेव्हिड धवन मात्र या खोडकर मुलामध्ये भावी डॉक्टर बघत होते. डॉक्टर नाही तर चांगल्याशा बँकेत नोकरी करून त्यानं स्थिरस्थावर व्हावं इतकीच त्यांची अपेक्षा. म्हणून एचआर कॉलेजातून बारावी झाल्यानंतर नॉटिंगहॅम ट्रेंट युनिव्हर्सिटीमध्ये बिझनेस मॅनेजमेंट शिकायला वरुण लंडनला पोहोचला. परतल्यावर वडिलांना न सांगता त्यानं ऑडिशन्स द्यायला सुरुवात केली. गंमत म्हणजे ही ऑडिशन्स ‘वरुण धवन’ नावाच्या मुलानं दिली आहेत याचा काही पुरावा नाही, कारण प्रत्येकवेळी तो स्वतःचं भलतंच नाव सांगून येत असे. रमेश, सुरेश अशा वेगवेगळ्या नावांनी त्याने कधी टीव्ही मालिकांसाठी तर कधी चित्रपटांसाठी ऑडिशन्स दिल्या. वरुण धवनच्या आयुष्यातलं कलाकार होण्यासाठीचा स्ट्रगल हे इतकाच.

वडिलांचा सल्ला
‘धोबी घाट’, ‘लाइफ ऑफ पाय’साठी मुलगा ऑडिशन देऊन आल्याचं डेव्हिड धवन यांना कळल्यावर त्यांनी सिनेमा बनण्याची प्रक्रिया शिकून घेण्याचा सल्ला दिला. आपल्या चित्रपटातून वरुणनं पदार्पण करू नये असाही निर्णय घेतला.   त्याच सुमारास करण जोहर ‘माय नेम इज खान’ बनवत होता. साहाय्यक दिग्दर्शक म्हणून करणसोबत काम करण्याची इच्छा वरुणनं व्यक्त केली. डेव्हिड धवनच्या मुलाची इच्छा कोण डावलणार? ‘माय नेम इज खान’च्या प्रक्रियेत वरुणनं मूलभूत धडे गिरवले. अभिनय शिकून घेण्यासाठी अनुपम खेरपासून किशोर नमित कपूरपर्यंत आठ ते दहा प्रशिक्षणसंस्थांमध्ये अनुभवही घेतला. 

दणदणीत पदार्पण
दोनच वर्षांत करण जोहरच्याच ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चकाचक चित्रपटातून वरुणनं पदार्पण केलं. कोणालाही हेवा वाटावा अशी ती संधी होती. वरुण धवन, आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा यांचं फ्रेश त्रिकूट, रॅम्पवॉकवर चालणारं कॉलेज, ग्लॅमरस चित्रीकरण, ठेका धरायला लावणारं संगीत या आणि अशा अनेक गोष्टींमुळे हा चित्रपट तुफान चालला.     
‘अकड की भी औकात होती हैं, और इस कॉलेज में वो जगह मेरी हैं’ असा कचकचीत डायलॉग मारत वरुण धवन रातोरात स्टार झाला. ‘स्टुडंट ऑफ द इयर’मधला त्यानं साकारलेला श्रीमंत वडिलांचा स्टायलिश मुलगा रोहन नंदा प्रत्यक्षातल्या वरुणच्या बराचसा जवळचा होता. खोड्या काढण्यात पटाईत, मैदानी खेळांत अग्रेसर आणि ब्रँडेड कपडे घालून उंची गाड्यांमध्ये फिरणारा मुलगा म्हणूनच तो अगदी सहज उभा करू शकला.

