Next
स्वतःच्या ओळखीचा ‘कोडमंत्र’
शब्दांकन : मनीषा नित्सुरे-जोशी
Friday, August 30 | 02:15 PM
15 0 0
Share this story


नमस्कार! ‘कोडमंत्र’ नाटकाबद्दल मी मागच्या भागात बोलले होते. माझ्या संस्थेची निर्मिती असलेलं ते सगळ्यात मोठं नाटक होतं. अर्थात दिनू पेडणेकरकाकांच्या मदतीशिवाय ते शक्य नव्हतं. ते नाटक पहिल्या प्रयोगापासून हिट ठरलं.
नेहमीचे प्रयोग तर हाऊसफुल असायचेच, शिवाय लोकाग्रहास्तव त्या नाटकाचे अनेक प्रयोग आम्ही केले. त्या नाटकाला बाहेरून खूप मागणी यायची, पण पन्नास-साठ जणांचा ताफा घेऊन परदेशात जाणं मला शक्य नव्हतं. लोक असंही सुचवायचे की तुम्ही त्या नाटकातील मुख्य कलाकार घेऊन इकडे या आणि सहकलाकार म्हणून आमच्याकडचे हौशी कलाकार घ्या. पण मला ती सूचना फारशी पटली नाही. माझ्या नाटकातील प्रत्येक कलाकार, मग त्याचं काम मोठं असो किंवा लहान भूमिका असो, प्रत्येक जण महत्त्वाचा होता. निर्माती म्हणून काम करताना एक गोष्ट मला या काळात जाणवली ती म्हणजे मी पूर्णवेळ तिथे असले पाहिजे. दर्जा टिकवण्याची जी धडपड होती ते काम किंवा ती जबाबदारी दुसऱ्या कुणावर टाकता येणार नाही हे लक्षात आलं आणि मी निर्णय घेतला की माझी निर्मिती असलेल्या नाटकात मी काम करेन आणि त्यावेळी दुसरं कुठलं काम घेणार नाही. हा निर्णय घेतल्यावर निर्माती म्हणून मी प्रत्येक गोष्ट पारखून घेऊ लागले. हवं तसं नाटक मिळेपर्यंत थांबायचं, हेही मी ठरवलं. पूर्ण समर्पित भावनेनं नाटक करत असताना मग चित्रपटांसाठी वेळ देऊ शकायचे नाही. एकदा ड्रायव्हिंग सीटवर बसल्यावर तुम्हाला रस्त्यावरून चालणाऱ्यांच्या चुका कळतात, तसं निर्माती झाल्यावर मी निर्मात्याच्या दृष्टिकोनातून कलाकृतीकडे पाहू लागले आणि माझ्या लक्षात आलं की चित्रपटाच्या शूटिंगसाठी ‘शनिवार-रविवार मला जमणार नाही’ असं म्हणणं किंवा लोकेशन बदलणं हे निर्मात्याला महागात पडू शकतं. त्यामुळे आता चांगले चित्रपट येताहेत तर मग दुसरी मोठी जबाबदारी घेऊन चालणार नाही. ‘कोडमंत्र’नंतर मी नाटकाच्या निर्मितीचं काम थोडे दिवस थांबवलं. चित्रपट करताना एकीकडे नाटक करत राहणं मला जमणार नव्हतं. दोन्ही ठिकाणी पुरेसा वेळ देणं मला एक निर्माती म्हणून आणि एक कलाकार म्हणूनही आवश्यक वाटतं. घाईघाईनं नाटक करणार नाही असा निर्णय मी आताच्या घडीला घेतला आहे. ‘कोडमंत्र’ संपल्यानंतर मी एका वर्षात वेगवेगळे चित्रपट केले.
