Next
एका अवलियाची एक्झिट
जयश्री देसाई
Friday, October 04 | 03:30 PM
15 0 0
Share this story
शुभा खोटे म्हणजे एक हसरं, धमाल, लहान मुलांसारख्या व्रात्य खोड्या करणारं व्यक्तिमत्त्व. परंतु परवा मी त्यांना भेटले तेव्हा हे हसरं झाड पार कोसळलं होतं. डोळ्यांतून सतत वाहणाऱ्या आसवांनी चिंब भिजलं होतं आणि ते स्वाभाविकही होतं, त्यांचा अत्यंत लाडका छोटा भाऊ आणि प्रतिभावान अभिनेते विजू खोटे हे दिगंताच्या प्रवासाला निघून गेले होते. अत्यंत हळव्या स्वरात त्या म्हणाल्या, “आमचं एकत्र कुटुंब असल्यानं आमच्या घरी अगदी आमची पणजी, आजी, काका, आई-बाबा, आम्ही, एक चुलत भावंड अशी खूप सारी माणसं होती. एकेक करत सगळी निघून गेली. एकमेव विजू उरला होता. परंतु आता तोही निघून गेला. मी पूर्णपणे एकटी पडले. मला खूप एकाकी वाटतंय... त्याच्या अंतिम संस्कारानंतर जेव्हा आम्ही घरी यायला निघालो तेव्हा गावदेवीहून वरळी सी लिंकनं येताना माझी अवस्था इतकी वाईट झाली... कारण डोळे बंद केले तर तो असा मृत्युशय्येवर पडलेला दिसत होता आणि डोळे उघडले तर बाहेर दिसणाऱ्या प्रत्येक ठिकाणी मला आम्ही तिथे कसे गेलो आणि काय केलं ते आठवत होतं... प्रत्येक ठिकाणी तो माझ्याबरोबर असायचाच. आता तो नाहीय हे मी पचवूच शकत नाही.”
शुभाताई सांगत होत्या, “आमच्यात मी मोठी. मला धाकटा भाऊच हवा होता. त्यासाठी मी अक्षरशः सगळ्यांचं डोकं खाल्लं होतं. अखेर देवानं माझं ऐकलं. मला छानसा छोटासा भाऊ दिला. त्याचं नावही आत्यानं नाही, मी ठेवलंय. आईचा खूप लाडका होता तो. आमच्या दोघांमध्ये तर इतका घट्ट बंध होता की आम्ही खूप धमाल करायचो. मी टॉम बॉयच होते. शॉर्ट्स आणि शर्टातच असायचे आणि त्याचा माझ्यावर इतका जीव होता की त्याला नवीन कपडे आणले तर तो ते आधी मला घालायला द्यायचा. मी जे करीन त्याचं त्याला प्रचंड कौतुक असायचं. साधं मी जर सहज कुणाला म्हटलं की या जेवायला. तर तो माझ्या स्वयंपाकाचंही इतकं तोंड भरून कौतुक करायचा. माझंच नाही, माझी लेक भावनाचंसुद्धा त्याला असंच कौतुक होतं. तिनं केलेलं एखादं काम त्याला आवडलं की दुसऱ्या दिवशी तो आपल्या भाचीचं कौतुक करायला केक घेऊन आलाच म्हणून समजा. तिला असलेली नृत्याची आवडही त्याच्याकडूनच आलीय. तो नृत्य शिकला नव्हता, ही शिकलीय. एवढाच फरक! तोही उत्तम नृत्य करायचा. एकदा तर तो स्टेजवर इतका धमाल नाचत होता की शामक डावरला विनंती करावी लागली की विजूभाईंना स्टेज सोडायला सांगा नाही तर आमच्याकडे कुणी लक्षच देत नाहीय. तो बॉक्सिंग चम्पियन होता. कॉलेजमध्ये असताना एनसीसीत होता. त्याला भटकायला खूप आवडायचं. लग्न होईपर्यंत मी कुठेच फिरले नव्हते. तो मात्र सगळ्या देशभर भटकून आला होता. अतिशय हजरजबाबी होता आणि अगदी शेवटचा महिनाभर बिछान्यात पडून असतानाही त्याचा तो हजरजबाबीपणा टिकून होता.”
“मी चित्रपटांत काम करायला लागले तेव्हा सगळी शूटिंग्स पश्चिम उपनगरांत चालायची. त्यासाठी जवळ पडेल म्हणून लग्नाआधी मी सांताक्रुझला बंगला बांधला होता.” असं सांगून त्या पुढे म्हणाल्या, “विजू कितीदा तरी तिथे येऊन राहायचा. त्याला एका ड्रम फक्टरीत कामाला लावलं होतं. त्या ड्रमच्या आवाजाचा त्याला इतका त्रास व्हायचा. मग तो माझ्या सांताक्रुझच्या घरी येऊन शांत झोपायचा. आमची दोघांचीही सगळी सुख-दुःखं आम्ही एकमेकांना सांगायचो. अगदी बारीकसारीक गोष्टीसुद्धा. आता त्या मी कोणाला सांगू?” हे म्हणता म्हणता परत शुभाताईंचे डोळे भरून आले.  