हिरोगिरी  
वडिलांच्या चित्रपटात काम करण्याची वरुणची इच्छा ‘मैं तेरा हिरो’मुळे लगेचच पूर्ण झाली. यातल्या ‘मैं दिखता हूं स्वीट, इनोसन्ट, स्वामी टाइप का, लेकिन अक्चुअली हूं बहोत बडे हरामी टाइप का!’ असे टाळ्या-शिट्ट्या घेणारे डायलॉग्स मारत ‘तेरा ध्यान किधर हैं ये तेरा हिरो इधर हैं’ म्हणत नाचणाऱ्या वरुणमध्ये अनेकांना गोविंदाचा भास झाला. वरुणच्या यशाची घोडदौड मग सुरूच राहिली.
करण जोहरनं ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ची निर्मिती करून नव्या पिढीचा ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ प्रेक्षकांच्या स्वाधीन केला. आधुनिक राज-सिमरन (शाहरूख-काजोल) झाले वरुण-आलिया. ‘मैं तेनुं समझावां की’ गाजलं आणि हम्प्टी-काव्याच्या प्रेमाची मॉडर्न कहाणीसुद्धा लोकांनी डोक्यावर घेतली.  ‘करण जोहर विवाहसंस्थे’च्या वतीनं यांचा आणखी एक लग्न-चित्रपट आला - ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’. पुन्हा तोच उतावीळ, हळवा प्रेमी वरुणनं साकारला. त्याच वर्षी ‘जुडवा २’सुद्धा आला होता. डेव्हिड धवनचा हा बिनडोक रिमेक वरुणला चांगलाच मानवला.  
बालिश विनोद, येताजाता सिक्स पॅक्स दाखवणं आणि ऊठसूट नाचणं यांतच वरुण रमतोय की काय असं एव्हाना वाटायला लागलं होतं. नाही म्हणायला ‘एबीसीडी २’च्या वास्तवावर आधारित कथानकात वरुणची नृत्यशैली नावाजली गेली. हिप-हॉप डान्स चॅम्पिअनशिप हा विषय असताना त्यात वरुणचा विचार झाला नसता तरच नवल होतं म्हणा! त्यांनतर रोहित शेट्टीच्या ‘दिलवाले’चं यश त्याच्यासह शाहरूख, काजोल इत्यादींमध्ये विभागलं गेलं असलं तरी आणखी एक सुपरहिट चित्रपट वरुणच्या खात्यात जमा झाला होता. दरम्यान, ‘ढिशूम’मुळे यशाचा वेग थोडासा मंदावला.

कलाकार की अभिनेता?
कलाकार म्हणून मनोरंजन करणं आणि अभिनयाचं सामर्थ्य दाखवून देणं यांची सांगड अनेकांना घालता येत नाही. नव्या दमाच्या नायक-नायिकांकडे तासलेलं शरीर असतं, ते नृत्यात तरबेज असतात, अॅक्शनमध्ये जोमदार असतात आणि मेकअप-मार्केटिंग-पीआरसह तंत्रज्ञानाचा पूर्ण पाठिंबाही त्यांना मिळतो. मात्र सहजाभिनयाचं काय? वरुणच्या संलग्न पिढीकडे या प्रश्नाचं उत्तर अभावानंच सापडतं. प्रामुख्यानं हलक्याफुलक्या भूमिका करत असूनही वरुणनं या प्रश्नाचं उत्तर शोधायचं ठरवलं. अंगावर काटा आणणारी भावनोत्कट व्यक्तिरेखा करून आपली क्षमता त्याला दाखवून द्यायचीच होती. शिवाय, कॉमेडी हिरो, चॉकलेट बॉय या साच्यांमधून कधी ना कधी बाहेर पडायला हवं होतं. या विचारानं त्यानं तीन चित्रपट केले - ‘बदलापूर’, ‘ऑक्टोबर’ आणि ‘सुई धागा.’ त्याच्या प्रतिमेच्या जवळपासही न फिरकणारे हे चित्रपट. ‘बदलापूर’ एक डार्क थ्रिलर होता. बायको आणि मुलाच्या खुनाचा बदला घेणाऱ्या नायकाची भूमिका त्याला समीक्षकांचं कौतुक, पुरस्काराचं नामांकन आणि बॉक्स ऑफिसवर नफाही देऊन गेली.
सहकारी तरुणी कोमात गेल्यानंतर हॉटेलातल्या एका शिकाऊ कर्मचाऱ्याचं आयुष्य कसं बदलतं याचं चित्रण ‘ऑक्टोबर’मध्ये केलं होतं. वरुणच्या अभिनयाकडे कोणी बोट दाखवलं नसलं, तरी चित्रपटाला यश मात्र निसटतंच मिळालं.
‘सुई धागा : मेड इन इंडिया’मध्येसुद्धा त्यानं निगुतीनं काम केलं. चित्रपटानं नफाही कमावला, पण त्याला वरुणच्या आधीच्या यशाची सर नव्हती.

