Next
अशक्य ते शक्य झाले
निपुण धर्माधिकारी
Friday, September 06 | 02:15 PM
15 0 0
Share this story


नमस्कार. मी निपुण धर्माधिकारी. मी पुण्याचा. कॉन्व्हेंट शाळेत शिकलेला मुलगा. पुण्यात ज्या मोजक्या कॉन्व्हेंट शाळा माझ्या लहानपणी होत्या त्यापैकी एक म्हणजे विद्याभवन हायस्कूल. माझा मोठा भाऊ त्या शाळेत होता आणि शाळेत त्याची हुशार विद्यार्थ्यांमध्ये गणना होत होती, म्हणून खरं तर मला त्या शाळेत प्रवेश मिळाला होता, कारण शाळेनं घेतलेल्या मुलाखतीत आपल्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडू न देण्याची मी पुरेपूर काळजी घेतली होती. अत्यंत लाजाळू होतो मी. ज्युनियर केजी ते दहावी अशी बारा वर्षं मी त्या शाळेत होतो. पूर्णतः इंग्रजी माध्यम. तिथे सुरुवातीला मराठी बोलण्याचीही परवानगी नव्हती. शाळेत बरीच मराठी मुलं असल्यामुळे आम्ही आपापसात मराठीत बोलायचो. त्यामुळे तो नियम फार काळ टिकला नाही. नाटकाचा तर तिथे संबंधच नव्हता. आर्ट पिरियडलासुद्धा फक्त चित्रकला हा एकच विषय होता. नेमक्या त्याच विषयात मी खूपच वाईट होतो. एक साधी सरळ रेषासुद्धा मला काढता यायची नाही. मोठी-मोठी चित्रं मी डोळ्यांसमोर उभी करायचो, मनातल्या मनात ती छान रंगवायचो. पण ती माझ्या हातातून कागदावर उतरायची नाहीत. चित्रकलेचे मार्क मोजले जात नव्हते तेव्हा मी वर्गात पहिला-दुसरा यायचो आणि ज्या वर्षीपासून चित्रकलेचे मार्क धरले जाऊ लागले तेव्हापासून माझा नंबर चौथा-पाचवा यायला लागला. हे मी यासाठी सांगतोय की कला, अभिनय, नाटक, साहित्य वगैरे गोष्टींशी माझा दूरदूरपर्यंत काहीही संबंध नव्हता. लोकांसमोर स्टेजवर उभं राहून काही करायचं म्हणजे माझ्यासाठी अशक्य गोष्ट होती. मला लोकांसमोर यायला अजिबात आवडायचं नाही, काहीतरी सादर करून दाखवणं तर त्याहून आवडायचं नाही. शाळेतील कवितावाचनस्पर्धेसाठी आई-बाबांनी एक कविता चांगली घोटून घेतली होती पण वर्गात ती कविता म्हणून दाखवायची वेळ आली तेव्हा मी उभाच राहिलो नाही. तिसरीत असताना आमच्या वर्गावर ज्या बाई आल्या त्या स्वतः खूप छान गायच्या. त्या मला एकदा म्हणाल्या की तू चांगला गातोस. हे मी घरी आईला जाऊन सांगितलं तर तिनं माझ्याकडून ‘हमको मन की शक्ती देना’ हे गाणं पाठच करून घेतलं आणि गाण्याच्या स्पर्धेसाठी तयार केलं. परंतु पुन्हा तेच. वर्गात निवडचाचणी होती तेव्हा मला गाणं पाठ असूनही मी उभाच राहिलो नाही. का कुणास ठाऊक? त्या बाईंनी मला जवळ बोलावलं आणि तू काही म्हणून दाखवणार आहेस का, असं मायेनं विचारलं. कदाचित माझा लाजाळूपणा, स्टेजबद्दल असणारी भीती त्यांना समजली असावी. माझ्यावर विश्वास दाखवून त्यांनी माझं नाव पुढे ढकललं. ती माझ्या आयुष्यातील स्टेजवर जाण्याची पहिलीच वेळ होती. समोर खूप विद्यार्थी बसले होते एवढंच मला आठवतंय कारण नंतर मी त्यांच्याकडे बघितलंच नाही. मी फक्त माइककडे बघत गात राहिलो. इतका जवळून की त्याच्या आतल्या तारा दिसत होत्या. त्यावरच नजर स्थिर करून मी गायलो आणि निकाल जाहीर झाला तेव्हा माझा पहिला नंबर आला होता. तिथपासून जरा माझी भीती कमी होत गेली. त्या स्पर्धेत बक्षीस मिळाल्यावर आईनं माझी गाण्याची शिकवणी सुरू केली. परीक्षेसाठी म्हणून नाही तर आपण आपल्यासाठी गायचं असं ठरलं. गाणं येऊ लागलं तसं गाण्याच्या स्पर्धेत भाग घेणं नित्याचं झालं.शाळेत गाण्याच्या स्पर्धेत भाग घ्यायचो आणि दरवेळी काही ना काही बक्षीस मिळायचं. मात्र अजूनही नाटक हा विषय माझ्या आयुष्यात आलेला नव्हता. कुटुंबातील कुणीही या क्षेत्रात नव्हतं.