लवकरच माझ्या वेब सीरिजचं चित्रीकरणही सुरू होणार आहे. हिंदीसाठी ज्या ऑडिशन द्यायच्या होत्या, त्या देऊन झाल्या आहेत. नाटकाचे प्रयोग तूर्तास थांबवून मी इतर शक्यता पडताळून पाहत आहे. नाटकापासून मी किती दिवस दूर राहू शकेन माहीत नाही, परंतु सध्यातरी मी वेगळ्या अर्थानं काही इतर गोष्टी ‘ट्राय’ करून पाहत आहे. वयाच्या छान टप्प्यात असल्यामुळे आता आणखी प्रगल्भता आली आहे. टिनीमिनी गोष्टी, अल्लडपणा, स्वप्नाळू दिवस, लग्न, संसार यांपेक्षा वेगळे विषय आता सापडत आहेत. अधिक आव्हानात्मक भूमिका मिळू लागल्या आहेत. नुकत्याच येऊन गेलेल्या ‘स्माइल प्लीज’ चित्रपटात खूप वेगळी भूमिका होती किंवा ‘रुद्रम’सारखा रोल असेल, अमुक एक भूमिका मुक्ताच करू शकते हा विश्वास व्यक्त केला जातो तेव्हा मला खूप छान वाटतं. ‘आम्ही दोघी’ चित्रपटाच्या आसपासच ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ प्रदर्शित झाला होता. इतक्या भिन्न भूमिका करायला मिळाल्या याचा नक्कीच आनंद वाटतो. मी मुंबईत आल्यापासून आजपर्यंत केलेल्या माझ्या सर्व लहान-सहान भूमिकाही प्रेक्षकांनी उचलून धरल्या, त्यांनी त्यात्या भूमिकेमध्ये मला स्वीकारलं, माझं कौतुक केलं, समीक्षकांनी वेळोवेळी गौरवलं हे मला माझं भाग्य वाटतं. प्रत्येक कलाकाराला वाटत असतं की आपल्यासाठी काहीतरी लिहिलं जावं. तर आता तेही होताना दिसतंय. ‘तुला डोळ्यांसमोर ठेवून भूमिका लिहिली आहे’ असं कुणी सांगतं किंवा निर्माता म्हणतो, हे दोन कलाकार मला हवे आहेत आणि त्यातली एक मुक्ता आहे, तेव्हा चांगलं वाटतं. हा एक नवीन टप्पा आहे. अजून बराच मोठा प्रवास करायचा आहे. पस्तिशीच्या उंबरठ्यावर असताना मला दोन भाग दिसतात. एक म्हणजे आतापर्यंत केलेल्या कामांतून मिळालेली ओळख आणि दुसरा भाग हा की आता माझी जबाबदारी आहे की काहीतरी नवीन, वेगळं करून, आजमावून पाहण्याची. प्रेक्षकांना, दिग्दर्शक-निर्मात्यांना ‘अरे, मुक्ता हेपण करू शकते’ असं वाटेल, असं मला काहीतरी करायला आवडेल, ज्यातून एक नवीन दालन माझ्यासाठी खुलं होईल.
सर्वसाधारणपणे तिशी-पस्तिशीनंतर बायका असा विचार करतात की आता कुठे काही नवीन करायचं, जे चालू आहे तेच करत राहायचं किंवा एक मरगळ आलेली दिसते. मात्र मला वाटतं की या टप्प्यावर अधिक उत्कटतेनं तुम्ही नवीन काहीतरी करू शकता. मी माझे जुने फोटो बघते तेव्हा मुंबईत आलेली विशीतली मी आणि आजची मी यात मला खूप फरक दिसतो. डोळ्यांत मला एक प्रगल्भता जाणवते, नजरेत ठामपणा आलेला दिसतो, विचारांमध्ये स्पष्टता आलेली दिसते. म्हणजे विशी-पंचविशीत जे धुकं होतं ते गेलं आणि माझं आकाश आता मला स्पष्टपणे दिसतंय. एखाद्या गोष्टीला नाही म्हणण्याचं धाडस आणि त्याचं समर्थन करण्याचं बळ आज माझ्यात आहे. हेच तुम्ही विशीत असताना म्हटलं असतं, तर ‘किती माज आहे हिला’ असं लोक म्हणाले असते. परंतु आता ‘ही समजून-उमजून निर्णय घेते’ असंही म्हणतात. या वयात आपण आपल्याला जेवढे छान कळलेले असतो तेवढे यापूर्वी कळलेले नसतो. अठरा वर्षांपूर्वी ‘माझं काय चाललंय, मलाच माहीत नाही’ अशी अवस्था होती. आज मात्र ते पक्कं ठाऊक असतं. विचारांमध्येही एक स्थैर्य आलेलं असतं. म्हणून या वयात तुम्ही स्वतःला छान न्याय दिला पाहिजे. माझ्या बाबतीत आणखी एक जमेची बाजू होती ती म्हणजे माझे आई-बाबा. ‘जग असं जगतं म्हणून तूही तसंच जग’ अशी माझ्या आई-बाबांनी कधीही सक्ती केली नाही. ज्या ज्या क्षणी तुला छान जगावंसं वाटेल, त्या त्या क्षणी तू छान जगलं पाहिजेस हाच कानमंत्र त्यांनी मला दिला. दहा वर्षांपूर्वी त्यांना लोक मुद्दाम विचारायचे, ‘लग्नाचं वगैरे बघताय का हिच्या’, तेव्हाही माझी आई सांगायची, की ‘आम्हाला नाही वाटत की त्यातच सगळं आहे. ती छानच जगतेय. आम्हाला कौतुक वाटतं तिचं!’ हा टोन असला की मुलांनाही ताण येत नाही. करिअरच्या दृष्टीनं बोलायचं झालं तर हा टप्पा मला खूपच छान आणि आशादायक वाटतो, वेगळ्या पद्धतीनं स्वतःला शोधण्याचा वाटतो. त्यामुळेच कदाचित वेगवेगळ्या माध्यमांतून एक कलाकार म्हणून मी स्वतःला ‘एक्स्प्लोर’ करून बघतेय. आतापर्यंतच्या प्रवासात तुम्ही प्रेक्षकांनी खूप कौतुक केलं म्हणून हा मार्ग सोपा होत गेला. इथून पुढेही तुमच्याकडून असंच कौतुक आणि शाबासकी मिळत राहो, अशी प्रार्थना करते आणि थांबते.
(समाप्त)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link