अपयशाची चव
१९४०च्या फाळणीपूर्व काळाची पार्श्वभूमी, वरुण-आलिया-माधुरी दीक्षित यांसारखे कलाकार, भव्यदिव्य सादरीकरण, करोडोंचं बजेट असूनही ‘कलंक’कडे समीक्षक आणि प्रेक्षकांनी पाठ फिरवली. वरुणच्या चित्रपटाचे इतके हाल प्रथमच झाले. २०१७ च्या ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ आणि ‘जुडवा २’नंतर खरं तर वरुणनं घवघवीत यश तसं पाहिलेलंच नाही.
वरुणच्या खात्यात एकीकडे आहेत करोडोंची उड्डाणं घेणारे मसालापट आणि दुसरीकडे स्तुती मिळवून देणारे वेगळ्या वळणाचे चित्रपट. आता पुढे काय? व्यक्तिमत्त्वाला आव्हान देणाऱ्या भूमिका करायच्या की शिट्ट्या-टाळ्या खेचणारे मनोरंजक चित्रपट करायचे? मार्ग दोन आहेत आणि निर्णय एक..!
रेमो डिसूझाचा ‘स्ट्रीट डान्सर’ (श्रद्धा कपूरसह), ‘कुली नंबर वन’ (सारा अली खानसह), ‘बिवी नंबर वन’ (आलिया-जॅकलिनसह) आणि ‘शादी नंबर वन’ (विकी कौशल, यामी गौतम, आलिया भट्टसह) या डेव्हिड धवनच्या तीन मसालापटांचे रिमेक साइन करून वरुणनं सध्या तरी आपल्यापुरता निर्णय घेतलाय, असं वाटतं.
------------------------


ड्वेन जॉन्सनचा चाहता
‘द रॉक’ - ड्वेन जॉन्सनच्या प्रभावामुळे वरुणनं अभिनयक्षेत्रात यायचा निश्चय केला. कट्टर चाहता असल्यानं वरुण त्याला सोशल मीडियावर संदेश पाठवत असे. एकदा सहज ड्वेनचं लक्ष गेलं आणि त्यानं वरुणला शुभेच्छांचं ट्वीट केलं. एका मुलाखतीत वरुणनं त्याला ‘फायनली द रॉक इज कमिंग टू इंडिया’ हे वाक्य बोलून दाखवण्याची गळ घातली आणि ड्वेननं त्याची तीही इच्छा पूर्ण केली. वरुणच्या घरात बैठकीच्या खोलीत ड्वेन जॉन्सनचा भलामोठा फोटो लावलाय. 


तू ही रे...
न्यू यॉर्कच्या ‘फॅशन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’मधून फॅशन डिझायनिंग शिकून मुंबईत परतल्यावर नताशा दलाल हे नाव वरुणशी जोडलं जाऊ लागलं. कोणताही गाजावाजा न करता एक दिवस वरुणनं नताशाशी लग्न करण्याचा निश्चय बोलून दाखवला. मध्यंतरी एका चाहतीनं वरुणची भेट झाली नाही म्हणून नताशाला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या. पोलिसांकडे रीतसर तक्रार करून त्यानं चाहत्यांना मर्यादा न ओलांडण्याची ताकीदही दिली.
वरुणला फिल्मी दुनियेशी संबंध नसणारी जीवनसाथी हवी होती, ती अपेक्षा नताशाच्या रूपात पूर्ण झाली. शिवाय दोघं एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. नताशा स्वतःचा फॅशन ब्रँड चालवते. वरुण-नताशा लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा आहे.