गणेशोत्सवात पुणे फेस्टिव्हल खूप जोरदार असायचा. सांस्कृतिक कार्यक्रमांची तर नुसती रेलचेल असायची. तिथे ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’चा प्रयोग होता. मी तेव्हा सहावीत होतो. मला अजिबात तिथे जायचं नव्हतं आणि कार्यक्रम बघण्यातही मला रस नव्हता. आई-बाबांनी बळेबळेच मला तिकडे नेलं. तिकडे पोहोचलो तेव्हा माझा मूड पार गेलेला होता. मात्र प्रा. लक्ष्मण देशपांडे समोर आले, त्यांनी बोलायला सुरुवात केली आणि काय सांगू तुम्हाला! तो कार्यक्रम संपेपर्यंत मी जागचा हललो नाही. मला ते इतकं आवडलं की त्याच्या पुढच्याच आठवड्यात मी त्या कार्यक्रमाची कॅसेट विकत आणली आणि मग अक्षरशः हजारो पारायणं केली. रोज शाळेतून आल्यावर कॅसेट लावायचो. लवकरच मला अख्खं नाटक एकदम तोंडपाठ झालं. एकदा वर्गात ऑफ पिरियडला मी माझ्या शेजारच्या मुलाला ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’चे एकेक भाग करून दाखवत होतो. आमच्या मॉनिटरनं ते पाहिलं आणि मला वर्गात सगळ्या मुलांसमोर करून दाखवायला सांगितलं. त्या निमित्तानं तरी सगळी मुलं शांत बसतील. सर्वांना ते खूपच आवडलं. मग ती बातमी बाईंपर्यंत पोहोचली. दुसऱ्या दिवशी बाईंनी पुन्हा वर्गासमोर करून दाखवायला सांगितलं. त्यांनाही ते आवडलं. नंतर असं होऊ लागलं की कुठल्या वर्गावर बाई आल्या नाहीत तर मला बोलावलं जायचं आणि ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ सादर करायला सांगितलं जायचं. त्यासाठी मी शाळेत ‘फेमस’ झालो. वर्गातल्या मुलांच्या सांगण्यावरून आमच्या ओळखीतील एका काकांनी मला त्या वर्षी त्यांच्या गणेशोत्सवमंडळात हाच कार्यक्रम सादर करायला बोलावलं. यात स्टेजची भीती कधी पळून गेली माझं मलाही कळलं नाही. मी तिकडे गेलो आणि कार्यक्रम सादर केला. तो माझा पहिला कार्यक्रम, जो मी एकट्यानं दीड तास परफॉर्म केला. तो छान झाला, लोकांना आवडला. मलाही मजा आली होती. निघताना त्या काकांनी मला पाकीट दिलं. घरी येऊन बघतो तर त्यात एक हजार रुपये होते. माझी पहिली कमाई. मला खूप छान वाटलं. मग आणखी एक-दोन ठिकाणी मला गणेशोत्सवात बोलावलं गेलं. त्या वर्षी माझी कमाई चांगली झाली होती. मग तो सिलसिला सुरूच झाला. अख्खं नाटक पाठ होतंच. त्यामुळे अनेक ठिकाणी मी ते सादर करायचो. यात शाळेची वर्षं सरली आणि मी ‘बीएमसीसी’मध्ये (बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स) कॉमर्सला प्रवेश घेतला. त्या कॉलेजचं सांस्कृतिक मंडळ खूपच सक्रिय होतं. जोमात काम सुरू होतं. शाळेतल्या माझ्या मित्रांपैकी कुणीच कॉमर्सला आले नव्हते त्यामुळे कॉलेजमध्ये मी अगदी एकटा पडलो होतो. कॉमर्सला येऊन चूक केली की काय असं वाटत असतानाच माझी ओळख झाली ती दोन अशा मुलांशी ज्यांच्यामुळे मला एक वेगळीच दिशा मिळाली – ते मित्र होते सारंग साठे आणि अमेय वाघ. त्यांच्या ग्रुपमध्ये मी गेलो आणि तिथेच रमलो. त्याविषयी अधिक पुढच्या भागात.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link