Next
वैचारिक मूल्य देणारी नाटकं हवीत- प्रेमानंद गज्वी
अरुण घाडीगांवकर
Friday, November 30 | 06:30 PM
15 0 0
Share this story

‘घो टभर पाणी’, ‘देवनवरी’, ‘बेरीज वजाबाकी’, ‘गाहान’, ‘एकी एके शून्य’, ‘उतारा’ यांसारख्या बारा एकांकिका ‘देवनवरी’,’तनमाजोरी’, ‘वांझ माती’, ‘किरवंत’,’गांधी आणि आंबेडकर’,’जय जय रघुवीर समर्थ’, ‘नूर महंमद साठे’,’पांढरा बुधवार’,’शुद्ध बीजापोटी’, ‘छावणी’ यां सारखी नाटकं मराठी रंगभूमीला देणारे नाटककार प्रेमानंद गज्वी यांची नियोजित नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी, अखिल भारतीय नाट्यपरिषदेनं एकमतानं निवड केली आहे. ‘घोटभर पाणी’ या एकांकिकेनं प्रेमानंद गज्वी यांना उभा-आडवा महाराष्ट्र ओळखू लागला. या एकांकिकेचे विविध नाट्यसंस्थांनी हजारहून अधिक प्रयोग केले आहेत. केवळ ही एकांकिकाच नव्हे तर त्यांच्या बहुतांश एकांकिकांनी नाट्यक्षेत्र घुसळून काढलं होतं. ‘घोटभर पाणी’चे आजही प्रयोग होत आहेत. ती आजही तितकीच ताजी वाटते. यावरची गज्वींची प्रतिक्रिया अत्यंत बोलकी आहे. ते म्हणतात,’१९७८ च्या आसपास, त्यावेळच्या समस्येवरची, मी लिहिलेली ही एकांकिका. ती आजही तितकीच ताजी वाटते, कारण ग्रामीण भागातील वास्तव अजूनही बदललेलं नाही. आजही दलितांना पाण्यासाठी वंचित राहावं लागतं. माझी ही एकांकिका जेव्हा ‘आऊटडेटेड’ठरेल, तो सुदिन.’
एकांकिका काय किंवा नाट्यकृती काय प्रेमानंद गज्वींनी आपलं सामाजिक भान कुठेच सुटू दिलेलं नाही. सामान्यातील सामान्य माणसांची दैन्यं, दु:खं, समस्या, अन्याय यावर ते सातत्यानं विचार करून आपल्या नाट्यकृतींतून आपली प्रतिक्रिया देतात. संवेदनशील लेखक, नाटकाकर म्हणून त्यांचे समाजप्रबोधन, वास्तव बदलण्याचे प्रयत्न सुरूच असतात. परंतु त्यांना त्यासाठी संस्थात्मक साथीचीही गरज वाटते. परिस्थितीत बदल घडविण्यासाठी व्यापक स्तरावर काय करायला हवं, याचंही भान त्यांना आहे. म्हणून ‘संमेलना’सारख्या वार्षिक घटितांचा आधार त्यांना घ्यावासा वाटला, हा एक मार्ग.
यापूर्वी साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठीही त्यांनी, याच भूमिकेतून, निवडणूक लढवली होती. नाट्यसंमेलनाच्या ‘अध्यक्षपदा’साठी त्यांनी यापूर्वीही प्रयत्न केले होते. या वर्षी त्यांच्या आजवरच्या, रंगभूमीवरील नाट्यलेखनकार्याची, कलावंतांसाठी केलेल्या साहाय्याची दखल घेऊन त्यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली. नाट्यसंमेलनाचं ‘अध्यक्षपद’ हे सन्मानाचं आहे,याची पुरेशी कल्पना त्यांना आहेच, शिवाय हे पद जेमतेम वर्षासाठी. या कालावधीत आपल्याकडून काही भरीव कार्य होईल, अशी कुणाची अपेक्षा नाही, हेही त्यांना ज्ञात आहे. पण... ‘नाट्य परिषदे’नं त्यांच्या अखत्यारीतील गोष्टींचं साहाय्य केलं, त्यांच्या ‘योजना’ कार्यान्वित होण्यासाठी सर्वतोपरी मदत केली, तर बऱ्याच गोष्टी करणं शक्य आहे, असं गज्वींना मनापासून वाटतं.