भूमिकेत शिरताना...
एका खुशालचेंडू मुलाला निराशेनं उद्विग्न झालेल्या व्यक्तीची भूमिका करायची असेल, तर जितका कठोर सराव करावा लागेल, तो वरुणनं ‘बदलापूर’साठी केला. इतका केला, की त्या काळात वैयक्तिक आयुष्यातही तो डिप्रेशनच्या खोल विहिरीत बुडाला होता. पंखासुद्धा नसलेल्या खोलीत दिवसेंदिवस राहणं, लोकांशी संपर्क तोडणं, एकटेपणात घुसमटणं या प्रक्रियेचा फायदा त्याच्या भूमिकेला झाला. मात्र यातून बाहेर पडण्याचा काळ म्हणजे त्याच्या आणि कुटुंबीयांच्या संयमाची परीक्षा होती. ‘बदलापूर’ केल्याचे दोन फायदे झाले; एक म्हणजे त्याच्या ‘हायपर’ अभिनयावर जरासं नियंत्रण येत गेलं आणि शंभर करोडच्या क्लबमध्ये गेल्यानं डोक्यात जाऊ लागलेली हवाही विरली. 
त्यानंतर आलेल्या ‘ऑक्टोबर’साठी शूजित सरकारला खरं तर नवखा नायक अपेक्षित होता, पण वरुणनं ही भूमिका करण्याची इच्छा व्यक्त केली. ‘हायपर’ अभिनय सोडून एखाद्या नवशिक्या युवकासारखं निमूट ऐकावं लागेल,’ या अटीवर शूजितनं वरुणला ‘ऑक्टोबर’मध्ये घेतलं. दिल्लीच्या हॉटेलात वरुणनं शिकाऊ कर्मचाऱ्याचं काम करून भूमिकेची तयारी केली.
‘सुई धागा’च्या वेळेसही छोट्याशा गावातला कपड्यांचा व्यापारी साकारण्यासाठी त्यानं दोन महिने शिवणकामाचं प्रशिक्षण घेतलं होतं.


घरकुल
वडिलांपेक्षा मनानं वरुण आई आणि भाऊ रोहित (लेखक-दिग्दर्शक) यांच्या अधिक जवळ आहे. आईवडिलांपासून हाकेच्या अंतरावर त्यानं नवीन घर विकत घेतलंय. घरात ठिकठिकाणी ‘रिसॉल्व्ह टू बी दायसेल्फ’सारखे सुप्रसिद्ध व्यक्तींचे विचार लिहिले आहेत. घरात बांधलेल्या जिममध्ये व्यायामासाठी प्रेरणा मिळावी म्हणून भिंतीवर लिहिलेलं ‘युअर ओन्ली लिमिट इज यू’ हे वाक्यही ठळक अक्षरात दिसतं.


अतिउत्साही अभिनय
अतिउत्साहात अभिनय करण्याच्या सवयीमुळे वरुणची वारंवार थट्टा होते. ‘हायपर’ अभिनय सादर करण्याची सवय लागल्याचं स्वतः वरुणही कबूल करतो. ‘मैं तेरा हिरो’, ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’, ‘जुडवा २’ यांच्या वेळेस ही टीका प्रकर्षानं झाली. काही दृश्यांमध्ये हा जोश आवश्यक ठरत असला, तरी या ‘हायपर’ अभिनयावर स्वतः वरुणनंच नियंत्रण आणून समतोल साधायला हवा असं समीक्षक, चाहते, दिग्दर्शक सगळेच सांगत असतात.


वादांपासून लांब  
अफेअर्स आणि व्यसनांपायी बदनाम होण्याची वेळ वरुणवर आली नाही. चित्रपटसृष्टीत असं क्वचितच घडतं. वादांचं म्हणाल, तर ट्रॅफिक सिग्नलजवळ फॅनसह सेल्फी काढताना पोलिसांनी घेतलेली हरकत आणि एका पुरस्कारसोहळ्यात ‘नेपोटिझम (चित्रपटसृष्टीतली घराणेशाही) रॉक्स!’ हे उद्गार काढल्याचा वाद असे मोजकेच अपवाद.  

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link