त्या सांगत होत्या, “ माझे वडील हे मूकपटाच्या काळातील जबरदस्त अभिनेते होते. त्यांची निर्मिती-दिग्दर्शन असलेल्या ‘ती आणि ते’ या चित्रपटात हौस म्हणून मी व विजूनं काम केलं होतं. तेव्हा मी १० वर्षांची होते तर विजू ५ वर्षांचा. आम्ही हिरॉईनची भावंडं झालो होतो. त्यावेळी खरं तर त्याला जबरदस्त डांग्या खोकला झाला होता. तरीही जिद्दीनं त्यानं ते काम केलं होतं. मी कधीतरी भारतीय विद्याभवनमध्ये जाऊन गाणं शिकायचे. मला खूप आवड होती. विजूलाही गाण्याची आवड होती पण तो गाऊ शकायचा नाही. मात्र सूर कसा यायला हवा किंवा एखादी तान, मींड कशी यायला हवी हे तो बरोब्बर सांगू शकायचा.” गाजलेल्या ‘सीमा’च्या वेळची आठवण जागवताना त्या म्हणाल्या, “सीमा हा चित्रपट अमिय चक्रवर्ती करत होते. त्यांनी माझे सायकलिंगचे फोटो पाहून त्यांचे वितरक एम.व्ही. कामत यांच्याबरोबर निरोप पाठवला. ते माझ्या वडिलांना ओळखत होते. ते घरी आले तेव्हा बाबा घरी नव्हते आणि मी व विजू उश्या एकमेकांवर फेकून मारामाऱ्या करत होतो. अशी धमाल आम्ही खूप केली. मोठेपणीपण केली. आम्ही दोघंही ‘जबान सम्हाल के’ करत असताना आम्ही एक खूण ठरवून टाकली होती. गंमत करायची लहर आली की मी त्याला एक खोटीखोटी ठेवून द्यायचे. मग तो चिडल्याचं नाटक करून एका कोपऱ्यात जाऊन बसायचा. मी धुसफुसत दुसऱ्या कोपऱ्यात जाऊन बसायचे. मग काही जण त्याला समजवायला जायचे, तर काही जण मला समजवायला यायचे. आम्ही मनातल्या मनात हसत असायचो. पण आमच्यात कोणत्याच कारणावरून खरी भांडाभांडी झाली नाही.”  याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान शुभाताईंना पहिला भीषण अपघात घडला. त्यातील चोराला पकडण्याच्या सीनच्या चित्रीकरणादरम्यान त्या तोल जाऊन वेगात बाजूच्या खडीमध्ये फेकल्या गेल्या. त्यांचा पूर्ण चेहरा फाटला. अगदी नाकाच्या आतूनही टाके घालावे लागले. आपण पुन्हा अभिनय करू शकू असंच त्यांना वाटेना. त्या आठवणींबद्दल त्यांनी सांगितलं, “त्या पूर्ण काळात मी घरी होते आणि विजू माझ्या उशापायथ्याशी बसून माझी सेवा करत होता. नंतरही मी जेव्हा जेव्हा आजारी होते किंवा अपघातग्रस्त झाले तेव्हा तेव्हा तो रोज, कितीही काम असलं तरी हॉस्पिटलमध्ये मला बघायला येणारच. अशी माझीच नाही तर त्याने सगळ्यांचीच खूप सेवा केली. आमच्या आईला डायबेटीस झाला होता. गँगरीन झाल्यानं तिचा एक पाय कापावा लागला होता. काकांना कॅन्सर झाला होता. वडीलसुद्धा शेवटी खूप आजारी होते. त्याची बायको खूप आजारी झाली.  त्यातच गेली. या सगळ्यांची त्यानं इतकी मनापसून सेवा केली. तरी त्याच्या वाट्याला अशा यातना का याव्यात हेच समजत नाही. त्याच्या पायाला वेदना होत होत्या, काठी घेऊन चालायचा, त्याची अँजिओप्लास्टी झाली होती, आईप्रमाणेच त्याला डायबेटीस होता, त्याची किडणी आणि लिव्हर  खराब झालं होतं. शेवटी शेवटी तर बघवत नव्हतं त्याच्याकडे. त्याला खाण्याची खूप आवड. त्याला व मला नॉन व्हेज जास्त आवडायचं. मुंबईत कुठे काय चांगलं खायला मिळतं ते विजूला विचारा असं इंडस्ट्रीत सगळे म्हणायचे. आम्ही दोघं त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन खाऊन आलोय. आणि शेवटी त्याचं खाणंच बंद झालं! काही खायचाच नाही. तो गेला त्याच्या तीन दिवस आधी आम्ही सगळे भेटायला गेलो होतो. माझ्या सुनेनं डाळ-भातापासून सगळा डबा घेतला होता. तो नकोच म्हणत होता, पण मी आग्रहानं त्यातली थोडी डाळ त्याला चमच्यानं भरवू शकले तेवढंच. त्याचे मित्र भरत दाभोळकर त्याच्या जाण्याच्या दोन दिवस आधी त्याला जिंजर बिस्किट्स आणि मावा केक घेऊन गेले होते. त्याची अवस्था गंभीर होती. त्यांना बरं वाटावं म्हणून त्यानं त्यातलं अर्धं बिस्कीट व केकचा छोटासा तुकडा खाल्ला. हे कोमल हृदय म्हणजे विजू. खूपच हळवा होता. कुणाला कधी दुखावलं नाही त्यानं.  अगदी मरतानाही.... शेवटी मात्र इतका कंटाळला होता की मृत्यूची याचना करत होता. आम्हाला म्हणायचा अंगारकी कधी आहे? मला अंगारकीला जायचंय. तो गणेशभक्त होता. मग अंगारकी गेल्यावर म्हणायला लागला सर्वपित्री कधी आहे? पुण्यवान होता. नवरात्र लागलं आणि तो गेलाच...’ हे सांगतानाही त्या महत्प्रयासानं अश्रू आवरत होत्या.
