Next
२०५०ची धोक्याची घंटा
दिलीप नेर्लीकर
Friday, January 11 | 03:00 PM
15 0 0
Share this story

डेव्हिस गगेनहॅम यांनी दिग्दर्शित केलेली ९७ मिनिटांची एक डॉक्युमेंटरी सर्वप्रथम २४ मे २००६ रोजी न्यू यॉर्क इथे दाखवण्यात आली. त्या डॉक्युमेंटरीचं नाव होतं The Inconvenient Truth. याचे लेखक आणि नायक होते अमेरिकेचे उपराष्ट्रपती अल गोर. त्यांनी या चित्रफितीला दिलेलं नावच सर्व काही सांगून जातं होतं... एक विदारक सत्य..! हो या चित्रफितीतून वसुंधरा तापते आहे, हे विदारक सत्य सर्वप्रथम जगासमोर उघडपणे मांडलं गेलं. १५ लाख डॉलर खर्चून बनवलेल्या या चित्रफितीनं तब्बल पाच कोटी डॉलर कमावले आणि जगाला खडबडून जागं केलं.
“मी अल गोर, कदाचित अमेरिकेचा भावी राष्ट्रपती... ही गोष्ट मी अनेक वर्षं झाली सांगायचा प्रयत्न करतोय, परंतु माझे प्रयत्न आजवर निष्फळ ठरलेत...” या वाक्यानं त्यांनी आपली अगतिकता सांगून, हे बोचणारं सत्य जगासमोर मांडायला सुरुवात केली. काही अप्रिय गोष्टी आपल्याला ऐकायलाही आवडत नाहीत. या विषयाचंही असंच आहे. आपण सर्वजण आपल्या हातानं आपल्या एकुलत्या एक पृथ्वीची कशी वाट लावत आहोत हे जर कुणी पोटतिडकीनं सांगत असेल तर ते निदान ऐकून घ्यावं, परंतु त्यावेळीही कोळसा आणि खनिजतेलं यांच्या पैशांवर गब्बर झालेल्या काही बड्या अमेरिकन कंपन्यांनी त्यांचे हितसंबंध जपण्यासाठी या चित्रफितीला विरोधही केला. अनेक दिवस शास्त्रज्ञ सांगत असलेला पण लोकांनी आणि सर्व देशातील सरकारांनी विचारातही न घेतलेला विषय पुन्हा चर्चेत आला तो याच चित्रफितीमुळे.
संयुक्त राष्ट्र संघानं स्थापन केलेल्या पर्यावरण बदलावरील आंतरसरकारी समितीनं (Inter governmental Panel on Climate Change (IPCC) वसुंधरा तापते आहे, हे सत्य उघडपणे स्वीकारलं आणि खनिजतेल, कोळसा आणि लाकूड यांच्या अमर्याद वापरामुळेच हे घडतंय हेही त्यांनी मान्य केलं. इथूनच पुढे ग्लोबल वार्मिंग हे पर्यावरण संवर्धनात परवलीचे शब्द बनले. २००७ साली युनोनं प्रसिद्ध केलेल्या आयपीसीसीच्या अहवालात असं ठामपणे सांगितलं गेलं, की जगातील ९० टक्के शात्रज्ञ असं मानतात की तप्त वसुंधरेमुळे सागरातील पाणी तापतं आहे. याचा परिणाम वातावरणाच्या लहरी वागण्यात झाला आहे. उन्हाळ्यात जाणवणारी असह्य उष्णता, वारंवार उद्भवणारी प्रलयंकारी वादळं, जंगलांना लागणाऱ्या आगी, पावसाच्या कमतरतेमुळे पडलेले दुष्काळ या साऱ्यामागं एकच कारण आणि ते म्हणजे तप्त वसुंधरा (ग्लोबल वॉर्मिंग).
सागरातील पाणी आणि पृथ्वीवरील जमीन तापली, तर तिचं तापमान कमी करण्यासाठी जमिनीतून आणखी अधिक पाणी शोषलं जातं आणि मग जमीन आणखी कोरडी बनते, त्यामुळे दुष्काळाच्या भीषणतेत भर पडते. याचा आणखी एक परिणाम म्हणजे सागराच्या आत वाहणारे प्रवाह बदलतात. परिणामी समुद्रावरील वारे आणि त्यावरील उष्णता, हवामानात वेड्यासारखे बदल घडवतात, अवकाळी पाऊस, भाजणारं ऊन, पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष, नापीक जमीन आपल्या नशिबी येते आणि आपण दोष देतो तो लहरी निसर्गाला. खरं तर आपण आपल्याच कर्माची फळं भोगतोय! पण लक्षात कोण घेतोय?
नासा या अंतराळ संशोधन संघटनेनं आणि अमेरिकेतील अनेक भूगर्भशास्त्रज्ञांनी पृथ्वीवर भयंकर उत्पात माजवणारे भूकंप हे ही याच वातावरणातील बदलाचा आणखी एक परिणाम म्हणून घडतात हे दाखवून दिलं आहे. मुख्यत्वेकरून अलास्का या हिमखंडात घडणारे भूकंप हे या तप्त वसुंधरेमुळे घडतात याचे त्यांना सप्रमाण दाखले दिले आहेत.
आणखी एक धोक्याची घंटी वाजते आहे. वाढणाऱ्या उष्णतेनं दक्षिण आणि उत्तर ध्रुवावरील बर्फ वितळण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे समुद्रातील पाण्याची पातळी वाढते आहे. याचा परिणाम म्हणून समुद्रकाठावर असलेल्या काही मानवी वसाहती आपल्याला हलवणं गरजेचं होणार आहे. फार पुढचा विचार करू नका, साधारण २०५० पर्यंत तुम्हाला उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवावर आज बारमाही दिसणारा बर्फ असाच एक दिवस अचानक गडप होईल!
कॅनडा आणि अमेरिकेच्या सीमेवरील उत्तर गोलार्धातील सर्वात मोठं पाण्याचे तळं लेक सुपीरिअर, याची लांबी ५६० किलोमीटर तर रुंदी २६० किमी आहे. २००६ साली हा तप्त वसुंधरेचा अहवाल आला त्यावेळीच तिथल्या शास्त्रज्ञांनी सांगितलं होतं, की ग्लोबल वार्मिंगमुळे हे तळं पूर्णपणे व्यापेल इतका बर्फ उत्तर ध्रुवावरून प्रतिवर्षी वितळतो आहे.
मागील दशलक्ष वर्षांत कोणीही न अनुभवलेला बर्फमुक्त उत्तर आणि दक्षिण ध्रुव पाहण्याचा दुर्मिळ योग आपल्या करंट्या पृथ्वीवासियांच्या नशिबी येणार आहे. तर होणार ना या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार? एकच विनंती, असा योग येऊ नये म्हणून यज्ञ वगैरे काही करू नका, कारण त्यासाठी पण शेकडो टन लाकडं जाळली जाणार आपल्या या भारत देशात!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link