ते म्हणतात, ‘ही काही माझ्या एकट्याची’ जबाबदारी नाही. मात्र कलाकार, नाट्यसंस्था, परिषद, शासनव्यवस्था... या साऱ्यांच्या सहकाऱ्यानं रंगभूमीच्या संदर्भातील बऱ्याच गोष्टी मार्गी लावता येतील. आम्ही  कलावंत अगदी चहा पितानाही, रंगभूमीविषयी अगदी गांभीर्यानं चर्चा करतो. परस्परांचं ऐकतो. तोडगे सुचवतो. काही व्यक्त करतो. परंतु त्यास मान्यता मिळत नाही. संस्थात्मक  पातळीवर अशा चर्चा झाल्या, तर शासनाच्याही साहाय्यानं यात सकारात्मक बदल घडवून आणता येतील.’ आपल्या मनातील संकल्पनांचं यशापश हे साऱ्यांच्याच साहाय्यानं शक्य होईल, असं गज्वी म्हणतात आणि आत्मविश्वासानं ते सांगतात, ‘संमेलनाध्यक्ष हे पद लोकांच्या मनात ‘सन्माना’चं, ‘मिरवण्या’चं आहे, त्याला मी छेद देईन, असं वाटतं.’
‘माझ्या कल्पना परिषद, शासन, कलावंत यांना पटल्या तर ते सहकार्य करतील ना? माझ्या एकट्याच्या खिशातून पैसे खर्च करून काही करू गेलो, तर त्यास मर्यादा आहेत. साऱ्यांनी मिळून केलं, तरच ते मोठ्या स्तरावर यशस्वी होईल. मुंबई विद्यापीठाचा नाट्यविभाग आहे, नाट्यपरिषदेच्या महाराष्ट्रभर पसरलेल्या शाखा आहेत, गावोगावी असणाऱ्या नाट्यसंस्था... अशांसाठी नाट्यलेखन कार्यशाळा, नाट्यशिबिरांचं आयोजन करता येईल, त्यांना जाणकारांचं मार्गदर्शन देता येईल, त्यांच्या अडचणी, समस्या, प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करता येतील...’ प्रेमानंद गज्वी अगदी भरभरून बोलतात. अर्थात, यामागे त्यांचा आजवरचा अनुभव आहेच. त्यांच्या ‘बोधी नाट्य’ संस्थेद्वारा त्यांनी आजवर २८ ‘लेखन कार्यशाळा’ आयोजित केल्या आहेत. त्यात सहभागी झालेल्या नाटककारांनी १४४ नव्या नाट्यसंहितांचे वाचन केलं. त्यावर सांगोपांग चर्चा झाल्या. दुरुस्ती-सूचना केल्या गेल्या. नाट्यसंहितांच्या पुनर्लिखाणातून प्रयोगक्षम नाटकांचे ‘बोधी नाट्य महोत्सव’ही त्यांनी घडवून आणलेत. याच शिबिरांतून भगवान हिरे, सलीम शेख, आशुतोष पोतदार, वीरेंद्र गजवीर यांच्यासारखे नाटककार, वेगळ्या विषय-आशयाची नाटकं रंगभूमीला देऊ लागले. नांदेड, नाशिक, यवतमाळ रत्नागिरी, कणवकवली, महाड, येवला... अशा ठिकाणी या ‘नाट्यलेखन कार्यशाळा’ झाल्या. कणकवलीला तर वामन पंडित यांच्या ‘वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान’च्या सहकार्यानं केवळ महिलांसाठी ‘नाट्यलेखन कार्यशाळा’आयोजित करण्यात आली होती. त्यात पाच नाट्यलेखिकांनी आपल्या नाट्यसंहितांचं वाचन केलं. त्यावर चर्चा करून त्यांना मार्गदर्शन केलं. ‘बोधी नाट्य’तर्फे त्यांच्या संहितांचे प्रयोग होतात, ते रवींद्र लाखे, गिरीश पतके, राम दौंड यांसारख्या दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनाखाली.
