Next
पावसात जाऊ !
अनुजा हर्डीकर
Friday, July 12 | 03:00 PM
15 0 0
Share this story

यावर्षी पावसाला हजेरी लावायला जुलै उजाडला खरा, पण आलाच तो इतक्या दणक्यात की जणू काही जूनची पूर्ण गैरहजेरी भरून काढावी. सगळीकडे पाणी तुंबले. दुर्घटना घडायच्या त्या घडल्या. ऑफिस, शाळा यांना सुट्टी जाहीर झाली. सुरुवातीच्या पावसात मस्त भिजायचे, गरमागरम भजी खायची, वाफाळता चहा प्यायचा, मक्याचे कणीस भाजून खायचे- अशा साऱ्या रोमँटिक गोष्टी सर्वांनी केल्या. इतके दिवस उन्हाळ्याने त्रस्त झालेले आपण दोनच दिवसांत पावसालाही कंटाळलो. काही ठिकाणी तर पावसाने हाहाकार माजवला.
असा मस्त बरसणारा पाऊस पाहून आमच्या घरातल्या लहानग्यांची स्वारी रेनकोट घालून पावसात भिजायला तयार झाली. पाण्याने तुंबलेल्या रस्त्यावर त्यांना फक्त वाहती नदी दिसत होती. या गुडघाभर पाण्यात मी त्यांना घेऊन बाहेर जाणे   नक्कीच समाजमान्य नव्हते! जवळपास प्रत्येक जीव आडोसा शोधत असताना, पावसापासून दूर जाऊ बघत असताना, आमची ही चिमुकली स्वारी मात्र कधी एकदा घराबाहेर पडतो आहोत, ह्या विचारात होती. त्या पाण्यात किती कचरा,  रस्त्यावरच्या प्राण्यांची मलमूत्राची घाण, पावसाळ्यात पसरणारे रोगजंतू, आजार, सगळे उलटसुलट विचार आई म्हणून माझ्या मनात सुरूच होते. मात्र त्यांना शाळेत शिकवलेली ‘ये ग ये ग सरी’ हीच कविता आठवत होती. शिवाय त्यातली ‘मडकं गेलं वाहून’ची भीती कळायचेही त्यांचे वय नाही. त्यांच्या बालहट्टासमोर माझे काहीच चालेना. ते मलाही आता पावसात खेचत घेऊन गेलेच.
त्या पाण्यात पाय टाकायचा की नाही याचा विचार मी करेपर्यंत आमची स्वारी पावसात उभी राहून माझी वाट बघत होती. “ये ग लवकर” असं सांगायला त्यांनी मान वर करताच तोंडावर टपोरे पावसाचे थेंब पडले. “आई, पावसाचा थेंब लागतो?” असं विचारत असताना ती लागण्याची मज्जा पुन्हा पुन्हा अनुभवण्यासाठी मान वर करून बघत होते. “ढगांतून पाऊस पडताना का दिसत नाहीये?” ह्या प्रश्नावर त्यांची चर्चा सुरू झाली आणि त्यांच्या गप्पा ऐकता ऐकता मीही हळुहळू साधारण वीतभर पाण्यात येऊन पोहोचले. वीत-दोन वीत असणाऱ्या पाण्यालाही आवेग होता, प्रवाह जाणवत होता. आपोआपच मुलांनी धरलेल्या माझ्या हाताची पकड अधिक घट्ट झाली. ‘मेघ कसे बघ गडगड करिती, विजा नभातुनी मला खुणविती’... खरोखरच अंगात वीज संचारल्यासारखे दोघेही ढगांपेक्षा जोरजोरात गडगडाट करत होते. त्यात मीही सामील झाले. आम्ही कोसळणाऱ्या धारा झेलत होतो, हातात पाणी पकडण्याचा प्रयत्न करत होतो, एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत होतो. रस्त्यावर आडोशाला असणारे काहीजण मनापासून हे दृश्य न्याहाळत होते. कोणाच्या चेहऱ्यावर उत्सुकता, कोणास कौतुक, तर कोणाच्या चेहऱ्यावर स्पष्ट नापसंती दिसत होती. मला मात्र पावसाचा असीम आनंद लुटणाऱ्या मुलांचा हसरा चेहरा आणि आम्हाला अधिक जवळ करणारा तो पाऊस आवडला होता. मोबाईलवर नेहमी ऐकलेले गाणे आज आम्ही प्रत्यक्षात अनुभवत होतो. रेनकोट घालूनही आम्ही तिघे त्या पावसात चिंब चिंब भिजत होतो.
ढगांनी आता अधिकच काळोख केला. पावसाचे थेंब चक्क असह्य बोचरे झाले. दोघेही जण मला घट्ट बिलगत घरी जाऊया म्हणून रडू लागले. ‘एवढंसं पाणी पण मला केवढं ढकलतय’ या त्यांच्या उद्‍गारांतूनच त्यांना वाटलेली भीती मला स्पष्ट जाणवली. मग आमचा मोर्चा ताबडतोब घराकडे वळला. घरी येता येता पावसात भिजलेले घाबरलेले एक मांजरीचे पिल्लू आम्हाला दिसले. त्याची आई घराच्या छपरावर बसून त्याला बोलावत होती, मात्र पिल्लाला काही तितकी उंच उडी मारून तिच्याकडे जाता येत नव्हते. खाली पाणी वाढले असल्याने मांजरही त्या पाण्यात शिरायला धजत नव्हती. हे पहाताच इतका वेळ मला घट्ट धरुन चालणाऱ्या माझ्या दोन्ही मुलांनी मला सोडले- “आई, या पाण्यात तर ते पिल्लू वाहूनच जाईल की. त्याला उचल आणि त्याच्या आईजवळ दे.”
स्वतःला वाटणाऱ्या वाहत्या पाण्याच्या भीतीपेक्षा त्यांना त्या पिल्लाची अधिक काळजी वाटली. त्या पिल्लाला उचलून मी छतावर ठेवले. मांजर लगेच त्याला तोंडात धरून कुठेतरी आत जाऊन लपली आणि पुन्हा नकळत मीही माझ्या पिल्लांचा हात घट्ट हातात घेऊन घराकडे निघाले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link