माणूस म्हणून तर ते मोठे होतेच, कलाकार म्हणूनही श्रेष्ठ होते. त्यांचा ‘शोले’तला कालिया कुणी आजही विसरू शकत नाही. त्याबद्दल शुभाताई म्हणाल्या, “त्यानं अमजद खान यांच्याबरोबर एका नाटकात काम केलं होतं त्यामुळे त्यांनी रमेश सिप्पींना त्याचं नाव सुचवलं. त्या शूटिंगच्या दरम्यान घोड्यावरून तो चार-पाचदा पडला, पण त्यानं सगळं हसत हसत सहन केलं. त्याची ‘कसौटी’मधली भूमिकाही मला खूप आवडते. एका तोतऱ्याची भूमिका त्यानं त्यात केली होती. अगदी सौम्यपणे. तो चित्रपट चालला नाही, पण मला त्याची ती भूमिका खूप आवडते. ‘या मालक’ चित्रपटात त्यानं मेहमूदबरोबर केलेली धमालही अप्रतिम. ‘वक्त हमारा है’, ‘शरारत’ अशा काही चित्रपटांत आम्ही पडद्यावरही बहीण-भावाचंच काम केलं. ते क्षणही माझ्यासाठी अविस्मरणीय आहेत.
“नाटकांतही आम्ही एकत्र काम केली. त्याचं ते टायमिंगही अफलातून. मात्र मला वाईट वाटतं आणि माझा जावई करण शहा, ज्याच्या ‘ नो प्रॉब्लेम’ नाटकांत त्यानं काम केलं होतं. त्यालाही हेच वाटतं की विजूची एक कलाकार म्हणून जेवढी जबरदस्त क्षमता होती तिला न्याय मिळेल अशी फार कमी कामं त्याच्या वाट्याला आली. तुम्हाला माहीत आहे, भरत दाभोळकर यांच्या ‘बॉटम्स अप’ नाटकात त्यानं काम केलं होतं. खरं तर तो ३५ वर्षांपूर्वी कुणाच्या तरी बदली असा ते काम करायला गेला होता आणि पुढे त्या नाटकात शेवटपर्यंत राहिला. अमेरिकेत सॅन जोसे इथे याच नाटकाचा प्रयोग असताना त्याच्या एन्ट्रीला तब्बल सात मिनिटांचं ‘स्टँडिंग ओव्हेशन’ मिळालं होतं. शेवटी त्याला लोकांना विनंती करावी लागली होती की ‘खाली बसा म्हणजे आम्हाला नाटक पुढे नेता येईल.” याच नव्हे तर आणखी २५ नाटकांत त्यानं त्यांच्याबरोबर काम केलं. जगभर त्यानं या नाटकांचे हजारो प्रयोग केले. त्याचं फॅन फॉलोइंग जबरदस्त होतं. त्याचेही खूप किस्से सांगता येतील. एकदा तर कानपूरमध्ये तो स्थानिक रेस्तराँमध्ये ब्रेकफास्ट करायला बसला, तेव्हा चाहत्यांनी तिथे इतकी गर्दी केली की पोलिस बंदोबस्त लावावा लागला व त्याला कडक बंदोबस्तात सुरक्षितस्थळी हलवायला लागलं. त्याच्या अभिनयक्षमतेमुळे शेवटपर्यंत त्याला कामं येत होती. परंतु तब्येतीनं साथ नाही दिली... त्यानं कायम सगळ्यांना समजून घेतलं, कायम सगळ्यांना हसवलं...आणि आज मात्र सगळ्यांना रडत ठेवून तो निघून गेलाय... त्याच्या जाण्यानं माझ्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी तर कधीच न भरणारी...”
हे दुःख शब्दांच्या पलीकडले... त्याला काळ हेच औषध ....नाही का? ‘कालिया’ची ही एक्झिट मात्र सगळ्यांनाच चटका लावून गेली हे निश्चित! त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link