प्रेमानंद गज्वी म्हणतात, ‘बोधी ज्ञानाशी निगडित आहे. ज्ञान ही काही कुणाची मक्तेदारी नाही. ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचायला हवं. त्यासाठी आमचे अविरत प्रयत्न असतात.’ गेल्या ४० वर्षांहून अधिक काळ प्रेमानंद गज्वी यांनी रंगभूमीची सेवा केलीय. सुरुवातीस एकांकिका-नाट्यलेखक म्हणून आणि त्याचबरोबर कलावंतांना लिहितं करीत, त्यांच्या नाट्यजाणिवांना विकसित करत, त्यांना मार्गदर्शन करत... मराठी रंगभूमी मूल्यांच्या, विचारांच्या, आशयाच्या दृष्टीनं पुढे कशी जाईल, याचा विचार ते सतत करत असतात.
त्यांनी पाहिलेल्या, अनुभवलेल्या मराठी व्यावसायिक रंगभूमीविषयी आपली मतं ते स्पष्टपणे मांडतात.’मराठी व्यावसायिक रंगभूमीवर प्रामुख्यानं नाटकं आली ती कौंटुबिक जिव्हाळ्याची...विनोदी... मनोरंजन करणारी अशी. ‘चारचौघी’ किंवा ‘किरवंत’सारखी वेगळ्या विषय-आशयाची नाटकं आली, पण त्यांचं प्रमाण फारंच थोडं. ‘सूर्य पाहिलेला माणूस’चे किती प्रयोग झाले? हे सारे प्रयत्न मर्यादित आहेत.’ आपला मुद्दा अधिक स्पष्ट करत गज्वी म्हणतात, ‘हे सारं अवलंबून असतं ते पॉप्युलॅरिटीवर. वैचारिक मूल्यं देणारी नाटकं येत नाहीत. काही निर्माते असे प्रयत्न करतात. आता लताबाई नार्वेकरांनी ‘गांधी आणि आंबेडकर’ हे वैचारिक नाटक, चांगली स्टारकास्ट घेऊन काढलं. व्यावसायिक रंगभूमीवर, या दोन्ही नायकांचा त्यांच्या विचारांचा प्रभाव आजही भारतीयांवर आहेच की. तरीही या नाटकास रसिकाश्रय लाभला नाही. गांधीवाद्यांना हे नाटक आंबेडकरांचं वाटतं, तर आंबेडकरवाद्यांना ते गांधींचं! अखेर प्रेक्षकांअभावी ते निर्मात्यांना बंद करावं लागलं.’ही खंत मांडून ते निराश होत नाहीत. तर त्यांना नव्या कलावंतांकडून अजूनही आशा वाटते. आपल्या अनुभ‌वातून ते सांगतात,’वैचारिक मूल्यं देणारी नाटकं राज्यनाट्यस्पर्धेत होतात. सांगलीच्या इरफान मुजावर यांचं ‘वृंदावन’ असं नाटक आहे. मथुरेला काय चालतं, त्यावरची त्याची ती प्रतिक्रिया आहे. मात्र ते व्यावसायिक रंगभूमीवर नाही येऊ शकलं.’ असं म्हणून यावर उपाय सांगताना म्हणतात,’इथं शासनाच्या मदतीची आवश्यकता आहे. शासनानं अशा नाटकांचे दहा प्रयोग करावेत. कलाकारांना, नाट्यसंस्थांना अर्थ साहाय्य करावं... म्हणजे ते नाटक लोकांपुढे येईल. कदाचित एखादा धीट नाट्यनिर्माता त्याचे व्यावसायिक रंगभूमीवर प्रयोगही करील आणि ते अधिक लोकांपर्यंत पोहोचेल.’
मूल्यभान वाढवण्यासाठी ‘शासना’च्या साहाय्याची आवश्यकता आहे, हे गज्वींनी अधोरेखित केलं. ‘मनात तर खूप उसळतंय, त्याला वाट करून द्यायची आहे, या संमेलनाध्यक्षाच्या काळात, अपेक्षा आहे ती साऱ्यांच्या सहकार्याची...’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link