Next
अभियनक्षेत्रात ‘अफलातून’ प्रवेश
सुनील बर्वे
Friday, January 04 | 05:00 PM
15 0 0
Share this story

ते साल होतं १९८५. ‘अफलातून’ या नव्या नाटकासाठी विनय आपटे कलाकारांची मोट बांधत होते. त्या नाटकासाठी त्यांना गायक-नट हवा होता. मी गाण्याच्या परीक्षा दिलेल्या होत्या आणि लिटिल थिएटरचं नाट्यशिबीरही केलं होतं. त्या शिबिरातून मला संजय क्षेमकल्याणी विनय आपटेंकडे घेऊन गेले. तिथे विनय आपटे, आनंद मोडक, विक्रम भागवत, दिलीप कुलकर्णी असे सगळे दिग्गज जमले होते. त्यांनी माझी ऑडिशन घेतली. मला आठवतंय मी ‘दयाघना’ गाणं गायलं होतं. ते ऐकून आनंद मोडक यांनी, “अरे हा मुलगा चांगला गातोय. घेउया याला.” अशी पसंतीची पावती दिली आणि माझी निवड झाली. ते माझं पाहिलं नाटक.

रंगभूमीवरच्या माझ्या प्रवेशाची ती सुरुवात होती. त्याआधी खूप नाटकं पाहिलेली होती, नाटकातून कामं केली होती, नाटकात भाग घेत होतो, असं काहीच नव्हतं खरं तर. त्यावेळी फक्त गाणं आणि शिक्षण चालू होतं. सुट्टीत नाट्यशिबीर केलं आणि एकदम कलाटणी मिळावी तसं झालं व मी अचानक नाटकात आलो, जो आजतागायत टिकून आहे. अभिनयात करिअर घडेल याची कल्पनाही नव्हती. आमच्या ‘अफलातून’ नाटकाच्या रीतसर तालमी सुरू झाल्या आणि मला नाटक आवडू लागलं. या क्षेत्राविषयी कुतूहल निर्माण होत गेलं आणि ते बऱ्यापैकी शमलं, कारण विनय आपटेंसारख्या दिग्दर्शकाची साथ होती. त्यांनी दोन पायांवर ठामपणे उभं राहायला शिकवलं, शब्दोच्चारावर काम करायला शिकवलं, जे ज्ञान नव्हतं ते त्यांच्यामुळे मिळत गेलं आणि मी वेचत गेलो. मग त्यांच्याबरोबर आम्ही खूप फिरायचो. तेव्हा ते दूरदर्शनवर काम करायचे. मी, सचिन खेडेकर, राजा देशपांडे आम्ही त्यांच्याबरोबर साहाय्यक म्हणून जायचो. त्या सुमारास त्यांनी दूरदर्शनवर ‘चाळ नावाची वाचाळ वस्ती’ या मालिकेची निर्मिती केली. मराठीतील सगळी वल्ली माणसं त्यात होती. आम्ही त्यात नाक्यावरची टपोरी पोरं म्हणून रुजू झालो. ती माझी पहिली टीव्ही मालिका. तेव्हा मी बी.एस्सी. केमिस्ट्री करत होतो. त्या मालिकेदरम्यान कॅमेऱ्याच्या मागं काम करणं असेल, कलाकारांकडून वाक्य म्हणून घेणं असेल, मालिकेच्या दोन भागांमधील साधर्म्य दाखवणारं लिखाण करणं असेल, हे सगळं मी विनय आपटेंच्या बरोबरीनं करत होतो. मग आम्ही एडिटिंगसुद्धा करू लागलो. या सगळ्या गोष्टी शिकत होतो.

दरम्यान ‘मोरूची मावशी’ नाटकात प्रशांत दामले साकारत असलेली भूमिका मला मिळाली आणि त्या नाटकाचे धडाधड प्रयोग सुरू झाले. दिवसाला तीन प्रयोग व्हायचे. ते नाटक तेव्हा ‘हाउसफुल’ जात होतं. ही एप्रिल १९८७ सालची गोष्ट आहे. ‘मोरूची मावशी’ नाटक सुरू झालं आणि रोजचे प्रयोग, दौरे यात पुरता व्यग्र झालो. अचानक सुरू झालेल्या अभिनयक्षेत्रातील या प्रवासानं आता चांगला वेग पकडला होता. हे नाटक मी जून १९९० पर्यंत केलं. साधारणत: ८००-८५० प्रयोग केले. घरच्यांसाठीसुद्धा हे अनपेक्षितच होतं. वडिलांचं एकच सांगणं होतं, की ‘आधी पदवीधर हो आणि मग तुला आवडेल ते कर.’ नाटकामुळे अभ्यासाकडे थोडं दुर्लक्ष होत होतं, पण केमिस्ट्री विषय घेऊन मी बी.एस्सी. पूर्ण केलं. त्यानंतर बँकेत नोकरी मिळवण्याचा प्रयत्नही केला. तेव्हा कलाकारांची बँकेत भरती व्हायची. म्हणून मी सेन्ट्रल बँकेत अर्ज केला होता आणि माझी निवडही झाली होती, पण त्याच दरम्यान हर्षद मेहताचा मोठा घोटाळा उघड झाला आणि बँकांनी सगळी भरतीप्रक्रियाच रद्दबादल ठरवली. त्यामुळे बँकेतील नोकरीचं स्वप्न हवेतच विरलं. मग मी एम.आर. (मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह) म्हणून काही दिवस नोकरी केली खरी, पण त्यात मी रमलो नाही. माझी आवड नाटक आहे हे एव्हाना घरच्यांच्याही लक्षात आलं होतं.

‘चारचौघी’ नाटक सुरू झाल्यानंतर मात्र मी नोकरीचा विचार फारसा केला नाही. आपली नोकरी कशीबशी आटपायची आणि प्रयोगाला पळायचं हे मला पटत नव्हतं. मी घरी सांगितलं, की ‘नोकरी नसली तरी नोकरीएवढा पगार मी घरी घेऊन येईन, त्याची काळजी करू नका.’ सुदैवानं मला सतत कामं मिळत गेली. महिन्यातील पंचवीस दिवस प्रयोग करायचो. आमचं संध्याकाळी नाटक असेल तर आम्ही दुपारीच नाट्यगृहात पोहोचायचो. त्यामुळे अनेक मोठ्या कलाकारांची नाटकं जवळून पाहायला मिळाली. त्यातून लाइव्ह मनोरंजनक्षेत्राची मला गोडी लागली. सेट लावतात कसा, काढतात कसा अशा स्टेजच्या मागील गोष्टीही मी शिकून घेतल्या.

नाटक आणि दूरदर्शनमालिका असं दोन्ही सुरू असतानाच मला पहिला चित्रपट मिळाला तो सचिन पिळगावकर यांचा ‘आत्मविश्वास.’ पुन्हा एक नवीन अनुभव, नवीन क्षेत्र. त्या क्षेत्राची एक वेगळीच गंमत आहे. मी सचिनजींना खूप प्रश्न विचारून या वेगळ्या क्षेत्राविषयी माहिती करून घ्यायचो. तेही मला त्यातील तांत्रिक बाजू समजावून सांगायचे. माझा प्रवास असा वेगवेगळ्या माध्यमांतून सुरू राहिला, त्यामुळे दुसरा कोणता विचार डोक्यात आला नाही आणि मी याच क्षेत्रात करिअर करायचं हे निश्चित केलं. पुढे या क्षेत्रात अनेक वळणं आली, अनेक निर्णायक क्षण आले... त्याबद्दल बोलेनच, पुढच्या भागात.

(क्रमश:)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link