Next
भकास करणारा विकास
प्रतिनिधी
Friday, September 06 | 02:15 PM
15 0 0
Share this story

मुंबई बुधवारी पुन्हा एकदा पाण्यात बुडाली. मुंबईत धुवांधार पाऊस होणे व त्यामुळे सर्व प्रकारची वाहतूक विस्कळीत होणे हे नवीन नाही. संपूर्ण पावसाळ्यात एकदोनदा असे घडतेच. परंतु अलीकडच्या काळात पाणी साचणाऱ्या क्षेत्रांत नवनव्या विभागाची भर पडू लागली आहे. मुंबई-पनवेल मार्ग कळंबोलीजवळ पाण्याखाली जाण्याची घटना या वर्षी प्रथमच घडली आहे. त्याचे सकृतदर्शनी कारण या भागातील टेकड्यांचे झालेले सपाटीकरण व त्याजागी झालेले नवे बांधकाम हेच दिसते. सध्या मुंबई आणि महानगर क्षेत्रात विकासाच्या नावाखाली झाडे तोडण्याचे व टेकड्यांच्या खोदकामाचे बरेच प्रकार घडत आहेत, त्याचा पर्यावरणावर हळूहळू विपरीत परिणाम होत आहे, हेच या पावसाळ्याने सिद्ध केले आहे. नवी मुंबईतील विमानतळासाठी तिवराच्या जंगलाची कत्तल, दोन नद्यांच्या प्रवाहात बदल आणि एक डोंगर सपाट करून निसर्गात अक्षम्य हस्तक्षेप करण्यात आला आहे, त्याचे परिणाम नव्या मुंबईत व पनवेल भागात दिसू लागले आहेत. ठाण्यात घोडबंदर भागातील सर्व झाडे तोडून बिल्डरांची धन केली त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. आरेचे अर्धे जंगल आधीच बिल्डरांच्या घशात घालून झाले आहे, आता उरलेले जंगल मेट्रोकारशेडसाठी नष्ट करण्यात येत आहे. मुंबईचा विकास करायचा असेल तर हे सर्व करावेच लागेल असे सांगण्यात येते, परंतु मुंबईच्या विकासाला काही अंत आहे का, हा खरा प्रश्न आहे. कारण हा विकास असाच चालू राहिला तर येत्या काळात बोरीवलीचे राष्ट्रीय उद्यानही नष्ट करावे लागेल व कान्हेरीच्या गुंफा पाडून तेथे टॉवर्ससाठी जागा करावी लागेल. मुंबईत माणसांचे लोंढे सतत वाढत राहणार आहेत व त्यांच्या राहण्यासाठी, त्यांच्या मोटारींसाठी सतत नवनव्या सुविधा निर्माण कराव्या लागणार आहेत. मात्र त्यासाठी हवी असलेली जागा कुठून आणायची, याचे उत्तर मुंबई शहरात जे थोडे जंगल आहे, ते तोडणे हेच एक आहे. मात्र ते तोडून झाल्यावर काय, याचा विचार कोणीच करताना दिसत नाही. यात अनेकांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले असल्यामुळे तितका दूरवरचा विचार करण्याची आवश्यकता सध्या कुणालाच वाटत नाही. परंतु याचे भविष्यातील परिणाम भयंकर असणार आहेत. मुंबईत सर्वच रेल्वेस्थानकांवर सध्या मरणाची गर्दी असते. परळच्या चेंगराचेंगरीच्या घटनेने या परिणामाची झलक दाखवून दिलेलीच आहे. बुधवारच्या पावसात अशीच घटना ठाणे व घाटकोपर स्थानकावर घडताघडता टळली. परंतु आपण त्यापासून काहीच धडा घेण्यास तयार नाही. मुंबईत मेट्रोचे सध्या आडवेतिडवे जाळे विणण्यात येत आहे, परंतु ते समस्येचे उत्तर नसून नव्या समस्यांना आमंत्रण आहे. यामुळे मुंबईच्या लोकसंख्येत भर घालण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मुंबईने आता विकासाची हाव थांबवणे आवश्यक आहे. येथील विकास आता विकेंद्रित करणे आवश्यक आहे. मुंबईखेरीज अन्य शहरे महाराष्ट्रात व देशातही आहेत. तेथे विकासाची नवी केंद्रे सुरू केल्यास मुंबईकडचा ओघ तिकडे वळेल व मुंबईला थोडी उसंत मिळेल. पण, त्याचीच भीती या शहरात आर्थिक हितसंबंध गुंतलेल्यांना वाटते. त्यांनीच मुंबई रिक्लेम केली, त्यांनी नवी मुंबईही वसवली, त्यांनी बीकेसी निर्माण केली, आता रोहा, रायगड भागात तिसऱ्या मुंबईचा घाट घालण्यात येत आहे. याचा अर्थ या सर्व भागांतील जंगले, झाडे, टेकड्या नष्ट करण्यात येणार आहेत. हा विकास आहे, पण तो सगळे जीवन भकास करणारा आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link